ललिता जाधव : ‘नवरा मरून जास्त दिवस झाले नाही आणि चालली करोडपती व्हायला, असं लोक म्हणायचे’

फोटो स्रोत, LALITA JADHAV
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, जळगावहून
“लोकांचं म्हणणं होतं की, हिचा नवरा मरून जास्त दिवस झाले नाही आणि ही काय उद्योग करतीये. आधीच मला करोडपती, करोडपती म्हणायचे. तोंडावर नाही पण मला ऐकायला येईल, कळेल अशा भाषेत बोलत होते. म्हणत होते की, एवढा प्रसंग घडून गेला आयुष्यात. पण हिला काही फरक पडलेला नाही.”
‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमासाठी निवड झाल्यानंतर ललिता किशोर जाधव यांना आलेले हे अनुभव.
ललिता जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातल्या पथराड गावात राहतात. ललिता यांच्याकडे दीड एकर शेती आहे.
पतीच्या आत्महत्येनंतर त्यांनी ती ठोक्यानं कसायला दिली आहे. ललिता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांचंही सध्या शालेय शिक्षण सुरू आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
ललिता यांचं लग्न लहानपणीच करून देण्यात आलं.
ललिता यांच्या वडिलांनी त्यांच्या बहिणीला शब्द दिला होता. त्यानुसार मग आत्याच्याच घरी ललिता यांना देण्यात आलं.
ललिता सांगतात, “माझं लग्न लहानपणीच झालं. म्हणजे मी 18 ची पण कंम्प्लीट नव्हते. तुम्हाला चांगली कल्पना असेल की ,खेड्यात मुलींचे लग्न लवकरच करून देतात. माझी इच्छा नव्हती. कारण माझं खूप मोठं ध्येय होतं की, मी काहीतरी मोठी अधिकारी व्हावं."
"त्यादृष्टीनं माझी तयारी आणि अभ्यास पण चांगलाच होता. पण वडिलांनी त्यांच्या बहिणीला शब्द दिला होता. मग त्यांनी माझं लग्न करून दिलं.”
पतीची आत्महत्या
लग्न झाल्यानंतर ललिता यांच्या शिक्षणात तब्बल 10 वर्षांचा गॅप पडला. 2021 मध्ये, लग्नाच्या 18 वर्षांनंतर ललिता यांच्या शेतकरी पतीनं आत्महत्या केली.
ललिता यांच्या घरात हॉलमध्ये एका बाजूला मुलांची पुस्तकं ठेवलेली आहेत, तर दुसऱ्या बाजूला पतीचा फोटो लावण्यात आला आहे.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
त्या घटनेविषयी विचारल्यावर ललिता सांगतात, “तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. 28 सप्टेंबर 2021. त्याच्याआधी आमचं बऱ्यापैकी चाललेलं होतं. पण सततची नापिकी आणि थोडीशी शेती त्याच्यावर उदरनिर्वाह होता. परत त्यांनी पतसंस्थेचं कर्ज घेतलेलं होतं.
"तर त्याचं टेंशन घेऊन म्हणा की काय म्हणा, त्यांच्या मनात काय विचार होते, ते त्यांनी कडू (कळू) पण दिले नाही. त्यादिवशी माझी आत्या गावातच राहते, त्यांच्याकडे मी गेले होते, तेव्हा त्यांनी आत्महत्या करून घेतली.”
‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमासाठी निवड
पतीच्या आत्महत्येनंतर 6 महिन्यांनी, फेब्रुवारी 2022 मध्ये ललिता यांची ‘कोण होणार करोडपती’, या कार्यक्रमासाठी निवड झाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या 6 वर्षं प्रयत्न करत होत्या.
कोण होणार करोडपती कार्यक्रमात सहभागी होण्यामागे दोन उद्देश असल्याचं त्या सांगतात.
“केबीसीमध्ये सहभागी होण्याचे दोन उद्देश होते. ज्ञान हे कधीच संपत नाही हे मला दाखवून द्यायचं होतं. कारण मी लहानपणापासून वर्गात पहिलीच यायचे. माझं जे ध्येय बाजूला राहिलं होतं, त्यामुळे माझ्या मनात मलाच त्रास व्हायचा.
वाटायचं आपण जाणार कुठे होतो? आणि आज आपली काय परिस्थिती आहे? बरोबरच्या मुली बघितल्या की वाईट पण वाटायचं. आपलं ज्ञान अजून संपलेलं नाहीये आणि मी तेव्हा जशी होते तशी आजपण आहे, हे मला लोकांना दाखवून द्यायचं होतं."

