पोप कोण असतात? त्यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी काल पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचं निमंत्रण दिलं आहे.

पोप फ्रान्सिस यांनी 2013 साली पोप पदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पहिल्यांदाच मोदी यांच्या त्यांच्याशी भेट झाली.

1999 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पोप हे भारत दौऱ्यावर अखेरचं आले होते. त्यावेळी पोप जॉन पॉल द्वितीय हे त्या पदावर होते.

विद्यमान पोप फ्रान्सिस यांनी 2015 मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी म्यानमार आणि बांगलादेश या शेजारी देशांना भेट दिली. पण दोन्ही वेळेस ते भारतात आले नव्हते.

पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारलं असून ते भारतात नेमके कधी दाखल होतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

पण तत्पूर्वी पोप कोण असतात? ते काय करतात, या गोष्टींची माहिती आपल्याला असायला हवी.

पोप कोण असतात?

ईसा मसीह यांच्यानंतर कॅथलिक धर्मात सर्वात मोठं पद म्हणजे पोप. याचा शाब्दिक अर्थ वडील असा होतो

पोप हे कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू असतात.

भूगोलात सर्वात लहान देश कोणता याबद्दल आपण शिकलो आहोत. व्हॅटिकन सिटी हे त्याचं उत्तर.

इटली आणि त्याहीपेक्षा थेट सांगायचं तर रोम शहराने या देशाला चारही बाजूंनी वेढलेलं आहे. या व्हॅटिकन सिटीमधूनच पोप यांचा राज्यकारभार चालवला जातो.

पोप हे व्हॅटिकन सिटी या देशाचे राष्ट्राध्यक्ष मानले जातात. तसंच जगभरात विविध भागात वास्तव्याल्या असणाऱ्या 1.2 अब्जाहून अधिक कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च अध्यात्मिक गुरू असतात.

पोप यांना चर्चने ठरवलेल्या नावांप्रमाणे विशिष्ट अशी नावे दिली जातात. पण पहिले पोप 'पीटर द एपोजल' यांचं नाव कुणीही घेऊ शकत नाही, असा नियम आहे.

सध्याचे पोप कोण आहेत?

वर नमूद केल्याप्रमाणे पोप फ्रान्सिस हे सध्याचे पोप आहेत. त्यांची निवड 2013 मध्ये झाली होते.

खरं तर पोप पद हे आजीवन असतं. पण आधीचे पोप बेनेडिक्ट यांनी 2013 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पोप फ्रान्सिस यांची त्या पदावर निवड करण्यात आली होती.

आजवरच्या 600 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पोपनी आपलं पद स्वत: सोडलं होतं. त्यामुळेही या घटनेला जास्त महत्त्व आहे.

पोप फ्रान्सिस यांचं खरं नाव जॉर्ज मारियो बर्गोल्लिओ असून हे आहे. पण नियमांनुसार त्यांना पोप फ्रान्सिस नावानेच ओळखलं जातं.

पोप फ्रान्सिस मूळचे अर्जेंटिनाचे असून त्यांच्या स्वरुपात पहिल्यांदाच लॅटीन अमेरिकन (दक्षिण अमेरिकन) देशांतील व्यक्तीची पोप पदावर निवड झाली.

पोप कोण बनू शकतात?

कोणताही पुरुष जो कॅथलिक असेल, ज्याचा बाप्तिस्मा विधी झालेला असेल, तो पोप पदावर जाऊ शकतो.

बाप्तिस्मा ही एक कॅथलिक विधी आहे. हा पूर्ण झाल्यानंतरच कोणताही व्यक्ती हा कॅथलिक मानला जातो.

पोप यांची निवड कशी होते?

पोप हे पद आजीवन काळासाठी असतं. त्याचा ठराविक असा कालावधी ठरवण्यात आलेला नाही.

पोप यांच्या निवडीची प्रक्रिया अत्यंत गोपनीय आणि गुंतागुंतीची असते. चर्चच्या नियमांनुसार पोप यांच्या निवडीकरिता कार्डिनल हे मतदान करतात.

कॅथलिक धर्मात कार्डिनल यांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. जगभरात एकूण 184 कार्डिनल आहेत. यामध्ये पाच भारतात आहेत. हे कार्डिनल त्या-त्या देशांमध्ये सर्वात मोठे कॅथलिक धर्मगुरू म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामार्फतच पोप यांची निवड केली जाते.

यादरम्यान, जगभरातील कार्डिनल्स व्हॅटिकन सिटीमध्ये जमा होतात. पण पोप पदासाठी कोणतंही नाव प्रस्तावित नसतं.

