जॉर्डनचे राजकुमार आणि सौदीच्या तरुणीचा विवाह का आहे चर्चेत?

जॉर्डनचे राजकुमार (क्राउन प्रिन्स) हुसेन बिन अब्दुल्लाह द्वितीय यांच्या लग्नाच्या चर्चा केवळ मध्यपूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगभरात सुरू आहेत.
जॉर्डनचे राजकुमार हुसेन बिन अब्दुल्लाह द्वितीय आणि सौदीतील रजवा अल सैफ यांचा शाही विवाहसोहळा 1 जून रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेत.
मागच्या वर्षी 10 ऑगस्टला या दोघांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता मे आणि जून मध्ये होणाऱ्या त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू आहे.
या शाही लग्नानिमित जॉर्डनमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय जगभरातील मान्यवर मंडळी या समारंभाला उपस्थित असणार आहेत. एवढंच नव्हे तर जॉर्डनच्या राजधानीत अरब गायकांचे विनामूल्य कार्यक्रमही पार पडणार आहेत.
जॉर्डनचे राजकुमार हुसेन यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, रजवा अल सैफसोबत असलेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांची भेट घडवून आणण्यात एका मित्राने मदत केली होती.
मागच्या काही दिवसांपूर्वी जॉर्डनच्या महाराणी रानया यांनी पारंपारिक मेहंदी समारंभाचं आयोजन केलं होतं. मेहंदीच्या या समारंभात पारंपारिक जॉर्डनी आणि सौदी गाणी गाण्यात आली. शिवाय या गाण्यांवर तालही धरण्यात आला.
याप्रसंगी महाराणी रानया म्हटल्या, "हुसेन हा माझा मोठा मुलगा आहे. तो हाश्मी कुळातील तरुण आहे. इतर कोणत्याही आईप्रमाणे त्याला नवरा मुलगा म्हणून पाहण्याचं माझं स्वप्न होतं. हुसेन जसा माझा मुलगा आहे, तसाच तो तुमचाही मुलगा आहे. हा समारंभ तुमच्या प्रत्येकाचा आहे."
त्या पुढे म्हणाल्या की, "शेवटी मला एक सून मिळालीच आणि ती लाखात एक आहे. परमेश्वराने रजवाला भरभरून द्यावं. माझ्यासाठी ती माझ्या मुलींप्रमाणेच (इमान आणि सलमा) आहे."
राजकुमार हुसेन बिन अब्दुल्लाह कोण आहेत?
राजकुमार हुसेनचा जन्म 28 जून 1994 रोजी शाह अब्दुल्लाह द्वितीय आणि महाराणी रानया यांच्या पोटी झाला. ते सर्व भावंडांमध्ये मोठे आहेत. त्यांना शहजादा हाशिम हा एक भाऊ आणि इमान, सलमा या दोन बहिणी आहेत.
राजकुमार हुसेन यांनी 2012 साली जॉर्डनच्या किंग्स अकादमीमधून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी 2016 मध्ये अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय इतिहासात पदवी संपादन केली.

2017 मध्ये त्यांनी रॉयल मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली
याच अकादमीतून त्यांचे वडील शाह अब्दुल्लाह द्वितीय आणि त्यांचे आजोबा शाह हुसेन बिन तलाल यांनी आपली पदवी संपादन केली होती. आज ते जॉर्डनच्या सशस्त्र दलात कॅप्टन पदावर कार्यरत आहेत.
2 जुलै 2009 मध्ये राजकुमार हुसेन यांना युवराज म्हणून घोषित करण्यात आलं.
मागच्या काही वर्षांमध्ये राजकुमार हुसेन यांनी आपल्या वडिलांसोबत अनेक देशांचे दौरे केले आहेत. पण खरं सांगायचं तर ते अगदी लहानपणापासूनच आपल्या वडिलांसोबत अनेक सरकारी आणि लष्करी कार्यक्रमांमध्ये दिसून आलेत.
जॉर्डनच्या राज्यघटनेनुसार युवराज हे पद अराजकीय असतं. 2009 मध्ये राजकुमार हुसेन यांची युवराज म्हणून निवड झाली. त्यानंतर जून 2010 मध्ये पहिल्यांदा जॉर्डनमधील ग्रेट अरब रिव्हॉल्ट आणि सशस्त्र दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात त्यांनी आपल्या वडिलांचं प्रतिनिधित्व केलं.
त्यानंतर राजकुमार हुसेन जॉर्डनच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये राजाचं प्रतिनिधित्व करतना दिसले.
22 सप्टेंबर 2017 रोजी त्यांनी वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. सुरक्षा परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणारे ते आतापर्यंतचे सर्वात तरुण व्यक्ती आहेत.

फोटो स्रोत, QUEEN RANIA SOCIAL MEDIA
2015 साली राजकुमार हुसेन यांनी क्राउन प्रिन्स फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केली. जॉर्डनच्या तरुणांना माहिती तंत्रज्ञान, पर्यटन आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रात मदत करणे हा या फाउंडेशनचा उद्देश आहे.
या फाउंडेशनने जॉर्डनच्या अनेक तरुणांना अमेरिकन अंतराळ संस्था नासा मध्ये प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. याच प्रशिक्षणानंतर जॉर्डनने 2018 साली आपला पहिला उपग्रह (JY1-SAT) अवकाशात पाठवला.
रजवा अल सैफ कोण आहेत?
प्रसिद्ध मासिक 'वोग'ची अरबी आवृत्ती आणि ब्रिटीश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 28 वर्षीय रजवा अल सैफ यांचे वडील खालिद अल सैफ हे मोठे उद्योगपती असून अल सैफ ग्रुपचे प्रमुख आहेत. ही कंपनी आरोग्य, बांधकाम आणि सुरक्षा या क्षेत्रात काम करते.
राजवा यांचा जन्म 28 एप्रिल 1994 मध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियाध इथे झाला. त्यांना चार भावंडं असून त्या सर्वात धाकट्या आहेत. सुरुवातीचं शिक्षण सौदी अरेबियामध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सिराक्यूज विद्यापीठात आर्किटेक्चर मध्ये पदवी पूर्ण केली.

