सीमा हैदर सारखीच सलमा सुद्धा तब्बल 40 वर्षं भारताचा नागरिक होण्याची वाट पाहत आहेत

सलमा
    • Author, शाहबाज अन्वर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, शामली, उत्तर प्रदेश येथून

आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या सर्वच माध्यमांवर चर्चा आहे.

पबजी खेळता खेळता ग्रेटर नोएडा येथील सचिन मीणा याच्या प्रेमात पडलेली सीमा हैदर आपल्या चार मुलांसह ही पाकिस्तानातलं आपलं सर्वस्व सोडून निघाली. पाकिस्तानची सीमा ओलांडून तिने नेपाळमार्गे भारतात प्रवेश केला आहे.

सध्या ती उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये रब्बुपुरा येथे सचिन मीणा याच्या घरी राहत आहे. साहजिकच, माध्यमांना तिच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर तिच्या मुलाखतींचं सत्र, सुरक्षा संस्थांकडून चौकशी आदी गोष्टी सुरू आहेत.

सीमा हैदर सध्या राहत असलेल्या ग्रेटर नोएडापासून 100 किलोमीटर अंतरावर शामली जिल्ह्यात सलमा नामक एक पाकिस्तानी महिला राहते.

सलमा असं या महिलेचं नाव असून त्या 63 वर्षांच्या आहेत. सध्या सलमा यांची तब्येत खालावलेली आहे. त्यांना मधुमेहाचा दुष्परिणाम होऊन एका डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे. सध्या त्या केवळ एकाच डोळ्याच्या मदतीने पाहू शकतात.

सलमा या गेल्या 38 वर्षांपासून भारताचं नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकवेळी अपयश आलं तरी त्या याबाबत अपेक्षा बाळगून आहेत.

दृष्टी कमी होत असतानाही कागदोपत्री आपली ओळख ही भारताची सून म्हणून बनवण्याची उमेद कायम असल्याचं दिसून येतं.

अनिस अहमद आणि सलमा

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

फोटो कॅप्शन, अनिस अहमद आणि सलमा

सलमा यांच्याबाबत बोलताना गढ़ी पुख्ता पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राधेश्याम सांगतात, "येथील जैनपुरी परिसरात अनिस अहमद राहतात. त्यांची पत्नी सलमा ही मूळची पाकिस्तानची रहिवासी आहे. ती सध्या दीर्घ मुदतीच्या व्हिसावर याठिकाणी वास्तव्य करते. मला एवढेच माहीत आहे, पण तिच्यावर सतत नजर ठेवली जाते."

काय आहे प्रकरण?

शामली येथील गढी पुख्ता परिसरात 65 वर्षीय अनिस अहमद यांचं घर आहे. ते एक घाऊक भाजीविक्रेते आहेत. तर त्यांची पत्नी सलमा ही पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील झांग येथील मूळ रहिवासी आहे.

अनिस आणि सलमा यांचं विवाह प्रमाणपत्र

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

फोटो कॅप्शन, अनिस आणि सलमा यांचं विवाह प्रमाणपत्र

अनिस अहमद बीबीसीशी बोलताना म्हणाले, "माझं लग्न सलमासोबत 23 सप्टेंबर 1983 रोजी पाकिस्तानात झालं. सलमा ही माझ्या मावशीची मुलगी आहे. भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी माझी मावशी पानिपतमध्ये राहायची. पण फाळणीनंतर ती पाकिस्तानातील झांगमध्ये राहायला गेली. पण आमच्या कुटुंबाने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला.

ते पुढे म्हणतात, “फाळणीनंतरही आमच्या मावशीसोबत आमचा संपर्क होता. ते येथे येत-जात असत. सलमाचा जन्म झांगमध्येच झाला. आमच्यातील नातं टिकवण्यासाठी आमचं लग्न लावून देण्यात आलं. त्यावेळी माझे वय 24 आणि सलमा 22 वर्षांची होती. मी माझ्या पत्नीच्या भारतीय नागरिकत्वासाठी 1985 पासून प्रयत्न करत आहे."

म्हणजेच भारतात दाखल झाल्याच्या 40 वर्षांनंतर देखील त्यांना अद्याप नागरिकत्व मिळू शकलेलं नाही.

अनिसच्या लग्नाची वरात पाकिस्तानात

अनिस यांना एकूण दोन भाऊ आणि एक बहीण अशी भावंडं. हे सर्व जण गढी पुख्ता येथेच राहायचे. त्यांच्यापैकी एक भाऊ आणि बहीण यांचं निधन झालेलं आहे. तर एक भाऊ अजूनही गढी पुख्ता येथेच राहतात.

