प्रजासत्ताक दिन : 'स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर आमच्या गावात अजून वीज पोहोचली नाही’

कलावती उईके
फोटो कॅप्शन, कलावती उईके
    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी, मेळघाटहून

सगळा देश प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात असताना महाराष्ट्राच्याच कोपऱ्यातलं एक गाव आहे, जे आजही विजेशिवाय जगतंय. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही या गावात वीज पोहोचली नाहीये. अशा परिस्थितीत इथले लोक कसे राहतात, जगतात हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने या गावाला भेट दिली.

“आमच्या गावात कधीपासून लाइट नाहीयेत हे आता सांगताही नाही येणार. सोलरवर जेवण बनवेपर्यंत लाइट सुरू राहते, पण नंतर बंद होते.”

घरात अंधार आहे म्हणून कलावती उईके अंगणात स्वयंपाक करत असतात. त्यांचा सगळा स्वयंपाक अंधारतच होतो.

त्यांच्यासाठी ही आता सवयीची गोष्ट आहे. कारण त्यांच्या कोकमार गावात आजपर्यंत वीजच पोहोचली नाहीये.

अमरावती पासून 130 किलोमीटर अंतरावर मेळघाटातलं कोकमार गाव आहे. हरिसाल पासून इथपर्यंतचं 30 किलोमीटर अंतर पार करायला 3 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. यावरून इथल्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात येते.

'बॅटरीवर लाइट लावायचे की टीव्ही पंखे चालवायचे?'

या गावातल्या कलावती उईकेंच्या कुटुंबात पाच जण आहेत. त्यांची दोन मुलं निवासी आश्रम शाळेत शिकतात. या कुटुंबाचा डोलारा 3 एकराच्या शेतीवर अवलंबून आहे.

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रातल्या 'या' गावात 77 वर्षांत अजूनही वीज पोहोचली नाही

वीज नाही, म्हणून गावात सोलर प्लेट बसवण्यात आल्यात. पण त्यातून काही फार फरक पडला नाही. कारण त्यातून उजळणाऱ्या दिव्यांचा प्रकाश केवळ रात्री आठपर्यंत मिळतो. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी वाईट असते.

कलावती उईके
फोटो कॅप्शन, कलावती उईके

कलावती उईके सांगतात की, "सोलर प्लँट काय कायमस्वरुपी सुरू राहत नाही. पॉवर असते तोपर्यंत ठीक बॅटरी उतरल्यावर काय करायचं? लाइट नाही तर टीव्ही-पंखे कसे चालणार? बॅटरीवर लाइट लावायचे की टीव्ही आणि पंखे चालवायचे?"

गेल्या वर्षी वर्गणीसाठी काही लोक घरी आले होते. गावातून काही जणांनी 100 रुपये तर काही जणांनी 500 रुपये दिले. मात्र, वीज काही आली नाही.

'इथे जनावरं राहतात असं वाटत असावं'

गावात वीज यावी म्हणून गावकऱ्यांनी सिमाडोहमध्ये रस्ता रोको आंदोलनही केलं होतं.

गावकरी सूरजलाल बेठेकर सांगतात की, "आम्ही सिमाडोहमध्ये रस्तारोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरही गेलो होतो. जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर ती तारीखही उलटून गेली."

“इथे इलेक्ट्रिसिटी आली नाही, रस्ते बनले नाहीत, टॉवर बनले नाहीत. नेत्यांना वाटतं की, इथे सगळी जनावरं राहतातं. आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हाच इथं यावं असं वाटतं त्यांना.”

अंधार पडायला लागल्यावर गावकरी शेकोटी करून बसतात.
फोटो कॅप्शन, अंधार पडायला लागल्यावर गावकरी शेकोटी करून बसतात.

वीज नसल्यामुळे रोजच्या जगण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचीही किती गैरसोय होते, हे सूरज बेठेकर सांगतात.

वीज असली की गावात गिरणी असली की पीठ दळलं जातं. वीज नसल्यामुळे बायकांना अंधारात स्वयंपाक करावा लागतो. आमची मुलं अभ्यास करू शकत नाहीत. अभ्यासात मागे राहतात, असंही सूरज बेठेकर सांगतात.

शाळा आहे, पण वीज नाही

कोकमार गावातील शाळा

कोकमार गावात शाळा आहे. पण तिथेही वीज नाही. कोकमारपासूनच काही अंतरावर भुत्रूम गाव आहे. शासनाकडून मिळालेली ऑनलाईन शिक्षण प्रणालीची सर्व यंत्रणा इथे आहे, पण वीजच नसल्यामुळे ही सगळी यंत्रणा धूळ खात पडली आहे. मुलांना सोलर पॅनलखाली बसून अभ्यास करावा लागतो.

विनोद देवरकर हे इथे शिक्षक आहेत.

त्यांनी शाळेची परिस्थिती सांगताना म्हटलं की, "मी शाळेला वीज द्या असं म्हटलं. पण पोल दूर असल्यामुळे या ठिकाणी सोलर प्लेट देऊ असं ग्रामपंचायतीनं सांगितलं.

मुलांना ऑनलाइन प्रोजेक्टर वरून जे शिक्षण देऊ शकतो ते टीव्ही किंवा पेन ड्राइव्हवरुन देऊ शकत नाही. शाळा कशा नीटनेटक्या असल्या पाहिजेत."

कोकमार

केंडे धंडे हेही इथले एक ग्रामस्थ आहेत.

ते या सगळ्याबद्दलचा तीव्र संताप व्यक्त करताना म्हणतात की, "स्वातंत्र्य मिळून 70 हून अधिक वर्षं झाली आहेत. मात्र, आजही आमच्या गावात वीज नाहीये. रस्ते नाहीत, तर मतं नाहीत हे आमचं म्हणणं आहे. आम्ही अजूनही राक्षस युगात आहोत."

अमरावती शहरात एक दिवस लाइट गेले तरी तरी फोन करतात. आम्ही इथे कोणाला फोन करायचा, असा त्यांचा प्रश्न आहे.

ही केवळ कोकमारची गोष्ट नाहीये. मेळघाटात आणखी 22 गावं अशी आहेत, जिथे वीज पोहोचलेली नाहीये.

कोकमारमधील या परिस्थितीबद्दल आम्ही आम्ही महावितरणमधील मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला.

त्यांनी म्हटलं की, "मेळघाट हा टायगर फॉरेस्ट रिझर्व्ह आणि अभयारण्य आहे. त्यामुळे त्यांची परवानगी हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जे प्रस्ताव सादर करावे लागतात, ते अतिशय गुंतागुंतीचे असतात. विद्युतीकरणासाठीचं बजेट हे साधारण 50 कोटींचं आहे. मुख्य म्हणजे वन विभाकडून क्लिअरन्स आल्यानंतरच आम्ही हा प्रकल्प हाती घेऊ. "

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)