इंदिरा गांधींचा आवाज काढून जेव्हा निवृत्त कॅप्टनने बँकेची 60 लाखांची फसवणूक केली होती

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

24 मे 1971 रोजी सकाळचे साडेअकरा वाजले असतील, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संसद मार्गावरील शाखेत चीफ कॅशियर वेद प्रकाश मल्होत्रा हे त्यांच्या केबिनमध्ये एका खातेधारकाशी चर्चा करत होते, तितक्यात केबिनमधील फोन खणाणला.

मल्होत्रांनी फोन उचलताच समोरुन आवाज आला, ‘पंतप्रधानांचे सचिव पी. एन. हक्सर तुमच्याशी बोलणार आहेत.’

नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘द स्कॅम दॅट शुक अ नेशन’ या पुस्तकात या घटनेबाबतचा तपशील दिलाय. या पुस्तकात प्रकाश पात्रा व रशीद किदवई लिहितात, “काही वेळाने मल्होत्रा यांना फोनवर दुसरा आवाज ऐकू आला : मी पंतप्रधानांचा सचिव बोलतोय. मला आपल्याशी एका गुप्त मिशनबाबत बोलायचं आहे.

"भारताच्या पंतप्रधानांना एका गुप्त कामासाठी 60 लाख रुपये तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्याकडून एक व्यक्तीला येईल. ते पैसे तुम्हाला त्या व्यक्तीकडे द्यायचे आहेत."

मल्होत्रा यांनी विचारले, की पैसे चेक, पावतीच्या बदल्यात दिले जातील का? त्यावर, “याची पावती तुम्हाला नंतर पाठवली जाईल,” असे उत्तर मिळाले.

"तुम्ही एका गाडीतून ते पैसे घेऊन फ्री चर्चला या, कारण हे पैसे वायुसेनेच्या विमानाने बांगलादेशात पाठवायचे आहेत. याबाबात तुम्ही कुणाशीही कुठल्याच प्रकारची चर्चा करायची नाही."

'मी बांगलादेशचा बाबू आहे'

मल्होत्रा यांच्या 26 वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अशाप्रकारचा आदेश मिळाला नव्हता. मल्होत्रा यांनी या आदेशाला मानण्यास थोडी शंका व्यक्त करताच त्यांना फोनवर दुसरीकडून बोलणारी व्यक्ती म्हणाली, ‘पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी तुम्ही स्वत:च बोला.’

अन् फोनवर दुसरीकडून एका महिलेचा आवाज आला, “माझ्या सचिवांनी सांगितल्याप्रमाणे बांगलादेशात एका महत्त्वाच्या मिशनसाठी 60 लाख रुपयांची आवश्यकता आहे. ते तत्काळ पाठविण्याची व्यवस्था करा. हक्सर यांनी सांगितलेल्या ठिकाणावर आमच्याकडून एक व्यक्ती येईल. ते पैसे तुम्ही त्याच्याकडे सोपवा.”

प्रकाश पात्रा आणि रशीद किदवई पुस्तकात लिहितात, “मल्होत्रा यांनी विचारलं, मी त्या व्यक्तीला कसं ओळखणार? यावर उत्तर मिळाले, तो तुमच्याशी कोडवर्डमध्ये बोलेल, ‘मी बांगलादेशचा बाबू आहे’ असं तो म्हणेल. त्यावर तुम्ही ‘मी बार अ‍ॅट लॉ आहे’ असं उत्तर द्यायचंय. त्याला पैसे सोपवल्यानंतर तुम्ही सरळ माझ्याकडे यायचंय. तुम्हाला याची पावती तिथेच मिळेल.”

मल्होत्रा तेथून उठून सरळ त्यांचे सहायक रामप्रकाश बत्रा यांच्याकडे आले. त्यांनी बत्रा यांना विचारलं, “सध्या आपल्याकडे शंभर रुपयांचे किती बंडल आहेत?” बत्रा यांनी कॅश रजिस्टरवर नजर टाकत 180-190 बंडल म्हणजेच जवळपास 1.8 ते 1.9 लाख रुपये असल्याचं सांगितलं.

यावर मल्होत्रा यांनी तत्काळ 60 लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले, यानंतर बत्रा यांनी कॅश इन्चार्ज हकूमत राय खन्ना यांच्या केबिनमध्ये जाऊन चीफ कॅशिअर यांना 60 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचं कळवलं.

या दोघांचा संवाद सुरू असतानाच मल्होत्रा हे देखील केबिनमध्ये दाखल झाले. खन्ना यांनी मल्होत्रा यांना इतक्या तातडीने एवढ्या मोठ्या रकमेची गरज का पडली? असं विचारलं असता मल्होत्रा यांनी उत्तर दिलं, “हे टॉप सिक्रेट काम आहे. ते पूर्ण झाल्यानंतर याबाबत सांगेन.”

