हकीम अजमल : हिंदू महासभेच्या मुस्लिम अध्यक्षांची कहाणी

    • Author, विवेक शुक्ला वरिष्ठ पत्रकार
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेसकडून पंचकुइया रोडवर पुढं गेलं की, आरके आश्रम मेट्रो स्टेशनपासून काही अंतरावर एक मोडकळीस आलेलं पांढरं गेट दिसतं. त्याच्या बाहेर बरीच वर्दळही पाहायला मिळते.

गेटमधून प्रवेश करत तुम्ही हसन रसूल वस्तीमध्ये प्रवेश करता. याठिकाणी लहान-लहान घरांच्या बाहेर अनेक कबरी दिसतात. त्यामुळं हे नेमकं कब्रस्तान आहे की वस्ती हेच लक्षात येत नाही. कबरींजवळ गप्पा मारत असलेले लोक दिसतात. घरांमधून ढोलकी वाजण्याचा आणि काही लोक संगिताचा रियाज करत असल्याचाही आवाज ऐकू येतो.

आम्ही एका जणाला हकीम अजमल खान यांच्या कबरीबाबत विचारलं. रमजान नावाच्या त्या व्यक्तीनं इशाऱ्यानंच सांगितलं.

या महान व्यक्तीमत्त्वाच्या अत्यंत साधारण अशा वाटणाऱ्या कबरीजवळ आम्ही पोहोचलो. काँग्रेस, मुस्लीम लीग आणि हिंदु महासभा या सर्वांचे अध्यक्ष ही व्यक्ती राहिलेली आहे. ते मोठे युनानी अभ्यासक (हकीम) होते. रोज शेकडो रुग्णांवर ते उपचार करायचे.

काही लोक त्यांना 'मसिहा ए हिंद' देखिल म्हणायचे. हकीम अजमल खान यांच्या कबरीसमोर एक महिला बसलेल्या होत्या. त्यांचं नाव होतं फौजिया. त्या म्हणाल्या की, "आम्हीच हकीम साहेबांचया कबरीची देखभाल करतो. याठिकाणी कुरआण आणि फातिया पठन करतो."

हकीमजींच्या कबरीवर गुलाबाच्या काही सुकलेल्या पाकळ्या पडलेल्या आहेत.

फौजिया म्हणाल्या की, "कबरीवर श्रद्धांजली अर्पण करायला कोणतीही प्रसिद्ध व्यक्ती किंवा हकीमजींच्या कुटुंबातील कोणीही येत नाहीत."

पण हकीमजींचे पणतू आणि सुप्रीम कोर्टातील वकील मुनीब अहमद खान यांनी हा आरोप फेटाळला.

ते म्हणाले, "मी हकीम साहेबांच्या जयंतीला (11 फेब्रुवारी) भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर कबरीच्या ठिकाणी नक्की जातो. ही जागा आमच्या कुटुंबाची होती. इथं आमचे पूर्वज दफन आहेत. पण याठिकाणी अतिक्रमण केलं आहे."

त्यांचा इशारा हकीमजींच्या कबरीची निगा राखण्याचा दावा करणाऱ्या महिलेकडं होता.

हकीमजी आणि गांधीजींची भेट

मुनीब अहमद खान दिल्ली-6 च्या प्रसिद्ध लाल कुआँमधील शरीफ मंजिल नावाच्या हवेलीत राहतात. हेच हकीम अजमल खान यांचं घर होतं.

या शरीफ मंजिलमध्येच 13 एप्रिल 1915 रोजी गांधीजी आणि कस्तुरबा हकीमजींना भेटण्यासाठी पोहोचले होते. गांधीजी 12 एप्रिल 1915 ला पहिल्यांदा दिल्लीला आले होते. त्यावेळी ते काश्मिरी गेटवरील सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये थांबले होते.

हकीमजी 14 एप्रिलला गांधीजी आणि कस्तुरबा यांना दिल्ली फिरवण्यासाठी लाल किल्ला आणि कुतूब मिनारला घेऊन गेले होते. सगळ्यांनी तेव्हा टांग्यातून प्रवास केला होता. हकीमजींनीच याठिकाणी गांधीजींसाठी वैष्णव भोजनाची व्यवस्था केली होती.

दिल्लीचे इतिहासकार आर.व्ही.स्मिथ याबाबत उल्लेख करायचे.

"दिल्लीमध्ये गांधीजींची त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या हकीम अजमल खान यांच्याशी दीनबंधू सीएफ अँड्र्यूज यांच्या मार्फत भेट झाली होती. त्यांच्याच आग्रहामुळं गांधीजी सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये थांबले होते. अँड्र्यूज सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये शिकवायचे आणि दिल्ली ब्रदरहूड सोसायटीशी संलग्न होते."

चेहरा पाहून आजार ओळखायचे

हमदर्द दवाखाना आणि जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीची स्थापना करणारे हकीम अब्दुल हमीद यांनी 1995 मध्ये सांगितलं होतं की, हकीम अजमल खान यांच्याकडं महिलांच्या मासिक पाळी आणि फेफरे येण्याच्या आजारावर अगदी रामबाण औषध असायचं.

त्यांच्या औषधावरून रामपूरच्या नवाबांच्या बेगम मृत्यूशय्येवरून परतल्या होत्या. ते नऊ वर्ष रामपूरच्या नवाबांकंडं हकीम बनून राहिले.

त्यांचं निधनही रामपूरमध्येच झालं. दिल्लीचे जुने लोक दावा करायचे की, त्यांची बुद्धी एवढी तल्लख होती की, ते फक्त रुग्णाचा चेहरा पाहून आजाराबाबत ओळखून जायचे.

