You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या झोपेचं करायचं काय? भारतातल्या 78 टक्के जोडप्यांनी घेतला 'स्लिप डिव्होर्स'
- Author, दिग्विजय जिरगे
- Role, बीबीसी मराठीसाठी
शांत, व्यवस्थित आणि पुरेशी झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
झोपेची गुणवत्ता आणि त्याचं प्रमाण आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकतात.
योग्य आणि शांत झोप आपली मानसिक क्षमता वाढवते, थकवा कमी करते, मूड सुधारते आणि शरीराची कार्यक्षमताही सुधारते.
परंतु, आता केवळ स्वतःचीच झोप नव्हे तर जोडीदाराच्या झोपेचा परिणामही आपल्यावर होतो व त्यातून नवनव्या समस्या निर्माण होताना दिसत आहेत.
अनेकवेळा जोडीदाराचं घोरणं, त्याची अंथरुणात सुरू असलेली चुळबूळ यांसारख्या गोष्टींमुळंही जोडीदाराला झोप येत नाही. याचा त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या दिनचर्येवर परिणाम तर होत आहेच. शिवाय त्यांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम होताना दिसत आहे.
जोडीदाराच्या घोरण्याकडं दुर्लक्ष करणं ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. पण आरोग्य आणि नातेसंबंध तज्ज्ञांच्या मते, याचा जोडीदाराशी असलेल्या नात्यांवर आणि त्याचबरोबर आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
झोपेपुरता घटस्फोट
अनेकांनी स्लिप डिव्होर्सचा पर्याय निवडल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण जगाला भेडसावत असलेल्या या समस्येनं भारतालाही ग्रासलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग हा झोपेच्या समस्येला सामोरे जात आहे.
स्लिप डिव्होर्स हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी पण हे खरं आहे. या समस्येमुळे एका खोलीत एका बेडवर झोपणारी जोडपी वेगवेगळ्या खोलीत झोपतात. यामागे बरीच कारणं आहेत, मात्र त्यातलं मुख्य कारण म्हणजे झोपेत घोरणं.
रेसमेड या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 78 टक्के भारतीयांनी झोपेसाठी स्लिप डिव्होर्सचा पर्याय निवडला आहे. हे लोक रात्री आपल्या जोडीदाराबरोबर झोपत नाहीत. दोन्ही जोडीदार वेगवेगळ्या खोलीत झोपतात.
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लिप मेडिसिनने (एएएसएम) 2023 मध्ये एक अभ्यास केला होता. या अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांनी असं म्हटलं होतं की, कधीकधी वेगवेगळ्या खोलीत झोपणं चांगल्या झोपेसाठी आवश्यक असतं.
अमेरिकेच्या मॅक्लीन रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ स्टेफनी कॉलियर सांगतात, "स्लिप डिव्होर्स म्हणजे झोपण्यासाठी वेगळं होणं. या जोडप्यांना शांत झोपायचं असतं त्यामुळे ते वेगवेगळं झोपतात."
स्टेफनी सांगतात, "मागच्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड वेगाने वाढू लागलाय. बऱ्याचदा लोक घोरतात कारण त्यांना आरोग्याच्या समस्या असतात. कधीकधी लोक झोपेत चालतात, सतत लघवीला जातात, झोपेत हालचाल करतात. यामुळे त्यांच्या जोडीदाराला त्रास होतो."
भारताखालोखाल ब्रिटन आणि अमेरिकेत स्लिप डिव्होर्सचं प्रमाण हे 50-50 टक्के इतकं आहे.
स्वतंत्रपणे झोपण्याचे संमिश्र परिणाम
वेगवेगळ्या खोलीत झोपण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि तज्ज्ञांनी देखील हे मान्य केलं आहे. गाढ झोप लागणं हा मुख्य फायदा आहे. कॉलियर सांगतात की, माणसाला दीर्घायुष्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे.
त्या स्पष्ट करतात की, "एखादी व्यक्ती नीट झोपत नसेल, तर त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून त्याच्या अवयवांच्या कार्यप्रणालीपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. तसेच या व्यक्तींचा संयम संपतो आणि त्यांना लवकर राग येऊ लागतो. अशा व्यक्ती उदास असतात."
मानसोपचारतज्ञांच्या मते, 'स्लिप डिव्होर्स'मुळं जोडीदारासोबत नातं निरोगी ठेवण्यास मदत मिळते.
कॉलियर म्हणतात की, "जी जोडपी नीट झोपत नाहीत त्यांच्यात मोठे वाद होण्याची शक्यता असते. ते अनेकदा चिडचिड करतात. मात्र काही लोक जेव्हा एकटे झोपतात तेव्हा त्यांची झोप चांगली होते आणि गोष्टीही चांगल्या राहतात."
