You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कमला हॅरिस यांची 'पाच फूट उंचीची, हुशार, भारतीय आई' अमेरिकन निवडणुकीत का ठरत आहे चर्चेचा विषय?
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
‘कमला हॅरिस कृष्णवर्णीय आहेत की भारतीय वंशाच्या?’ डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रश्नाने कमलांच्या वांशिक ओळखीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. आईकडून भारतीय आणि वडिलांकडून कृष्णवर्णीय वारसा असलेल्या कमला हॅरिसना डेमोक्रॅटिक पक्षाने राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
त्यानंतर उमेदवारी स्वीकारल्यानंतर बोलताना कमला हॅरिस यांनी त्यांच्या आपल्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.
“माझी आई पाच फूट उंचीची एक हुशार, भारतीय महिला होती. तिच्या बोलण्याची ढब वेगळी होती. जग माझ्या आईला कसं वागवायचं हे घरातली मोठी मुलगी म्हणून मी पाहिलं आहे. पण तिनं कधी धीर सोडला नाही. ती कणखर होती, धीट होती, महिला आरोग्याच्या क्षेत्रात तिने मोठं काम केलं. तिने मला आणि मायाला (कमला हॅरिस यांची बहीण) – ‘अन्यायाबद्दल तक्रार करू नका, त्यावर तोडगा काढा’ ही महत्त्वाची शिकवण दिली.”
डेमोक्रॅटिक पक्षाच्या चार दिवस चाललेल्या अधिवेशनात कमला हॅरिस यांनी अधिकृतपणे पक्षाची उमेदवारी स्वीकारली. या अधिवेशनात हॅरिस यांच्या धोरणांबाबत, त्यांच्या कामगिरीबाबत तर खूप बोललं गेलं.
पण एका गोष्टीने खास लक्ष वेधून घेतलं. जवळपास सर्वच नेत्यांनी कमला हॅरिस यांच्या आईच्या योगदानाबद्दल केलेली भाषणं. कमला हॅरिस यांच्या आई श्यामला हॅरिस एकप्रकारे निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनलेल्या पाहायला मिळालं.
कोण होत्या कमला हॅरिस यांच्या आई?
श्यामला गोपालन या संशोधक होत्या. त्यांनी स्तनांच्या कर्करोगावर संशोधन केलं होतं. 1958 साली त्यांनी चेन्नईहून अमेरिकेत शिक्षणासाठी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. श्यामला यांचे आई – वडील तामिळनाडूच्या थुलसेंद्रपुरम गावात राहायचे.
श्यामला गोपालन यांनी शिक्षणासाठी अमेरिकेतलं कॅलिफोर्निया राज्य गाठलं आणि न्यूट्रिशन अँड एंडोक्रिनॉलोजीमध्ये पीएचडी मिळवली.
डोनाल्ड हॅरिस यांच्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर कमला आणि माया हॅरिस या दोन्ही मुलींना श्यामला यांनी एकटीने वाढवलं. कमला हॅरिस यांनी आपल्या 'द ट्रुथ वी होल्ड' नावाच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केला आहे.
निवडणूक प्रचार आणि हॅरिस यांच्या आई
डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात राष्ट्राध्यक्ष जो बायडन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि बराक ओबामा, माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन तसंच माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी कमला हॅरिस यांच्या मध्यमवर्गीय पार्श्वभूमीचे तसेच त्यांच्या आईने त्यांना ज्याप्रकारे मोठं केलं याचे दाखले दिले.
‘एकीकडे केवळ आपला आणि आपल्या अब्जाधीश मित्रांचा फायदा पाहणारे डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरीकडे सर्वसामान्य अमेरिकन लोकांची काळजी करणाऱ्या कमला हॅरिस’ अशी तुलना डेमोक्रॅटिक नेते सातत्याने करत होते.
बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रतिनिधी अँथनी झर्कर म्हणाले की, अमेरिकेतील अनेकांना कमला हॅरिस माहीत आहेत पण त्यांची पार्श्वभूमी नेमकी माहिती नाही. खुद्द कमला यांनी त्यांच्या भाषणातून हेच बदलण्याचा प्रयत्न केला.