कुणाच्या सल्ल्याने सुरू केले तिब्बिया कॉलेज

पहिल्या भेटीनंतरच गांधीजी आणि हकीम अजमल खान यांच्यात जवळीक निर्माण झाली.

गांधीजींनीच हकीम अजमल खान यांना दिल्लीतील लोकांना फायदा व्हावा म्हणून एक मोठं हॉस्पिटल सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी हकीमजी लाल कुआँमधूनच रुग्णांची सेवा करायचे.

लाल कुआँ भाग सोडून बाहेरच्या रुग्णांच्या उपचाराचा विचारही त्यांनी केला नव्हता. त्यांना गांधीजींचा सल्ला आवडला. त्यानंतर करोल बागमध्ये नवीन रुग्णालय आणि कॉलेजसाठी जागा शोधण्यात आली.

जेव्हा जमीन मिळाली तेव्हा हकीमजींनी गांधीजींच्या हस्ते 13 फेब्रुवारी 1921 ला तिब्बिया कॉलेज आणि हॉस्पिटलचं उद्घाटन केलं.

शरीफ मंजिल किती जुनी?

हकीम साहेबांची वडिलोपार्जित हवेली शरीफ मंजिलला 2020 मध्ये 300 वर्षे पूर्ण झाली. ती 1720 मध्ये बांधली गेली होती.

शरीफ मंजिल दिल्लीतील सर्व जुन्या वस्तींमधल्या घरांपैकी असल्याचं समजलं जातं. याठिकाणी सध्या हकीम अजमल खान यांचे पणतू हकीम मसरूर अहमद खान त्यांच्या कुटुंबासह राहतात.

हकीमजींनी महात्मा गांधीच्या असहकार आंदोलनातही सहभाग घेतला होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षही बनले होते. तसंच 1921 मध्ये अहमदाबादेत झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्षही होते.

हकीमजी काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे पाचवे मुस्लिम होते. त्यापूर्वी ते 1919 मध्ये मुस्लीम लीगचे अध्यक्ष बनले होते. मुस्लीम लीगच्या 1906 मध्ये ढाक्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनातही ते सहभागी झाले होते.

ते 1920 मध्ये अखिल भारतीय खिलाफत कमिटीचेही अध्यक्ष होते. दिल्ली सरकारच्या वेबसाईटनुसार ते हिंदु महासभेचेही अध्यक्ष होते.

कुणाचे भाडेकरू होते मिर्झा गालिब?

शरीफ मंजिलपासून दोन मिनिटांच्या अंतरावरच मिर्झा गालिब यांचं स्मारक आहे. मिर्झा गालिब यांचं स्वतःचं घर तर नव्हतं.

ते भाड्याच्या घरांमध्ये राहत होते. पण जीवनाची अखेरची सहा वर्ष ते ज्या घरात राहिले, ते घर हकीम अजमल खान यांचे वडील हकीम गुलाम महमूद खान यांनी त्यांना राहण्यासाठी भाड्यानं दिलं होतं.

गालिब यांच्याकडून नावाला भाडं घेतलं जात होतं. गालिब यांचं स्मारक ज्याठिकाणी तयार केलेलं आहे, ती जागाही हकीमजींच्या वडिलांचीच आहे.

आरव्ही स्मिथ यांच्या मते, हकीमजींच्या पुढाकारानंच 1920 मध्ये उद्योग भवनला लागून असलेल्या सुनहरी मशिदीचा पुनर्विकास करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली नगर परिषद या मशिदीला हटवणार असल्याच्या चर्चेमुळं ही मशीद चर्चेत होती.

ही मशीद रस्त्यात मधोमध वर्तुळाकार भागात असल्याचा त्यांचा दावा होता. या गोल परिसराला हकीमजींची बाग म्हटलं जायचं. या लहानशा बागेत सुनहरी मशीद उभी आहे.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये योगदान

हकीम अजमल खान जामिया मिलिया इस्लामियाच्या संस्थापकांपैकी एक होते. 22 नोव्हेंबर 1920 ला त्यांची या विद्यापीठाचे पहिले कुलपती म्हणून निवड करण्यात आली होती. 1927 मध्ये मृत्यू झाला तोपर्यंत हकीमजी या पदावर होते.

या काळात त्यांनी विद्यापीठ अलिगडमधून दिल्लीला हलवलं आणि आर्थिक आणि इतर संकटांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा करून आणि अनेकदा स्वतःचे पैसे वापरून त्यांनी त्याला सहकार्यही केलं.

जामिया मिलिया इस्लामियाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक आसिफ उमर यांच्या मते, जामियाची स्थापना गांधीजींच्या आशिर्वादानं झाली होती.

गांधीजींच्या आवाहनावरून विदेशी राजवटीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार करण्यासाठी राष्ट्रवादी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एका गटानं विरोध करून अलिगड मुस्लिम विद्यापीठ सोडलं.

या आंदोलनात हकीम अजमल खान, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि अब्दुल मजीद ख्वाजा आघाडीवर होते.

जामियाचं स्थलांतर आणि प्रेमचंद

हकीम अजमल खान यांनी जामियाला 1925 मध्ये अलिगडहून दिल्लीत करोल बागला स्थलांतरित केलं.

याच परिसरात मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी 'कफन' चं लिखाण केलं होतं.

हकीमजींनी सुरुवातीच्या काळात जामियाचा बहुतांश खर्च स्वतःच्या पैशातून भागवला.

हकीम अजमल खान यांच्या कबरीची अवस्था पाहून, ज्या व्यक्तीनं दिल्लीत तिब्बिया कॉलेज आणि जामिया उभं केलं, त्याचाच दिल्लीला विसर पडला असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.