You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प , राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक
नोव्हेंबर महिन्यात अमेरिकत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका होतायत. या निवडणुकीत 24 कोटी अमेरिकन नागरिक मतदान करतील. पण राष्ट्राध्यक्ष कोण होतं हे मात्र 7 राज्यांतल्या मतदानावर ठरण्याची शक्यता आहे.
या 7 राज्यांना म्हटलं जातं - Swing States. म्हणजे काय? ही राज्य कोणती आहेत? आणि या राज्यांमध्ये असं काय आहे की ज्यामुळे निवडणुकीचा निकाल फिरू शकतो?
स्विंग स्टेट म्हणजे काय?
अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांचे कल हे दोनपैकी कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहेत, हे गेल्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने कल असणाऱ्या राज्यांना Red States म्हटलं जातं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना Blue States म्हटलं जातं.
पण जी राज्यं या दोनपैकी कुठल्याही बाजूने झुकू शकतात..किंवा फिरू शकतात, त्यांना Swing States म्हटलं जातं. कधीकधी या राज्यांचा उल्लेख Purple State असाही केला जातो.
स्विंग स्टेट्स कोणती?
अमेरिकेत यावेळी 7 राज्यं ही स्विंग स्टेट्स असल्याचं म्हटलं जातंय. ही राज्यं आहेत - अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सलव्हेनिया आणि विस्कॉन्सिन.
या राज्यांच्या हातात खऱ्या अर्थाने व्हाईट हाऊसची किल्ली आहे.
स्विंग स्टेट्स महत्त्वाची का?
स्विंग स्टेट्सचा अर्थच होतो की इथल्या मतदाराने प्रामुख्याने आधीपासून कोणतीही राजकीय भूमिका ठरवलेली नाही. त्यामुळे या राज्यांत दोन्ही उमेदवारांना आपला प्रभाव पाडण्याची संधी असते. म्हणूनच या राज्यातल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत करत असतात.
थोडक्यात समजून घेऊयात प्रत्येक राज्यातला कळीचा मुद्दा.
अॅरिझोना आणि निर्वासितांचा प्रश्न
Grand Canyon असणाऱ्या या राज्याची शेकडो मैलांची बॉर्डर मेक्सिकोला लागून आहे. म्हणून Immigration म्हणजे निर्वासितांबद्दल अमेरिकेत सुरू असलेल्या राष्ट्रीय वादाचा केंद्रबिंदू या राज्यात आहे.
सरहद्द ओलांडून अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांचा प्रश्न हाताळण्याची जबाबदारी जो बायडन यांनी सध्या उप-राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. आणि हॅरिस यांच्या निर्वासितांबद्दलच्या धोरणांवरून रिपब्लिकन उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन प्रशासन आणि कमला हॅरिस यांच्यावर सातत्याने टीका केलीय.
सध्याच्या त्यांच्या प्रचारातला हा एक प्रमुख मुद्दा आहे. आपण निवडून आलो तर अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठं - Deportation Operation आपण करू असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
गर्भपाताच्या हक्कांचा मुद्दाही या राज्यात गाजतोय.
जॉर्जियातली कृष्णवर्णीय लोकसंख्या
हे तेच राज्य आहे जिथे ट्रम्प समर्थकांनी बायडन यांचा विजय रोखण्यासाठी 2020च्या निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ केल्याचा आरोप झाला होता.
अमेरिकेतलं हे राज्य कृष्णवर्णीय लोकसंख्या सर्वाधिक असणाऱ्या राज्यांपैकी आहे. जॉर्जियाची सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या आफ्रिकन - अमेरिकन आहे. म्हणूनच हे राज्य आपल्याकडे वळवण्याचा कमला हॅरिस यांचा जोरदार प्रयत्न आहे.
मिशिगन आणि इस्रायल - गाझा युद्ध
ग्रेट लेक असणाऱ्या या राज्याने गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा विजयी उमेदवार निवडून दिलाय.
इस्रायल - गाझा युद्ध आणि त्यातली अमेरिकेची भूमिका हा राज्यातला निवडणुकीसाठीचा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण या राज्यात अमेरिकेतील सर्वाधिक अरब - अमेरिकन लोकसंख्या आहे. जो बायडन यांनी इस्रायलबाबत घेतलेली भूमिका या नागरिकांना आवडली नव्हती, त्यामुळे त्याचा फटका कमला हॅरिसना बसतो का, हे पहावं लागेल.
नेवाडा आणि लॅटिनो लोकसंख्या
गेल्या काही निवडणुकांत या राज्यातून डेमोक्रॅट्ससाठी मतदान झालंय. पण यावेळी वारे रिपब्लिकन्सच्या बाजूने वाहत असल्याची चिन्हं आहेत. या राज्यात Latino Population आहे. म्हणजे क्युबन, मेक्सिकन, पोर्तो रिकन, दक्षिण किंवा मध्य अमेरिकन किंवा इतर कोणतंही मूळ असलेले स्पॅनिश वंशाचे लोक.
कोव्हिडनंतर इतर राज्यांच्या तुलनेत नेवाडामध्ये आर्थिक सुधारणा झालेली नाही. आणि हे राज्य अमेरिकेतील सर्वाधिक बेरोजगारी असणाऱ्या जागांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पेन्सलव्हेनिया : जिथे ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला
हे तेच राज्य आहे जिथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या जीवघेण्या हल्ल्याचा पहिला प्रयत्न झाला होता. आणि त्याच्या तीन महिन्यांनंतर ट्रम्प यांनी पुन्हा त्याच ठिकाणी रॅलीही घेतली.
या राज्यातल्या Scranton भागात जो बायडन लहानाचे मोठे झाले. आणि 2020च्या निवडणुकीत याचा वारंवार उल्लेख केला होता.
या राज्यात अमेरिकेतल्या इतर राज्यांच्या तुलनेत महागाई जास्त आहे. आणि कदाचित बायडन-हॅरिस प्रशासनावरचा याबद्दलचा राग मतदानातून दिसू शकतो.
नॉर्थ कॅरोलिना
बायडन - ट्रम्प लढत होती तोपर्यंत या नॉर्थ कॅरोलिनाचा कल ट्रम्प यांच्या बाजूने झुकताना दिसत होता. पण डेमोक्रॅटिक पक्षाचं तिकीट कमला हॅरिस यांना मिळाल्यावर इथे वारे वेगळ्या दिशेने वहायला लागलेयत. म्हणूनच जुलैमध्ये हल्ला झाल्यानंतरची पहिली रॅली डोनाल्ड ट्रम्प यांनी या राज्यात घेतली.
“This state is a very, very big state to win," असं त्यांनी या रॅलीत म्हटलं होतं.
विस्कॉन्सिन आणि अपक्ष उमेदवार
2016 आणि 2020 सालच्या निवडणुकांत या राज्याचं मतदान निर्णायक ठरलं होतं. पण यावेळी राष्ट्राध्यक्षपदासाठीचे अपक्ष उमेदवार या राज्यात अनेक मतं फोडण्याची शक्यता आहे.
रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांना या राज्यात चांगला पाठिंबा होता, पण नंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
ग्रीन पार्टीच्या उमेदवार जिल स्टीन आणि दुसरे अपक्ष उमेदवार कॉर्नेल वेस्ट हे या राज्यात किती मतं मिळवतात त्याचा मोठा परिणाम ट्रम्प - हॅरिस यांच्या कामगिरीवर होईल.
'if we win Wisconsin, we win the whole thing' असं ट्रम्प यांनी बोलूनही दाखवलंय.