सीमा हैदरसाठी पाकिस्तानात मंदिरांवर हल्ले, बॉम्ब फेकण्याची धमकी

फोटो स्रोत, SHAHNAWAZAHMAD/BBC
- Author, रियाज सोहैल
- Role, बीबीसी उर्दू, कराची
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील काही दरोडेखोरांनी एका हिंदू मंदिरावर हल्ला केलाय. या मंदिराच्या भिंतींवर गोळ्यांच्या खुणा होत्या. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याची किंवा कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाहीये.
मागच्या काही दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी धमकी देताना म्हटलं होतं की, जर सीमा रिंद उर्फ सीमा हैदरला भारतातून परत आणलं नाही तर ते हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले करतील.
सीमा हैदरच्या म्हणण्यानुसार, ती भारतात राहणाऱ्या सचिन मीणावर प्रेम करते. ते दोघेही तिच्या चार मुलांसह ग्रेटर नोएडामध्ये राहत आहेत. ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतातील ग्रेटर नोएडामध्ये आली. आता हे प्रकरण दोन्ही देशांमध्ये चर्चेचा विषय ठरलंय.
बातम्यांनुसार, शनिवारी रात्री उत्तर सिंधमधील कश्मूर कंध कोट जिल्ह्यातील कच्छे येथील औगाही गावात हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर हिंदूंमध्ये भीतीचं वातावरण आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
गौसपूर येथील पत्रकार अब्दुस्समी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, त्यांचं दरबार डेरा बाबा सावल शाहच्या पुजार्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितलं की, ते रात्री मंदिरात (याला पोलीस दरबार म्हणतात) झोपले होते तेव्हा गोळीबार सुरू झाला. यानंतर त्यांनी जवळच्या घरात लपून आपला जीव वाचवला.
पोलिसांना सापडले रॉकेटचे भाग, तपास सुरू
पोलिसांना या दरबाराच्या आजूबाजूच्या परिसरात रॉकेटचे दोन गोळे सापडले आहेत. यांचा अजून स्फोट झालेला नाही. एक गोळा भिंतीत तर दुसरा गोळा खड्ड्यात पडला होता.
पत्रकार अब्दुस्समी यांच्या म्हणण्यानुसार, त्या गावात बागडी समाजाची 70 घरं आहेत. आजूबाजूच्या भागातील बागडी समाजाचे लोकही इथे दर्शनासाठी येतात.

कश्मूर कंध कोटचे एसएसपी इरफान सम्मू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, हे मंदिर नाहीये, हा दरबार एका घराला लागून आहे. काल रात्री जिथे गोळीबार झाला तिथे हिंदू समुदायाचे लोक दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात.
त्यांनी दावा केलाय की, या गावातील मुस्लिमांचे इतर जमातींशी जुने वैर आहे. त्यामुळे या अंगाने देखील तपास सुरू आहे.
दरोडेखोरांनी काय धमकी दिली होती?
बागडी हा समाज हिंदूमधील दलित समुदाय आहे. हा समाज उत्तर सिंधपासून खालच्या सिंधपर्यंत पसरला असून हे लोक प्रामुख्याने शेती करतात. टरबूज लागवडीत त्यांचं प्राविण्य आहे.
सीमा रिंद उर्फ सीमा हैदरला परत न आणल्यास हिंदूंच्या मंदिरावर हल्ले करू अशी धमकी घोटकीचा दरोडेखोर रानू शर याने दिली होती.
त्यानंतर कश्मूर कंध कोटच्या दरोडेखोरांनी देखील अशीच धमकी दिली होती. यात त्यांनी गौसपूर आणि करमपूर उद्ध्वस्त करू असं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
घोटकीचा दरोडेखोर निसार शर याने हल्ल्यानंतर एक व्हीडिओ पोस्ट केलाय. यात त्याने पोलीस अधिकार्यांना उद्देशून विचारलंय की, गौसपूर येथील मंदिरावर रॉकेटने हल्ला केल्यानंतर तुम्ही कुठे होता.
