‘भारत ही संतांची भूमी, सँटाची नाही; मुलांना सांताक्लॉज बनवाल तर…’- विश्व हिंदू परिषद

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. ‘विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवाल तर…’ विश्व हिंदू परिषदेचा इशारा

जगभरात आज 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस सण साजरा केला जाणार आहे. हल्ली शाळा, महाविद्यालय आणि खासगी कार्यालयात देखील ख्रिसमसनिमित्त विविध संकल्पना राबवून हा सण साजरा केला जातो.

मात्र या वर्षी विश्व हिंदू परिषदेने शाळांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यास विरोध दर्शवला आहे.

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून त्यांनी शाळेत ख्रिसमस साजरा करु नये, तसेच विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनवू नये, अशी ताकीद या पत्राद्वारे दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

विश्व हिंदू परिषदेनं पत्रात लिहिलंय की, “मध्य भारतातील लोक हे सनातन हिंदू धर्म आणि त्याची परंपरा मानतात. मात्र शाळेत ख्रिसमसच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्यास भाग पाडलं जातं. हा आपल्या हिंदू संस्कृतीवर एकप्रकारे हल्ला आहे.

हिंदू धर्मातील विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची प्रेरणा देण्याचे हे एक षडयंत्र आहे. तसेच विद्यार्थ्यांना ख्रिसमसनिमित्त वेगळे कपडे घ्यायला लावणे, ख्रिसमस ट्री घ्यायला भाग पाडणे, हे देखील पालकांवर आर्थिक ताण आणणारे असते.”

“शाळा हिंदू मुलांना सांताक्लॉज बनवून ख्रिश्चन धर्माबद्दल श्रद्धा आणि आस्था उत्पन्न करण्याचे काम करत आहेत का? आमची हिंदू मुलं राम बनो, कृष्ण बनो, बुद्ध बनो किंवा महावीर, गुरु गोविंद सिंह यापैकी काहीही बनो. याशिवाय क्रांतिकारी, महापुरुष ही बनोत पण सांताक्लॉज बनायला नकोत. ही भारताची भूमी संतांची भूमी आहे. सांताक्लॉजची नाही.

“जर शाळा विद्यार्थ्यांना सांताक्लॉज बनण्याचा आग्रह करत असेल तर अशा शाळांविरोधात विश्व हिंदू परिषद कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबेल,”, अशा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.

2.‘तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी भारत जोडो यात्रेत’ - कमल हासन

अभिनेते कमल हासन काल (24 डिसेंबर) 'भारत जोडो' यात्रेत उपस्थित राहिले होते. 'भारत जोडो' यात्रा दिल्लीत पोहचली आहे. त्यानंतर अभिनेते कमल हासन हे देखील या यात्रेत सहभागी झाले.

यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

ते म्हणाले,मला अनेकांनी विचारलं की तुम्ही इथे (भारत जोडो यात्रेत) का आलात?, “त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की मी एक भारतीय म्हणून या ठिकाणी आलो आहे. माझे वडील काँग्रेसी होते. माझ्या विविध प्रकारच्या विचारधारा आहेत. तसंच माझा स्वतःचा एक राजकीय पक्षही आहे.

मात्र जेव्हा प्रश्न देशाचा असतो तेव्हा सगळ्या राजकीय पक्षांच्या रेषा धूसर कराव्या लागतात. त्या रेषा धूसर केल्या आणि मी इथे आलो आहे.”

“एवढंच नाही तर माझ्या आतल्या आवाजाने मला सांगितलं की कमल हाच तो क्षण आहे की ज्या क्षणी देशाला तुझी सर्वाधिक गरज आहे. भारत तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी तुला गेलं पाहिजे त्यामुळेच मी यात्रेत सहभागी झालो आहे,” असंही कमल हासन यांनी यावेळी म्हटलं आहे.

3. भारताचा विकासदर 6.1 % राहणार, तर महागाई हळूहळू कमी होणार : IMF

कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, बाहेरील देशांकडून घटलेली मागणी आणि कठीण आर्थिक परिस्थितीमुळे भारताच्या आर्थिक विकासाचा वेग आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.1 % राहील, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तवला आहे.

तसंच चालू आर्थिक वर्षासाठी 6.8 टक्क्यांपेक्षा पुढील वर्षात वाढीचा दर 6.1 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असंही आयएमएफच्या (IMF) अहवालात म्हटलं आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

त्यासोबतच कोरोनाचा पुन्हा वाढत असलेल्या प्रादुर्भावाचा परिणाम आर्थिक वाढीवर होऊ शकतो, असा इशाराही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आपल्या अहवालातून दिला आहे.

4. लव्ह जिहादविरोधात सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा

लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी (24 डिसेंबर ) रोजी सांगलीत हिंदू गर्जना मोर्चा काढला.

जिल्हाभरातून अनेक महिला व पुरुष सहभागी झाले.

लोकमतनं ही बातमी दिलीय.

भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नसल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

भगव्या टोप्या घातलेल्या आणि भगवे ध्वज घेतलेल्या महिला अग्रभागी होत्या.

लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे अशा घोषणा त्यांनी दिल्या.

5. वीटभट्टीची चिमणी पेटली अन् 9 मजूरांचा जागीच मृत्यू

बिहारमधील मोतिहारी येथे चिमणी दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही दाट शक्यता आहे.

रामगढवा पोलीस स्टेशन हद्दीतील चंपापूर नरीरगीर चौकात एका वीटभट्टीला आग लागल्यानंतर त्याच्या चिमणीत मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर ती खाली पडली.

चिमणीत खाली खचल्यामुळे गेल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींना रक्सौल येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)