मला चार मुले झाली हा काँग्रेसचाच दोष - रवी किशन

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. मला चार मुले झाली हा काँग्रेसचाच दोष - रवि किशन
“काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक यापूर्वीच आणलं असतं, तर आज मी 4 मुलांचा बाप नसतो,” असं वक्तव्य भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी केलं आहे.
आज तकच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर देशात चर्चा सुरू आहे. खासदार रवी किशन हे सातत्याने याविषयी भूमिका मांडताना दिसतात. याविषयी बोलताना वाढत्या लोकसंख्येसाठी काँग्रेस जबाबदार असल्याचं रवी किशन म्हणाले.
ते म्हणाले, “मला चार मुले आहेत, ही काही चूक नाही. काँग्रेस सरकारने विधेयक आणले असते, कायदा असता तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती. चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारे विचारशील असती तर पिढ्याना त्रास झाला नसता.”

फोटो स्रोत, TWITTER@BSBOMMAI
2. सीमाप्रश्नी तडजोड नाही, नड्डांचा शिंदेंना फोन – बसवराज बोम्मई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामोपचाराची भूमिका घेणं सुरू केलं होतं.
पण दरम्यान, बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नी तडजोड करणार नाही, असं वक्तव्य केलं आहे.
याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बोलणं झालं आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्यास सांगितलं आहे, असं बोम्मई यांनी म्हटलं.
दरम्यान, कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, शिवाय, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही, असंही बोम्मई यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.

फोटो स्रोत, Getty Images
3. समान नागरी कायद्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक
समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक दाखल करण्यात आलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील खासदार किरोडी लाल मीणा यांनी हे विधेयक दाखल केलं. मात्र या विधेयकावरून राज्यसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं.
भारतात जाती-धर्मांवर आधारित कायदे रद्द करावेत, अशा आशयाचं हे विधेयक आहे. या विधेयकाचा विरोध करण्यासाठी 3 ठराव मांडण्यात आले. मात्र हे ठराव 63 विरुद्ध 23 मतांनी फेटाळण्यात आले.
यावरून केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले, “खासगी विधेयक दाखल करण्याचा अधिकार सदस्यांना आहे. या विधेयकावर सदनात चर्चा होऊ दे. या क्षणी सरकारच्या हेतूवर शंका घेणे आणि टीका करणं अनावश्यक आहे.” ही बातमी पुढारीने दिली.

फोटो स्रोत, Getty Images
4. ‘...तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक सुरक्षा पुरवतील’
शिल्लक सेनेत सगळे मर्द संपले असतील, तर संजय राऊत यांना महाराष्ट्र सैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र चर्चेत राहण्यासाठी अशा कांड्या पिकवू नका, असं वक्तव्य मनसे नेते गजानन काळे यांनी केलं आहे.
कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने आपल्याला महाराष्ट्रात येऊन हल्ला करण्याची धमकी दिली आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
त्यावर प्रतिक्रिया देताना काळे यांनी ट्वीट करून म्हटलं, “सौ. दाऊद ज्यांना घाबरतात त्यांना धमकी आल्याच कळतंय. काळजी नका करू सरकार संरक्षण देईलच पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र चर्चेत राहण्यासाठी अश्या काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली का पहावे सरकारने.” ही बातमी लोकमतने दिली.
5. रस्त्यांचं काम झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही – नीलेश लंके
नगर -पाथर्डी-शेवगाव, नगर -राहुरी- कोपरगाव व नगर-मिरजगाव ते चापडगाव टेंभुर्णी रस्त्याचे काम झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार आमदार नीलेश लंके यांनी केला. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
नगर जिल्ह्यातील नगर- शिर्डी, नगर-पाथर्डी यासह इतर रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. खराब रस्त्यामुळे अनेकांचे अपघातातबळी गेलेले आहेत. प्रशासन या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (7 डिसेंबर) उपोषण सुरू केले आहे. ही बातमी अॅग्रोवनने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








