शिवरायांनी औरंगजेबाकडे 5 वेळा माफी मागितली होती – भाजप नेता

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. शिवरायांनी औरंगजेबाकडे 5 वेळा माफी मागितली होती – भाजप नेता

राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्या माफीनाम्यावरून आरोप केल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एक वादग्रस्त दावा केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा पत्र लिहून माफी मागितली होती. त्यावेळी अनेकजण राजकीय समस्यांतून बाहेर येण्यासाठी माफीनामा लिहित होते, असं त्रिवेदी यांनी म्हटलं.

त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला.

शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. ‘क्योंकी वो अपनासा लगता है,’ राहुल गांधींवरील विवाहितेची FB पोस्ट व्हायरल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेले काही दिवस यात्रा महाराष्ट्रातून जात आहे.

यादरम्यान, अनेक व्यक्ती राहुल गांधी यांची भेट घेत असून त्यांच्याबाबत चर्चा सुरू आहे.

याच यात्रेदरम्यान राहुल गांधींची भेट घेतलेल्या एका विवाहित महिलेने लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

कल्पना सुर्यवंशी-गेडाम यांची ही पोस्ट असल्याचं खाली म्हटलं आहे. अनेक जण त्यांच्या नावासोबत ही पोस्ट शेअर करत आहेत.

या पोस्टमध्ये कल्पना यांनी राहुल गांधी यांना हजारोंच्या गर्दीत आणि आपले पती सोबत असताना मारलेल्या मिठीविषयी सांगितलं आहे.

राहुल गांधी आपल्याला आश्वासक वाटतात. प्रत्येक पुरुष असा आश्वासक आणि विश्वासक असेल, त्या दिवशी या देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल, असा विश्वास कल्पना यांनी व्यक्त केला.

सोशल मीडियावर या पोस्टचं कौतुक होताना दिसून येतं. ही बातमी ई-सकाळने दिली.

3. कोश्यारींना बाहेर काढा, मोदींना माझी हात जोडून विनंती – संभाजीराजे छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत.

याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ सुरू होता. त्यावेळी कोश्यारींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नितीन गडकरी डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं.

या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले झाले. मी आत्ताच्या काळात बोलत आहे." ही बातमी मुंबई तकने दिली.

4. ‘मी सिन्सियर मिनिस्टर, मंत्री बोलत असताना डिसिप्लिन पाळावा'

मंत्री बोलत आहेत, तेव्हा तुमच्यासारख्या IPS अधिकाऱ्याने शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मंचावर बसलेल्या अधिकाऱ्यांना झापल्याचा प्रकार एका कार्यक्रमात घडला.

दीपक केसरकर काल (19 नोव्हेंबर) ठाणे दौऱ्यावर होते. भिवंडीतील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास ते उपस्थित होते.

यावेळी केसरकर बोलत असताना मंचावरील अधिकारी मोठमोठ्यानं बोलत होते. हे लक्षात आल्यानंतर केसरकारांनी त्यावर नाराजी दर्शवली.

भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून झापलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

5. आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपाकडे आलो - गुलाबराव पाटील

साधं सरपंचपद कुणी सोडत नाही, मात्र आम्ही आठ जणांनी मंत्रिपद सोडून दिलं होतं.

आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो, असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असती, असंही ते म्हणाले. ही बातमी ई-टीव्ही भारतने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)