हुरडा विक्रीतून 'ही' 2 गावं 4 महिन्यात कोट्यवधी रुपये कशी कमावताहेत?

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील नरसापूर आणि सारंगपूर ही दोन गावं. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान दररोज सकाळी या गावांमधील शेतशिवारात कीर्तन, अभंगाच्या नादात तल्लीन होत शेतकरी हुरड्याच्या कणसाची कापणी करताना दिसून येतात.
सकाळी 6 वाजता या शेतकऱ्यांचा दिवस सुरू होतो. हातात धारदार विळा घेऊन आणि कमरेला मोठा रुमाल बांधून इथले शेतकरी हुरड्याच्या कणसांची कापणी सुरू करतात.
कापलेलं कणीस हातावर मळलं जातं आणि नंतर ते वाऱ्यावर उफणलं जातं. पुढे त्याचं वजन करुन ते पॅक केलं जातं आणि हुरडा विक्रीसाठी सज्ज केला जातो. पण, याची सुरुवात होते ती ऑगस्ट महिन्यापासून.
नरसापूरचे हुरडा उत्पादक अण्णासाहेब शिंदे आम्हाला त्यांच्या शेतात घेऊन गेले तेव्हा तिथं काही जण हुरडा कापणी करत होते, तर काही जण कापलेला हुरडा मळायचं काम करत होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
हुरड्याच्या सीझनविषयी विचारल्यावर अण्णासाहेब सांगत होते, “हुरडा लागवडीची पहिला टप्पा आम्ही 1 ऑगस्टला चालू करतो. त्याच्यानंतर पंधरा-पंधरा दिवसांनी बाकी सगळे टप्पे चालू करतो. लावल्यानंतर 3 महिन्यांनी हुरडा कापणीला सुरुवात होते.”
अण्णासाहेब गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्याकडील 30 एकर क्षेत्रावर हुरडा लागवड करत आहेत. आधी ते ज्वारी, बाजरीचं पिक घेत होते.
हुरडा पिकाकडे का वळाले, यावर ते सांगत होते, “ज्वारी 3 ते 4 हजार रुपये क्विंटल जाते. हुरड्याचा दर आम्हाला 200, 120 रुपये प्रती किलो मिळतो. त्याच्यामुळे आम्ही हुरड्यातच विकून टाकतो. ज्वारीचा प्रकार अलग आणि हा सुरती हुरड्याचा प्रकार अलग. ज्वारी म्हणजे शाळू जवारी आली आणि हा आहे वाणीचा हुरडा, ही व्हरायटी अलग आली.”