त्याचं म्हणणं आहे, ही निंदनीय गोष्ट आहे. यात पाकिस्तान मधील हिंदूंचा काहीच दोष नाहीये, पण पाकिस्तान सरकारने सीमा रिंदला परत आणलं नाही तर असे हल्ले होतच राहतील.
हिंदू प्रार्थनास्थळे, वसाहतींची सुरक्षा वाढवली
आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलण्यास तयार झालेल्या रमेश लालने (नाव बदललेलं आहे) सांगितलं की, तो घोटकी जिल्ह्यातील रहिवासी असून तो विद्यापीठात शिकायला आहे.
तो सांगतो, "आम्ही नेहमीच वाद करणं टाळतो, आमच्या कामाशी काम ठेवतो. दरोडेखोरांच्या धमकीनंतर साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण असणार. कारण आमच्या समाजातील लोकांचं अपहरण झालंय आणि या जिल्ह्यात हिंदू समाजावर हल्लेही झालेत."
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी हिंदू समुदायाच्या प्रार्थनास्थळांची आणि वसाहतींची सुरक्षा वाढवली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सीमा रिंदला (सीमा हैदर) परत आणण्यासाठी दरोडेखोरांनी दिलेल्या धमक्यांमुळे ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

दरोडेखोरांच्या अनेक टोळ्या सक्रिय
उत्तर सिंधमधील घोटकी, कश्मूर, कंध कोट आणि जेकोबाबाद या जिल्ह्यांमध्ये दरोडेखोरांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांनी सिंध नदीकाठी कच्चे परिसरात तळ ठोकलाय.
मागील अनेक दशकांपासून या टोळ्यांवर पोलिस कारवाई सुरू आहे. पण त्यांना नेस्तनाबूत करण्यात अद्याप यश आलेलं नाही.
सीमा आणि गुलाम हैदर (सीमाचे पती) दोघेही बलुच समाजातील आहेत. सिंधमधील विविध दरोडेखोरांच्या टोळ्यांनी भारत सरकारला सोशल मीडियावर धमकी दिली होती की, सीमाला तिच्या देशात परत पाठवावं.
रानू शर नावाच्या या दरोडेखोराने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो, संसद सदस्य आणि सरकारला उद्देशून एक व्हीडिओ तयार केला होता. यात त्याने सीमा आणि तिच्या मुलांना पाकिस्तानात परत आणण्याची विनंती केली होती. नाहीतर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या सर्व हिंदूंना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल असं म्हटलं होतं. जर सीमा परत आली नाही तर राहरकीच्या मंदिरावर बॉम्बफेक करू अशी धमकीही दिली होती.
दरोडेखोर रानू शरचा पोलिसांकडून शोध सुरू असून त्याच्यावर आरोप आहे की, तो महिलांच्या आवाजात लोकांना फूस लावून कच्चे येथे बोलवतो आणि नंतर त्यांचं अपहरण करतो.

दुसर्या एका व्हीडिओमध्ये पाच सशस्त्र मुखवटाधारी दरोडेखोर हिंदू समाजाला धमकी देताना दिसत आहे. सीमा परत आली नाही तर जेकोबाबाद, रत्तू डेरू आणि कश्मूर भागात जिथे जिथे हिंदू राहतात त्यांना गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी धमकी दिली आहे.
या व्हीडीओमध्ये दरोडेखोर अतिशय असभ्य भाषेचा वापर करताना दिसत आहेत. ते म्हणतात, "आमची मुलं आणि सीमा परत करा. आम्ही बलुची कोणाला घाबरत नाही." व्हीडिओच्या शेवटी ते पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत.
एका तिसऱ्या व्हीडिओ क्लिपमध्ये, दरोडेखोर रानू शरची बाजू घेताना म्हणतो की, तो कंध कोट आणि आसपासच्या भागावर हल्ला करेल. तिथे असलेले दोघेजण बॉम्बही दाखवतात.
'यात पाकिस्तानच्या हिंदूंचा काय दोष?'
