शिर्डी लोकसभा निकाल : भाऊसाहेब वाकचौरेंनी केला सदाशिव लोखंडेंचा 50 हजारांच्या फरकाने पराभव

फोटो स्रोत, FACEBOOK
अहमदनगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी एक शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला आहे.
वाकचौरे यांनी शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडे यांचा 50 हजार 529 मतांनी विजय मिळवला.
मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजे 2009 पासून शिवसेनेचं या मतदारसंघावर वर्चस्व पाहायला मिळालं आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा 'शिवसेना' विरुद्ध 'शिवसेना' म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत रंगली होती.
2014 मध्ये उमेदवारीसाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये परतले. त्यांना तिकिट देत उद्धव ठाकरेंनी पुन्हा ही जागा मिळवली.
मतदारसंघाचा इतिहास
पूर्वीच्या कोपरगाव मतदारसंघातून परिसीमन आयोगानुसार (सीमांकन) 2008 मध्ये शिर्डी या नव्या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. त्यापूर्वीपर्यंत म्हणजे 2004 पर्यंत या मतदारसंघावर (कोपरगाव) प्रामुख्यानं बाळासाहेब विखे पाटलांचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं.
बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचं लोकसभेमध्ये तब्बल 7 वेळा प्रतिनिधित्व केलं. त्यापैकी 6 वेळा ते काँग्रेसकडून आणि एक वेळा शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
पण 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरच्या पहिल्या म्हणजे 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं याठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजयही झाला होता.

रिपाइं आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण आघाडीचा पाठिंबा असूनही त्यांचा जवळपास सव्वा लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव झाला होता.
नंतर 2014 ला शिवसेनेनं सदाशिव लोखंडेंच्या रूपानं उमेदवार बदलला. त्यामुळं नाराज वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. पण शिवसेनेकडंच हा मतदारसंघ राहिला आणि लोखंडेंचा सलग दोन वेळा विजय झाला.