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
नरसापूर, सारंगपूर गावातील शेतकरी सुरती आणि गुळभेंडी या हुरड्याच्या वाणाची लागवड गेल्या 30 वर्षांपासून करत आहेत. हे हुरड्याचं पारंपरिक वाण आहे.
शेतात कापणीला आलेल्या सुरती हुरड्याच्या कणीस मी हातात घेऊन बघितलं ते एकदम मऊ जाणवलं. ज्यावेळेस मी हे कणीस हातात घेऊन मळलं तर एकही दाणा कणसाला शिल्लक राहिला नाही.
याशिवाय सुरती, गुळभेंडी हुरड्याचं वाण हे ज्वारीपेक्षा वेगळं आहे. याचा वापर पीठासाठी करता येत नाही. कणीस कापणीला आलं तर त्याचा वापर केवळ हुरड्यासाठीच करता येतो.
‘कापसापेक्षा हुरडा परवडला’
सारंगपूरमधील शेतकरी संतोष गावंडे यांनी कापूस पिकासोबत हुरड्याचीही लागवड केली आहे. हुरड्यातून 3 महिन्यांच्या कालावधीत एकरी लाखभर रुपयांचं प्रॉफिट ते कमावताहेत.
बीबीसी मराठी सारंगपूर गावात पोहोचलं तेव्हा संतोष आणि कुटुंबीय त्यांच्या शेतात कणसाची मळणी करत होते.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
संतोष म्हणाले, “हुरडा हे नगदी पिक आहे आणि शेतकरीच त्याचा बाजारभाव ठरवू शकतो. तसं कापसाचं नाही, कापसाचं सगळं व्यापाऱ्यावर अवलंबून आहे. कापसाला चार-पाच फवारण्या कराव्या लागतात, डीएपीचे दोन-तीस डोस द्यावे लागते. तसा हुरड्याला एवढा खर्च नाहीये.
“नफ्याच्या बाबतीत म्हटलं तर कापसापेक्षा दोन पट उत्पन्न आहे. वातावरण चांगलं राहिलं, तर एका एकरात 700 ते 800 किलो हुरडा निघतो. त्याच्यातून कधी एक लाखाचं तर कधी दीड लाखाचं उत्पन्न मिळतं. पण बाजारभाव कमी असला तर एकरी 70 ते 80 हजार रुपये राहतात.”
इतर गावांतही हुरडा उत्पादन
सारंगपूर, नरसापूर इथल्या शेतकऱ्यांचं हुरडा पिकातून मिळणारं उत्पन्न पाहून शेजारील मुरमी, दहेगाव बंगला येथील शेतकरीही हुरडा शेतीकडे वळाले आहेत.
आम्ही दिवसाच्या वेळी या गावांमध्ये गेलो, तर कुणीही गावात दिसलं नाही. सगळ्या घरांना कुलूप लावलेलं असतं. सगळे हुरडा काढायला शेतात गेलेत, असं इथल्या एक आजीबाई सांगत होत्या.
या गावांमधील शेतकरी औरंगाबाद-पुणे हायवेवर जागोजागी स्टॉल लावून हुरड्याची विक्री करताना दिसतात.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
आम्ही औरंगाबाद-पुणे हायवेवर आलो तर रस्त्यावर जागोजागी स्टॉल दिसून आले. यापैकी एक स्टॉल होता मुरमी गावच्या कांताबाई पारधे यांचा.
त्या म्हणाल्या,“सकाळी 6 वाजता आम्ही शेतात जातो. हुरडा काढतो आणि मग इथं विकायला आणतो. दिवसातून कधी 20 किलो, तर कधी 25 किलो, तर कधी 10 किलो विकतो. चांगला भाव असला तर हुरडा 250 रुपये किलोनं जातो. कमी असला तर 100 रुपये किलोनं जातो. यातून मग कधी हजार रुपये, तर कधी 500 रुपये घरी नेतो.”
‘2 गावांचा 10 कोटींचा टर्नओव्हर’
अण्णासाहेब शिंदे स्वत: हुरडा पिकवतातच, पण त्याशिवाय इतर शेतकऱ्यांचाही हुरडा विकत घेतात आणि तो पुणे, अमरावती या ठिकाणी सप्लाय करतात. त्यांचा स्वत:चा वार्षिक टर्नओव्हर 25 ते 30 लाख रुपये इतका आहे.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
"आमची दोन्ही गावं सारंगपूर, नरसापूर मिळून हजार, ते अकराशे एकरमध्ये हुरडा असतो. आमच्या गावामधून रोजचा 8 ते 10 लाख रुपयांचा माल विकला जातो. वर्षाचं म्हणाल तर चार महिन्याचं सीझन असतं आमचं हे. दोन गाव मिळून सगळे शेतकरी मिळून 8 ते 10 कोटींचा टर्नओव्हर होतो,” अण्णासाहेब सांगत होते.
हुरड्याच्या कडब्यातूनही आर्थिक कमाई
हुरडा काढल्यानंतर उरलेला कडबाही इथल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक कमाईचा स्रोत झालाय. आम्ही या गावांमध्ये फिरत असताना काही तरुणी बुरड्याचा कडबा (चारा) एका ठिकाणी जमा करताना दिसून आल्या.
“हुरड्याचे तर पैसे भेटतातच पण त्याचं जे वैरण आहे त्याचेही आम्हाला भरपूर पैसे भेटतात. जनावरासाठी चाऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी झालं. कापसाला भाव असल्यामुळे शाळू-जवारी आता कुणी करत नाही. याच्यात आमचे हुरड्याचे पण पैसे होतात, पंधराशे-सोळाशे रुपये शेकडा चारा विकला जातो. म्हणजे चाऱ्याचे पण आम्हाला चांगले पैसे मिळतात,” अण्णासाहेब सांगत होते.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
आता हुरड्याला प्रतीक्षा संशोधनाची!
हुरड्याची शेती ही मराठवाड्यातील या शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात, कमी कालावधीत, जास्त उत्पादन देणारी शेती ठरलीय. पण, हुरड्याचं आयुष्य हे या शेतीसमोरचं मोठं आव्हान आहे.
हुरड्याचं आयुष्य वाढल्यास त्याला कायमस्वरुपी बाजारपेठ मिळेल आणि त्याचा थेट फायदा इथल्या हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना होईल.
त्यामुळे हुरड्याचं लाईफ वाढवण्यासाठी त्यावर संशोधन व्हायला हवं, अशी अपेक्षा इथले शेतकरी व्यक्त करतात.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
यासाठी स्थानिक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचं अधिकारी सांगतात.

गंगापूर तालुक्याचे ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे सांगतात, “गंगापूर तालुक्यातील सारंगपूर नरसापूर या गावात हुरडा पीक हे सरासरी 1100 एकर वर घेतले जाते. या पिकाला फक्त 1 दिवसाचं आयुष्य असल्याने ते आयुष्य वाढवण्यासाठी फ्रॉझोन तंत्रज्ञान वापरले जाते.
“यासाठी आत्माच्या माध्यमातून गुजरात येथील वाडीलाल इंडस्ट्री सोबत बोलणी सुरू आहे. हे तंत्रज्ञान आपल्याकडे वापरल्यास हुरडा दोन ते चार महिने टिकवता येऊन दर स्थिर राहण्यास मदत होईल.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