यावर अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री ग्यानचंद इसरानी म्हणाले की, या संदर्भात सिंधचे मुख्यमंत्री आणि पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाशी बोलणी झाली असून, ते सिंधच्या आयजीशीही दररोज संपर्कात आहेत.
ते म्हणाले की, सिंधच्या आयजींनी मंदिरं आणि हिंदू परिसरात सुरक्षा वाढवल्याचं सांगितलं आहे.
सीमा विषयी ते म्हणाले की, सुरुवातीला तर कोणतीच जमात तिला आपलं मानायला तयार नव्हती.
"आणि जरी ती पाकिस्तानी असली तरी त्यात पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंचा काय दोष? पाकिस्तानी हिंदूंना भारतात जायचं असेल, तर त्यांना दोन दोन वर्ष व्हिसा मिळत नाही. आणि व्हिसा मिळाला तरी भारतात सुरक्षेच्या नावाखाली पाकिस्तानी हिंदूंना खूप छळलं जातं. प्रत्येक ठिकाणी एंट्री करावी लागते. हॉटेलमध्ये राहिलं तर सुरक्षा एजन्सीचे लोक चौकशी करायला येतात."
त्यांचा आरोप आहे की, "जर एखाद्या पाकिस्तानी मुलीला भारतातील एखाद्या हिंदू सोबत लग्न करायचं असेल तर मला वाटतं यात भारत सरकारचंच काहीतरी नियोजन असलं पाहिजे. पाकिस्तानमध्ये दंगल घडवण्यासाठी त्यांची एजन्सी काम करते. माझ्या मते भारताने हे सर्व घडवून आणलंय."
त्यांचं म्हणणं आहे की, "भारताच्या हिंदूंनी काहीतरी केलं म्हणून त्यात पाकिस्तानच्या हिंदूंचा काय दोष? पाकिस्तानचे हिंदू देशभक्त पाकिस्तानी आहेत, शतकानुशतकं ते इथे राहत आहेत, त्यांचा जन्म इथेच झालाय, त्यांचे इथे व्यवसाय आहेत."
हिंदू समाजात भीतीचं वातावरण
यापूर्वी पाकिस्तानातील धार्मिक संघटना या प्रकरणावर मौन बाळगून होत्या. मात्र आता त्यांनीही यावर बोलायला सुरुवात केली आहे.
जमियत-उलेमा-ए-इस्लाम पाकिस्तानचे पदाधिकारी अल्लामा रशीद मेहमूद सूमरो म्हणतात की, सीमा हैदर चार मुलांसह पाकिस्तानातून दुबई आणि नेपाळमार्गे भारतात कशी पोहोचली. या देशांचा व्हिसा तिला कोणाच्या माध्यमातून मिळाला, या घटनेची तातडीने चौकशी व्हायला हवी.
ते असंही म्हणाले की, "एक मुस्लिम महिला भारतात पोहोचल्यावर लगेच हिंदू धर्म स्वीकारते, साडी नेसते, एकदम अस्खलित हिंदी बोलते. यातून अनेक प्रश्न उपस्थित होतात."
सक्तीच्या धर्मांतरामुळे घोटकी जिल्ह्याचं नाव प्रसारमाध्यमांमध्ये येत असतं. स्थानिक रहिवासी मियाँ मिट्ठू यांनी या गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.
मियाँ मिट्ठू यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सिंधमध्ये राहणाऱ्या हिंदूंनी सीमा रिंदच्या परतीसाठी प्रयत्न करावेत. नाहीतर चुकून त्यांच्या मंदिरावर कोणते हल्ले होऊ नयेत.
घोटकी म्युनिसिपल कमिटीचे उपाध्यक्ष आणि सिंध ह्युमन राइट्सचे बोर्ड सदस्य सुखदेव आसर दास हिमानी म्हणतात की, या धमक्यांमुळे हिंदू समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून मंदिरांमध्ये येणं जाणं कमी केलंय.
