जॉर्ज सोरोस कोण आहेत, ज्यांच्यावरून भाजपनं सोनिया गांधींवर आरोप केलेत

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उद्योगजक गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यातच आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्स सोरोस यांच्यासोबत कथित संबंध असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी (9 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.

"फोरम फॉर डेमोक्रॅटिक लीडर्स ऑफ एशिया पॅसिफिक या संघटनेसोबत सोनिया गांधी यांचे संबंध असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला. इतकंच नाही, तर या फोरममध्ये भारताविरोधी आणि पाकिस्तानला समर्थन करणाऱ्या चर्चा होत असून या फोरमला जॉर्ज सोरोस फाऊंडेशनकडून निधी दिला जात आहे," असाही आरोप भाजपनं केला आहे.

पण हे सगळे आरोप बिनबुडाचे असून यात काहीही तथ्य नाही, असं काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी म्हटलंय.

भाजपनं कोणते आरोप केलेत?

ओसीसीआरपी (Organized crime and corruption reporting project) या फ्रेंच पब्लिकेशनने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, या प्रोजेक्टसाठी त्यांना विदेशी फंडिंग मिळतेय आणि ते भारतावर विशेष लक्ष देत आहेत, असा आरोप भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी याआधीही राज्यसभेत केला होता. या रिपोर्टचा विदेशी फंडिंगसोबतच जॉर्ज सोरोस यांच्यासोबतही संबंध आहे, असंही त्रिवेदी म्हणाले होते.

भारतात संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतं, तेव्हाच पेगासस रिपोर्ट, शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसा आणि हिंडनबर्ग अशा घटना घडतात, याला योगायोग समजावं की आणखी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

"कोरोना लशीवर देखील रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. इतकंच नाहीतर यंदाच्या संसदेच्या अधिवेशनावेळी भारताच्या उद्योजकाबद्दल अमेरिकन अटॉर्नीचा एक रिपोर्ट आलाय," असा दावाही त्रिवेदींनी केला आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत आरोपपत्र दाखल झाल्याचा रिपोर्ट समोर आला होता. गौतम अदानी यांच्यावर आपल्या कंपनीला कंत्राट मिळावं म्हणून 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आणि हे प्रकरण लपवल्याचा आरोप आहे.

यानंतरच काँग्रेसनं भाजपवर वारंवार निशाणा साधला असून संसदेतही गोंधळ घातला होता. तसेच, गौतम अदानींची जेपीसी चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसनं केली होती.

यानंतर सुधांशू त्रिवेदी यांनी हे सगळं जाणीवपूर्वक होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता.

याआधीही काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे सोरोस फाऊंडेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत संबंध असल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. गेल्या रविवारी निशिकांत दुबे यांनी संसदेतही हा मुद्दा लावून धरला आणि बाहेर आल्यानंतर माध्यमांनीही प्रतिक्रिया दिली.

पण, निशिकांत दुबे यांनी केलेले आरोप हे संसंदेनं बहाल केलेल्या विशेषाधिकारांचं उल्लंघन असून राहुल गांधींना नोटीस न देताच दुबेंना बोलण्याची परवानगी देण्यात आल्याचा आरोप शशी थरूर यांनी केला होता.

भाजपनं याआधीही सोरोस यांच्यावर केले होते आरोप

"भारताविरोधी काम करणाऱ्या काही शक्ती जॉर्ज सोरोस फाऊंडेशनसोबत जोडलेल्या आहेत. अशा देशविरोधात काम करणाऱ्या लोकांविरोधात आपण एकजुटीनं लढायला हवं. काही मुद्दे असे असतात की, त्यांना राजकीय चष्म्यातून बघू नये", असं भाजप खासदार किरेन रिजीजू म्हणाले होते.

याआधाही भाजपनं जॉर्ज सोरोस यांच्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत.

गेल्या वर्षी सुरुवातीलाच जर्मनीतल्या म्युनिक इथं झालेल्या संरक्षण परिषदेत जॉर्ज सोरोस म्हणाले होते की, "भारत हा लोकशाहीवादी देश आहे. पण पंतप्रधान मोदी हे लोकशाहीवादी नसून भारतीय मुस्लिमांवर होणारा हिंसाचार हेच मोदी झपाट्यानं मोठे नेते बनण्यामागचे कारण आहे."

सोबतच सोरोस यांनी गौतम अदानींचाही उल्लेख केला होता. ते म्हणाले की "मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे चांगले संबंध आहेत. दोघांनाही एकमेकांशिवाय पर्याय नाही. अदानी यांच्यावर स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप आहेत. पण, मोदी या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. पण, त्यांना विदेशी गुंतवणूकदार आणि संसदेत केल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यावीच लागतील."

यानतंर भाजपकडून सोरोस यांना प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत जॉर्ज सोरोस यांनी मोदींवर केलेली टीका भारतीय लोकशाहीला उद्धवस्त करणारी आहे, असं म्हणाल्या होत्या.