यानंतर बत्रा आणि खन्ना यांनी स्ट्रॉन्ग रुम उघडून 60 लाख रुपयांची व्यवस्था केली. ते पैसे एका ट्रंकमध्ये ठेवून ते हेड कॅशिअर रवेल सिंह यांच्या केबिनमध्ये आणण्यात आले.

टॉप सिक्रेट मिशन आणि तयारी

मल्होत्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जगमोहन रेड्डी कमिशनपुढे दिलेल्या साक्षीत सांगितले, “मी बाजूच्या इमारतीतील बँकेचे सुरक्षा अधिकारी एससी सिन्हा यांना इंटरकॉमवर फोन केला. फोन सहाय्यक सुरक्षा अधिकारी बरुन मित्रा यांनी फोन उचलला.”

मी मित्रा यांना म्हटलं, “मी एका टॉप सिक्रेट सरकारी कामासाठी जात असून त्यासाठी मला एक ॲम्बेसेडर कार उपलब्ध करून देण्यात यावी मला ड्रायव्हरची गरज नाही, मी स्वत: कार ड्राइव्ह करून जाईन” असं मल्होत्रा यांनी सांगितलं.

मात्र, मित्रा यांनी त्यांना ड्रायव्हरविना कार देण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, दोन हमाल पैशांनी भरलेली ट्रंक तिथे घेऊन आले जिथे एक ॲम्बेसेडर कार त्यांची वाट पाहत होती. तेथे कारचा ड्रायव्हर संतोष कुमार आणि गार्डमन बहादूर उपस्थित होते.

संतोषने कारची डिक्की उघडली आणि त्या दोन हमालांनी पैशांनी भरलेली ती ट्रंक डिक्कीत ठेवली. संतोष कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले की, त्या ट्रंकचा आकार इतका मोठा होता की त्यामुळे डिक्की बंद होत नव्हती.

संतोषने त्याच्या मालकाकडे तक्रार केली की मल्होत्रा यांनी त्याच्या हातून कारची चावी हिसकावून घेत ते स्वत: ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसले आणि त्यांनी गार्ड मन बहादूर यालाही आपल्या सोबत येऊ दिलं नाही.

वेद प्रकाश मल्होत्रा यांनी बँकेपासून फक्त 100 मीटर दूर असलेल्या फ्री चर्चमध्ये आपली गाडी थांबवली. त्यावेळी दुपारचे साडे बारा वाजले होते. तितक्यात, एक उंच, गौरवर्णीय, ऑलिव्ह (मेंदी) रंगाची टोपी घातलेला माणूस त्यांच्यादिशेने आला. ‘मी बांगलादेशचा बाबू आहे’, तो म्हणाला.

मल्होत्रा यांनी त्याला उत्तर देत, “मी बार अ‍ॅट लॉ आहे” असं म्हटलं.

‘चला’, तो म्हणाला. तो देखील ॲम्बेसेडर कारमध्ये बसला मात्र, ती सुरुच झाली नाही. मल्होत्रा यांनी त्याला विचारले, तुम्हाला कार चालवता येते का? त्याने ‘हो’ असं उत्तर दिलं.

मी त्याला ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसा असं सांगितलं. मी गाडीतून खाली उतरलो आणि गाडीला धक्का देऊ लागलो. इंजिन सुरू होताच मी पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसलो, असं मल्होत्रा यांनी दिलेल्या बयानात म्हटलं आहे.

मल्होत्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं, “त्या व्यक्तीने त्याला पालम विमानतळावर जायचं आहे, असं सांगितलं. मी त्याला पालमला सोडून देतो असं म्हटलं. पण, त्याने हे योग्य होणार नाही, असं म्हटलं. थोड्या वेळाने त्याने पंचशील मार्गावरील एका टॅक्सी स्टँडवर गाडी थांबवण्यास सांगितलं आणि येथून तो टॅक्सीने जाणार असल्याचंही तो म्हणाला. तुम्ही सरळ पंतप्रधान यांच्या निवासस्थानी जा, त्या तुम्हाला 1 वाजता भेटतील”, असंही तो म्हणाला.

या बातम्याही वाचा -

हक्सर यांचा फोनवरील संभाषणाबाबत नकार

मल्होत्रा पुढे सांगताना म्हणाले, 'मी टॅक्सी ड्रायव्हर आणि ‘बांगलादेशच्या बाबू’च्या मदतीने पैशांनी भरलेली ती ट्रंक टॅक्सीत हलवली. त्यानंतर ट्रंकची चावीही त्याच्याकडे सोपवली. टॅक्सीत बसताच तो म्हणाला, माझं नाव अजीज आहे. जय बांगलादेश. जय भारत माता.'

