You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'नेहरूंनी काय केलं विचारता, तुम्ही काय केलं?' प्रियंका गांधी संसदेतल्या पहिल्या भाषणात काय म्हणाल्या?
काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी काल (13 डिसेंबर) संसदेत आपलं पहिलं भाषण केलं. संविधान, आरक्षण आणि जातनिहाय जनगणना अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आपल्या भाषणातून भाष्य केलं.
संविधान हे 'सुरक्षा कवच' असल्याचं सांगत, त्या म्हणाल्या की, "सत्ताधारी पक्ष ते कवच तोडण्याचा प्रयत्न करत आहे'."
"लोकसभेत सत्ताधारी पक्षाला बहुमत असलं, तरी भारतीय जनता पक्षाचे सदस्य कमी असल्याने त्यांना संविधानाबद्दल बोलायची गरज पडतेय. जर अशी परिस्थिती नसती तर भाजपने केव्हाच संविधान बदलण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली असती," असं प्रियंका गांधी म्हणत होत्या.
या भाषणात त्यांनी त्यांचे पणजोबा आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही उल्लेख केला.
भाजपसोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. "पंतप्रधानांना भारताचं नाही, तर संघाचं (RSS) संविधान कळतं," असं त्या म्हणाल्या.
"संसदेत पंतप्रधान संविधानाच्या पुस्तकावर डोकं ठेवतात. पण संभल, हाथरस आणि मणिपूरमधून न्यायाच्या आरोळ्या ऐकू येतात, तेव्हा त्यांच्या कपाळावर एक आठीसुद्धा येत नाही. भारताचं संविधान म्हणजे संघाचं (RSS) मुखपत्र नाही, हे बहुतेक त्यांना कळलं नसावं," असे प्रियंका गांधी यांचे शब्द होते.
लॅटरल एंट्री म्हणजे थेट भरती प्रक्रियेच्या प्रश्नावरूनही प्रियंका गांधी यांनी सरकारला घेरलं. सध्यातरी या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समितीकडून विचारविनिमय केला जात आहे. पण थेट भरती प्रक्रिया म्हणजे देशातली आरक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रियंका यांचं म्हणणं होतं.
देशात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. याने प्रत्येक नागरिकाच्या परिस्थितीची माहिती मिळेल आणि त्यानुसार योजना आखता येतील, असं त्या म्हणाल्या.
तसंच, "देशातले सगळे विरोधी पक्ष जातीनिहाय जनगणनेची मागणी करत होते, तेव्हा भाजप गाय आणि मंगळसूत्र चोरीला जाण्याबद्दल बोलत होते," असंही त्या म्हणाल्या.
अदानींवरील आरोपांचा उल्लेख
संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात प्रियंका गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर लावल्या गेलेल्या आरोपांबद्दलही सरकारला खडे बोल सुनावले.
"अदानींवर अमेरिकेत लावल्या गेलेल्या आरोपांबद्दल सत्ताधारी पक्ष संसदेत बोलायलाही तयार नाही. कारण मोदी सरकार सामान्य माणसाच्या नाही, तर अशा मोठ्या उद्योगपतींच्या हिताला प्राधान्य देतं," असं त्या म्हणाल्या.
प्रियंका गांधी म्हणाल्या, "सरकारने या व्यावसायिकांना सगळं काही विकून टाकलं आहे. एका माणसाला वाचवण्यासाठी सरकार 140 कोटी लोकांकडे कसं दुर्लक्ष करतं, हे देश पाहतोय. एका माणसाला सगळी संपत्ती, बंदरं, रस्ते आणि खाणीही दिल्या जात आहेत."
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी केली. "बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन पहा; सत्य सर्वांसमोर येईल," असं त्या म्हणाल्या.
संभल आणि उन्नावच्या घटनांचा उल्लेख
अलिकडेच उत्तर प्रदेशमधल्या संभलमधे शाही जामा मशिदीतल्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसेच्या घटनांचाही उल्लेख प्रियंका गांधींनी केला.
"संभलमध्ये संकटात सापडलेले काही लोक मला भेटायला आले. त्यात दोन लहान मुलंही होती. अदनान आणि उजैर त्यांची नावं. त्यातला एक माझ्या मुलाच्या वयाच्या होता आणि दुसरा 17 वर्षांचा. त्यांचे वडील शिवणकाम करतात."
"आपल्या मुलांना शिकवणं एवढं एकच त्यांचं स्वप्न होतं. त्यातल्या एकानं डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. तसं 17 वर्षांच्या अदनाननेही डॉक्टर होऊन वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. हे स्वप्न आणि आशा त्याच्या मनात भारताच्या संविधानामुळे आली," त्या सांगत होत्या.
उन्नाव मधल्या घटनेचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, "उन्नावमध्ये बलात्कार पीडितीच्या घरी मी गेले होते. ती 20-21 वर्षांची असेल. ती लढत होती तेव्हाच तिला जाळून मारून टाकलं, त्यांचं शेत जाळलं, भावांना मारलं, वडिलांना घराबाहेर ओढत आणून मारहाण केली."
