'पूर्वी डोंगरातून सरपण आणावं लागायचं, चुली पेटायच्या; पाईप गॅस आला आणि ही दैना थांबली'

फोटो स्रोत, ganesh wasalwar
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“आता पुरुषांना म्हणायचं कामच राहिलेलं नाहीये की, सिलेंडर आणून द्या किंवा लावून द्या.”
“हे संपत नाही ना. आपल्याला आणायला जायचं नाही, दैना करायची नाही. वल्ल्याचिल्ल्याची पाह्यपाह्य नाही.”
छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमधील महिलांच्या या प्रतिक्रिया. लाडगाव हे गाव छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे.
लाडगावात गेल्या अडीच महिन्यांपासून घरोघरी पाईपलाईननं गॅसचा पुरवठा केला जातोय.
गावात गल्लोगल्ली पाईपलाईनच्या खुणा दिसतात. याशिवाय प्रत्येक घराच्या बाहेर गॅस वापराचं मीटर बसवण्यात आलंय.
आम्ही सकाळी या गावात पोहचलो तेव्हा रुपाली इत्थर स्वयंपाक करत होत्या.
त्याच्या घरातील पाईप गॅसबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, “घरात जर गॅस संपला, तर दुसरं सिलेंडर आणेपर्यंत आणि टाकी बसवेपर्यंत खूप वेळ जातो. मुलांचे टिफिन असतात, म्हाताऱ्या माणसांना शुगरच्या गोळ्या असतात, त्यांना वेळेवर जेवणं द्यावं लागतं.
"गॅसची पाईपलाईन आल्यामुळे माझा वेळही वाचलाय आणि खर्चही कमी झालाय.”
रुपाली यांनी अडीच महिन्यांपूर्वी पाईप गॅसचं कनेक्शन घेतलं आहे.
'पाईपचा गॅस परवडतो'
सध्या मार्केटमध्ये गॅस सिलेंडर 950 रुपयांच्या किंमतीत मिळतोय.आणि सरकारी सवलत असेल तर जवळपास 600 रुपये द्यावे लागतात.
लाडगावात प्रत्येक घराच्या बाहेर गॅस वापराचं मीटर बसवण्यात आलंय. सिलिंडरद्वारे खर्च होणाऱ्या गॅसपेक्षा पाईपचा गॅस 30 ते 40 % स्वस्त असल्याचं गावकरी सांगतात.
रुपाली सांगतात, “साधारणपणे एक किलो सिलेंडरच्या गॅससाठी मला 60 ते 65 रुपये पे करावे लागायचे. पाईपलाईनद्वारे माझ्या घरात जो गॅस आलाय त्याला मला 30 ते 35 रुपये खर्च येतो. त्याच्यामुळे पैशांमध्ये आलेला हा डिफरन्स खूप आहे.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
5 हजार रुपये डिपॉझिट आणि 1 हजार रुपये जोडणीसाठीचं शुल्क, असे एकूण 6 हजार रुपयांत गावकऱ्यांना पाईप गॅसचं कनेक्शन देण्यात आलंय. पाईप गॅसमुळे सिलेंडरबाबतची भीती महिलांच्या मनातून गायब झालीय.
“सिलेंडर बसवताना रेग्युलेटर थोडा खाली वरती झाला तर पेटवताना त्याचा स्फोट होतो किंवा स्मेल येतो. त्यामुळे घरात मुलांना प्रॉब्लेम येतो. रेग्युलर सिलेंडरची टाकी वापरताना अशा समस्या येत होत्या. आता तसं काहीही नाहीये. कॉक फिरवला की गॅस चालू होतो आणि स्मेल वगैरे काहीही येत नाही,” रुपाली सांगतात.
रुपाली यांनी लग्नानंतर 4-5 वर्षं चुलीवरच स्वयंपाक केला.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होत असल्यामुळे गावातील वृद्ध महिलाही खूश आहेत.
65 वर्षीय बबनबाई बागल त्यांच्या घरातील पाईपलाईन दाखवताना म्हणतात, “पूर्वी डोंगरातून सरपण आणावं लागायचं. दोन रोजाचं, चार रोजाचं. चुली पेटायच्या. एका चुलीवर पाणी तापायचं, एका चुलीवर स्वयंपाक करायचा. अशी दैन होती पहिली.
“धुपण जायचं डोळ्यात. डोळ्याची आग व्हायची. पण चूल पेटल्याशिवाय पर्याय नव्हता. पेटवावंच लागत होतं. शेतात जायचं तर 8-9 वाजताच स्वयपाक आवराव लागायचं. तर दैनच होत होती थोडी.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
आता मात्र बबनबाईंचं आयुष्य बदललं आहे.
त्या सांगतात, "याच्यात (पाईपचा गॅस) फायदा आहे कारण हे संपत नाही. आपल्याला सिलेंडर आणायला जायचं नाही, दैन करायची नाही. वल्ल्याचिल्ल्याची (पाऊसपाण्याची) सरपण पाहायची गरज नाही.”
65 वर्षीय बबनबाईंच्या घरात आधी 2 चुली होत्या. त्याऐवजी आता एकच चूल राहिलीय.
सामान्यपणे ग्रामीण भागातल्या कोणत्याही घरात चुलीशेजारी सरपण दिसतं. बबनबाईंच्या घरात मात्र चुलीशेजारी कोणत्याही प्रकारचं सरपण नव्हतं.
कारण बबनबाईंच्या घरातली चूल आता बंद झालीय.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
गावातच ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचा प्लांट आहे. इथं गुजरातहून एलएनजी म्हणजेच लिक्विफाइड नॅचरल गॅस आणला जातो आणि त्याच्या माध्यमातून सीएनजी आणि पीएनजी गॅस तयार होतो.
लाडगावच्या सरपंच जयश्री बागल सांगतात, “भारत पेट्रोलियम कंपनीनं गावात पीएनजी गॅस पाईपलाईन देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे एनओसी मागितली. ती ग्रामपंचायतनं दिली आणि मग गावात कामाला सुरुवात झाली. एनओसी दिल्यानंतर तीन-चार महिन्यांत हे काम पूर्ण झालं.”
लाडगावात एकूण 350 घरं आहेत आणि त्या सगळ्यांना गॅस पाईपलाईनं दिल्याचंही सरपंचांनी पुढे सांगितलं.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हा सिलेंडरच्या माध्यमातून पुरवला जातो. तर PNG म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅस, हा पाईपलाईनद्वारे पुरवला जातो. एलपीजीपेक्षा पीएनजी हा कमी दाबेचा, तसंच हवेपेक्षा हलका असल्यानं अधिक सुरक्षित असल्याचं कंपनीचे पदाधिकारी सांगतात.
लाडगावात जवळपास 7 किलोमीटर एवढ्या अंतरावर गॅसची पाईपलाईन टाकण्यात आलीय. लाडगावनंतर आता शेजारच्या हिवरा, जडगाव, टोणगाव या गावांनीही पाईपद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठीची तयारी दर्शवलीय.
“महिलांसाठी गॅसच्या पाईपलाईनची सुविधा ही प्रत्येक गावात व्हावी, कारण महिलांचा वेळ वाचतो, सिलेंडरचा खर्चही कमी आहे आणि मेन पॉईंट म्हणजे जेंट्स मंडळीवर अवलंबून न राहता आपण आपली कामं सुरळीतपणे चालू ठेवू शकतो,” पाईप गॅसचे फायदे विचारल्यावर रुपाली त्याचं उत्तर एका वाक्यात देतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