जोडप्यांनी जेव्हा स्वतंत्रपणे झोपण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यातून संमिश्र परिणाम दिसून आले. काहींच्या वैवाहिक जीवनात चांगले बदल झाले तर काहींचे नातेसंबंधही बिघडले.
वेगवेगळं झोपलेल्या 65 टक्के जोडप्यांना चांगली झोप लागली. तर 31 टक्के जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुधारणा झाली. पण 30 टक्के लोकांचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याचेही समोर आले आहे.
सुमारे 28 टक्के जोडप्यांनी त्यांच्या लैंगिक जीवनात सुधारणा झाल्याचं मत नोंदवलं आहे. तर 22 टक्के जोडप्यांनी याच्या अगदी उलट परिणाम झाल्याचं म्हटलं आहे.
एकाच बेडवर झोपल्याने अनेकदा जोडप्यांना भावनिक फायदे मिळतात. एकमेकांमधील प्रेम वाढतं, कम्फर्ट आणि रिलॅक्सेशन जाणवतं त्याचबरोबर आनंद आणि शांतता या भावना जोडप्यांनी अनुभवल्या.
वेगळ्या खोलीत झोपल्यास काय समस्या येतात?
वेगळ्या खोलीत झोपण्याच्या निर्णयाचे काही नकारात्मक परिणाम देखील होतात.
तज्ज्ञ इशारा देतात की, यामुळं जोडप्यांमधील जवळीकता कमी होऊ शकते. जे लोक पूर्णवेळ काम करतात त्यांच्यासाठी जोडीदारासोबत झोपण्याची वेळ मौल्यवान असते, असं डॉ. कॉलियर म्हणतात.
जेव्हा जोडपी "स्लिप डिव्होर्स घेण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्वांचं देखील पालन केलं पाहिजे.
डॉ. कॉलियर म्हणतात, "काही लोकांना एकटं झोपायची सवय नसते. या मुद्द्यावर दोघांनी समान सहमती घेऊन मगच निर्णय घ्यावा."
"घोरणे, झोपेत चालणे अशा समस्या असणाऱ्या लोकांसाठी काही गोष्टी कठीण असू शकतात. पण बऱ्याच लोकांना वेगवेगळं झोपायला आवडत नाही. सामान्यपणे, पुरुषांना असं झोपण्यात फारसा रस नसतो."
शांत झोपेसाठी जगाचा संघर्ष
संपूर्ण जग झोपेच्या समस्येशी झगडत आहे. कारण चांगल्या झोपेचा संबंध त्या व्यक्तीच्या उत्पादकतेशी, त्याच्या नातेसंबंधासाठी महत्त्वाचा असतो.
अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या शिफारसीनुसार अनेक लोक किमान सात तासांची झोप घेत असले तरी आठवड्यातील किमान तीन रात्री त्यांची अपुरी झोप होते. हे प्रमाण चिंताजनक आहे
22 टक्के लोक आपली खराब झोप सुधारण्यासाठी कोणाची मदतही घेत नाहीत. अजूनही याबाबत जागरुकता झाली नसल्याचे दिसून येते. अमेरिका, जपान आणि सिंगापूरमध्ये हेच प्रमाण आणखी चिंताजनक आहे. या देशांमध्ये 33 टक्के आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर 41 टक्के पर्यंत हे प्रमाण गेलं आहे, असं रेसमेडच्या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलं आहे.
शांत झोप न लागल्यास त्याचा मोठा परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. याचा प्रभाव दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक पैलूवर पडू शकतो. शांतता, आरोग्य, कल्याण, मनःस्थिती, एकाग्रता आणि मानवी संबंधांवर याचा परिणाम होतो.
ताण-तणाव हा झोपेवर परिणाम करणारा मोठा घटक
ताण-तणावाचा झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. ताणामुळं झोपेवर परिणाम झाल्याचे जगात सर्वाधिक प्रमाण भारतात आहे.
भारतातील 69 टक्के लोकांच्या झोपेवर ताण-तणावाचा परिणाम होत आहे. त्याखालोखाल दक्षिण कोरिया (67 टक्के), थायलंड आणि सिंगापूर (65-65 टक्के) आणि जर्मनीच्या (61 टक्के) नागरिकांवर याचा परिणाम होतो.
निम्म्याहून अधिक म्हणजे 53 टक्के जेन झेडच्या (जनरेशन झेड) झोपेवर चिंता हा घटक मोठा परिणाम करतो.
ताण-तणाव, चिंता, आर्थिक ताण याचा झोपेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं आहे.
अपुऱ्या झोपेचा महिलांवर काय परिणाम होतो?