जो बायडन यांची निवडणुकीतून माघार आणि कमला यांची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीपासूनच डोनाल्ड ट्रम्प कमला यांच्या स्थलांतराबाबतच्या भूमिकेवर टीका करत होते.
बायडन प्रशासनात बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याची जबाबदारी कमला हॅरिस यांच्यावर होती आणि त्या सपशेल अपयशी ठरल्या असं ट्रम्प सातत्याने म्हणत राहिले. बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचं काम आपण सुरू ठेवू असंही ट्रम्प सतत सांगतायत.
स्थलांतरित लोकांमुळे अमेरिकेत गुन्हेगारी वाढली आहे हा दावाही रिपब्लिकन पक्षाच्या प्रचारातून आक्रमकपणे केला जात आहे.
डेमोक्रॅटिक पक्षानं मात्र हा रिपब्लिकन पक्षाचा स्थलांतरितांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत प्रतिहल्ला चढवला आहे.
कमला हॅरिस यांचे आई आणि वडील एक स्वप्न घेऊन अमेरिकेत आले आणि त्यांना ते प्रत्यक्षात आणता आलं, अशा स्थलांतरितांपैकी होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आणि अमेरिकेत यशस्वीपणे स्थिरस्थावर होण्याच्या या प्रक्रियेला ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणण्याचा तिथे प्रघात आहे. डेमोक्रॅटिक पक्ष कमला हॅरिस यांची पार्श्वभूमी अधोरेखित करताना यावरच भर देताना दिसत आहे.
भाषा, लिंग, धर्म, वर्ण असे कोणतेही भेद न बाळगता अमेरिकन ही एकमेव ओळख डोळ्यापुढे ठेवून कमला हॅरिस सर्वांसाठी काम करतील असा संदेश देण्याचा त्यांच्या पक्षाचा प्रयत्न आहे.
‘अब्जाधीश’ ट्रम्प विरुद्ध ‘मध्यमवर्गीय’ कमला हॅरिस
डोनाल्ड ट्रम्प अब्जाधीश आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. गेली अनेक दशकं विविध माध्यमातून ट्रम्प स्वतः आपण किती श्रीमंत आहोत आणि कमालीचे यशस्वी उद्योजक आहोत असं सांगत आलेत.
मधल्या काळात काही कोर्ट खटल्यांमध्ये त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला गेला असला तरी ते आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत हे नाकारता येत नाही.
दुसरीकडे कमला हॅरिस मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यामुळे सर्वसामान्य अमेरिकन लोकांच्या दैनंदिन गरजांबाबत चांगली समज असल्याचं दाखवू पाहतायत.
त्यांच्या भाषणातून त्यांनी ‘दैनंदिन गरजांच्या वस्तूंचे दर कमी करण्याचं’ आश्वासन दिलं खरं, पण त्याबाबात ठोस अशी कुठली योजना मांडली नाही.
इथेही त्यांनी आपल्या आईचा उल्लेख केला केला. “माझी आई काटेकोर बजेट आखायची. आम्ही त्यात भागवायचो, पण आम्हाला कशाची कमतरताही जाणवली नाही. मिळणाऱ्या संधीचं सोनं करायला आणि त्याबद्दल ऋणी राहायला तिने आम्हाला शिकवलं. तिने आम्हाला शिकवलं की संधी सगळ्यांना मिळतेच असं नाही. त्यामुळे आपण संधी देणारी अर्थव्यवस्था निर्माण करूया, जिथे प्रत्येकाला स्पर्धेत उतरण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळेल, ” असं त्या म्हणाल्या.
ट्रम्प यांच्या धोरणांचा तसंच त्यांनी ज्या मुद्द्यांवर हॅरिस यांना लक्ष्य केलं त्या मुद्द्यांना प्रत्युत्तर देताना हॅरिस यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीचा उपयोग डेमोक्रॅटिक पक्ष करत असल्याचं यातून दिसतं.
महिला, स्थलांतरित आणि कृष्णवर्णीय मतदार
DNC मध्ये कमला हॅरिस यांच्या भाषणानंतर फॉक्स न्यूज वाहिनीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला यांच्या भाषणावर सडकून टीका केली.
