'उभ्या आयुष्यात नागपुरात असं कधी पाहिलं नव्हतं' - हिंसाचारानंतर नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट

अब्दुल खालिक
फोटो कॅप्शन, अब्दुल खालिक
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'अजब मंजर है शहर का, कुछ समझ नही आता,

दुकाने खुली है, मगर ग्राहक नजर नही आता..

भुल गए हे लोक देश का कानून, भाई से भाई का नाता,

गरीबही भूखा मरता यहाँ, गरीबही नंगा सोता!

लड़ानेवाला कोई नेता लड़ाई मै शहीद नही होता...'

नागपूरमध्ये 17 मार्चच्या रात्री झालेल्या दंगलीनंतर व्यथित झालेल्या अ‍ॅड. राकेश दावधरिया यांनी या ओळीतून आपल्या भावना व्यक्त केल्या.

दावधरिया हे मुस्लिम बहुल भागात राहतात. त्यांनी माथी भडकवणाऱ्यांच्या नादी लागून आपलं नुकसान करुन घेऊ नका.

तर याच शहरातील एक व्यावसायिक अब्दुल खलिक यांना बोलताना रडू कोसळलं. देशात कुठेही दंगल-हिंसाचार झाल्याचं ऐकायला मिळालं असेल पण या शहरात असं कधीच पाहिलं नव्हतं. हे आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं असं ते म्हणाले.

या घटनेनंतर नागपूरकरांच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं सुरू आहेत.

17 मार्चला मात्र नागपुरात झालेल्या आंदोलनानंतर दंगल उसळली. एरवी शांत असलेल्या नागपूरकरांना दगडफेक, जाळपोळ सारख्या घटनांना सामोरं जावं लागलं.

ज्या परिसरात ही घटना घडली तिथं आता तणावपूर्ण शांतता आहे. दुकानं बंद आहेत. जागोजागी पोलीस पहारा देत आहेत.

पण कालच्या घटनांच्या खाणाखुणा आजही तिथं स्पष्ट दिसतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दुकानांच्या काचा फुटलेल्या आहेत, काही ठिकाणी दगड-विटांचा खच दिसतो, जमावानं जाळलेल्या गाड्यांचे सांगडे तसेच होते.

काही दुकानदार, नागरिक आपल्या घर आणि दुकानांसमोर उभे होते. बीबीसीनं काही प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधला.

त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना नागपूरमध्ये जे घडलं ते अत्यंत चुकीचं होतं असं म्हटलं आहे.

'संपूर्ण आयुष्यात असं कधी पाहिलं नाही'

चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक या रस्त्यावर दुकान असणारे आणि तिथेच राहणारे अब्दुल खलीक यांचे दुकान कालपासून बंद आहे. त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अब्दुल खलील यांना बोलताना रडू कोसळलं.

अब्दुल खलिक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अब्दुल खालिक म्हणतात, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असं काही घडल्याचं बघितलं नाही. आमच्या शहरात असलं काही कधीच घडत नव्हतं. देशात कुठेही काहीही होऊ द्या इथे काही होत नव्हतं, काल रात्री गोंधळ झाल्यापासून आमची दुकानं बंद आहेत. आम्ही दिवसभर रोजा पाळून नमाज पठण करायला गेलो होतो. परत येईपर्यंत सगळीकडे गोंधळ उडाला होता. जे काही घडलं ते खूप चुकीचं आहे. आम्हाला खूप त्रास होतोय.

त्यांच्याच बाजूला बसलेले सनी दावधरिया म्हणाले, "आमचं एवढं वय झालं पण असं काही कधी घडलं नव्हतं. ज्यांना हे काम करायचं होतं ते करून गेले आता आम्ही परिणाम भोगतो आहोत. काल रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. आमच्या घरातील बायका-पोरांवर दहशत बसली आहे. रोज काम करून आम्ही पोट भरतो. आता माहित नाही पुढे काय होईल?"

असनी दावधरीया पुढे म्हणाले, "आम्ही हिंदू आणि मुस्लीम नेहमीच शांततेने एकत्र राहिलो आहोत. इथे कोणतेही संघर्ष नाहीत. सोमवारी जे घडले त्यात स्थानिकांचा सहभाग नव्हता. त्यासाठी बाहेरील लोक जबाबदार होते. बाहेरून आलेल्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांनी हे घडवून आणले."

याच परिसरात राहणाऱ्या कुंदा जाधव सांगतात, आमच्या घरावर दगड आणि काच फेकले. आम्ही घरात महिला होतो. आम्हाला रात्री खूप भीती वाटत होती.

चारशे वर्षांपूर्वीच्या घटनेचा वर्तमानात काय फायदा?

मुस्लीम बहुल भागात राहणारे अ‍ॅड. राकेश दावधरिया यांनी नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या घटनेचा निषेध केला.

अ‍ॅड. राकेश दावधरिया
फोटो कॅप्शन, अ‍ॅड. राकेश दावधरिया

दावधरिया म्हणाले, "चारशे वर्षांपूर्वी एखाद्या माणसानं किंवा एखाद्या बादशाहनं काही केलं असेल. पण आता आपण वर्तमानात जगत आहोत. आज आपण मुसलमानांबरोबर व्यवसाय करतो, व्यापार करतो. आमची मुलं त्यांच्याबरोबर शिकत आहेत.

