'हे माझंच लेकरू आहे का? कुणीतरी पाहून सांगा ना' भाचीसाठी व्याकूळ झालेल्या आत्याच्या वेदना

- Author, मुरलीधरन काशिविश्वनाथन
- Role, बीबीसी तामिळ
तुफान पाऊस सुरू असताना पूर आणि भूस्खलनामुळं एक अख्खं गाव जमीनदोस्त झालं. त्यावेळी तिशीतील एक महिला एकेका व्यक्तीजवळ जाऊन हातातल्या फोनवरचे फोटो दाखवत होत्या.
भाचीची ओळख पटवण्यासाठी त्या वेड्यासारखी धावाधाव करत होत्या. सगळ्यांना विचारत फिरत होत्या.
मंगळवारची (30 जुलै) ती रात्र एवढी भयावह असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. केरळच्या वायनाड जिल्ह्यातील चुराल्लमाला, मेप्पडी आणि मुंदाक्काईमधील प्रत्येत जण प्रचंड धक्क्यात होता. तशाच स्थितीत ते अनेक तास त्यांच्या आप्तेष्टांचा शोध घेत होते.
या तिशीतल्या महिलाही त्यांच्यापैकीच एक. त्या फोनमध्ये जो फोटो दाखवत होत्या ते होते त्यांच्या 9 वर्षांच्या भाचीचे म्हणजेच अनिताचे.
रडक्या आवाजात त्या सगळ्यांना फोन दाखवत विचारणा करत होत्या. त्यांच्या फोनमध्ये अनिताचे दोन फोटो होते. एक अनिता जिवंत असतानाचा आणि दुसरा भूस्खलनानंतर अनिताचा मृत्यू झाला त्यानंतरचा.
अनिताच्या आत्याला दोन्ही फोटोत त्यांची भाचीच आहे याची खात्री पटत नव्हती. कारण मृतदेहाचा वरचा भाग दुर्घटनेमुळं खूप खराब झालेला होता. फोनवरचे फोटो दाखवत फिरणाऱ्या या महिलेचा आक्रोश इतरांनाही भावनावश करत होता.
मेप्पडीमधील रुग्णालयात शवविच्छेदनानंतर ठेवलेल्या मृतदेहाचा तो फोटो होता. या ठिकाणी दुर्घटनेनंतर सापडलेले सगळे मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत.

मृतांचा आकडा 200 च्या वर
केरळच्या मुंदाक्काई आणि चुराल्लमालामध्ये झालेल्या भूस्खलनाच्या या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा 200 च्या वर पोहोचला आहे. बचावपथकं अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.
चुराल्लमाला, मुंदाक्काई आणि मेप्पडी ही गावं वायनाड जिल्ह्यात आहेत. याठिकाणी डोंगररांगांतून निघणारा पाण्याचा प्रवाह चुराल्लमालामधून पुढं सरकत इरुवंचीपुळा नदीला जाऊन मिळतो.
ही नदी पुढं जाऊन आणखी प्रवास करत छलियार नदीपर्यंत वाहत पुढे जाते.
30 जुलै आणि त्यापूर्वी काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. त्यानंतर नदीनं 30 तारखेला जणू मुंद्दाकाई हे गावच गिळंकृत केलं. याच गावाला सर्वात आधी भूस्खलनाचा फटका बसला.

गाव जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पुरामध्ये आणि भूस्खलनात जवळपास 400 घरं वाहून गेली, तर चुराल्लमाला परिसरात नदीच्या किनारी असलेला रहिवासी भाग पूर्णपणे वाहून गेला.
अजूनही अनेक रहिवासी बेपत्ता असल्यानं शोधकार्य सुरू आहे. मुंदाक्काई आणि चुराल्लमाला मध्ये राहणाऱ्या सुमारे 5000 हून अधिक लोकांना 88 मदत छावण्यांत हलवण्यात आलं आहे.
आजीकडे राहत होती चिमुकली
अनेकजण स्थानिक रुग्णालयांत त्यांच्या आप्तेष्टांच्या मृतदेहांची ओळख पटावी यासाठी वाट पाहत आहेत. अनिताची आत्या त्यांच्यापैकीच एक आहे.
अनिताच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. तिचे आजोबा थंगराज तिला वाढवत होते.
अनिताच्या आजीनं (आईची आई) थंगराज यांना विनंती करून तिला चुराल्लमालाला बोलावून घेतलं होतं.
अनिता चुराल्लमालामध्ये शिकत होती. या ठिकाणीच भूस्खलनात तिचा मृत्यू झाला. अनितासह या दुर्घटनेत कुटुंबातील इतर पाच जणांचाही मृत्यू झाला. त्यात आणखी काही मुलांचा समावेश होता.
त्यापैकी अनिता आणि कुटुंबातील आणखी दोघांचे मृतदेह सापडलेले नाहीत, तर तिघांचे मृतदेह सापडले आहेत. या परिस्थितीत थंगराज आणि त्यांची मुलगी अनिताच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

