'वडिलांचा दहावा (फातिहा) सुरू असताना पोलीस भावांना उचलून घेऊन गेले,' नागपूरच्या कोम्बिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया

फोटो स्रोत, bhagyashri raut \BBC
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
दगडफेक आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी भालदारपुरा परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. तिथून काही जणांना ताब्यात घेतलं. तसेच या भागात अश्रूधुराचे नळकांडे फोडले.
अश्रुधुरांच्या नळकांड्यामुळे या परिसरातले एकाच घरातील एक 6 महिने आणि 8 महिन्यांच्या बाळांवर त्याची रिअॅक्शन झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान घरात वडिलांची शोकसभा सुरू असताना भावांना उचलून नेल्याचे एका महिलेनी बीबीसीला सांगितले आहे.
कोम्बिंग ऑपरेशन तसेच पोलीस बळाचा वापर, यावर बीबीसी मराठीने पोलिसांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
लहान बाळांना सक्करदरा इथल्या खडक्कार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्या मुलांचे आजोबा मोहम्मद इकबाल शेख सांगतात.
ते म्हणतात, "इथं अचानक दगडफेक सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी इथं अश्रुधुराचे नळकांडे फोडले. माझं सगळं कुटुंब घरातच होतं. अश्रूधुरांच्या नळकांड्यामुळे आमच्या घरातल्या लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला."
"एकाच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना दवाखान्यात नेलं. अशा परिस्थिती घरापासून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी पोलिसांनी आम्हाला मदतही केली," असं पुढं ते म्हणाले.
आता या मुलांची तब्येत ठीक असून त्यांना एक दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं.


"आमच्या वडिलांची शोकसभा सुरू होती हा आमचा दोष होता का?"
याच भालदारपुरा परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुसराज शेख यांनी वडिलांची शोकसभा सुरू असताना पोलिसांनी भावांना जबरदस्तीनं उचलून नेल्याचा आरोप केला.
त्या म्हणतात, "काल इथं हिंसा सुरू होती. माझ्या घरी माझ्या वडिलांचा काही दिवसांआधी मृत्यू झाला. आम्ही त्यांच्या शोकसभेसाठी एकत्र जमलो होतो. माझी आई, मावशी, त्यांची मुलं-मुली आणि जावई लोक असे सगळे आमच्या घरी आले होते. वडिलांच्या दहावा दिवस म्हणजे फातिहा झाली."
पुढं त्या म्हणाल्या, "त्यानंतर सगळेजण घरातच होते. कोणीच कुठे गेलं नव्हतं. माझा लहान भाऊ 24 वर्षांचा आहे, तो कधीच कुठेच जात नाही. घरातच राहतो. सगळे लोक इकडे येत होते. त्यामुळे आम्ही घाबरून दरवाजे लावून घरात लपलो होतो. पण, पोलीस आमच्या घरात घुसले, दरवाजे आणि खिडक्या तोडल्या."
आजूबाजूचे लोक जसे बघत होते तसेच त्यांचे भाऊ बाल्कनीत उभं राहून ते सगळं बघत होते. ते सगळे जेवणाची वाट बघत होते. जेवण झालं की ते आपआपल्या घरी जाणार होते, असं त्या म्हणाल्या.

पुढं त्या म्हणाल्या, "आमच्या घरात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि शोकसभा सुरू आहे असं सांगितलं तरी पोलिसांनी ऐकलं नाही. जबरदस्ती आमच्या घरातल्या सगळ्या पुरुषांना घेऊन गेले. माझा लहान भाऊ जो नेहमी घरातच पडलेला असतो त्याचा डोळा फोडला तर शासकीय रुग्णालयात उपचार घेतोय. त्याच्या तब्येतीचं आम्हाला काहीच अपडेट नाही. माझ्या मावशीचा मुलगा पण हॉस्पीटलमध्ये आहे."
त्यांचा काही दोष नसताना कसे काय घेऊन गेलेत? आमच्या घरात आमच्या वडिलांची शोकसभा सुरू होती हा आमचा दोष होता का? असा प्रश्न त्या उपस्थित करतात.
कोम्बिंग ऑपरेशनच्या परिसरात लोकांनी केलेल्या आरोपांबद्दल त्या बंदोबस्ताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस उपायुक्तांसोबत बोललो. पण, त्यांनी बोलण्यास नकार दिल्याचं त्यांनी सांगितलं.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन
नागपुरात सोमवारी (17 मार्च) रात्री दोन गटातील वादातून हिंसाचाराची घटना घडली. शहरातील महाल भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली.
पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्यांना केलं आहे.
18 मार्चला सकाळी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांनी रात्री उशिरा एक वाजेपर्यंत चिटणीस पार्क परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं.
यात जवळपास 20 संशयितांना ताब्यात घेतलं असून, सध्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीय.

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
फडणवीस म्हणाले, "मी सातत्याने पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे. नागपूर शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारं शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा."
भालदारपुरा इथल्या नागरिकांनी केलेल्या आरोपांवर नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, "मी याविषयी बोलू शकत नाही. दंगलीचे घटना झालेली आहे. ऑन रेकॉर्ड व्हीडिओ आहेत. असं कोणी म्हणत असेल तर त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचं काम करत आहोत."
गुरुवारी 20 मार्चला पोलीस आयुक्त कार्यालयात ते मध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
तर कुठल्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई करु नका असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पोलीस विभागाला दिले आहेत. खान यांनी गुरुवारी 20 मार्च रोजी पोलीस मुख्यालयात नागपूर हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.
'गैरसमजामुळे घडली घटना'
नागपूर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अर्चित चांडक यांनी माहिती दिली आहे.
अर्चित चांडक म्हणाले की, "ही घटना गैरसमज किंवा चुकीच्या संवादामुळे घडली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आमचं इथलं पोलीस दल भक्कम आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की घराबाहेर पडू नका किंवा दगडफेक करू नका. दगडफेक होत असल्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला. तसंच अश्रूधुराचा देखील वापर करावा लागला."

"इथे काही वाहनं जाळण्यात आली. अग्निशमन दलाला बोलावून आम्ही आग विझवली आहे. काही पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. दगडफेक होत असताना माझ्या पायालादेखील छोटी दुखापत झाली आहे," चांडक म्हणाले.
"मात्र सर्वांनाच आम्ही शांतता राखण्याचं आवाहनं करतो. अफवांवर विश्वास ठेवू नका. कायदा आणि सुव्यवस्था मोडू नका. पोलिसांना सहकार्य करा. या घटनेसंदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत," असं चांडक म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