तसेच, "सोरोस हा एक वृद्ध, श्रीमंत आणि कट्टरवादी माणूस असून न्यूयॉर्कमध्ये बसून आपल्यानुसार संपूर्ण जग चाललं पाहिजे, असं त्याला वाटतं," असं एस. जयशंकर म्हणाले होते.

सोरोस यांनी मोदींवर पहिल्यांदाच टीका केली होती असं नाही. याआधी 2020 मध्येही त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत पंतप्रधान मोदींवर टीका करत भारत एक हिंदू राष्ट्रवादी देश बनत असल्याचं म्हटलं होतं.

मोदींवर आरोप करणारे हे जॉर्ज सोरोस कोण आहेत?

जॉर्ज सोरोस अमेरिकन उद्योजक आहेत. त्यांनी 1992 मध्ये शॉर्ट सेलिंगद्वारे बँक ऑफ इंग्लंडला डबघाईला आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची ब्रिटनमध्ये अशीच ओळख आहे.

त्यांचा जन्म हंगेरीतल्या ज्यू कुटुंबात झाला. जर्मनीत ज्यू लोकांचा छळ केला जात असताना ते कसेतरी बचावले. त्यानंतर मग पाश्चिमात्य देशात आसरा घेतला.

शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सोरोस यांनी यातूनच तब्बल 44 अब्ज डॉलर कमावले. या पैशांतून त्यांनी हजारो शाळा आणि हॉस्पिटल सुरू केले.

तसंच, लोकशाही आणि मानवाधिकार यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटनांची देखील त्यांनी मदत केली.

सोरोस यांनी 1979 मध्ये सोसायटी फाउंडेशनची स्थापना केली असून हे फाउंडेशन जवळपास 120 देशांमध्ये काम करतेय. त्यांच्या अशाच कामांमुळे ते उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या निशाण्यावर असतात.

त्यांनी 2003 मध्ये इराक युद्धावर टीका केली. तसंच, डेमोक्रॅटिक पक्षाला लाखो डॉलर्सचा निधी दिला.

यानंतर अमेरिकेतील उजव्या विचारणीच्या लोकांकडून त्यांच्यावर टोकाची टीका करण्यात आली.

2019 मध्ये ट्रम्प यांनी एक व्हिडिओ रिट्विट करत दावा केला होता की, सोरोस यांनी होंन्डुरासमधील हजारो निर्वासितांना यूएसची सीमा ओलांडण्यासाठी पैसे दिले होते. याबद्दल ट्रम्प यांना विचारण्यात आलं यावेळी ते म्हणाले होते, अनेक लोक असं बोलतात.

पण, ट्रम्प यांनी शेअर केलेला व्हिडिओ फेक असून सोरोस यांनी कोणालाही पैसे दिले नसल्याचं काही दिवसानंतर समोर आलं होतं.

सोरोस यांच्याविरोधात अनेक देश

ऑक्टोबर 2018 मध्ये सिनागॉग इथं एका अमेरिकन श्वेतवर्णीय व्यक्तीनं गोळीबार केला. यामध्ये 11 ज्यू लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गोळीबार करणारा रॉबर्ड बॉवर्सच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यांचा असा विश्वास होता की आपल्यासारखीच विचारधारा असलेल्या गोऱ्या वर्चस्ववाद्यांच्या विरोधात नरसंहार करण्याचा कट रचला जात आहे. या सगळ्यामागे जॉर्ज सोरोस असल्याचा संशय त्या गोळीबार करणाऱ्याला होता.

फक्त अमेरिकाच नाहीतर आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, रुस आणि फिलिपींस हे देश सुद्धा जॉर्ज सोरोस यांच्याविरोधात आहेत.

तुर्कियेचे अध्यक्ष तय्यप अर्दोगन यांनीही म्हटलं होतं की, सोरोस हे ज्यूंच्या कटाच्या केंद्रास्थान आहेत जे तुर्कियेचे तुकडे करून देश उद्धवस्त करू पाहत आहेत.

सोरोस निर्वासितांना संपूर्ण युरोपमध्ये पसरण्यास प्रोत्साहित करत असून ते पाश्चात्य देशांशाठी सर्वात मोठा धोका आहेत, असा दावा ब्रिटनच्या ब्रेक्झिट पार्टीचे नाइजल फॅरेज यांनी केला.

इतकंच नाहीतर सोरोस यांचा जन्म झाला त्या हंगेरीचं सरकार सुद्धा सोरोस यांना आपला शत्रू मानतात.

2018 ला झालेल्या निवडणुकीत हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ऑर्बन यांनी सोरोस यांच्यावर टीका केली होती. या निवडणुकीत ऑर्बन यांचा विजय झाल्यानंतर सोरोस समर्थित संस्थांना सरकारकडून इतका त्रास झाला की, सोरोस यांच्या संस्थांनी हंगेरीमध्ये काम करणं बंद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)