राम चरण - RRR च्या एका सीनसाठी 35 दिवस लागले, तेवढ्या वेळात अक्षय कुमारचा एक सिनेमा बनतो

फोटो स्रोत, Facebook/Ram Charan
“आम्हाला केवळ RRR चा ओपनिंग सिक्वेन्स शूट करायला 35 दिवस लागले होते. तेवढ्या दिवसांमध्ये एखादा सिनेमा शूट होतो... अक्षय कुमार यांचे चित्रपट तेवढ्या दिवसांत शूट होत असल्याचं मी ऐकलंय,” असं वक्तव्य तेलुगू सुपरस्टार रामचरण याने केलं आहे.
राम चरण याने पुढं म्हटलं की, आम्ही जवळपास तीन ते चार हजार लोकांसोबत 35 दिवस RRR चा ओपनिंग सिक्वेन्स शूट केला होता. मला लहानपणापासून धुळीची अलर्जी होती. माझी लहानपणी सायनसची सर्जरीही झाली होती. आणि नशीब पाहा, मला 35 दिवस धुळीत काम करावं लागलं.”
एकीकडे राम चरणने आपला RRR च्या ओपनिंग सिक्वेन्सचा अनुभव सांगितला, तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारनं ‘सम्राट पृथ्वीराज’च्या शूटिंगचा अनुभव शेअर केला.
राम चरण आणि अक्षय कुमार हे दोघेही हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2022 मध्ये बोलत होते. यावेळी त्या दोघांनीही प्रेक्षकांची बदलती आवड, कोरोनानंतरची चित्रपट व्यवसायाची बदललेली गणितं, ओटीटीचं आव्हान, बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारं यश याबद्दलही भाष्य केलं.
पृथ्वीराजबद्दल सांगताना अक्षय कुमारने म्हटलं, “पृथ्वीराज 42 दिवसांत पूर्ण झाला होता. तुम्ही वेळेवर या, वेळेवर जा...चित्रपटही वेळेत पूर्ण होतो. कोरोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं, नाहीतर तो केव्हाच रिलीज झाला असता.”

फोटो स्रोत, YRF/TRAILERGRAB
‘प्रेक्षकांना आता काहीतरी वेगळं हवं’
2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी फारसं चांगलं गेलं नाही. कोरोनानंतर पूर्ण क्षमतेने थिएटर सुरू झाले तरी प्रेक्षकांना खेचून आणण्यात हिंदी चित्रपट अपयशी ठरले.
सूर्यवंशी, भूलभुलैय्या, काही प्रमाणात ब्रह्मास्त्र...असे बोटावर मोजता येतील इतके चित्रपट सोडले तर बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडची जादू दिसली नाही.
याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमारने म्हटलं की, प्रेक्षर थिएटरपर्यंत येत नाहीयेत, यात आमचाच दोष आहे. आम्ही कुठेतरी अपयशी ठरतोय.
गोष्टी बदलल्या आहेत. प्रेक्षकांना आता काहीतरी वेगळं पाहायचं आहे. त्यामुळे आम्हीच त्यांना काय हवंय याचा विचार करायला हवा, असं अक्षय कुमार याने म्हटलं.

फोटो स्रोत, PARAMOUNT PICTURES / ALAMY
कोरोनानंतर लोकांची आवड वेगाने बदलली आहे. सुरूवातीला हा बदलाचा वेग कमी होता. त्यामुळे आता केवळ अभिनेत्यांनाच नाही तर निर्माते, थिएटर चालक सगळ्यांनाच वेगळा विचार करावा लागेल.
कोरोनानंतर आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशावेळी केवळ मनोरंजनासारख्या गोष्टीवर लोक विचार न करता खर्च करतील का या मुद्द्यावरही राम चरण आणि अक्षय कुमार यांनी आपली मतं मांडली.
आशयाच्या दृष्टीनेच नाही, तर या व्यवसायाची आर्थिकदृष्ट्याही पुनर्बांधणी करावी लागेल असं अक्षयनं म्हटलं.

फोटो स्रोत, TWITTER/RRR MOVIE
राम चरण यानेही पुनर्विचाराची वेळ आली असून तो सगळ्यांनीच करणं आवश्यक असल्याचं म्हटलं. पण काही चित्रपट का चालतात यावरही विचार करणं गरजेचं आहे, असं त्यानं म्हटलं.
“चांगला विषय, चांगली कथा असेल तर लोक थिएटरपर्यंत येतीलच. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. ते खर्चही करतील. सूर्यवंशी, भूलभुलैय्या, पुष्पा, केजीएफ, आरआरआर ने लोकांना थिएटरमध्ये आणलंच. चांगला आशय हा नेहमीच लोकांना खेचून आणेल,” असं राम चरणनं म्हटलं.
लोकांना आता RRR, केजीएफ सारख्या लार्जर दॅन लाइफ स्टोरी पाहायच्या आहेत, असंही अक्षय कुमारने यावेळेस म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