ते म्हणतात, "या दरोडेखोरांविरोधात कारवाई सुरू आहे. काही धार्मिक कट्टरतावादी त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत आणि पाकिस्तानच्या हिंदू समुदायाने भारत सरकारशी चर्चा करावी, असं सांगत आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही भारतीय नाही, आम्ही त्यांच्या इतकेच पाकिस्तानी आहोत. आम्ही सुद्धा तितकेच या देशाचे नागरिक आहोत. तुम्ही आमच्या मुलींचं अपहरण करून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करता, तेव्हा आम्ही इतर कोणत्याही देशाची मदत मागत नाही. आम्ही तेव्हाही पाकिस्तान सरकारकडेच मदत मागतो."

मीरपूर माथेलो हिंदू पंचायतीचे प्रमुख डॉ. मेहरचंद म्हणतात, "त्या दरोडेखोरांचा सीमाशी काहीच संबंध नाहीये, ना त्यांचा इतर कोणत्या धर्माशी संबंध आहे. केवळ दरोडे घालणं इतकंच त्यांचं काम आहे."
ते म्हणतात की, "आमच्या समाजाची केवळ एकच इच्छा आहे की आम्हाला शांततेत जगू द्या. पण ते आम्हाला धमकावतात आणि त्रास देतात."
अनेक महत्त्वाची श्रद्धास्थानं
सिंधच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये असलेला हिंदू समाज व्यावसायिक आहे. इथे सोनारापासून ते तांदूळ गिरण्यांमधील खरेदी-विक्री करणारे सगळे व्यापारी हिंदू आहेत.
या जिल्ह्यांमध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत. यात शिकारपूर आणि घोटकी ही महत्त्वाची ठिकाणं आहेत. याच ठिकाणी हिंदू संतांचे दरबार आहेत.
घोटकीमध्ये राहरकी दरबार आहे. इथे 1866 मध्ये साई सतराम दास यांचा जन्म झाला होता.
त्यांना सच्चू सतराम किंवा सच्चा सतराम आणि एसएसडी धाम म्हणून ओळखलं जातं. इथे दरवर्षी जत्रा भरते, भारतातून अनेक प्रवासी येतात. जत्रेत येणारी अनेक भारतीय कुटुंब फाळणीच्या वेळी येथून भारतात स्थलांतरित झाली होती.

फाळणीपूर्वी उत्तर सिंधमध्ये धार्मिक दंगली झाल्या, तेव्हा त्या दरबाराशी संबंधित संत भगत कुंवर राम यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचीही इथे समाधी आहे.
शिकारपूरमध्ये समाधा आश्रम आहे. या दरबाराचे प्रशासक भगवान दास सांगतात की, "या आश्रमाला 250 वर्षं झाली आहेत. बाबा हरभजन हे पंजाबमधून आलेले पहिले गद्दी सर किंवा गद्दी नशीन होते. आता सातवे गद्दी नशीन आहेत. सक्खर नदीच्या मधोमध साधू बेलू नावाचा बाबा बखंडी महाराजांचा दरबार आहे, तेथे दरवर्षी जत्रा भरते."
काही लोकांनी 2019 मध्येही घोटकी येथील एसएसडी मंदिराची तोडफोड केली होती.
घोटकीमधील पीपल्स पार्टीच्या मिनार टी विंगचे अध्यक्ष कोको राम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, इथे पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. शिवाय मदतीसाठी सैनिकही आलेत.
ते म्हणतात की, "आम्ही सिंध भूमीचे रहिवासी असल्याचा आमच्या समाजाला खेद आहे. आमच्यासोबत राहणारे बांधव आमच्याविषयी अशी विधानं करत असल्यामुळे समाजात निराशेची लाट पसरली आहे."
सक्खरचे डीआयजी जावेद जसकानी सांगतात की, व्हीडिओ प्रसिद्ध करणारा कुख्यात दरोडेखोर रानू शर याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ते म्हणतात, "दरोडेखोरांनी जी समस्या उचलून धरली आहे त्याला जर धार्मिक प्रचार करणाऱ्या संघटनांकडून पाठिंबा मिळाला, तर ही बाब आणखीन गंभीर होऊ शकते."
