काँग्रेसची स्थापना करणारे ब्रिटिश अधिकारी ॲलन ह्यूम कोण होते?

    • Author, गणेश पोळ
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

18 व्या शतकात व्यापारी म्हणून आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन भारत (आताच्या पाकिस्तान आणि बांगलादेशसहित) ताब्यात घेतला होता. पण 1857मध्ये कंपनीविरोधात भारतीय लोकांत असंतोषाची ठिणगी पडली आणि भारतीय स्वातंत्र्यासाठीचा पहिला उठाव झाला.

त्यानंतर मात्र ब्रिटिश राजवटीविरोधोत संसदीय मार्गाने लढा देण्यावर भर देण्यात आला. याच विचाराने प्रेरित होऊन 28 डिसेंबर 1885 साली काँग्रेसची स्थापन केली.

काँग्रेसच्या स्थापनेत एका माजी ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याची मोठी भूमिका घेतली होती. त्यांचं नाव होतं ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूम. ते काँग्रेस स्थापनेसाठी बोलावलेल्या अधिवेशनाचे आयोजक होते. पुढं ह्यूम यांनी काँग्रेसचे महासचिव म्हणून अनेक वर्षं काम केलं.

एका ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीयांसाठी स्थापन केलेल्या राजकीय संघटनेचे अनेक उद्देश सांगितले जातात. 1857च्या उठावानंतर देशात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढत होता. त्याला एका ठिकाणी मार्ग करून देण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली, असा एक विचार मांडला जातो.

तर दुसरं म्हणजे ॲलन ह्यूम हे थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते. त्यांनी सनदी अधिकारी असताना भारतीय अधिकाऱ्यांचा प्रशासनातला टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले.

एकूणच ह्यूम यांची भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारचा रोषही ओढावून घेतला. असंही काही इतिहासकर सांगतात.

दरम्यान, भारतातील सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाची स्थापना करणारे ॲलन ह्यूम कोण होते? त्यांची भारतातील कारकीर्द कशी राहिली? याविषयी आपण जाणून घेऊयात.

ब्रिटिश आर्मीतून ॲलन ह्यूम यांच्या करिअरची सुरुवात

ॲलन ह्यूम यांचा जन्म 6 जून 1829 रोजी स्कॉटलंडमध्ये झाला. त्यांचे वडील जोसेफ ह्यूम हे राजकीय नेते होते. तसंच ते स्कॉटिश संसदेचे सदस्यही होते. ॲलन ह्यूम यांच्या करिअरची सुरुवात सैन्यातून झाली.

त्यानंतर त्यांनी मेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली. त्यांच्या भारतातील प्रशासकीय कामाची सुरूवात 1849 मध्ये बंगाल प्रांतातून झाली. त्यावेळी त्यांचं वय 20 वर्षं होतं.

1850मध्ये जिल्हाधिकारीपदी नेमणूक झाल्यावर ह्यूम यांनी बंगाल प्रांतात (आताचे प.बंगाल आणि बांगलादेश) प्राथमिक शिक्षण मोफत केले होते.

1857च्या उठावाविरोधात ॲलन ह्यूम यांचा सहभाग

1857मध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी पहिला उठाव झाला. तेव्हा ह्यूम यांना भारतात रुजू होऊन 7 वर्षं झाली होती. 1857मध्ये त्यांची पोस्टिंग आताच्या उत्तर प्रदेशमधल्या इटावा येथे दंडाधिकारी म्हणून झाली होती. तर त्यांनी उठावाविरोधात 650 सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं.

उठाव मोडून काढण्यात ते सहभागी होते. पण या सगळ्या रक्तपाताला त्यांनी ब्रिटिश सरकारला दोष दिला होता. तसं त्यांनी त्यांच्या डायरीत नमूद केलं आहे.

तब्बल 11 वर्षं इटावा येथे दंडाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती वायव्य प्रांतात महसूल मंडळाचे अधिकारी म्हणून झाली.

दरम्यान, 1857 नंतर भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये मोठे बदल झाले. ईस्ट इंडिया कंपनीकडंचे अधिकार काढून घेण्यात आले. लोकांच्या दबावामुळे इंग्लंडच्या संसदेला कंपनीच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय वसाहत थेट ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली आली.

ॲलन ह्यूम यांना काँग्रेसची स्थापना का करावी वाटली?

जवळजवळ 33 वर्षं ह्यूम यांनी भारतात सनदी अधिकारी म्हणून काम केले. 1882 साली ते ब्रिटिश सरकारमधून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं.

