पाकिस्तानच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याने तब्बल 7 वर्षं वाट पाहिली

फोटो स्रोत, GURPREET CHAWLA/BBC
- Author, गुरप्रीत चावला
- Role, बीबीसीसाठी
पाकिस्तानच्या शहलीनशी लग्न करण्यासाठी भारताच्या नमनने सात वर्ष वाट पाहिली
ही गोष्ट आहे भारत आणि पाकिस्तानात फुललेल्या प्रेमाची. सोशल मीडियावर या प्रकरणाची खूपच चर्चा झाली. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे प्रेम आता लग्नबंधनात अडकलंय
सीमा, धर्म, भारत-पाकिस्तानातील कटुता यांची भिंत ओलांडून हे प्रेम यशस्वी झालंय.
या प्रेमकथेची सुरुवात झाली होती 2015 साली.
या गोष्टीतील मुख्य पात्र आहेत नमन लुथरा आणि शहलीन जावेद. नमन पंजाबचे रहिवासी असून पेशाने वकील आहेत तर शहलीन पाकिस्तानच्या लाहोर शहरातल्या आहे. दोघांची पहिली भेट 2015 मध्ये झाली आणि तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच मे 2023 मध्ये दोघांनी लग्न केलं.
नमन धर्माने हिंदू आहे तर शहलीन ख्रिश्चन. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केलंय.
लग्न होण्यापूर्वी या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण सरतेशेवटी शहलीन लग्नासाठी भारतात आल्या आणि आता त्यांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला.
नमन आणि शहलीनची पहिली भेट
2015 साली नमन लुथरा आपल्या आई आणि आजीसोबत लाहोरला गेले होते. तिथेच त्यांची भेट शहलीनसोबत झाली. सध्या पंजाबमधील बटला शहरात राहणारे नमनचे आजोबा कधीकाळी पाकिस्तानातील लाहोर मध्ये राहात होते.
फाळणीनंतर त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील) भारतात आले. त्यामुळे पाकिस्तान आणि तिथे राहणारे लोक नमनसाठी अनोळखी नाहीयेत.
शहलीनसोबत झालेल्या पहिल्या भेटीविषयी नमन सांगतात, "माझ्या आईचे आई - वडील कधीकाळी पाकिस्तानचे रहिवासी होते. फाळणीनंतरही त्यांनी भारतात न येण्याचा निर्णय घेतला आणि ते पाकिस्तान मध्येच राहिले. पण वडिलांचे आई- वडील फाळणी नंतर भारतात आले."

फोटो स्रोत, GURPREET CHAWLA/BBC
नमनच्या म्हणण्यानुसार, 2015 मध्ये ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आई आणि आजीसोबत लाहोरला गेले होते. तिथेच त्यांची भेट शहलीनशी झाली.
शहलीन त्यांची दूरची नातेवाईक आहे. या भेटीनंतर नमन भारतात परतले. पण ते शहलीनसोबत ऑनलाईन संपर्कात होते. हळूहळू बोलणं वाढलं आणि दोघेही प्रेमात पडले. नंतर 2016 मध्ये कुटुंबीयांच्या परवानगीने त्यांनी साखरपुडा केला. हा समारंभ पाकिस्तानात पार पडला.
शहलीन सांगते की, साखरपुड्यानंतर ती 2018 मध्ये आपल्या आई आणि मावशी सोबत भारतात आली. इथेच तिची आणि नमनच्या कुटुंबीयांची भेट झाली.
लग्नात आल्या अडचणी
या दोघांचं नातं त्यांच्या कुटुंबियांना मान्य होतं मात्र भारत आणि पाकिस्तानातील कटू संबंधांमुळे सीमा ओलांडून एकत्र राहणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. 2018 मध्ये झालेल्या कौटुंबिक बैठकीत लग्न करायचं ठरलं.
पण 2020 मध्ये आलेल्या कोव्हिड रोगाच्या साथीपुढे संपूर्ण जगाने हात टेकले होते. ही साथ पसरण्याच्या भीतीमुळे अनेक देशांनी त्यांच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या होत्या. शिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासावर कठोर निर्बंध लादले होते.
भारत आणि पाकिस्तानमध्येही अशीच परिस्थिती होती. भारताने इतर देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांवर बंदी घातली होती. त्यातच भारत आणि पाकिस्तानच्या कटू संबंधांमुळे त्या देशांमध्ये प्रवास करणं आणखीनच कठीण होऊन बसलं होतं.