अपुऱ्या झोपेचा सर्वाधिक सामना महिलांना करावा लागतो. त्या आठवड्यात सरासरी केवळ 3.83 रात्री पुरेशी झोप घेतात. हार्मोनलमधील बदल, मासिक पाळी, गर्भधारणा आणि मेनोपॉझ सारख्या समस्यांमुळं त्यांच्या झोपेत आणखी व्यत्यय येतो.
44 टक्के रजोनिवृत्तीच्या महिलांना आठवड्यातून तीन किंवा त्याहून अधिक रात्री झोप न लागण्याचा त्रास होतो. हे प्रमाण नॉन-मेनोपॉझल महिलांच्या 33 टक्के इतके आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.
तणाव, चिंता, आणि आर्थिक दबाव हा महिलांसाठी झोपेच्या अडथळ्यातील मुख्य घटक असल्याचं रेसमेडच्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे.
चांगल्या झोपेचा मानवाच्या गुणवत्तेवर सकारात्मक प्रभाव
झोप चांगली झाल्यास व्यक्तीचा दिवस आनंदात, उत्साहात आणि कार्यक्षमतेने जातो. त्यामुळं डॉक्टरही नेहमी रुग्णांना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात.
अनेकवेळा पुरेशा झोपेमुळं आपला मूड फ्रेश होतो. एकाग्रता सुधारण्यासही मदत होते.
रेसमेडने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की, 89 टक्के लोकांनी पुरेशी झोप घेतल्याने त्यांना स्वतःबद्दल चांगलं वाटतं, परंतु रात्रीची झोप खराब झाल्यास दिवसा झोप लागणं, खराब मूड, चिडचिड, डोकेदुखीचा त्रास आणि लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो.
तर याच्या अगदी उलट, पुरेशा झोपेमुळं मूड सुधारतो, फिटनेस, मानसिक आरोग्य सुधारतं, उत्पादकतेत वाढ झाल्याचं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी नोंदवलं आहे.
स्लिप ॲप्निया म्हणजे काय?
स्लिप अॅप्नियाचा नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. मोठ्या आवाजात घोरण्याचा संबंध हा झोपेच्या विकाराशी जोडला जातो. या विकाराला ऑबस्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्निया (ओएसए)असंही म्हटलं जातं. यामध्ये झोपेदरम्यान वारंवार श्वासोच्छ्वास थांबतो आणि सुरू होत असतो.
घशाच्या भिंती अरुंद झाल्यामुळं हा विकार उद्भवत असतो. त्यामुळं सामान्य श्वासोच्छ्वासात अडथळा येतो आणि परिणामी ऑक्सिजनचं डिसॅच्युरेशन होतं.
यावर उपचार केले नाही तर घोरणारी व्यक्ती आणि पार्टनर या दोघांच्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसंच त्यांच्या कामेच्छेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
स्लिप अॅप्नियाची लक्षणं प्रामुख्यानं झोपेमध्ये पाहायला मिळतात. ती पुढीलप्रमाणे असतात:
- मोठ्यानं घोरणं
- श्वासोच्छ्वास थांबणं आणि पुन्हा सुरू होणं
- घोरण्याचा, गुदमरण्याचा किंवा गळा दबल्याचा आवाज
- वारंवार जाग येणं
दिवसाही याचे काही परिणाम दिसू शकतात:
- जागं असताना डोकेदुखी होणं
- सातत्याने थकवा जाणवणं
- एकाग्रता टिकवणं कठीण जाणं
- स्मरणशक्ती कमी होणं
- नैराश्य, चिडचिड किंवा मूडमधील इतर बदल जाणवणं
- समन्वयात अभाव जाणवणं
- सेक्स ड्राइव्ह कमी होणं
- आरोग्याच्या इतर समस्या
याशिवाय ऑबस्ट्रक्टिव्ह स्लिप ॲप्नियामुळे आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवू शकतात.
ॲप्नियामुळे रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानकपणे कमी झाल्यामुळं रक्तदाबात वाढ होऊ शकते, असा इशारा अनेक तज्ज्ञ देतात. त्यामुळं याच्याशी संबंधित इतर अनेक आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात, असंही तज्ज्ञांचं मत आहे.
झोपेमुळं शरीरातील अवयव होतात रिलॅक्स
झोप येणं आणि जाग येणं ही एकप्रकारची जीवनाची लय आहे असं मानलं जातं.
चार दिवस जागरण केलं आणि एक दिवस झोपून काढला तर कदाचित आराम मिळेल पण झोपेची लय बिघडेल. त्यामुळं ही लय काम ठेवावी असं डॉक्टर सांगतात.
झोपेची वेळ आणि आपला झोपेचा एकूण कालावधी कायम राखावा असं तज्ज्ञ सुचवतात.