"तरीही तिचे वडील मुली मला न्याय पाहिजे असं म्हणतात. ते सांगत होते की, त्यांची मुलगी तक्रार नोंदवण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यात जाते म्हणाली तेव्हा त्यांनी तिला परवानगी दिली नाही. ती रोज सकाळी तयार होऊन खटला लढण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यात ट्रेनने जात असे. तेव्हाही त्यांनी तिला परवानगी दिली नाही. तर ही माझी लढाई आहे आणि मी ती लढणारंच असं मुलीनं त्यांना सांगितल्याचं ते म्हणाले. त्या मुलीला हे बळ आपल्या संविधानाने दिलं."
पुढे त्या आग्र्यामधे अरुण वाल्मिकी यांच्या घरी गेल्याचं सांगत होत्या. "ते पोलिस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी होते. आपल्यासारखंच त्यांचही कुटुंब होतं. नवंनवं लग्न झालं होतं आणि दोन तीन महिन्याचं मूल होतं. त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला गेला. संपूर्ण कुटुंबाला पोलिस स्टेशनला नेलं."
"अरुण वाल्मिकी इतकं मारलं की त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या वडिलांची नखं उपटून काढली. सगळ्या कुटुंबाला मारहाण केली. मी त्यांच्या पत्नीला भेटले. ती म्हणाली 'ताई, आम्हाला फक्त न्याय हवाय. आम्ही न्यायासाठी लढत राहू.' ही हिंमत तिला संविधानानं दिली."
नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल काय म्हणाल्या?
भाजप सदस्य संसदेत नेहमी भूतकाळाविषयी बोलतात असं प्रियांका गांधी सांगत होत्या.
"नेहरूंनी काय केलं असं ते विचारत राहतात. तुम्ही वर्तमानाबद्दल बोला. तुम्ही काय करत आहात ते पहा. तुमची जबाबदारी काय आहे ते देशाला सांगा. ही जबाबदारीही जवाहरलाल नेहरूंचीच आहे का?" त्या म्हणाल्या.
"एक नाव घेताना तुम्ही कधीकधी डगमगता आणि ते घेणं टाळता. त्यांनी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड, बीएचईएल, सेल, गेल ओएनजीसी, एनटीपीसी, रेल्वे, आईआईट, आईआईएम, ऑयल रिफाइनरी आणि असे अनेक सार्वजनिक उपक्रम सुरू केले," असं त्या नेहरूंचा उल्लेख करताना म्हणाल्या.
"त्यांचं नाव पुस्तकातून पुसून टाकता येईल, भाषणांमधून काढून टाकता येईल. पण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि उभारणीतली त्यांची भूमिका कमी करता येणारच नाही."
प्रियंका गांधी यांनी माजी पंतप्रधान आणि आजी इंदिरा गांधी यांच्या कामांचाही उल्लेख केला.
"इंदिराजींंनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. काँग्रेसचं सरकार असताना शिक्षण आणि अन्नाचा अधिकार मिळाला. जनतेला विश्वास दिला गेला. पहिले संसदेचं कामकाज सुरू झालं की आता महागाई आणि बेरोजगारीवर तोडगा निघेल असा विश्वास लोकांना वाटत असे. भारतीय बाजार मजूबत करण्यासाठी काही योजना केल्या जातील असं त्यांना वाटे.
"तुम्ही नारी शक्तीबद्दल बोलता. निवडणुकांमुळे आज कदाचित त्याबद्दल जास्त बोललं जात असेल. पण आपल्या संविधानात महिलांना आधीच अधिकार दिले आहेत. महिलांशिवाय हे सरकार चालूच शकत नाही हे तुम्ही ओळखलंच पाहिजे."
राहुल गांधींनी केलं भाषणाचं कौतुक
संसदेत बहीण प्रियंका गांधी हिने केलेल्या भाषणाने काँग्रेस नेते राहुल गांधी फार समाधानी होते. संसदेत त्यांनी दिलेल्या पहिल्या भाषणापेक्षाही त्यांचं भाषण जास्त छान असल्याचं त्यांनी सांगितलं.
"त्यांनी जोरदार भाषण केलं," संसदेच्या परिसरात वृत्तसंस्थांशी बोलताना ते म्हणाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनीही प्रियंका गांधी यांच्या भाषणाचं कौतुक केलं. त्या संसदेतल्या नेत्यांसारख्या बोलल्या नाहीत, असं ते म्हणाले. भूतकाळाचं गाणं गात बसण्याऐवजी वर्तमानावर बोला हा प्रियंका गांधींनी सरकारला अतिशय योग्य सल्ला दिला असंही थरूर म्हणाले.
खरंतर वायनाड हा राहुल गांधींचा मतदारसंघ. पण तिथूनच लढून प्रियंका गांधी यांनी निवडणुकीत पहिलं पाऊल टाकलं.
यावेळेच्या लोकसभेत राहुल गांधींनी रायबरेली आणि वायनाड दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण त्यांनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)