You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छोट्या मुलीने केली पोटदुखीची तक्रार, नंतर लक्षात आलं सापाने घेतलाय चावा
- Author, शुभगुणम.के
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर भारतातील काही गावांमध्ये मण्यार ( कॉमन क्रेट ) या सापाला 'श्वास गिळणारा साप' असं म्हणतात. तर दक्षिण भारतात 'झोपेत असताना जीव घेणारा साप' असं म्हटलं जातं.
मण्यार साप हे रात्रीच सक्रिय असतात. लोक झोपलेले असताना मण्यार रात्रीच्या वेळी अंथरुणात येतात आणि चावतात त्यामुळे त्यांना झोपेत असताना जीव घेणारा साप असं म्हटलं जातं.
हा साप चावल्यावर लगेच जीव जात नाही, त्यामुळे वेळीच उपचाराचे महत्त्व ओळखायला हवे असे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, लवकरात लवकर योग्य उपचार मिळाले तर संबंधित व्यक्तीचा जीव वाचवता येऊ शकतो.
अलीकडेच, तमिळनाडूतील पुदुक्कोट्टई येथे एका सहा वर्षांच्या मुलीला मण्यारने चावलं होतं. परंतु, सात दिवसांच्या उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली.
मग, मण्यार चावलेल्या काही लोकांचा झोपेतच का मृत्यू होतो?
या सापाच्या विषामुळे मनुष्याच्या शरीरावर काय परिणाम होतो?
मण्यार विषारी सापांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, बीबीसीने साप आणि त्यांच्या विषाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद साधला.
पोटदुखीने त्रस्त असलेली सहा वर्षांची मुलगी
तमिळनाडूच्या पुदुक्कोट्टई जिल्ह्यातील इलुपूरजवळील कुलवईपट्टी गावात पलानी आणि पापथी दांपत्य राहतात. त्यांची सहा वर्षांची मुलगी 15 ऑक्टोबरच्या रात्री अचानक आजारी पडली.
मुलीला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे आई-वडिलांनी तिला रुग्णालयात नेलं.
मुलीवर दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले, तरीही तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसली नाही.
दोन दिवसानंतर तिला पुदुक्कोट्टई सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आलं.
ज्यावेळी मुलीला रुग्णालयात आणलं होतं, त्यावेळी तिला डोळेही उघडता येत नव्हते.
उशीर झाल्यामुळे उपचार देताना खूप अडचणी आल्या, असं तिथले बालरोगतज्ज्ञ अरविंद यांनी बीबीसीला सांगितलं.
मुलीच्या आई-वडिलांनी सांगितलं की, "मुलीला तीव्र पोटदुखी जाणवत होती, डोळे उघडता येत नव्हते आणि श्वास घेण्यासही त्रास होत होता. ही सगळी चिन्हं सर्पदंशाची होती."
आम्हाला हे समजताच आम्ही लगेचच निदानासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या.
मुलीला सर्पदंशाच्या विषाविरोधी औषधाने उपचार सुरू केले, असं त्यांनी सांगितलं.
साप चावल्यानंतर मनुष्य किती वेळ जगू शकतो?
सापाच्या चाव्यामुळे एखादी व्यक्ती मरण पावतो की उपचारानंतर बरा होतो, हे विषाच्या प्रमाणावर आणि उपचार किती लवकर मिळाले यावर अवलंबून असतं, असे 'युनिव्हर्सल स्नेकबाइट रिसर्च ऑर्गनायझेशन'चे संस्थापक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मनोज यांनी सांगितलं.
डॉ. मनोज म्हणाले की, "या मुलीच्या बाबतीत, साप तिला केव्हा चावला हे कोणालाही माहिती नव्हतं. पण कदाचित सापाने तिच्या शरीरात फक्त थोडसं विष सोडलं असेल. सर्वांबरोबर तसं होत नाही, पण या मुलीच्या बाबतीत तसं घडलं."
डॉ. मनोज म्हणाले की, सर्पदंशानंतर एक-दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांनी पाहिलं आहे.
त्यांनी सांगितले की, "सापाच्या विषाचा परिणाम शरीरात लगेच होत नाही. विषाची मात्रा कमी असल्यास त्याचा प्रभाव दिसण्यासाठी काही तासांपासून एक दिवसापर्यंत वेळ लागू शकतो."