फोटो स्रोत, GURPREET CHAWLA/BBC
या साथीचा प्रभाव कमी झाल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये शहलीनच्या कुटुंबीयांनी या दोघांचं लग्न लावून द्यायचं असं ठरवलं. भारतात येण्यासाठी त्यांनी व्हिसासाठी अर्ज केला, पण व्हिसा मिळू शकला नाही. त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजेच मे 2022 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा व्हिसा मिळविण्याचा प्रयत्न केला. पण याहीवेळी त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
शेवटी मार्च 2023 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. पण फक्त शहलीन आणि तिच्या आईला व्हिसा मिळाला आणि एप्रिल 2023 मध्ये त्या भारतात पोहोचल्या.
शहलीन सांगते, "तुम्हाला मनापासून जे काही हवं असतं ते तुम्हाला मिळतंच. माझा साखरपुडा झाला तेव्हापासून मला भारतात यायचं होतं. मी कोणाचंही ऐकलं नाही. मी मनाशी ठरवलं होतं की, भले कितीही उशीर झाला तरी चालेल मी वाट पाहीन."
कर्तारपूर साहिब: आशेचा एक किरण
शहलीन आणि नमनच्या नात्यावर शिक्कमोर्तब होऊन साखरपुडा पार पडला, पण लग्न अजून लांब होतं. या काळात ते दोघेही फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
लग्नाला होत असलेला उशीर, व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी यांमुळे दोघांचेही कुटुंबीय कर्तारपूर साहिबसाठी रवाना झाले. याच ठिकाणी दोघांची पुन्हा भेट झाली.
विशेष म्हणजे शिखांचे पहिले गुरू श्री गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त नोव्हेंबर 2019 मध्ये पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिब भारतीय नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं होतं.
घरच्यांनी हे नातं कसं स्वीकारलं?
आपल्या मुलाचं लग्न पाकिस्तानमधील एका मुलीशी लावून देणं नमनच्या आईसाठी सोपं नव्हतं.

फोटो स्रोत, GURPREET CHAWLA/BBC
नमनच्या आई योगिता सांगतात, त्या लहान असताना नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जायच्या. पण जेव्हा मुलाने पाकिस्तानी मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना धक्काच बसला.
त्या पुढे सांगतात, सुरुवातीला नमनचे वडीलही या लग्नासाठी तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की, वऱ्हाडी लग्नाला कसे जाणार? दोघांमध्ये खूप अंतर होतं आणि शिवाय लग्नात अडथळेही आले असते. पण नमनने तिच्याशीच लग्न करायचं मनोमन ठरवलं होतं, त्यामुळे आम्ही सर्वचजण लग्नासाठी तयार झालो.
नमनच्या आई सांगतात, नमनच्या वडिलांनी लग्नाला होकार तर दिला पण लग्न बटाला मध्येच होईल अशी अट घातली.
पुढे औपचारिकपणे शहलीनला मागणी घालण्यात आली. नमनच्या वडिलांच्या आईने हे काम मोठ्या उत्साहात पार पाडलं.
मागणी घातली तेव्हा लग्नासाठी इतका वेळ वाट पाहावी लागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं."
त्या सांगतात की, हे सगळं जुळणं अवघड आहे, आपण दुसरं एखादं स्थळ बघू असं आमचे इतर नातेवाईक म्हणायचे. मात्र दोन्ही मुलं आपल्या निर्णयावर ठाम होती. आज आम्ही सगळेच खूश आहोत.

फोटो स्रोत, GURPREET CHAWLA/BBC
आपल्या मुलीच्या लग्नासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली शहलीनची आई सांगते की, जेव्हा नमनचं स्थळ आलं तेव्हा आम्हाला खूप चिंता वाटली. आम्ही सगळ्यांनी मिळून यावर विचार केला.
"बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की, मुलीचं लग्न करून देताना जवळ असलेलं सासर बघावं."
"आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केला. पण तिसऱ्या वेळी मला आणि शहलीनलाच व्हिसा मिळाला."
शहलीनची आई चेहऱ्यावर हसू आणून सांगते, "इथे (भारतात) जवळपास 15 दिवस लग्नाचे विधी सुरू आहेत. आम्ही इथे आमच्या सर्व इच्छा पूर्ण करून घेतल्या आहेत."
सरकारी नोकरदार असणारे नमनचे वडील गुरविंदर पालही या लग्नामुळे खूश आहेत.
नमनच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सनी देओल आणि बटालाचे आमदार अमान शेरसिंह शेरी कलसी यांच्या प्रयत्नांमुळे शहलीन आणि तिच्या आईला व्हिसा मिळायला मदत झाली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