गढी पुख्ता येथील अनिस अहमद यांचं घर

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

फोटो कॅप्शन, गढी पुख्ता येथील अनिस अहमद यांचं घर

अनिस त्यांच्या लग्नाची आठवण सांगताना म्हणाले, "माझ्या लग्नाची वरात पाकिस्तानला गेली होती. आम्ही तिथे रेल्वेने गेलो होतो. वरातीत आमच्या नातेवाईकांसह जवळपास 22 जण होते.

पाकिस्तानात आम्ही एक खोलीही भाड्याने घेतली. लग्न समारंभ पार पडल्यानंतर सर्वजण सलमाला घेऊन भारतात परतलो. पाकिस्तानात आम्ही जवळपास तीन महिने राहिलो आणि लग्नाचे सर्व विधी पार पाडूनच आम्ही माघारी आलो.”

आपल्या लग्नाबाबत सलमा सांगतात, “मला आमचं लग्न चांगलंच आठवतंय. लग्नाच्या दिवशी मी लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. घरातले सगळे खूप आनंदात होते. मलाही खूप उत्सुकता होती की मी आता भारतात जाऊन बघेन की माझा हा देश कसा असेल."

सलमा या झांगच्या मोहल्ला भाबराना येथील रहिवासी सलमतुल्ला यांची कन्या आहेत. सलमतुल्ला काही वर्षांपूर्वी निधन झालं.

आता त्यांच्या घरी फक्त सलमतुल्ला यांचे पुतणे आणि इतर नातेवाईक राहतात. आपल्या चार भावंडांपैकी केवळ सलमा याच आजघडीला हयात आहेत.

1985 पासून नागरिकत्वासाठी प्रयत्न

अनिस अहमद यांनी सलमा यांच्याशी विवाह करून त्यांना भारतात आणलं. व्हिसाची मुदत संपल्यानंतर सलमा यांनी नागरिकत्वासाठी अर्ज केला.

अनिस अहमद

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

अनीस म्हणाले, “त्यावेळी मी माझ्या पत्नीला भारतीय नागरिकत्व देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे केला होता. तेव्हा शामली जिल्हा अस्तित्वात नव्हता. त्यावेळी मुझफ्फरनगर हा आमचा जिल्हा होता.”

"नंतर मी माझ्या पत्नीचा व्हिसा पाच वर्षांसाठी वाढवला, पण तिला आजतागायत नागरिकत्व मिळू शकलेलं नाही. अशा स्थितीत आम्ही सतत व्हिसाचा कालावधी वाढवत आहोत आणि प्रत्येक वेळी पासपोर्टचं नूतनीकरण करत आहोत."

"राज्यनिष्ठेची शपथही घेतली"

सलमा आणि त्यांचे पती अनिस अहमद हे 38 वर्षांपासून नागरिकत्वासाठी अधिकाऱ्यांकडे अर्ज करत आहेत. शिवाय, 10 ऑगस्ट 2015 साली शामली प्रशासनाच्या आमंत्रणानुसार राज्यनिष्ठेची शपथ घेतल्याचा दावाही त्यांनी केला. शपथ घेतल्यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या, पण त्याचं पुढे काहीही होऊ शकलं नाही.

शपथ

फोटो स्रोत, SHAHBAZ ANWAR

ते म्हणाले, "आम्हाला शामलीच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र मिळालं होतं. त्यानुसार आम्हाला सकाळी 11 वाजता बोलावण्यात आलं. आमची शपथही झाली. पण अजूनही आम्हाला नागरिकत्व मिळण्याची प्रतीक्षा आहे.”

सलमा यांच्या या आरोपावर बोलताना शामलीचे जिल्हाधिकारी रविंद्र सिंह यांनी म्हटलं, “आम्हाला याबाबत माहिती मिळाली होती. आम्ही याच अहवाल केंद्र सरकारकडे पाठवून दिला आहे. आता पुढची प्रक्रिया तिथूनच पार पडेल. आमच्या येथून आम्ही जानेवारी 2023 लाच अहवाल पाठवलेला आहे.”

'माझं जग भारतात, पाकिस्तानात जाऊन काय करणार?'

भारतीय नागरिकत्वासाठी प्रदीर्घ काळापासून प्रयत्न करणाऱ्या सलमा यांना दोन मुले आणि चार मुली अशी सहा अपत्य आहेत. या सर्वांचं वय 37 ते 19 वर्षे आहे.

भारताच्या नागरिकत्वाबाबत बोलताना त्या म्हणतात, “माझे पती, माझी मुलं ही सगळी भारताची रहिवासीच आहेत. आता या वयात मला जास्त धावपळ जमत नाही. आता तरी भारत सरकारने मला देशाचं नागरिकत्व द्यावं. आता माझं जग हे भारतच आहे. पाकिस्तानात परत गेले तर मी मरून जाईन.

हे बोलत असताना सलमा यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्यांच्या बाजूला त्यांची सर्वात लहान मुलगी तफसिरा हीसुद्धा बसलेली होती. आईचे अश्रू पाहताच तफसिराचे डोळेही पाणावले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)