नंतर, 'बांगलादेशचा बाबू'ची ओळख पटली, रुस्तम सोहराब नागरवाला असं त्याच नाव होतं, तो सैन्यातील पूर्व कप्तान होता.

मल्होत्रा यांनी टॅक्सी निघण्याआधी वाहनाचा नंबर नोट केला होता. नंबर होता डीएलटी 1622. यानंतर मल्होत्रा यांनी त्यांची कार पंतप्रधान निवासस्थानाकडे वळवली.

12:45 च्या सुमारास ते पंतप्रधान निवासस्थानी (1 अकबर रोड) पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांना पंतप्रधान संसद भवनला गेल्या असल्याचं कळालं.

त्या काळात पंतप्रधान निवासस्थानी आजच्यासारखी सुरक्षा व्यवस्था नव्हती. एक सामान्य माणूसदेखील पंतप्रधानांच्या घरी जाऊन त्यांची झलक पाहू शकत होता.

संसद भवनाबाहेर मल्होत्रा यांनी जेव्हा इंदिरा गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांचे खासगी सचीव एनके शेषन बाहेर आले. मल्होत्रांनी शेषन यांना घटनेबाबत सांगितलं.

शेषन यांनी संपूर्ण प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलं.

मल्होत्रा यांनी हक्सर यांनाही फोन केला, ते तेव्हा साऊथ ब्लॉक येथे होते. हक्सर तत्काळ संसद भवनात आहे. मल्होत्रा यांनी हक्सर यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

हक्सर यांनी रेड्डी कमिशनला सांगितलं, “मी संपूर्ण घटनाक्रम ऐकला आणि मल्होत्रा यांना तत्काळ जवळील पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीची तक्रार नोंदवण्यास सांगितलं. तसंच, मी किंवा पंतप्रधान कोणीही त्यांना टेलिफोन केला नसल्याचंही स्पष्ट केलं.”

रिपोर्ट दाखल होताच नागरवाला याला पकडण्यासाठी ‘ऑपरेशन तुफान’ सुरू करण्यात आलं.

नागरवाला याला अटक

पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत त्याच रात्री पावणे दहाच्या सुमारास दिल्ली गेटजवळील पारशी धर्मशाळेतून नागरवाला याला अटक केली. आणि डिफेन्स कॉलनीतील त्याच्या मित्राच्या घरून 59 लाख 94 हजार 300 रुपये जप्त केले. जप्त केलेल्या रकमेतून 5700 रुपये कमी आढळून आले.

त्या दिवशी मध्यरात्री पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितलं की, टॅक्सी स्टँडवरुन नागरवाला राजेंद्र नगर येथील एका घरी गेला. तेथून एक सुटकेस घेतली आणि जुन्या दिल्लीतील निकल्सन रोडला गेला.

तेथे ड्रायव्हर समोरच त्याने ट्रंकमधील सर्व रक्कम काढून सूटकेसमध्ये ठेवली. ड्रायव्हरला त्याने 500 रुपयांची टीप दिली व हे गुपित आपल्यापर्यंतच ठेवण्यास सांगितले.

त्यावेळेस संसदेचं अधिवेशन सत्र सुरू होतं.

‘इंदिरा गांधी अ पर्सनल ॲन्ड पॉलिटिकल बायोग्राफी’ चे लेखक इंदर मल्होत्रा लिहितात, “या प्रकरणावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. काही प्रश्न असे होते ज्यांची उत्तरे मिळत नव्हती."

उदाहरणार्थ, याआधी पंतप्रधान वेद प्रकाश मल्होत्रा यांच्याशी बोलल्या होत्या का? नसेल तर त्यांनी इंदिरा गांधींचा आवाज कसा ओळखला? बँकेचा कॅशिअर केवळ तोंडी आदेशावर बँकेतून एवढी मोठी रक्कम काढू शकतो का? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा पैसा कोणाचा होता?”

इंदिरा गांधी यांचे पूर्व सचीव पी. एन. हक्सर आणि खासगी सचिव एनके शेषन दोघांनी रेड्डी कमिशनला सांगितलं की, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या कधीही बँकेशी सरळ संपर्कात नव्हत्या.