फोटो स्रोत, amol langar
“दुसरं म्हणजे माझी घरची परिस्थिती. असं वाटायचं केबीसीमध्ये गेले आणि संधी मिळालीच, तर आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न सुटेल.
थोडीफार रक्कम मिळाली, तरी आपण आपल्या मुलांचं शिक्षण बऱ्यापैकी करू शकू. यासाठी मी केबीसीमध्ये सहभाग घेतला होता,” ललिता पुढे सांगतात.
ललिता यांनी ‘कोण होणार करोडपती’मध्ये लखपती झाल्या. या कार्यक्रमात जिंकलेली रक्कम त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सुरक्षित ठेवलीय.
ललिता सांगतात, “6 लाख 40 हजार माझी विनिंग अमाऊंट होती. त्यातून 30 % सरकारचा कर कापून 4 लाख 48 हजार त्यांनी माझ्या खात्यात जमा केले. ते मी जशाच्या तसे एफडी करुन ठेवलेले आहेत. आता जे मुलांचं शिक्षण चालू आहे ते मी काटकसर करुन, शेतीतून येणाऱ्या पैशांतून करते. पुढे मुलांच्याच शिक्षणासाठी मी हा पैसा वापरणार आहे.”
शेतकरी आत्महत्येची कारणं...
महाराष्ट्रात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांच्या कालावधीत 2,079 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात दररोज सरासरी 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत.
शेतकरी आत्महत्येची कारणं विचारल्यावर ललिता त्याचं उत्तर आकडेवारीसहित देतात.

फोटो स्रोत, AMOL LANGAR
ललिता सांगतात, “शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर काय करेल बरं? या 10 वर्षांची आकडेवारी पाहिली तर, सोनं जवळजवळ 400 ते 500 पटीमध्ये वाढलंय. मोबाईल, पेट्रोल 200 ते 250 पटीमध्ये वाढलंय. फक्त मजुरी म्हणाल, तर गेल्या 2 वर्षात ती 50 ते 150 पटीत वाढलीय.
"आणि शेतकऱ्याचा मालाचा भाव आहे तो तिथल्या तिथंच आहे कित्येक वर्षापासून. तो फक्त 10 ते 20 टक्क्यांनी वाढवलाय. परत हे असं दुष्काळ चालू असतो, नापिकी असते, कधी जास्तच पाणी पडतो."
“जर शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला, प्रत्येक वेळेस व्यवस्थित भाव मिळत गेला, तर त्याला कोणत्याच मदतीची गरज कधीच राहणार नाही,” असंही ललिता पुढे सांगतात.
‘सबसे बुरा रोग, क्या कहेंगे लोग’
ललिता यांनी 2007 साली गावच्या शाळेतील अंगणवाडीत मदतनीस म्हणून कामाला सुरुवात केली. 2016 मध्ये त्यांची अंगणवाडी सेविका म्हणून निवड झाली.
लग्नानंतर 10 वर्षांच्या गॅपनंतर त्यांनी एमए आणि बीएमध्ये डबल ग्रॅज्यूएशन पूर्ण केलंय.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना त्या सांगतात, “या महिलांनी खचून न जाता, थांबून न जाता, वेगवेगळे मार्ग काढत राहिले पाहिजे. आणि जगासमोर सिद्ध केलं पाहिजे की, हो माणूस गेलाय, त्याच्यामुळे मला फरक पडलाय, पण ज्या गोष्टींचा फरक पडलाय त्याच गोष्टी दाखवल्या पाहिजे. मी माझी मुलं, माझा संसार व्यवस्थित सांभाळू शकते, हे खंबीरपणे उभं राहून दाखवलं पाहिजे.”

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC
अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं पद मिळवण्याचं ललिता यांचं पुढचं ध्येय आहे.
‘सबसे बुरा रोग, क्या कहेंगे लोग’, हे वाक्य डोक्यात फिट केलं की, कोण काय म्हणतंय, हा विचार सुटतो आणि आपण आपला विचार करायला, मार्ग निवडायला मोकळे होतो, ललिता यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या या वाक्यातून प्रकर्षानं जाणवतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