ही प्रक्रिया सुरू असताना कार्डिनल यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला असतो. आतमध्ये कोणतंच इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्याची, पत्रव्यवहार करण्याची परवानगी नसते. ही माहिती कुणासमोरही उघड करणार नाही, अशी शपथ कार्डिनल्स यांना घ्यावी लागते.

पोप निवडणुकीत कसल्याही प्रकारची घोषणाबाजी, प्रचार वगैरे होत नाही.

प्रत्येक कार्डिनल दिवसभरात चारवेळा मत देतो. कुणाला किती मते पडली त्याची मोजणी स्क्रूटनिअर करतो. तो एका दोरीत संबंधित मतपत्रिका जोडत जातो. ज्या नावाला सर्वाधिक पसंती मिळते त्यांना पोप पदाची जबाबदारी दिली जाते.

या प्रक्रियेदरम्यान येथील चिमणीची (धुराडं) भूमिका महत्त्वाची असते. पोप यांची निवड झाल्यानंतर चिमणीतून पांढरा धूर सोडून सर्वांना त्याची माहिती दिली जाते. तसंच नावाची घोषणाही केली जाते.

पोप यांच्याकडे काय जबाबदारी असते?

पोप हे दर रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल झालेल्या जगभरातील भाविकांना संबोधित करतात. त्यांना आशीर्वाद देतात.

त्यासाठी ते आपल्या अभ्यास खोलीतील खिडकीचा वापर करतात. याच खिडकीतून सेंट पीटर्स स्क्वेअरचं भव्य दृश्य पाहता येऊ शकतं.

याशिवाय दर आठवड्यात पोप हे सुमारे पाच हजार भाविकांना भेटतात. हिवाळ्यात हा कार्यक्रम एका बंदिस्त हॉलमध्ये आयोजित होतो. पण इतर वेळी सेंट पीटर्स स्क्वेअरवर मोकळ्या आकाशाखाली हा कार्यक्रम पार पडतो.

पोप यांचे काही खासगी कर्मचारीही असतात. तसंच ननही त्यांच्या मदतीसाठी कार्यरत असतात.

हे कर्मचारी त्यांच्यासाठी साफसफाई, घरगुती काम करतात. त्याशिवाय पोप यांचा खासगी स्वयंपाकीही असतो.

पोप बेनेडिक्ट आणि पोप जॉन पॉल यांचे दोन खासगी सचिवही होते.

बिशप यांना भेटणं

कॅथलिक धर्मात बिशप यांचीही प्रमुख भूमिका असते. जगभरात पाच हजारपेक्षा जास्त बिशप कार्यरत आहेत. त्यांची पाच वर्षांत किमान एकदा तरी भेट घेणं हे पोप यांच्या प्रमुख जबाबदाऱ्यांपैकी एक आहे.

पोप हे दरवर्षी सुमारे एक हजार बिशप यांची भेट घेतात. म्हणजेच दर आठवड्याला किमान 20 बिशप यांची भेट नियोजित असते.

चर्चच्या नियमांनुसार प्रत्येक बिशप यांनी व्हॅटिकन सिटीला जाणं अनिवार्य आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात काय घडामोडी घडत आहेत, याची माहिती त्यांनी पोप यांना द्यायची असते.

परदेश दौरे करणं

गेल्या काही वर्षांत पोप यांच्या कामांमध्ये परदेश दौरे हीसुद्धा प्रमुख जबाबदारी बनली आहे.

पोप हे पोप या नात्याने सर्वप्रथम त्यांच्या मूळ देशाचा दौरा करतात. त्यानुसार पोप फ्रान्सिस यानी अर्जेंटिनाचा दौरा सर्वप्रथम केला होता.

आता पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून ते भारताचाही दौरा करण्याची शक्यता आहे. याआधी 2019 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केला होता.

त्याशिवाय यावर्षीच्या सुरुवातीला त्यांना इराकला भेट दिली होती. ही भेट ऐतिहासिक मानली गेली. कारण या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या युद्धग्रस्त देशाचा दौरा केला होता.

पाहुणचार करणे

पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच अनेक परदेशी पाहुणे व्हॅटिकन सिटीला जात असतात.

पोप हे आपल्या लायब्ररीमध्ये त्यांची भेट घेतात. इथं एकाच वेळी चार-पाच जण किंवा शेकडो लोकांची भेट घेतात. त्यासाठी आवश्यक त्या स्वरुपात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)