ते म्हणतात की, "त्यांच्या जिल्ह्यांच्या एसएसपींनी मंदिरं आणि हिंदू समाज राहत असलेल्या भागांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. हिंदूंसाठी संभाव्य धोका ठरू शकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तैनाती, गस्त आणि गुप्तचरांचा समावेश करण्यात आला आहे."
सिंधच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष सहाय्यक वीर जी कोहली यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की,
"सिंधमधील सर्व मंदिरांमध्ये पोलीस दल आधीच तैनात करण्यात आलं आहे. तेथे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेत. जर कोणी चेहरा लपवून धमकावत असेल तर काही फरक पडत नाही. राज्य जे काम करायचं ते करेल."
ते विचारतात, जेव्हा हिंदू मुली जातात तेव्हा आम्ही काय करतो?
ते म्हणतात, "आम्ही काही करत नाही कारण कायदा म्हणतो की मुलीचं म्हणणं ग्राह्य धरलं पाहिजे. मुलगी जर प्रौढ असेल तर ती आपला धर्म बदलू शकते, लग्न करू शकते."
सीमाचं गुलामशी लग्न
सीमा रिंद उर्फ सीमा हैदर ही सिंध मधील खैरपूर जिल्ह्यातील कोईदिजी तालुक्यातील हाजानू रिंद गावची रहिवासी आहे.
सीमाने तिच्या मर्जीने गुलाम हैदर जाखराणीशी लग्न केलं तेव्हा न्यायालयात हाच पत्ता दिला होता.
गुलाम हैदर हे जेकबाबादच्या नूरपूर भागातील रहिवासी आहेत. पण लग्नानंतर ते गुलिस्तान जौहर येथील दहनी बख्शगोत भागात राहायला गेले.
सौदी अरेबियाला काम करण्यासाठी जाईपर्यंत ते आपल्या कुटुंबासह सीमाच्या घरच्यांसोबत राहत होते. त्यांच्या मेहुणीचं घरही याच भागात आहे.
सून आणि नातवंडं बेपत्ता झाल्यावर गुलाम हैदरचे वडील मीर जान यांनी मालेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सौदी अरेबियातून बीबीसीशी बोलताना गुलाम हैदर जाखराणी म्हणाले की, ही तक्रार एफआयआरमध्ये रूपांतरीतर करण्यासाठी ते एका वकिलाचा सल्ला घेत आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांना परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज पाठवण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन पाकिस्तान सरकार त्यांची पत्नी आणि मुलं परत आणण्यासाठी मदत करेल.

सोशल मीडियावर वेगवेगळे दावे
दुसरीकडे, पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सीमा रिंदच्या कपड्यांपासून ते तिच्या बोलण्याच्या शैलीवर कमेंट्स केल्या जात आहेत. काहीजण तिला भारतीय गुप्तहेर म्हणत आहेत तर काही जण ती सिंधची असूच शकत नाही असं म्हणत आहेत.
जैन बुगटी ट्विटरवर लिहितात, "सीमा ही पाकिस्तानी नसून भारताच्या रॉची एजंट प्रियंका आहे. ती 2013 साली दुबईतून पंजाबच्या मुल्तान शहरात आली आणि स्वतःचं नाव सीमा ठेवलं. तिथे तिची अनवर नावाच्या मुलीशी भेट झाली. गुलाम हैदर आणि अन्वर एकत्र काम करायचे."

शमा जुनेजो नामक ट्विटर हँडलवर लिहिलं होतं की, "ही कोणती मुस्लिम आहे जिला एकही आयात (कुराणची ओळ) आठवत नाही? तिचे पाकिस्तानातील कुटुंब आणि नातेवाईक कुठे आहेत? इथे कुठे वाढली? माध्यमांनी या संशयास्पद प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे."
स्तंभलेखक जावेद अहमद काजी लिहितात, "मी एक सिंधी आहे आणि मला तिच्या (सीमा) सिंधी असण्यावर शंका आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