फोटो स्रोत, SOURCETHE ROYAL COURT
2016 मध्ये शिक्षण सुरू असताना रजवाने दुबईचा नऊ दिवसांचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वेबसाइटला सांगितलं होतं की, "हा दौरा माझ्या कायम लक्षात राहील, कारण विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच अरब संस्कृती आणि वास्तूनिर्मिती पाहिली आहे."
त्यांनी पुढे सांगितलं होतं की, "दुबई खूपच सुंदर शहर आहे. या शहरात आधुनिक वास्तुकला आहे, पण अरब संस्कृती आणि इतिहासाचं पारंपारिक सौंदर्यही जपण्यात आलंय."
त्यांच्या वाङ्निश्चयापूर्वी राजकुमार हुसेन यांची धाकटी बहीण राजकुमारी इमान बिंत अब्दुल्लाह यांचा वाङ्निश्चय जमील अलेक्झांडर थर्म्युटिस यांच्यासोबत पार पडला होता. हा कार्यक्रम गेल्यावर्षी जुलै मध्ये पार पडला होता.

रजवा यांच्याकडे लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइजिंगची व्हिज्युअल कम्युनिकेशनची पदवी देखील आहे.
त्यांनी लॉस एंजेलिसमधील एका आर्किटेक्चर फर्मसोबत काम केलं आणि त्यानंतर रियाधमधील एका डिझाइन स्टुडिओसोबत काम सुरू केलं.

फोटो स्रोत, QUEENRANIA/INSTAGRAM
रजवा आणि राजकुमार हुसेन यांच्या वाङ्निश्चयानंतर सौदीचे युवराज प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या होत्या.
राजकुमार हुसेन हे जॉर्डनचे युवराज असल्याने लग्नानंतर रजवा यांच्यावरही शाही जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
बऱ्याचदा रजवा यांच्या फॅशन सेन्सची तुलना ब्रिटनच्या प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांच्याशी केली जाते.

फोटो स्रोत, ALHUSSEINJO/INSTAGRAM
त्यांची भावी सासू महाराणी रानया यांनी कैरो येथील अमेरिकन विद्यापीठात बिजनेस एडमिनिस्ट्रेशन मध्ये शिक्षण पूर्ण केलंय. लग्नापूर्वी त्यांनी सिटी बँक आणि ऍपल कॉम्प्युटर सारख्या कंपन्यांमध्ये काम केलंय.
मेहेंदी समारंभाच्या निमित्ताने महाराणी रानया यांनी सांगितलं की, "अल हुसेनने मला आणि महाराजांना जेव्हा रजवा विषयी सांगितलं तेव्हा आम्ही फारच आनंदी झालो. मी केलेल्या प्रार्थनेचं ते सर्वात चांगलं फळ आहे."
त्या पुढे म्हणाल्या की, रजवा तिची आई इझा बिंत अल सादिरी यांच्या इतकीच देखणी आहे. मी, आमचं कुटुंब आणि अल हुसेन कायम रजवाची काळजी घेऊ. हा देश तिचाही आहे, तिला इथे तिचं कुटुंब मिळेल."
1 जूनला पार पडणाऱ्या शाही विवाहसोहळ्याबद्दल..
जॉर्डनमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विवाह सोहळा 1 जून रोजी राजधानी अम्मानमधील झहरान पॅलेसमध्ये पार पडणार आहे.
1950 च्या मध्यात या राजवाड्याची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासूनच या ठिकाणी शाही विवाहसोहळे पार पडत आलेत. शाह अब्दुल्लाह द्वितीय आणि त्यांचे वडील शाह हुसैन बिन तलाल यांचा विवाहही देखील याच राजवाड्यात झाला होता.

फोटो स्रोत, JORDAN ROYAL FAMILY
विवाह सोहळा पार पडल्यानंतर सगळेजण अल हुसेनिया राजवाड्यात येतील. याठिकाणी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.
जॉर्डनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दिवशी काही अरब गायक राजधानी अम्मानमध्ये विनामूल्य कार्यक्रम सादर करतील. शिवाय यातील काही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय सर्व राज्यांमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
त्यादिवशी सर्व शासकीय विभागांना सुट्टी देण्यात आली आहे. जॉर्डनची अधिकृत वृत्तसंस्था 'पितरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे 31 मे रोजी दुपारी 1 वाजेपर्यंतच सर्व मंत्रालये आणि विभाग सुरू राहतील.
इटलीच्या सार्डिनिया बेटावर या लग्नाशी संबंधित काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं 'पितरा'ने स्पष्ट केलं आहे. लग्नाशी संबंधित सर्व कार्यक्रम फक्त अम्मानमध्येच होणार आहेत.
जॉर्डनच्या या शाही विवाह सोहळ्याला अरब आणि आंतरराष्ट्रीय जगतातील मोठे नेते, राष्ट्रप्रमुख आणि महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. डेन्मार्क आणि स्वीडनच्या राजघराण्यातील सदस्यही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








