4 मुलांची आई, पब्जी खेळत तरुणाशी प्रेम करत पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे भारतात आली, पण एक चूक भोवली

seema

फोटो स्रोत, ANI

    • Author, अभिनव गोयल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पाकिस्तानच्या कराची येथील मलीर कँट ठाण्याचे पोलीस सध्या सीमा रिंद आणि तिच्या चार मुलांचा शोध घेत आहेत.

पण हे पाचही जण कराचीपासून हजारापेक्षा जास्त किलोमीटर दूर ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहत आहेत.

शुक्रवारी (7 जुलै) उत्तरप्रदेशच्या जेवर दिवाणी न्यायालयाने सीमा गुलाम हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीणा यांना पत्ता न बदलण्याच्या आणि देश सोडून न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.

आपल्या पतीला सोडून मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय भारतात आल्याबद्दल सीमाला 4 जुलै रोजी सकाळी पोलिसांनी अटक केली.

सीमा हैदर आणि सचिन
फोटो कॅप्शन, सीमा हैदर आणि सचिन

2019 साली पब्जी खेळता खेळता पाकिस्तानची नागरिक असलेली सीमा गुलाम हैदर भारतात राहणाऱ्या सचिन मीणाच्या प्रेमात पडली होती. पण या प्रेमात केवळ कुटुंबाच्याच नाही तर दोन्ही देशांच्या सीमा आडव्या येत होत्या.

सीमा पाकिस्तानातील अशा भागात राहायची जिथं मुलींना आपलं प्रेम व्यक्त करण्याची अजिबात मुभा नाही. आपलं प्रेम व्यक्त केलं म्हणून इथं मुलींचे दिवसाढवळ्या खून पडल्याच्या बातम्या येतात.

पण सीमाने केवळ प्रेमच व्यक्त केलं नाही तर त्या प्रेमापायी पती गुलाम हैदरला सोडून भारतातील आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अशाच एका सकाळी ती संकटांनी भरलेल्या प्रवासाला निघाली.

सीमा पाकिस्तानात कुठे राहत होती? दोघांची प्रेम कहाणी सुरू कधी झाली? सीमा गुलाम हैदर व्हिसा नसताना भारतात पोचली तरी कशी?

या दोघांनी एका भाड्याच्या खोलीत दीड महिना कसा काढला? आणि तिने अशी कोणती चूक केली ज्यामुळे ती तपास संस्थांच्या जाळ्यात अडकली?

नेपाळ ते ग्रेटर नोएडा पर्यंतचा प्रवास

नेपाळच्या टुरिस्ट व्हिसापासून सीमाची गोष्ट सुरू झाली. सीमाने पोलिसांना सांगितलं की, तिला भारताचा व्हिसा न मिळाल्याने तिने नेपाळचा व्हिसा घेतला.

10 मार्चला ती शारजामार्गे नेपाळला पोहोचली. तिथेच सचिन तिला भेटायला आला होता.

दोघांनी काठमांडूच्या न्यू बस पार्क परिसरातील न्यू विनायक हॉटेलमध्ये एक खोली घेतली आणि सात दिवस राहिले.

सीमा हैदर
फोटो कॅप्शन, सीमा हैदरचं पाकिस्तानी ओळखपत्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यानंतर सीमा पाकिस्तानला परतली. दोन महिने उलटल्यावर तिने पुन्हा नेपाळचा टुरिस्ट व्हिसा घेतला. यावेळी सीमासोबत तिची चार मुलंही होती, मात्र सचिन भारतातच होता.

एफआयआरनुसार, सीमाने सांगितलं की, तिने तिच्या चार मुलांसह काठमांडू ते पोखरा असा प्रवास व्हॅनने केला. रात्रीची वेळ होती म्हणून ती पोखरा मध्येच राहिली. दुसऱ्या दिवशी पोखराहून दिल्लीला जाणारी बस पकडली.

पोखरा ते काठमांडू हे अंतर जवळपास 200 किलोमीटर इतकं आहे. आणि बसने प्रवास करायचा तर सात तास लागतात. पोखरा ते दिल्ली असा प्रवास करण्यासाठी सीमाने सृष्टी नामक एजन्सीच्या एसी डिलक्स गाडीची (सीट क्रमांक 9,10,11) तीन तिकीटं काढली. तिने बसचालकाला एका तिकिटामागे पाच हजार असे एकूण पंधरा हजार रुपये दिले.