कमला हॅरिस महिला, हिस्पॅनिक, तरुण तसंच कृष्णवर्णीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करत असताना ट्रम्प कँपेनची रणनीती काय आहे? असं ट्रम्प यांना विचारलं गेलं.
बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेण्यापूर्वी या मतदारांचा कल ट्रम्प यांच्याकडे काही प्रमाणात झुकल्याचं चित्र होतं पण ते अल्पजीवी ठरलं.
फॉक्स न्यूज वाहिनी रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प यांच्याकडे झुकलेली मानली जाते. पण या प्रश्नावर खुद्द ट्रम्प काहीसे चिडलेले दिसले. ते म्हणाले, “नाही, त्यांना (हॅरिसना) असं कोणतंही यश मिळत नाहीये. हिस्पॅनिक मतदारांमध्ये माझी कामगिरी चांगली आहे, कृष्णवर्णीय पुरुषांमध्येही. फक्त तुम्हालाच ते (डेमोक्रॅटिक पक्ष) (यशस्वी होताना) दिसतायत. पण पोल्समध्ये आम्ही चांगली कामगिरी करतोय.”
अर्थात, प्रचारात कमला हॅरिस यांचं भारतीय मूळ आणि त्यांच्या भारतीय आईबद्दल भरभरून बोललं जात असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कमला हॅरिस यांनी शेवटचा भारत दौरा अनेक वर्षांपूर्वी केला. उपराष्ट्राध्यक्ष पदावर असताना त्यांनी भारताला भेट दिलेली नाही.
हॅरिस यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे मिशिगनचे मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांनी म्हटलं होतं, “आम्ही त्यांना सांगतोय शक्य तेवढ्या लवकर तुम्ही भारताचा एक दौरा करा. तुमचं भारतीय मूळ महत्त्वाचं आहे. तुम्ही येऊन भारताबरोबरचे संबंध चांगले करा. मोदीजी अमेरिकेत आले होते तेव्हाही आमचं याबद्दल बोलणं झालं.चीनच्या आक्रमक वागणुकीला तोंड देण्यासाठी भारत आणि अमेरिकेला एकत्र काम करणं आवश्यक आहे आणि ते कमला हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली चांगल्या प्रकारे होईल.”
रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षावर सातत्याने डाव्या विचारांकडे झुकल्याची टीका केलीय. कमला हॅरिस यांनाही या टीकेला सामोरं जावं लागतंय. पण खरंच डाव्या पक्षांना – नेत्यांना असं वाटतं का?
अमेरिकेतील राजकारणात सक्रीय असलेल्या मूळच्या मराठी आणि मार्क्सवादी विचारांच्या नेत्या क्षमा सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना कमला हॅरिस यांच्या या प्रचारावर टीका केली.
सावंत म्हणतात, “दुर्दैवाने, हॅरिस यांचं दक्षिण आशियाई मूळ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दलचं नॅरेटिव्ह हे त्यांच्या मूळ प्रचारावरून लक्ष वळवण्याचे प्रयत्न आहेत. त्या युद्धाला पाठिंबा देणाऱ्या कॉर्पोरेट राजकारणी आहेत आणि त्यांचा पक्षही.”
“हॅरिस किंवा ट्रम्प यांच्याकडं कष्टकरी वर्गाच्या समस्यांसाठी उपाययोजना नाहीयत. दोघांनी इस्रायलच्या युद्धाला संपूर्ण पाठिंबा घोषित केलाय. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्ष युद्धाला पाठिंबा देणारे आणि कॉर्पोरेट अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणारे आहेत,” असंही त्यांनी म्हटलं.
या दोन मोठ्या पक्षांव्यतिरिक्त जिल स्टाईन या तिसऱ्या उमेदवारही या निवडणुकीत आहेत. काही डाव्या संघटनांचा त्यांना पाठिंबा पाहायला मिळतोय.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होईल. बराक ओबामांच्या सलग 8 वर्षांच्या कारकीर्दीनंतर डोनाल्ड ट्रंप यांची चार वर्षं आणि मग जो बायडन यांची चार वर्षं सत्ता राहिली आहे.
यावेळी अमेरिकन मतदार कोणाला कौल देतील हे नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल. जानेवारी 2025 मध्ये नवीन राष्ट्राध्यक्ष पदभार स्वीकारतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.