You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तैवानमध्ये गेल्या 25 वर्षांतला सर्वात मोठा भूकंप, त्सुनामीचा इशारा
तैवानमध्ये गेल्या 25 वर्षांतील सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. तैवानच्या पूर्व किनाऱ्याला 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
किनारपट्टीवरील गावं आणि शेजारील देशांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
तैवानच्या हुयालिअन शहरापासून 18 किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र असल्याचे अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनी म्हटले आहे.
गेल्या 25 वर्षांतील हा सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जपानच्या वायव्य किनारपट्टीवर अंदाजे 9 फूट उंचीच्या त्सुनामीच्या लाटा येऊ शकतात असा इशारा जपानच्या हवामान खात्याने दिला आहे.
फिलीपाइनच्या भूगर्भ विज्ञान विभागाने त्सुनामीचा इशारा दिला आहे.
चीनमधील फुजिआन प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे चीनमधील स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
भूकंपाचे केंद्र हे जमिनीपासून जवळ आहे. संपूर्ण तैवान आणि बेटांवर हे धक्के जाणवले आहेत, असं भूगर्भ विभागाचे संचालक वू चिएन फू यांनी म्हटले आहे.
जपानचे सरकारी माध्यम एनएचकेनुसार त्सुनामी सकाळी 9.30 च्या सुमारास इरिओमोटे आणि इशिगाकी बेटांवर धडकू शकते आणि सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मियाकोजिमा आणि ओकिनावाच्या मुख्य बेटांवर पोहोचू शकते.
इथं राहाणाऱ्या लोकांना सावध राहाण्याची सूचना देण्यात आली आहे, कारण 2011 साली मार्चमध्ये तोहोकूमध्ये भूकंप आल्यानंतर सुरुवातीला काही सेंटीमीटर उंचीच्या लाटा आल्या मात्र त्याचं रुपांतर नंतर त्सुनामीमध्ये झालं.
11 मार्च 2011 साली जपानच्या ईशान्य किनाऱ्यावर आलेल्या भूकंपाला सर्वात मोठा भूकंर मानला जातो. त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे नजिकच्या भूतकाळातलं एक मोठं आण्विकसंकट अनुभवयाला मिळालं होतं.
या त्सुनामीमुळे फुकुशिमामधील अणूभट्टीतील वीजपुरवठा बंद झाला आणि तेथे किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली. त्यामुळे या प्रदेशाला नो फ्लाय झोन घोषित करुन आजूबाजूची वस्ती मोकळी करण्याची वेळ जपान सरकारवर आली.
रशियाच्या चेर्नोबिल दुर्घटनेनंतरचं हे सर्वात वाईट संकट मानलं जातं.