रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने बाळासह गर्भवतीचा मृत्यू

पिंकी आणि रुग्णवाहिकेचे प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, पिंकी आणि रुग्णवाहिकेचे प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एका गरोदर महिलेचा आणि तिच्या बाळाचा वेळीच रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाला असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

डहाणू तालुक्यातील सारणी गावातील पिंकी डोंगरकर (26) या गर्भवतीचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.

पिंकी डोंगरकर यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिला मंगळवारी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे पाठवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

कासा येथून सिल्वासाला जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. वाट पाहिल्यानंतर एक रुग्णवाहिका आली मात्र रुग्णवाहिकेतच त्यांचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचे पिंकी यांचे नातेवाईक आकाश वावरेंनी बीबीसी मराठीला सांगितले.

जिल्हा चिकित्सक रामदास मराड यांनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की '108 ही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे 102 ही रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली परंतु महिलेचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.'

बीबीसी मराठीने जिल्हा चिकित्सक रामदास मराड यांच्याशी संपर्क साधून स्वतंत्ररीत्या अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. ती आल्यानंतर या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पालघर जिल्ह्यात माता मृत्यू दर, कुपोषण याचे प्रमाण जास्त आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सर्व योजना राबवण्यासाठी फेर आढावा घेऊन गरजूंना त्याचा जास्तीत जास्त लाभ झाला पाहिजे आणि केलेल्या उपाययोजना उपसभापती कार्यालयास अवगत कराव्यात असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

उप-जिल्हा रुग्णालय
फोटो कॅप्शन, उप-जिल्हा रुग्णालय कासा येथून सिलवासाला जाण्यास सांगण्यात आले.

या घटनेबाबत पिंकी यांचे पती गणेश डोंगरकर म्हणाले, "माझ्या पत्नीला प्रसूती वेदना होत असल्याने आम्ही तत्काळ तिला कासा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. सिल्वासा येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे तिचा रस्त्यात मृत्यू झाला. रुग्णवाहिका वेळेत पोहचली असती तर माझी पत्नी आणि गर्भातील बाळाचा जीव वाचला असता."

https://www.whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालघरवासीय करत आहेत. ही घटना पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील समस्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी यावेळी केली आहे.

पालघर येथील या घटने संदर्भात आणि जिल्ह्यातील वैद्यकीय परिस्थिती संदर्भात पालघर जिल्ह्यात काम करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांच्याशी बीबीसी प्रतिनिधींनी संवाद साधला असता, ते म्हणाले की, "पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था ही नेहमीच व्हेंटिलेटरवर असल्याचे पाहायला मिळते. जिल्हा निर्मितीनंतर दशक उलटूनही पालघर जिल्ह्यामध्ये सक्षम आरोग्य व्यवस्था नसल्याने आरोग्य व्यवस्थेचे नेहमीच धिंडवडे उडत आहेत. अनेक रुग्णांना आरोग्याच्या उत्तम सेवा घेण्यासाठी गुजरातमधील सुरत, वलसाड तसेच सिल्वासा आणि मुंबई आदी ठिकाणी जावे लागते. काही रुग्णालय आहेत तिथे फक्त मशीनरी आहेत मात्र त्या हाताळणारे डॉक्टर आणि कर्मचारी नाहीत."

"रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतेही ठोस पावले उचललेली नाहीत, त्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दर दिवशी कुपोषित बालके मृत्यू होतात, दर महिन्याला चार ते पाच महिला या वैद्यकीय अवस्थेमुळे मृत्युमुखी पडत आहेत. ही घटना समोर आली त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे. मात्र अशा अनेक घटना जिल्ह्यात घडतात याबाबत येणाऱ्या काळामध्ये प्रशासन याबाबत काही योजना कधी करणार? प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवं," असं सांबरे सांगतात.

लोकप्रतिनिधींचे काय म्हणणे आहे?

या घटने संदर्भात आणि जिल्ह्यातील वैद्यकीय सद्यस्थितीबाबत बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी आमदार विनोद निकोले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, "ही घटना अत्यंत खेदजनक आहे. या घटनेप्रमाणेच जिल्ह्यातील वैद्यकीय अवस्था दयनीय आहे. यासंदर्भात यापूर्वी विधिमंडळामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता.

"जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत पुन्हा विधिमंडळात या गंभीर समस्येबाबत आवाज उठवून याविषयी ठोस पावले उचलायला सरकारला भाग पडणार आहोत. प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर या महिलेचा मृत्यू झाला नसता," असे निकोले म्हणाले.

पालघर जिल्हा केव्हा झाला?

ठाणे जिल्ह्याचं विभाजन करुन नव्या पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं 13 जून 2014 रोजी घेतला होता.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी आणि विकासासाठी जिल्हा विभाजन करण्याची मागणी गेली 30 वर्ष सुरू होती. त्यानुसार विभाजन होऊन पालघर जिल्हा स्थापन झाला.

पालघर जिल्ह्यात आठ तालुके आहेत. त्यात तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई. जव्हार, मोखाडा आणि तलासरी हे तीन तालुके 100 टक्के आदिवासी आहेत.

जिल्ह्यात वसई-विरार ही महानगरपालिका तर डहाणू, पालघर, जव्हार या नगरपालिका आहेत. जिल्ह्याचं क्षेत्रफळ असेल 5344 चौरस किलोमीटर, तर लोकसंख्या आहे तीस लाखांच्या वर जवळपास आहे.

या नव्या जिल्ह्याला एक खासदार आणि सहा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून लाभले आहेत. मात्र तरीही गेल्या दहा वर्षात हवा तसा विकास या जिल्ह्यात झालेला नाही, असे या जिल्ह्यातील नागरिकांचे आणि स्वयंसेवी संघटनांचे म्हणणे आहे.

आजही या जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधांसह वैद्यकीय सोयी सुविधांचा अभाव असल्याच पाहायला मिळतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.