त्यांनी स्पष्ट केलं की, जरी शरीर सहन करू शकण्याइतकं थोडंसं विष जरी शरीरात गेलं तरी त्याचा परिणाम दिसतो, पण त्यासाठी बराच वेळ लागतो. कदाचित पुदुक्कोट्टईतील मुलीला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असेल.
त्यांनी सांगितलं की, जरी विषाची मात्रा कमी असली तरी शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि उपचार होईपर्यंत तो परिणाम कमी होत नाही.
रात्री चावणारा साप
मनोज यांनी सांगितलं की, मण्यार चावल्यावर दोन दिवसांनी रुग्णालयात दाखल झाली आणि 7 दिवसांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरीही झाली.
त्यांनी सांगितले की, "जर विषाची मात्रा कमी असेल तरच त्या बरं होण्याची शक्यता असते. नाहीतर विषामुळे फुफ्फुसात सूज येते, श्वास घेण्यात अडचण निर्माण होते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो."
हर्पेटॉलॉजिस्ट रामेश्वरन म्हणाले की, मण्यार साप रात्री खूप सक्रिय असतात.
त्यांनी सांगितलं की, "हे साप घरांमध्ये आणि सभोवतालच्या जागांमध्ये दिसतात. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असतात, तेव्हा ते घरात येतात आणि लोकांना दिसतही नाहीत. शिवाय, मण्यार इतर काही विषारी सापांसारखा चावताना आवाज करत नाही, त्यामुळे त्याचा अंदाजही येत नाही."
"हे साप लाकडाच्या ढिगाऱ्यांत, सिलिंडरच्या बेसमध्ये लपतात आणि पावसाळ्यात किंवा थंडीच्या काळात उब घेण्यासाठी घरातही येतात."
साप शरीरावर कुठे चावला हे समजत नाही?
डॉ. मनोज म्हणाले की, अनेक साप चावल्यावर जखम दिसते. परंतु, मण्यारच्या चाव्याची कधी-कधी जखमही दिसत नाही.
साधारणपणे, साप चावल्यावर जखम दिसते. वेगवेगळ्या सापांमुळे जखमेचा प्रकारही वेगळा असतो. तीव्र वेदना, सूज येणे, लालसरपणा किंवा काळं पडणे आणि फोडही येऊ शकतात.
डॉ. मनोज यांनी स्पष्ट केलं की, मण्यारच्या चाव्यामुळे शरीरावर कोणत्याही खुणा दिसत नाहीत. त्यामुळे फक्त पाहूनच सापाच्या चाव्याचा अंदाज बांधणे कठीण असते.
कोब्राचे दात साधारणपणे 8 ते 10 मिमी लांब असतात. काही सापांच्या चाव्यामुळे जखमेवर फोडासारख्या जखमा होऊ शकतात.
पण मण्यारच्या चाव्यामुळे असे ठसे दिसत नाहीत. कारण त्यांचे विषारी दात 4 मिमी पेक्षा लहान असतात.
मागील 15 वर्षांहून अधिक काळ सापाचा चावा आणि त्यांच्या विषयावर संशोधन करणारे डॉ. मनोज म्हणाले की, जर रुग्णाची लक्षणं मण्यारच्या चाव्यासारखी असतील, तर लगेच त्याला आयसीयूमध्ये ठेवून योग्य तपासण्या कराव्यात आणि नंतर उपचार सुरू करणं चांगलं असते.
झोपेत मृत्यू होऊ शकतो का?
डॉ. मनोज यांनी सांगितलं की, थंडीत ऊब घेण्यासाठी घरात येणारे हे साप कधी कधी माणसांजवळ लपून राहतात, आणि जर माणसाने चुकून जरी त्यांना स्पर्श केला, तर ते लगेच त्यांना चावतात.
मनोज यांनी सांगितले की, मण्यारच्या विषामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे चावलेल्या व्यक्तींना तीव्र पोटदुखी, उलट्या, डोळे उघडता न येणं, दुर्गंधीयुक्त लाळ, बेशुद्धी अशी लक्षणे दिसतात.
"सापाच्या विषामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे फुप्फुसांमध्ये सूज येते, चावलेल्यांना पापण्या उघडता येत नाहीत, श्वास घेता येत नाही आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो. कारण फुफ्फुसे संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवू शकत नाहीत," असंही ते स्पष्ट करतात.
त्यांनी सांगितले की, रात्री झोपेत असताना जर मण्यारने चावले आणि सकाळपर्यंत त्या व्यक्तीकडे कोणीही लक्ष दिलं नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून याला 'झोपेत मृत्यू घडवणारा साप' म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.