इंदिरा गांधींनीही त्यांच्या दोन पानी लिखित जबाबात म्हटलंय, “माझ्या खासगी बँक खात्याशी निगडित सर्व व्यवहार माझे खासगी सचिव बघायचे. मी आजपर्यंत कधीच बँकेत जाऊन खात्यातून पैसे काढलेले नाहीत.”

27 मे, 1971 साली नागरवालाने कोर्टात आपला गुन्हा मान्य केला.

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील ही कदाचित पहिलीच वेळ असावी जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्याला शिक्षाही झाली.

रुस्तम नागरवाला याला चार वर्षांची सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

कोण होता नागरवाला?

नागरवालाजवळून प्राप्त कागदपत्रांतून मिळालेल्या माहितीनुसार सैन्यातील पूर्व कप्तान असलेल्या नागरवालाला इंग्रजी, फ्रेंच, जापानी, हिंदी, मराठी आणि गुजराती भाषा यायच्या.

तो एक टुरिस्ट टॅक्सी सर्विस चालवायचा. त्याच्याकडे व्यावसायिक वाहन चालक परवाना होता.

तो काही काळ जापानमधील नागोया शहरात राहिला तेथे त्याने अमेरिकन कल्चरल सेंटर आणि नागोया विश्वविद्यालयात इंग्रजी भाषा शिकवायचा.

त्याच्या बायोडेटातील माहितीनुसार घोडेस्वारी आणि पोहण्याच्या कलेत तो निपुण होता.

त्याला ब्रिज खेळणे व भारतीय व्यंजन बनवण्याची आवड होती. त्याचाजवळून एक रिवॉल्व्हर जप्त करण्यात आली. त्याचे मित्र त्याला ‘रुसी’ म्हणून हाक मारायचे.

नागरवाला ने तपास अधिकारी देविंदर कुमार कश्यप यांच्यापुढे स्वीकृती दिली की, त्यानेच पीएन हक्सर आणि इंदिरा गांधी यांच्या आवाजाची नक्कल करून मल्होत्रा यांच्याशी फोनवरून संभाषण केलं होतं.

एक माणूस एका महिलेचा आवाज कसा काय काढू शकतो?, यावर कश्यप यांना विश्वासच बसत नव्हता.

पोलिसांनी अशी करुन घेतली खात्री

प्रकाश पात्रा आणि राशिद किदवई लिहितात, नागरवालाने कश्यप यांना इंदिरा गांधींचा आवाज काढून दाखविला त्यानंतर कश्यप यांना विश्वास बसला.

मल्होत्रा आणि नागरवाला यांच्यातील फोनवरील संभाषण पुन्हा एकदा करवून ते रेकॉर्ड करण्याचं पोलिसांनी ठरवलं.

नागरवालाला पोलीस ठाण्यात तर मल्होत्रा यांना एसपी राजपाल यांच्या कार्यालयात बसवून ते संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं.

नागरवालाला या रेकॉर्डिंगची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे इंदिरा गांधींच्या आवाजाची नक्कल करण्याची क्षमता नगरवालामध्ये आहे हे पोलीस अधिकाऱ्यांना पटले.

नागरवालाने सांगितले की त्याला बँकेच्या फसवणुकीची कल्पना तेव्हा आली जेव्हा तो 100 रुपयांचे सुटे करण्यासाठी बँकेत गेला होता. या संपूर्ण प्रकरणात त्याचा कोणीही साथीदार नव्हता.

नागरवालाने कोर्टात कबुल केले की त्याने, बांगलादेश अभियानाचा बहाणा करून मल्होत्रा यांची फसवणूक केली मात्र, नंतर त्याने आपला जबाब बदलला आणि निर्णयाविरोधात अपील केली.

या खटल्याची पुन्हा सुनावणी व्हावी, अशी नागरवालाची मागणी होती पण 26 ऑक्टोबर 1971 रोजी त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.

दरम्यान, 20 नोव्हेंबर 1971 ला या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसपी कश्यप यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आणि येथून या खटल्यात नवे वळण मिळाले.

याच काळात नागरवालाने त्या काळातील प्रसिद्ध साप्ताहिक वृत्तपत्र ‘करंट’चे संपादक डीएफ कराका यांना मुलाखत देण्यासंदर्भात पत्र लिहिले.

दरम्यान, अचानक काराका यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी त्यांच्या सहाय्यकाला मुलाखत घेण्यासाठी पाठविले. पण नगरवालाने त्याला मुलाखत देण्यास नकार दिला.

फेब्रुवारी 1972 च्या सुरुवातीला नागरवालाला तिहार तुरुंगाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथून त्याला 21 फेब्रुवारी रोजी जीबी पंत रुग्णालयात आणण्यात आले. तेथे 22 मार्च रोजी नागरवालाची प्रकृती खालावली आणि त्याच दिवशी दुपारी 2.15 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने नागरवालाचे निधन झाले. त्या दिवशी त्याचा 51 वा वाढदिवस होता.