त्यात भारतीयांनी त्यांच्यासाठी एक राजकीय चळवळ सुरू करावी असं म्हटलं होतं. तर 1884मध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या खासगी बैठकीत ॲलन ह्यूम यांनी राजकीय संघटनेचा विचार पण मांडला होता.

पुढे त्यांनी भारतीय नेत्यांची जमवाजमव सुरू केली. 1885 साली पुण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचं ठरलं. पण पुण्यात प्लेगची साथ आल्याने काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला हलवण्यात आले. त्यावेळी ॲलन ह्यूम यांच्यासोबत तत्कालीन गव्हर्नर डफरीन यांची पण भूमिका महत्त्वाची मानली जाते.

स्थापनेच्या वेळी काँग्रसचा उद्देश नमूद केला होता. त्यानुसार सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा. भारतीय आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा, अशी घोषणा करण्यात आली होती.

पण काँग्रेसच्या स्थापनेमागची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. 1887च्या उठावानंतर दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, भारतीयांच्या अभिव्यक्तीला मार्ग मिळावा म्हणून काँग्रेसची स्थापना झाली असं काही इतिहासकारांचा दावा आहे. तर काहीजण ॲलन ह्यूम यांचा उद्देश हा भारतात सामाजिक आणि राजकीय सुधारणा व्हावी असा होता, असं सांगितलं जातं. त्यामुळे ॲलन ह्यूम यांच्या भारतात आणि ब्रिटनमध्येही संशयाच्या नजरेने पाहिले गेले.

काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते. तर फिरोजशाह मेहता, सुरेन्द्रनाथ बनर्जी, रोमेश चंद्र दत्त, बद्रुद्दीन तयबजी, एस. सुब्रमण्यम अय्यर आणि इतर नेत्यांचा पहिल्या अधिवेशनात समावेश होता. यातले बहुतेक नेते हे बंगाल आणि बाँबे प्रांतातले होते. मुंबईतील गवालिया टँक जवळच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं.

त्यामध्ये एकूण 72 नेत्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी बहुतेकजण हे वकील आणि पत्रकार होते. आधी या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय संघ असं ठरलं होतं पण दादाभाई नौरोजी यांच्या विनंतीवरून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करण्यात आलं.

मेडिकलचे विद्यार्थी, सनदी अधिकारी आणि पक्षी निरीक्षक

ॲलन ह्यूम यांची पहिली महत्त्वाची बदली बंगाल प्राताचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. तसंच त्यांनी इटावा येथे सलग 11 वर्षं दंडाधिकारी म्हणून काम केलं.

पुढे सनदी अधिकारी म्हणून त्यांनी ब्रिटिश सकार सरकारातील महसूल आणि कृषी विभागांचे सचिव राहिले. गृहसचिव या नात्याने पोलीस खात्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले. प्रशासनात भारतीयांचा अधिकाधिक सहभाग असावा, या त्यांच्या धोरणामुळे ते अडचणीत आले होते. त्या वादानंतर त्यांची प्रांतिक प्रशासनात बदली करण्यात आली होती.

ॲलन ह्यूम हे तसे मेडिकल सायन्सचे विद्यार्थी होते. त्याच फिल्डमध्ये करीअर केलं असतं तर ते सर्जन झाले असते. पण ते ब्रिटिश सनदी सेवेत रुजू झाले आणि भारतात आले.

सनदी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ह्यूम यांचा रस मात्र पक्षी निरिक्षणात होता. त्यांनी भारतातील विविध पक्ष्यांचा अभ्यास केला. पक्षीविज्ञान विषयावर पुस्तकं लिहिली. त्यांनी अनेक पक्षांचा संग्रह पण केला. द गेम बर्ड्स ऑफ इंडिया, बर्मा अँड सिलोन हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले. स्ट्रे फेदर्स नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले. तसंच त्यांनी भारतातील शेतीच्या सुधारणांसाठीही एक पुस्तक लिहिलं आहे.

निवृत्तीनंतर ह्यूम हे काही वर्षं भारतातच होते. त्यानंतर 1894 मध्ये ते इंग्लंडला परत गेले. तर 31 जुलै 1912 रोजी म्हणजे 83व्या वर्षी लंडन येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ पुस्तके-

  • Revival: The Rise and Growth of the Congress in India by C.F. Andrews and Girija Mookerjee.
  • Modern India by Bipin Chandra
  • Selected Writings of Allan Octavian Hume, Volume 1 (Oxford University Press)
  • मराठी विश्वकोश

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)