एकाग्रता कायम राहावी, कामातला- रोजच्या जगण्यातला इंटरेस्ट कायम राहावा, स्मरणशक्ती चांगली काम करावी असं वाटत असेल तर चांगली व पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे, असं डॉ. शुभांगी पारकर सांगतात. डॉ. शुभांगी पारकर मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या मनोविकार उपचार विभागाच्या प्रमुख आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "झोपेमुळं आपल्या शरीरातले अवयव जणू रिलॅक्स मोकळे होतात. आपली वाढ होण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. झोपेमध्ये शरीरात महत्त्वाचे बदल होत असतात. एकाग्रता, स्मरणशक्तीसाठी झोप आवश्यक आहे.
शरीर-मेंदूतल्या पेशी नीट काम करायला हव्यात तर झोप घेतलीच पाहिजे. जर मेंदू शांतच झाला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नवनिर्मितीचं काम करू शकणार नाही. विश्रांती घेतल्याशिवाय मेंदू उत्साहाने काम करू शकत नाही.
तुम्ही किती वेळ झोपता याबरोबर तुमच्या झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. चांगल्या गुणवत्तेची झोप झाल्यास तरतरीत वाटते आणि मानसिक तणावही कमी होतात."
रसेल फॉस्टर यांचे सहकारी आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॅनिअल फ्रीमन मानसिक आरोग्य उपचारांमध्ये झोपेच्या समस्येकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज व्यक्त करतात.
कारण झोप न येणं, हे एखाद्या विशिष्ट आजाराचं मुख्य लक्षण नसलं तरी वेगवेगळ्या रोगनिदानांमध्ये हे लक्षण आढळून येतं आणि फ्रीमन यांच्या मते बरेचदा या लक्षणाकडे दुर्लक्ष होतं.
चांगल्या झोपेसाठी काय करावं?
हॉवर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार दीर्घकाळ निद्रानाशाची समस्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे मूड स्विंग, लठ्ठपणा, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
चांगल्या आणि गाढ झोपेसाठी डॉ. संजय मनचंदा काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला देतात.
- जेव्हा तुम्हाला झोप येते तेव्हाच झोपा. विनाकारण बेडवर पडून राहिला तर तुमच्या डोक्यात विचारांचं काहूर माजू लागतं.
- तुमच्या झोपायची वेळ ठरवून घ्या. ती अर्धा तास पुढं-मागं असू शकते पण त्यापेक्षा जास्त नाही.
- तुमच्या खोलीत घड्याळ असेल तर ते काढून टाका. कारण ही एक सामान्य सवय आहे की, जर तुम्ही झोपत नसाल तर घड्याळ पुन्हा पुन्हा पाहता. यामुळं नकारात्मक प्रतिक्रियेचं चक्र सुरू होतं, जे तुम्हाला झोपू देत नाही.
- झोपायला जाण्यापूर्वी तुमचे सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स मग ते टीव्ही, टॅबलेट किंवा मोबाईल असो ते सर्व किमान 40 मिनिटे आधी बंद करा.
- संध्याकाळी सहा नंतर चहा/कॉफीचे सेवन करू नका. कारण हे उत्तेजक आहेत. ते तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकतात. धूम्रपान देखील टाळा.
झोप सुधारण्यासाठी लोक काय करतात?
चांगल्या झोपेसाठी किंवा झोप सुधारण्यासाठी 26 टक्के लोक आय मास्क, 25 टक्के लोक पडदे, 19 टक्के लोक रेशमी उशा आणि 15 टक्के लोक इअरप्लगसारख्या साधनांचा वापर करत असल्याचे रेसमेडच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
अनेक लोक झोप सुधारण्यासाठी गॅझेट्सचा वापर देखील करतात. 42 टक्के लोक स्लिप ट्रॅकिंगसाठी स्मार्टफोन अॅप्सचा वापर करतात. हे स्मार्टफोन अॅप्स वापरण्याचं प्रमाण जपानमध्ये 54 टक्के, भारतात 53 टक्के आणि दक्षिण कोरियात 52 टक्के आहे.
29 टक्के लोक उपकरणांचाही (वियरेबल डिव्हाइस) वापर करतात. न्यूझीलंडमध्ये 41 टक्के, सिंगापूर 39 टक्के, चीनमध्ये 38 टक्के लोक अशा उपकरणांचा वापर करतात.
पुरेशी झोप ही आरोग्य, चांगलं वैवाहिक जीवन आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा थेट प्रभाव आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीकडे जातो.
हे आपल्या दैनंदिन कार्यक्षमतेला सुधारतं, तणाव कमी करतं आणि आपलं नातेसंबंध बळकट करतात. म्हणूनच, चांगली झोप एक आदर्श जीवनशैली साधण्यासाठी आवश्यक आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)