"मग त्यांचं नुकसान करुन किंवा आपलं स्वतःचं नुकसान करुन आपण कोणतं मोठं काम करत आहोत. 400 वर्षांपूर्वी जे झालं त्याचा वर्तमानात काय फायदा?," असा सवाल त्यांनी केला.

'धर्मावर बोलणारा नेता महागाई, बेरोजगारीवर बोलत नाही'

धर्मावर बोलणारा नेता महागाई, बेरोजगारीवर बोलत नाही, राजकारणी लोकांना हेच हवं आहे, असा आरोप ॲड. राकेश दावधरिया यांनी केला.

लोकांचं महागाई, बेरोजगारी आणि नवनवे जे कायदे केले आहेत, त्याच्यावरील लक्ष हटवण्यासाठीच अशा प्रकारचे षडयंत्र रचले जातात, दंगे पेटवले जातात, असं दावधरिया म्हणाले.

नागरिकांनी अशा राजकारण्यांना ओळखलं पाहिजे, धर्मासाठी पुढं येणारे नेते बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावर समोर येत नाहीत.

कोणता खासदार-आमदार याबद्दल बोलत नाही. यांची घरं भरलेली आहेत. ते एसीत बसतात पण यात भरडला जातो सामान्य माणूस, असं दावधरिया यांनी म्हटलं.

पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत. ईद जवळ येत आहे. रामनवमीही आहे. त्यामुळं सर्वांनी अशा उपद्रवी मंडळींच्या चिथावणीखोर वक्तव्यांना भुलू नये. फुटीरवादी लोकांना नागरिकांनी ओळखावं आणि सावध राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

नागपूर पोलीस

फोटो स्रोत, bhagyashri raut

फोटो कॅप्शन, ज्या परिसरात ही घटना घडली तिथं आता तणावपूर्ण शांतता आहे. दुकानं बंद आहेत. जागोजागी पोलीस पहारा देत आहेत.

रात्रीची परिस्थिती भयानक, आम्ही गांगरुन गेलो

17 मार्चच्या रात्रीच्या घटनेबद्दल सांगताना कुंदा जाधव आजही तणावात दिसल्या. "रात्रीची परिस्थिती अत्यंत भयानक होती. घराच्या परिसरात जमाव आला होता. आमच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. आम्ही गांगरुन गेलो होतो," असं त्या म्हणाल्या.

"आमच्या हॉलमध्ये काचा आल्या होत्या. जमावानं आमच्या दुकानाचे लाईट्स फोडले, कॅमेरे फोडले. दगड येत होते. हे सर्व पाहून माझे हातपाय थंड पडले होते. हे दृश्य पाहिल्यावर आमची झोपच उडाली होती", असं कुंदा जाधव सांगतात.

कुंदा जाधव

फोटो स्रोत, bhagyashri raut

फोटो कॅप्शन, 17 मार्चच्या रात्रीच्या घटनेबद्दल सांगताना कुंदा जाधव आजही तणावात दिसल्या.

जाधव यांच्याप्रमाणेच आशाताईंच्या घराभोवतीही जमाव आला होता.

त्यांच्या घराच्या गेटवर काचा, दगड-विटा पडल्याचे त्यांनी सांगितलं.

आशाताई म्हणाल्या, "जमाव एकत्रित होता. खूप आवाज येत होता. ते शिवीगाळ करत होते. खूप भीतीचं वातावरण होतं. आमच्या घराचं नुकसान झालं नाही. पण अंगणात दगड, विटा आणि काचा पडल्या होत्या."

'या घटनांमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान'

दंगल हा काही समस्येवर तोडगा नाही असं मत एका नागपूरकराने दिलं आहे. त्यांनी आपली ओळख जाहीर न करण्याची विनंती केली.

"हे खूप चुकीचं झालं. नागपूरमध्ये असं घडायला नको होतं. सर्व सण इथं मिळून मिसळून साजरे केले जातात. भाईचारा असतो इथं. परंतु, काही लोकांना हे बिघडलं पाहिजे असं वाटतं. पण अशा घटनांमुळं सर्वांचंच नुकसान होतं," असं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले, "अशा घटनांमुळं खासगी कर्मचारी, हातावर पोट असलेल्यांचं मोठं नुकसान होतं. अशा दंगलीत सार्वजनिक मालमत्तेचं जेव्हा नुकसान होतं. तेव्हा ते तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांचंच नुकसान असतं. शांततेत अनेक गोष्टी करता येतात. दंगल हे सोल्यूशन नाही, शांततेत कराल ते तितकं चांगलं आहे."

निलिमा जाधव

फोटो स्रोत, bhagyashri raut

फोटो कॅप्शन, निलिमा जाधव म्हणाल्या की, हे घडायला नको होतं.

निलिमा जाधव यांनी सोमवारची घटना खूप वाईट होती असं म्हटलं.

त्या म्हणाल्या की, हे घडायला नको होतं. आम्हाला खूप भीती वाटत होती. जमावानं आमच्या अंगणात दगडं फेकली. घरात आम्ही महिलाच होतो. त्यामुळं आम्ही सगळेच घाबरलो होतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.