नागपूर हिंसाचार गुप्तचर विभाग आणि पोलिसांचं अपयश आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपुरात सोमवारी (17 मार्च) रात्री दंगल झाली. यामध्ये वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली. दगडफेक झाली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये 33 पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली आहे. आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्याचं काम सुरूच आहे.
या दंगलीमध्ये पोलिसांसोबतच काही नागरिकही जखमी झाले आहेत. दंगलीत सर्वसामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, ही दंगल का घडली? ही दंगल म्हणजे पोलीस विभाग, त्यांच्या गुप्तचर विभागाचं अपयश आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
हे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे पोलिसांनी या दंगलीनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दिलेली माहिती आणि भाजप आमदार प्रविण दटके यांनी पोलिसांवर केलेले आरोप.
पोलिसांच्या एफआयआरमध्ये काय म्हटलं?
गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन करून औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यानंतर मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पक्षाचा शहराध्यक्ष फहीम खान गणेश पेठ पोलीस ठाण्यात 50 ते 60 लोकांचा जमाव बेकायदेशीरित्या घेऊन आला आणि पोलिसांना लेखी निवेदन दिले.
त्यानंतर जाळपोळ करणाऱ्या 9 आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 223, सहकलम 37 (1), 37 (3) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाला लोकांना शांतता ठेवण्यासाठी समज देण्यात आली. तरीही त्यांनी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात 500-600 लोक जमवले.


पोलीस ठाण्यात 50-60 लोकांचा जमाव जमतो आणि विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनाविरोधात पोलिसांना तक्रार देतात. पोलीस गुन्हाही दाखल करतात आणि त्या जमावाला शांतता ठेवण्याची समजही देतात. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ही दंगल पूर्वनियोजित होती. दंगल पूर्वनियोजित होती, तर गुप्तचर विभागाला, पोलिसांना याची चाहूल कशी लागली नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दंगल घडेपर्यंत गृहविभाग आणि गुप्तचर विभाग काय करत होता? असा सवाल आमदार रोहित पवार यांनीही उपस्थित केला.

फोटो स्रोत, ANI
इतकंच नाहीतर सत्तेत असलेल्या भाजप आमदार प्रविण दटके यांनीही पोलिसांवर आरोप केलाय. नागपूर पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी पहिल्यांदा पोलीस बंदोबस्त लावला असता, तर ही घटना घडली नसती. पोलीस उशिरा आले असा आरोप त्यांनी केला.
हा आरोप नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना फेटाळला. पोलिसांनी चांगलं काम केल्याचं त्यांनी म्हटलं.
ज्या भागात दंगल झाली त्या भागातील वकील राकेश देवधारियाही असाच प्रश्न उपस्थित करतात.
ते म्हणाले, "17 मार्चला इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना पोलिसांना पुढे काहीही घडू शकतं याचा अंदाज कसा आला नाही?"
"ज्या लोकांनी सकाळी आंदोलन केलं त्यांना प्रशासनानं आधी अटक केली असती किंवा काही कारवाई केली असती, तर या गोष्टी झाल्या नसत्या. पोलिसांनी संवेदनशील क्षेत्रात आधीच बंदोबस्त लावला असता तर पुढे दंगल घडलीच नसती."
पोलिसांवर दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीचाही देवधारिया निषेध करतात.
पोलिस विभाग आणि गुप्तचर विभागाचं अपयश आहे का?
हे पोलीस विभागाचं आणि गुप्तचर विभागाचं अपयश आहे का? याबद्दल बीबीसी मराठीने काही माजी आयपीएस अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली.
पोलिसांना या प्रकरणाची तीव्रता आधीच लक्षात यायला हवी होती, असं निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे सांगतात.
ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "पोलिसांसमोर तक्रार आली आणि इतक्या घडामोडी घडत होत्या तर त्यांना या प्रकरणाची तीव्रता आधीच लक्षात यायला हवी होती. पुढे काय होऊ शकतं आणि आपण त्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील लक्षात यायला हवं होतं."
"तक्रार आली तेव्हा लोकांच्या भावना प्रक्षोभक झालेल्या आहेत हे पोलिसांच्या लक्षात आलं, तर दंगलीसारखी प्रतिक्रिया समोरून येऊ शकते हे पोलिसांना कोणी सांगायची गरज नव्हती. पोलीस आयुक्त फार ज्येष्ठ माणसं असतात. या परिस्थितीत काय होऊ शकतं हे त्यांना कळायला पाहिजे," असं सुरेश खोपडे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, ANI
ज्यावेळी प्रक्षोभक भावना दिसतात त्यावेळी पोलिसांनी लगेच काय करायला पाहिजे हे देखील खोपडे समजावून सांगतात.
ते म्हणतात, "ज्यावेळी अशी परिस्थिती होईल असं वाटतं, तेव्हा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करायला पाहिजे. त्यासाठी आधी ट्रबलशूटर्स कोण आहेत त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे. त्यांनंतर त्या परिसरात बंदोबस्त वाढवायला पाहिजे. समज देऊन कोण ऐकतं का? या प्रकरणात पोलिसांनी जी प्रतिबंधात्मक कारवाई असते तीच केलेली दिसत नाही."
"गुप्तचर विभागाचं अपयश आहे का यापेक्षा पोलिसांना 50-60 लोकांचा जमाव येऊन तक्रार देतो तेव्हा पोलिसांनी काय कारवाई केली हे महत्वाचं आहे," असं राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिरीष इनामदार यांना वाटतं.
ते म्हणतात, "ठराविक समुदाय आपल्याकडे भावना दुखावल्या अशी तक्रार घेऊन आले त्यावेळी पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाई करायला 48 तास उशीर का लावला? असा प्रश्न उपस्थित होतो."