अनेक अनुत्तरित प्रश्न

1977 साली जेव्हा जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा त्यांनी नागरवाला याच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी जगनमोहन रेड्डी आयोगाची स्थापना केली, परंतु या तपासात नवीन काहीही समोर आले नाही.

जर अशाप्रकारचा व्यवहार करायचाच होता तर बँक मॅनेजरशी सरळ संपर्क न करता चीफ कॅशिअरशी संपर्क का करण्यात आला? स्टेट बँकेला कोणत्याही पावती (व्हाउचर) किंवा चेकशिवाय एवढी मोठी रक्कम देण्याचा अधिकार होता का?

इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी, 11 आणि 12 नोव्हेंबर 1986 च्या हिंदुस्तान टाइम्सच्या अंकात असा आरोप करण्यात आला, की मल्होत्रा हे रॉ (RAW) साठी नाही तर सीआयए (CIA) साठी काम करत होते आणि या संपूर्ण प्रकरणाचा उद्देश इंदिरा गांधींना बदनाम करणे हा होता.

विशेषत: अशावेळी जेव्हा निक्सन प्रशासन त्यांच्या बांगलादेश धोरणामुळे त्यांच्यावर खूप नाराज होते, परंतु या आरोपाचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले गेले नाहीत.

बँकेच्या कॅशिअरने एवढी मोठी रक्कम कोणत्याही कागदपत्रांशिवाय अज्ञात व्यक्तीकडे कशी सोपवली, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरही मिळू शकले नाही.

ही रक्कम आज जरी फार मोठी वाटत नसली तरी त्याकाळाच्या हिशोबाने मोठी होती. वर्तमान काळात जर या रकमेचा हिशोब लावला तर ही रक्कम सुमारे 170 कोटींच्या जवळपास येते.

रेड्डी आयोगाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

या फसवणूक प्रकरणातील 60 लाखांच्या रकमेतील 5700 वगळता सर्व रक्कम जप्त करण्यात आली. राहिलेले 5700 रुपये मल्होत्रा यांनी त्यांच्याकडून भरले.

अंतत: बँकेचं फार मोठं नुकसान झालं नसलं तरी त्यांच्या प्रतिमेला मोठा फटका बसला. स्टेट बँकेने विभागीय चौकशीनंतर वेद प्रकाश मल्होत्रा यांना नोकरीतून बडतर्फ केलं.

इंदिरा गांधींनी रेड्डी कमिशनसमोर दिलेल्या जबाबात आपण मल्होत्रा यांना कधीच भेटले नसल्याचं म्हटलं.

बँकेनी बडतर्फ केल्यानंतर मल्होत्रा यांनी मारुती कंपनीत नोकरी केल्याचा आरोप तत्कालीन गृहमंत्री चरण सिंह यांनी केला होता. इंदिरा गांधींनी हे आरोप फेटाळताना म्हटलं होतं की त्यांनी या प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती गोळा गेली असता त्यांना सापडलं की मल्होत्रा यांचा मारुती कंपनीशी दूरदूरपर्यंतही कुठला संबंध नव्हता.

23 ऑक्टोबर 1978 रोजी दिलेल्या अंतिम अहवालात रेड्डी आयोगाने दिल्ली पोलिसांच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित केले.

त्यांच्या मते या प्रकरणातील तपासात अनेक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. जसे की, जोपर्यंत एखाद्याला पूर्ण क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत तो संशयित राहतो हा पोलीस तपासाचा नियम पाळला गेला नाही.

आयोगाला असे आढळून आले की या प्रकरणातील एफआयआर तपास सुरू झाल्यानंतर दाखल करण्यात आला आणि त्याचा मसुदा पोलिसांनी स्वतः तयार केला, ते ही पैसे वसूल झाल्यानंतर.

नागरवालानी आपल्या वक्तव्यात दावा केला की, हवाई दलाचे एक विमान त्याची वाट पाहत होते जेणेकरुन हे पैसे बांगलादेशला पोहोचवता येतील. मात्र या प्रकरणाची अधिक चौकशी झाली नाही.

न्यायमूर्ती रेड्डी आपलं निष्कर्ष नोंदवताना दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी-सोव्हिएत करारावर चर्चिलच्या टिप्पण्यांचा संदर्भ देताना म्हणाले, 'हे प्रकरण देखील एक असं कोडं आहे ज्याचं रहस्य उलगडू शकलेलं नाही.'