हवामान बदलाबाबतच्या या बातम्याही वाचा -

थोडक्यात बचावला जीव
अमरावती या दुर्घटनेतून थोडक्यात बचावल्या. पण त्यांचा दीर आणि पुतण्या यांचा मात्र मृत्यू झाला. अमरावती तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातील आहेत. पण त्या चुराल्लमालामध्ये राहतात.
अमरावती यांनी या घटनेबद्दल सांगताना म्हटलं की, "सतत दोन दिवस पाऊस पडत होता. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा भूस्खलन झालं तेव्हा पाणी आणि चिखल पाहून मी आणि पती आम्ही दोघंही प्रचंड घाबरून गेलो होतो. आम्ही आणखी खूप वेळ तिथं राहायचं नाही असं ठरवलं."

अमरावती पुढं म्हणाल्या की, "आम्ही मुलीच्या घरी गेलो. तिचं घरं काही अंतरावर होतं. तिथं गेल्यांतर काही वेळातच मोठा आवाज आला. मला लगेचच कळलं चिखलाचा मोठा लोंढा येत होता. आम्हाला लगेचच बाहेर पडणं शक्य नव्हतं. त्याचवेळी आमची सून शिडीने टेकडावर चढली आणि आम्हालाही वर खेचून घेतलं. त्यानंतर आम्ही आणखी वर चढत राहिलो आणि कॉफीच्या जंगलात गेलो. सकाळी सरकारची बचावपथकं येईपर्यंत आम्ही तिथंच होतो."
पण त्यांचा दीर आणि पुतण्या यांचं नशीब मात्र एवढं चांगलं नव्हतं. भूस्खलनात त्यांचं घर चिखलाखाली गेलं. त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
घर सोडलं म्हणून...
अमरावती यांच्याप्रमाणेच चुराल्लमालामध्ये राहणारे पोन्नियन हेदेखील या दुर्घटनेतून अगदी थोडक्यात बचावले. त्यांचं एक छोटंस टेलरिंग आणि लॉटरीचं दुकानं आहे. चुराल्लमालामधील नदीजवळ त्यांचं घर होतं.
या दुर्घटनेची आठवण सांगताना पोन्नियन म्हणाले की, "मंगळवारी (30 जुलै) सकाळपासूनच जोरदार पाऊस होत होता. पावसाचा जोर वाढताच मी घरी न थांबता दुकानात जाण्याचा निर्णय घेतला. सुमारे 9 वाजता एक वीजेचा खांब दुकानाच्या शटरवर कोसळला. त्यामुळं हळूहळू दुकानात पाणी शिरायला लागलं. मी जेव्हा बाहेर पाहिलं तेव्हा सगळंकाही चिखलाखाली गेलं असल्याचं मला दिसलं."
पोन्नियन यांच्या मते, त्यावेळी वाचण्याची किंचितही शक्यता नव्हती.
"पण 10 मिनिटांत पाऊस थांबला. त्यानंतर मी तहसीलदारांना फोन करून सांगितलं. ते म्हणाले की, लगेचच बाहेर येण्याचा प्रयत्न करा. त्यानुसार मी कुटुंबासह ती जागा सोडली. गुडघ्यापर्यंत चिखल होता. जवळपास अर्धा किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा एकदा जमीन खचायला लागली. त्यावेळी आम्ही जवळच्या एका टेकडावर चढलो. त्यानंतर काही मिनिटांत बचाव पथकातील लोक आले. त्यानंतर आम्ही गावात गेलो," असं पोन्नियन म्हणाले.

पावसाचा जोर वाढला तेव्हा त्यांनी अगदी मोक्याच्या क्षणी घर सोडलं. पण भूस्खलनात पोन्नियन यांचे शेजारी, नातेवाईक, मित्र मारले गेले. पुढे काय होणार याची कल्पनाही त्यांना नव्हती. ते शांतपणे झोपलेले होते.
दुर्घटनेनंतर मिळालेल्या मृतदेहांचं मेप्पडी येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. नातेवाईकांना ओळख पटवण्यासाठी नंतर हे मृतदेह शाळेत ठेवण्यात आले होते.
चुराल्लमाला आणि मुंदाक्काई यांना जोडणारा पूल पुरामध्ये वाहून गेल्यानं मदत कार्यासाठी मोठी उपकरणं, यंत्रे नेणंही कठीण होत आहे. त्याठिकाणी लोखंडी पूल उभारण्याचा प्रयत्न सध्या लष्कराकडून केला जात आहे.