फोटो स्रोत, ANI
सोमवारी सकाळी औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन झालं होतं. त्यानंतर त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर बुधवारी (19 मार्च) सायंकाळी 4 वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यावर शिरीष इनामदारांनी प्रश्न उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, "ठराविक समुदायाचे लोक तक्रार घेऊन आले हे माहिती असून देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय काय केले? प्रतिबंधात्मक उपाय करून जे दंगा भडकवू शकतात, ज्यांच्यामध्ये दंगा भडकवण्याची ताकद आहे अशा लोकांना आधी ताब्यात घेतलं असतं तर कदाचित पुढचा प्रकार टळला असता."
"हे तिन्ही प्रतिबंधात्मक उपाय केले नाही. पण, त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे ओळखून काय यंत्रणा अंमलात आणली याचं उत्तर पोलिसांकडे दिसत नाही. याचा अर्थ त्यांचा गुप्तचर विभाग अपयशी ठरला किंवा पोलीस दंगल होण्याची वाट बघत बसले असा होतो. अर्थ कुठलाही निघाला तरी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात."

फोटो स्रोत, ANI
हे पोलीस विभागाचं अपयश असलं तरी ही जबाबदारी गृहविभागाची असल्याचं माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना वाटतं.
ते म्हणतात, "आपल्या राज्यघटनेत लिहिलं आहे की, कॅबिनेट मंत्री त्या खात्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो. लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना अपघात झाला तेव्हा त्यांनी स्वतः राजीनामा दिला होता. आता दंगल झाली त्याची जबाबदारी पण गृहखात्याची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची आहे."
शिरीष इनामदार यांचं मत थोडंस वेगळं आहे. पोलिसांना प्रतिबंधात्मक कारवाई करायची असेल, तर गृहविभागाला विचारायची गरज नाही. कायद्याचं संरक्षण करणं पोलिसांचं काम आहे. पोलीस कायद्याला बांधील आहेत. त्यांना कोणाच्या आदेशाची वाट बघायची गरज नाही, असं ते म्हणतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल एबीपी माझा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "मला वाटत नाही की हे गुप्तचर विभागाचं अपयश आहे. पण सोशल मीडियावर बरोबर ट्रॅक झाला नाही. कारण हे सगळे व्हीडिओ सोशल मीडियावर तयार झाले. सोशल मीडियातून पोस्ट गेल्या, लोकांना जमवलं. आपल्याकडे ट्रॅक करण्याची क्षमता आहे. पण त्याची सवय लावावी लागेल. कारण आजकाल गोष्टी फिजिकल न घडता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होतो. दुपारी नीट सोशलमीडिया ट्रॅक झाला असता तर या गोष्टी लक्षात आल्या असत्या. पण ते चांगल्या प्रकारे ट्रॅकझालं नाही. पण पोलिसांचं अपयश म्हणणे 100 टक्के चुकीचं आहे. कारण पोलीस त्याचं काम करत होते. पोलीस एका गल्लीत गेले की ते दुसऱ्या गल्लीत लपायचे. पोलिसांनी हिमतीने घुसून कारवाई केली त्यामुळे मोठी दंगल झाली नाही. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते."
पोलिसांचं म्हणणं काय आहे?
50-60 लोकांचा जमाव आधी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आला होता, पोलिसांनी तक्रारही नोंदवून घेतली होती, तर मग ही दंगल का घडली? हे पोलीस विभागाचं अपयश आहे का? याबद्दल गुरुवारी (20 मार्च) नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दुसरा प्रश्न म्हणत या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. ते पोलीस आयुक्तालयात माध्यमांसोबत बोलत होते.
सोशल मीडियावरील व्हायरल कंटेट, अफवा या गोष्टीला कारणीभूत ठरल्या असंही पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं.
मात्र, हे आक्षेपार्ह कंटेट दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते तर सायबर विभागाच्या कसं लक्षात आलं नाही? यामधून पुढे काही होऊ शकतं हे कसं समजलं नाही? हे आपल्या विभागाचं, गुप्तचर विभागाचं अपयश आहे का? असं आम्ही सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांना विचारलं.

फोटो स्रोत, ANI
सायबर पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "व्हीडिओ व्हायरल होत होता. मात्र, त्याला हटवायला आणि त्याची माहिती घ्यायला वेळ लागतो. आम्ही सगळे व्हीडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युबला पाठवले आहेत. त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही."
"त्यांनी व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारीत केला. सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम नाही, तर व्हॉंट्सअपही आहे. तिथे मोठे ग्रुप आहेत. त्यावर लक्ष ठेवणं इतकं सोप्पं नाही," असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











