उष्णतेच्या लाटेचा, वाढलेल्या तापमानाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतोय?

उन्हाळा सुरू होताच राज्यात अनेक ठिकाणी तापमान 39 - 40 अंशांवर गेलेलं आहे तर काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याचा इशाराही देण्यात आला.

अशावेळी या सततच्या वाढलेल्या तापमानाचा, उष्णतेच्या लाटेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी?

समजून घेऊयात 9 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

उष्णतेची लाट किंवा Heatwave म्हणजे काय?

भारतीय हवामान विभागानुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्शियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं.कमाल तापमानातील वाढ 6.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला अतिउष्ण लाट किंवा सिव्हीयर हीट वेव्ह (severe heat wave) म्हटलं जातं.

वाढलेल्या उष्णतेचा शरीरावर काय परिणाम होतो?

मानवी शरीराचं सामान्य तापमान 37-38 सेल्शियस असतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानवी शरीराभोवती हवेचं तापमान 18 ते 24 सेल्शियस असतं. तापमान 39-40 सेल्शियसपर्यंत पोचलं की आपला मेंदू स्नायूंना काम थांबवण्याचे किंवा आहे त्या परिस्थितीत स्नायू शांत करण्याचे संदेश पाठवतो आणि त्यामुळे शरीराला थकवा येतो.

बाहेरचं तापमान वाढतं, तेव्हा आपलं शरीर आतली उष्णता बाहेर फेकायला लागतं. या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो. शरीरातून घाम बाहेर पडतो, या घामाचं बाष्पीभवन होतं, आणि त्याने शरीर थंड होतं.

दुसरीकडे शरीर जेव्हा तापत असतं, तेव्हा रक्तपेशी प्रसरण पावतात...त्याने रक्तदाब कमी होतो. परिणामी शरीरभर रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक श्रम घ्यावे लागतात.

याचा परिणाम म्हणून खाजरा पुरळ उठणं, पावलं सुजणं अशा गोष्टी होतात.

तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यानंतर सनबर्न होण्याची शक्यता असते.

सतत घाम आल्याने शरीरातलं पाण्याचं - द्रवाचं आणि Salts - सोडियम - पोटॅशियमचं प्रमाण कमी होतं आणि त्याचेही परिणाम शरीरावर होतात.

डिहायड्रेशन म्हणजे काय? ते कधी होतं?

आपल्या शरीरातली पाण्याची पातळी आणि क्षार (Electrolytes) कमी झाली तर त्याचा तब्येतीवर गंभीर परिणाम हाेऊ शकतो. या परिणामांना डिहायड्रेशन (Dehydration) म्हणजे निर्जलीकरण म्हटलं जातं.

मग डिहायड्रेशन कधी होतं? तर जर तुम्ही प्रखर उन्हात फारकाळ राहिलात तर त्यामुळे शरीरातलं पाणी - क्षार कमी होऊ शकतात. तुम्हाला डायरिया किंवा एखादा आजार झाला असेल तर देखील शरीरातलं पाणी कमी होऊ शकतं. भरपूर दारू किंवा कॅफिनयुक्त पेयं प्यायल्याने वा भरपूर व्यायाम केल्याने प्रचंड घाम आल्याने डिहायड्रेशन होऊ शकतं.

भरपूर लघवी व्हावी यासाठी तुम्हाला औषधं देण्यात आली असतील तर हा त्रास होऊ शकतो.

डिहायड्रेशनची लक्षणं कोणती?

  • एकदम तहानल्यासारखं वाटणं
  • नेहमीपेक्षा कमी, पिवळी वा तीव्र वास येणारी लघवी
  • चक्कर वा गरगरणं
  • गळून गेल्यासारखं, दमल्यासारखं वाटणं
  • तोंड, ओठ, जीभ, त्वचा कोरडी पडणं

अशी लक्षणं असतील तर तुम्हाला डिहायड्रेशन झालं असल्याची शक्यता आहे. अशावेळेस शरीरातून गेलेलं पाणी आणि क्षार भरुन काढण्याचा प्रयत्न करावा आणि डॉक्टरांची मदत घ्यावी.