सृष्टी एजन्सीने बीबीसीला सांगितलं की, पोखरा ते दिल्लीचं प्रवास भाडं नेपाळी चलनात पाच हजार रुपये आहे. त्यांनी या मार्गाविषयी माहिती देताना सांगितलं की, पोखराहून दिल्लीला जाण्यासाठी सुमारे 28 तास लागतात. ही बस पोखरापासून उत्तरप्रदेशातील सुनौली बॉर्डर (महाराजगंज जिल्हा) मार्गे आग्रा, नोएडा आणि नंतर दिल्लीला पोहोचते.

या प्रवासादरम्यान सीमा सचिनच्या संपर्कात होती. एफआयआरनुसार, 13 जूनच्या रात्री सीमा आपल्या चार मुलांसह यमुना एक्सप्रेसवेवर फलिदा कटजवळ उतरली. तिथे सचिन तिची वाट बघत थांबला होता.

सीमा हैदर

इथून सचिन, सीमा आणि सीमाची 4 मुलं ग्रेटर नोएडातील रबुपुरा येथील आंबेडकर वस्तीत गेले. इथे सचिनने गिरजेश नामक व्यक्तीकडून एक खोली भाड्याने घेतली होती. या खोलीला दर महिना 2500 रुपये भाडं ठरलं.

बीबीसीशी बोलताना घरमालक गिरजेशने सांगितलं, "सचिन माझ्याच गावचा आहे. 13 मे च्या आधी चार पाच दिवस तो खोली भाड्याने मागण्यासाठी आला होता. त्याने सांगितलं की, मी कोर्ट मॅरेज केलं असून आता पत्नी आणि मुलांसोबत राहणार आहे. त्याचं आधार कार्ड आणि पॅनकार्ड घेऊन त्याला भाड्याने खोली दिली.

सचिनशी लग्न करण्याचं स्वप्न

आता सीमा आणि तिची मुलं सचिनसोबत राबुपुरा येथील आंबेडकर वस्तीत राहू लागली. सचिन मागच्या तीन वर्षांपासून त्याच्या घराजवळच्याच एका किराणा मालाच्या दुकानात काम करत होता. इथून तो बऱ्याचदा घरी जेवणासाठी ये जा करायचा.

सीमाचे शेजारी सांगतात की, ती तिचा बहुतेक वेळ घरातच घालवायची. तिचा धर्म, तिचं नागरिकत्व याबद्दल कोणालाच शंका आली नाही.

सीमा हैदर

फोटो स्रोत, ani

घरमालक गिरजेशची पत्नी सांगते, "ती पूर्ण मेकअप करायची. बिंदी, सिंदूर लावायची, साडी पण नेसायची. आता तर ईदही होऊन गेली पण तिच्यावर शंका येईल असं तिने काहीच केलं नाही.

आता सर्व काही सुरळीत झालं होतं. एफआयआरनुसार, सचिनने सीमाला घरी आणल्यानंतर चार-पाच दिवसांनी सगळी कथा आपल्या वडिलांना नेत्रपाल यांना सांगितली. हे ऐकून वडिलांनी सीमाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सचिनने वडील आणि सीमाची भेट एका जंगलात घडवून आणली.

सीमाने नेत्रपाल यांना सचिन सोबत लग्न करायचं आहे असं सांगितलं. यावर नेत्रपाल म्हणाले, "आता तू इथं आली आहेस, पण तू मूळची पाकिस्तानची आहेस. तुझ्या मुलांचं राहणीमान तिकडच्या सारखं आहे. तुम्ही इकडचं राहणीमान शिकून घ्या, मग आम्ही तुझं लग्न सचिनशी लावून देतो."

सीमा-सचिन एकत्र राहत असल्याचं केवळ त्याच्या वडिलांनाच नाही तर त्यांच्या मुलीलाही माहीत होतं. घरमालक गिरजेश सांगतात की, वडील आणि सचिनची बहीणही इथे येऊन सीमाला भेटून गेले. येताना सीमासाठी साडी देखील आणली होती.

सचिनचे काका बिरबल देखील मान्य करतात की, सहा महिन्यांपूर्वी सचिनने त्यांना सीमाबद्दल सांगितलं होतं. पण त्याने खूप समजावून देखील ते या गोष्टीसाठी तयार झाले नाहीत.

भांडं कसं फुटलं?

सीमाला लवकरात लवकर सचिनसोबत लग्न करायचं होतं. यासाठी त्यांनी एक वकील गाठला आणि त्याच्याशी बोलून घेतलं. एफआयआरनुसार सीमाने सांगितलं की, 30 जूनला सचिनचे वडील नेत्रपाल खोलीवर आले आणि त्यांनी कोर्ट मॅरेज करून देऊ असं सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, सचिन आधीच बुलंदशहरला गेलाय तू पण (सीमा) तुझे कागदपत्र घेऊन बुलंदशहर न्यायालयात जा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर सीमा आपल्या चार मुलांसह बुलंदशहर न्यायालयात गेली. तिथे सीमा आणि तिच्या मुलांचे पासपोर्ट पाहून वकिलांनी विचारलं की, तुम्ही तर पाकिस्तानच्या आहात. तुम्ही सचिन सोबत लग्न करू शकत नाही. त्यानंतर सीमा, सचिन आणि त्याचे वडील राबुपुराला परत आले.

