You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोलिसांनी माझ्या मुलाची जात कशी ठरवली? रोहित वेमुलाच्या आईचा सवाल
- Author, शंकर वडीशेट्टी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करत असलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याने आठ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. दलित असल्यामुळे झालेल्या भेदभावामुळे रोहितने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.
आज आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे, त्यावरून वाद सुरू झाला आहे. रोहित वेमुला हा दलित नव्हता, असं म्हणत तेलंगणा पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे या वादाला तोंड फुटलंय.
या क्लोजर रिपोर्टनुसार, रोहित वेमुलाच्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर आणि रोहित वेमुलाचं हस्तक्षार सारखं असल्याचं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (FSL) आढळलं. तसंच, रोहित वेमुला आणि इतर सगळ्यांवर नियमांनीच कारवाई करण्यात आली होती, असं क्लोजर रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलंय.
रोहित वेमुला आणि त्याच्या सोबतच्या इतर कुणावरही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, तसंच रोहित वेमुलाला कुठलीही स्कॉलरशिप नाकारण्यात आली नव्हती, असंही या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय.
रोहित वेमुलाला अनुसूचित जातीतला असल्या कारणाने त्रास दिल्याचा दावाही पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये फेटाळला आहे.
तेलंगणा सरकारने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. तेलंगाणाच्या पोलिस महासंचालकांनीही या प्रकरणी अधिक चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
दुसरीकडे रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांनी या सगळ्या पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी हे एक षड्यंत्र असल्याचं म्हटलं आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राधिका यांनी म्हटलं की, त्यांच्या मुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहील.
या मुलाखतीचा संपादित अंश :
प्रश्न : रोहितला जाऊन आठ वर्षं झाली आहेत. कसे होते हे दिवस?
राधिका वेमुला : हे सगळे दिवस अतिशय त्रासदायक होते. पोलिसांनी आता सादर केलेला रिपोर्ट तर अधिक त्रासदायक आहे. ही केस बंद करत रिपोर्ट कोर्टात सादर केल्यानंतर अनेक विद्यार्थी चिंतेत आहेत.
मला स्वतःलाही याचा त्रास होत आहे. आम्ही तातडीने तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ते आम्हाला न्याय देतील.
या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याबद्दल त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यावेळी ज्या इतर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तेही रद्द करण्याची विनंती मी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणीही लक्ष घालून न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.
प्रश्न :रोहित दलित नव्हता, असं सांगणारा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
राधिका वेमुला : हे सर्व आरोप खोटे आहेत. पोलिसांनी इतकी अचूक जात पडताळणी कशी केली? जातीचं प्रमाणपत्र तपासण्यात पोलिसांची काय भूमिका?
आम्ही 2018 सालीच जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती. 2019 मध्ये निवडणूक आणि त्यानंतर 2020 तसंच 21 मध्ये कोरोनामुळे जात पडताळणी झाली नाही.
मग पडताळणी पूर्ण झाल्याशिवायच जात कशी निश्चित केली गेली.
हे सर्व भाजपच्या षड्यंत्रामुळे होत आहे.
MC प्रवेशप्रक्रियेत त्याची ऑल इंडिया रँक ही पाचवी आहे. तो JRF मध्ये दोन वेळा पात्र ठरला होता.
रोहित वेमुलाची प्रमाणपत्रं खोटी नाहीयेत. मी या सर्व गोष्टी जनतेसमोर ठेवेन. लोकांनाच त्या लक्षात येतील. हे सगळं राजकीय कारस्थान आहे.
आम्ही दलितच आहोत. आम्ही काहीही चूक केलं नाहीये.
प्रश्न :रोहित अनुसूचित जाती नव्हता आणि हे प्रकरण बाहेर येईल, या भीतीने त्याने आत्महत्या केली, असं पोलिस सांगत आहेत.
राधिका वेमुला : जर रोहित अनुसूचित जातीचा नव्हता तर त्याला विद्यापीठात प्रवेश कसा मिळाला? त्याची प्रमाणपत्रं तपासल्यानंतरच त्याला प्रवेश देण्यात आला होता ना?
हा सगळा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.
रोहित दलित म्हणूनच जन्माला आला आणि दलित म्हणूनच गेला. जर तो अनुसूचित जातीचा नव्हता, तर त्याला निलंबित का केलं?
मृत्यूनंतर जातीवरून आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे.
प्रश्न : गुंटुरचे जिल्हाधिकारी, गुरजलाच्या तहसीलदारांनी दिलेल्या रोहितच्या जातीसंबंधीच्या रिपोर्टवरून पोलिसांनी म्हटलं की, तो वड्डेरा जातीचा होता.
राधिका वेमुला : हे कसं ठरवणार? तुम्ही मला विचारायला नको का? तुम्ही माझीही बाजू ऐकून घ्यायला नको का? गच्चीबावली पोलिसांनी कधीही माझा जवाब घेतला नाही.
रोहितच्या मृत्यूनंतर कांतिलाल दांडे गुंटूरचे जिल्हाधिकारी झाले. रोहित अनुसूचित जातीचा असल्याचं जाहीर करण्यात आलं. मग त्यांनी लगेचच हे कसं बदललं?
आता आठ वर्षांनंतर तो अनुसूचित जातीचा नव्हता हा अपप्रचार केला जात आहे.
प्रश्न : रोहितला न्याय मिळावा यासाठी तुम्ही देशभर दौरे केले. पण तुम्हाला अपेक्षित असलेला न्याय मिळाला नाही आणि आता अहवालात रोहितवरच आरोप करण्यात आले. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचे आहे?
राधिका वेमुला : हे सगळं निवडणुकीच्या काळातलं षड्यंत्र आहे. सत्तेवर आलो, तर रोहितला न्याय मिळवून देऊ, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. आता हा अहवाल म्हणजे त्यांना बाजूला करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.
प्रश्न : या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू झाल्यानंतर रोहितला न्याय मिळेल, असं तुम्हाला वाटतं का?
राधिका वेमुला : यावेळी निश्चितपणे न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. जर भाजप आणि बीआरएसच्या पूर्वग्रहांशिवाय चौकशी झाली तर न्याय होईल.
प्रश्न : न्याय म्हणजे तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे?
राधिका वेमुला : रोहित वेमुलाच्या मृत्यूसाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा व्हावी. दलित विद्यार्थ्यांवर हल्ले करणाऱ्यांना भीती वाटायला हवी.
प्रश्न : रोहितच्या मृत्यूनंतरही आयआयटीसारख्या संस्थांमध्येही दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या. याकडे तुम्ही कसं पाहता?
राधिका वेमुला : रोहित वेमुलासोबत जे घडलं, ते कोणासोबतही घडू नये म्हणून मी लढत आहे. देशातले सगळेच विद्यार्थी माझ्यासाठी रोहित सारखेच आहेत. मी माझा मुलगा गमावला आहे. कोणावरही ही वेळ येऊ नये, हीच आशा आहे
प्रश्न : तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे?
राधिका वेमुला : दिवस चालले आहेत. मी शिवणकाम करते. राजाने काही दिवस हाय कोर्टात वकिली केली. पण कुटुंबाला फार पाठिंबा नाहीये. त्यामुळे आम्ही छोटीमोठी कामंच करतोय.
प्रश्न : रोहित वेमुला अॅक्ट मागची भूमिका काय आहे?
राधिका वेमुला : हा कायदा अस्तित्वात येईल, अशी मला आशा आहे. दलित मुलांवर होणारा अन्याय त्याने थांबेल. त्यामुळेच मला हा कायदा अस्तित्वात यावा असं वाटतंय.