उन्हाचे शरीरावर इतर कोणते परिणाम होतात?

  • भूक न लागणं
  • चक्कर येणं
  • गोंधळल्यासारखं वाटणं
  • पायांमध्ये गोळे येणं, स्नायू दुखणं
  • डोकेदुखी
  • दरदरून घाम फुटणं
  • थकवा
  • रक्तदाब खूप कमी झाल्यास हृदयविकाराचा धोका असू शकतो.

उष्णतेला आपलं शरीर असा प्रतिसाद का देतं?

शरीराचं तापमान 37 डिग्रीजवर ठेवण्याचा प्रयत्न आपलं शरीर करत असतं. आपल्या शरीराला त्याचीच सवय असते. त्यामुळे आजूबाजूचं तापमान वाढलं की शरीराचं तापमान एका पातळीवर कायम ठेवण्यासाठी शरीराला अधिक कष्ट करावं लागतात. आणि यासाठी शरीरात होणाऱ्या प्रक्रियांचे इतर परिणाम शरीरावर होतात.

उष्माघात म्हणजे काय? त्याची लक्षणं कोणती?

कडाक्याच्या उन्हात काम केल्यानं किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातला गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात. बाहेरचं तापमान खूप वाढलं की शरीरातील थर्मोरेग्युलेशन बिघडतं, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं. याला सनस्ट्रोक किंवा हीटस्ट्रोक (Sunstroke / Heatstroke) असंही म्हटलं जातं.

उष्माघात जीवघेणा ठरू शकतो. चक्कर, उलट्या, मळमळणं, शरीराचं तापमान वाढणं, पोटात कळ येणं, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं ही सगळी उष्माघाताची लक्षणं असू शकतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

दरम्यान या व्यक्तीला थंड, सावलीच्या ठिकाणी पाय थोडे उंचावून झोपवा, ओल्या कपड्याने अंग पुसून घ्या, या व्यक्तीच्या डोक्यावर पाणी घाला आणि शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा. या व्यक्तीला लिंबू सरबत वा ORS - मीठ - साखरेचं मिश्रण असणारं पाणी द्या.

वाढलेल्या उष्णतेचा सर्वाधिक धोका कुणाला?

म्हातारी माणसं, गंभीर आजार असलेल्यांना, प्रदीर्घ आजारपण सुरू असणाऱ्यांना, हृदयरोग असलेल्या व्यक्तींना वाढलेल्या उष्णतेपासून अधिक धोका असतो. डायबिटीस असणाऱ्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाणही पटकन कमी होण्याचा धोका असतो.

लहान बाळं, उन्हात मैदानावर खेळणारी मुलं, भर उन्हात उघड्यावर काम करणारे कामगार यांनाही वाढतेल्या उष्णतेचा धोका असतो.

उन्हाळ्यात एकूणच काय काळजी घ्यायची?

  • दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा.
  • तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया वा हालचाली करू नका.
  • ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हात-पाय पुसा.
  • चक्कर येत असेल, दमल्यासारखं वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
  • प्राण्यांना आडोशाला ठेवा. त्यांना पुरेसं पाणी द्या.
  • तहान लागली नाही तरीही पाणी पित रहा. पण एकाचवेळी भरपूर पाणी पिणं योग्य नाही.
  • ORS, लस्सी, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल.
  • हलके, फिकट रंगाचे, सुटसुटीत सुती कपडे घाला. गॉगल्स, छत्री किंवा टोपी वापरा. सनस्क्रीन वापरा.
  • अल्कोहोल, चहा - कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. ही पेयं टाळा.
  • प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न, तेलकट - शिळं अन्न टाळा.
  • लिंबूवर्गीय फळं 'सी' जीवनसत्त्वासाठी चांगली. कलिंगड, खरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षं, आंबा, डाळिंब, करवंद, जांभूळ यांचा आहारात समावेश करावा.
  • आवळा, कोकम, कैरी यांच्यातही 'सी' जीवनसत्त्व, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक असतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)