इथून हे सगळं प्रकरण पोलिसात गेलं. परत आल्यावर सीमा आणि सचिनला भीती वाटू लागली की, पोलिसांना जर माहिती मिळाली तर ते आपल्याला पकडून नेतील.

30 जूनला रात्रीच सीमाने मुलांना सोबत घेऊन रबुपुरा सोडलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 1 जुलैला सचिन सकाळी दुकानात कामावर गेला. पण थोड्या वेळातच त्याने कामावरून सुट्टी घेतली.

दुकानाचे मालक बीबीसीशी बोलताना सांगतात, "1 जुलै रोजी सचिन सकाळी आठच्या सुमारास दुकानात आला होता. पण आल्या आल्याच त्याने काहीतरी काम आहे असं सांगितलं आणि निघून गेला."

सीमा हैदर

घरमालकाच्या म्हणण्यानुसार, 1 जुलै रोजी पोलीस सीमा आणि सचिनचा शोध घेत ते राहत असलेल्या भाड्याच्या खोलीपर्यंत पोहोचले. पण तिथे कोणीच नव्हतं.

एफआयआरनुसार, पोलीस त्यांच्या मागावर होते. पोलिसांनी सांगितलं की, 3 जुलैला रात्री आठ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रबुपुरा पोलिस ठाण्याचे प्रमुख सुधीर कुमार त्यांच्या टीमसह निघाले. 4 जुलैला पहाटे 1 वाजता हरियाणाच्या वल्लभगढमधून सीमा, सचिन आणि चार मुलांना ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांनी सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांच्याविरोधात विदेशी अधिनियमाच्या कलम 14,120 बी आणि पासपोर्ट अधिनियम 1946 च्या कलम 14 अंतर्गत खटला दाखल केला आहे.

7 जुलै रोजी उत्तरप्रदेशच्या जेवर दिवाणी न्यायालयाने वडिलांसह दोघांनाही जामीन मंजूर केला.

सीमा हैदर मूळची कुठली?

सीमा रिंद ही सिंधच्या खैरपूर जिल्ह्याची रहिवासी आहे. हा भाग खजुराच्या लागवडीसाठी ओळखला जातो. हे शेवटचं स्वतंत्र संस्थान होतं जे नंतर पाकिस्तानात सामील झालं.

सीमाचे पती गुलाम हैदर हे जकोबाबादचे रहिवासी आहेत. सीमा आणि गुलाम हैदर दोघेही बलुची आहेत. एकदा गुलाम हैदर यांनी चुकून सीमा रिंदला मिस कॉल दिला आणि दोघे संपर्कात आले. दोघांमध्ये बोलणं वाढलं आणि प्रेम झालं.

मात्र लग्न करताना अडचणी आल्याने सीमाने आपल्या आईवडिलांचं घर सोडलं आणि गुलाम हैदरशी न्यायलायात जाऊन लग्न केलं.

प्रकरण पंचायतीपर्यंत गेलं आणि गुलाम हैदरच्या कुटुंबीयांना दंड भरावा लागला. पत्नीच्या सांगण्यावरून गुलाम हैदर कराचीला आले. इथे ते रिक्षा चालवून आपला गुजराण करीत होते. 2019 मध्ये कामानिमित्त त्यांनी सौदी गाठलं.

सीमा रिंद कराचीत गुलिस्तां-ए-जौहर भागातील धानी बख्श गोठ गावात भाड्याच्या खोलीत राहत होती.

तिचं घर तिसऱ्या मजल्यावर होतं तर घराचे मालक तळमजल्यावर राहत होते.

सुरुवातीला सीमासोबत तिचे वडील, भाऊ आणि बहीणही राहत होते. वडील अर्ध आणि सीमा अर्ध भाडं देत होती. मात्र भाडं देण्यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणं व्हायची.

पुढे तिच्या बहिणीचं लग्न झालं, भाऊ सैन्यात भरती झाला. आता तिच्यासोबत फक्त वडील राहू लागले. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं.

घरमालक मंजूर हुसैन सांगतात की, एकदा सीमाने सांगितलं की ती गावी निघालीय. त्यानंतर मात्र ती पुन्हा कधी फिरकलीच नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)