You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पावसाळ्यात घरात साप येऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे?
- Author, के. सुभगुनम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अभ्यासातून असं आढळलं आहे की, फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरात शिरणं आणि सर्पदंश होणं ही खूप सामान्य बाब आहे.
यामुळे घरात शिरलेल्या सापांना मारून टाकलं जाण्याचीही अधिक शक्यता असते.
जर साप घरात किंवा घराच्या आसपास आला, तर वन विभागाशी संपर्क साधून सापाला तिथून काढण्याचा आणि वाचवण्याचा सल्ला दिला जातो.
अर्थात एखादा साप विषारी असो की बिनविषारी लोक बहुतांश वेळा सापांना एकाच प्रकारे हाताळतात.
त्याचबरोबर, अभ्यासातून असंही आढळून आलं आहे की, पावसाळ्यात सर्पदंशामुळे जास्त लोक मरतात.
यावर काय उपाय आहे? पावसाळ्यात साप घराच्या जवळ येण्याचं प्रमाण का वाढतं? साप घराजवळ किंवा घरात आल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून आपण स्वत:चा बचाव कसा करायचा?
पावसाळ्यात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ
2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 2000 ते 2019 या कालावधीत भारतात सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू पावसाळ्यात झाले होते.
सरासरी एखाद्या भारतीयाचा वयाच्या 70 वर्षांआधी सर्पदंशामध्ये मृत्यू होण्याची शक्यता 250 मध्ये एकाची आहे, असंही अभ्यासात दिसून आलं.
काही ग्रामीण भागात तर हा धोका 100 मध्ये एकाचा आहे.
अभ्यासानुसार, 2000 ते 2019 या 20 वर्षांच्या कालावधीत भारतात सर्पदशांमुळे 12 लाख लोकांचा मृत्यू झाला.
यातील बहुतांश सर्पदंशाच्या घटना ग्रामीण भागातील घरांमध्ये झाल्या. विशेषकरून पावसाळ्यात जवळपास 6 लाख मृत्यू झाले.
अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या काळात म्हणजेच जून ते डिसेंबर या कालावधीत सर्पदंश होण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात.
यातील बहुतांश घटना घरांमध्ये आणि घराच्या अवतीभोवती घडतात.
पावसाळ्यात साप जास्त प्रमाणात का आढळतात?
डॉ. ए. थानिगैवेल अशोका फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्चमध्ये संशोधक आहेत. ते म्हणतात की, पावसाळ्याचा ऋतू हा फक्त सापांसाठीच नाही तर जैवविविधतेसाठी महत्त्वाचा काळ असतो.
यासंदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, "पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतरच जैवविविधता सक्रिय होते. कारण कीटक, बेडूक आणि पक्षांसह अनेक जीवांसाठी हा प्रजननाचा काळ असतो."
ते पुढे म्हणाले, "हीच बाब सापांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांनाही लागू होते. साप आणि सरड्यांच्या अनेक प्रजाती पावसाळ्याच्या काळातच प्रजनन करतात. तसंच इतर प्राण्यांप्रमाणे सापांनाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते शिकार करत असलेले बेडकांसारखे प्राणी अधिक प्रमाणात उपलब्ध असतात."
"त्यामुळेच मान्सूनच्या आधीचा आणि मान्सूनच्या नंतरचा काळ इतर जीवांप्रमाणेच सापांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो."
अर्थात डॉ. थानीगैवेल यांनी नमूद केलं की, मानवामध्ये सापांविषयीची नैसर्गिक भीती असते. त्यामुळे साप दिसणं किंवा अवतीभोवती साप आढळणं या गोष्टीकडे माणूस समस्या म्हणून पाहतो.
पावसाळ्यात साप घरांमध्ये खरोखरंच शिरतात का? त्यामागचं कारण काय?
पावसाळ्यात, साप घरात शिरल्याच्या घटना अधिक प्रमाणात नोंदवल्या जातात. यातून साप आणि मानवाचा संपर्क आल्यामुळे सर्पदंश होतात. त्यातून अनेकदा सापांपासून धोका वाटल्यामुळे भीतीपोटी लोक त्यांना मारून टाकतात.
यामागचं कारण विचारलं असता, डॉ. थानीगैवेल म्हणाले, "यासाठीचं एक कारण म्हणजे साप बेडूक आणि उंदरांसारख्या त्यांच्या भक्ष्याच्या शोधात असतात. तसंच साप हे शीत रक्ताचे प्राणी आहे. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या तापमानाचं नियमन करण्यासाठी ते घरांसारखी बंदिस्त ठिकाणं शोधतात."
म्हणजेच, "ज्याप्रमाणे साप उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड किंवा दमट जागा शोधतात, त्याचप्रमाणे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ते गरम किंवा उबदार जागा शोधतात. हा त्यांच्या सवयीचा भाग आहे."
त्यांनी पुढे असंही नमूद केलं की, अशा परिस्थितीत थंडी आणि पाऊस यापासून बचावासाठी साप मानवी वस्त्यांचा आसरा शोधतात.
डॉ. थानिगैवेल पुढे याबाबत म्हणतात, "चेन्नईसारख्या शहरी भागात, जिथे संपूर्ण परिसरच रहिवासी भागात रुपांतरित झाला आहे, सर्वत्र बांधकामं झाली आहेत, तिथे सापांना ज्याप्रकारच्या निवाऱ्याची किंवा आश्रय घेण्याच्या ठिकाणांची आवश्यकता असते, तशा जागा उपलब्ध नसतात."
"त्यामुळे साहजिकच पावसाळ्यात ते घरांमध्ये आसरा घेतात. त्यानंतर जेव्हा वातावरण त्यांना अनुकूल होतं, तेव्हा ते पुन्हा बाहेर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निघून जातात."
साप घरात कोणत्या मार्गांनी येऊ शकतात? त्यांना कसं रोखावं?
पावसाळ्यात साप जेव्हा घराजवळ येतात, तेव्हा ते नेहमीच निवांतपणात नसतात, असं हर्पेटोलॉजिस्ट (सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांचे संशोधक) रामेश्वरन म्हणतात.
ते इशारा देतात की, जेव्हा कोणताही प्राणी त्याचा अधिवास गमावल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेण्यासाठी प्रयत्न करत असतो, त्यावेळेस तो जसा घाबरलेला असतो तसेच सापदेखील घाबरलेले असतात आणि चिंताग्रस्त असतात. त्यामुळे अशावेळी सापांच्या जवळ जाताना खूपच सावध रहावं.
रामेश्वरन म्हणाले, "पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे जमिनीवर पाणी साचतं. बिळं, खड्डे यामध्ये पाणी साचतं. साहजिकच साप सुरक्षित जागांच्या शोधात बाहेर पडतात आणि घरं किंवा बांधकामांमध्ये आश्रय शोधू लागतात."
'स्नेक्स वाईडली फाऊंड इन तामिळनाडू' या पुस्तिकेत रामेश्वरन यांनी माहिती दिली आहे की, साप कोणत्या मार्गानं किंवा कशाप्रकारे घरात शिरू शकतात आणि त्यांना रोखण्याचे कोणते मार्ग असतात.
"साप घराच्या छतांवरून किंवा कौलांवरून, दरवाजाच्या खालच्या बाजूला असलेल्या फटींमधून, खिडकीला बांधलेल्या दोऱ्यांवरून, खिडकीवर वाढलेल्या वेलींमधून आणि झाडांच्या फांद्यांवरून घरांमध्ये शिरू शकतात. त्याशिवाय, ते घरांच्या भिंतींमधील भेगांमधून, छिद्रांमधून आणि भिंतीवरील सांडपाण्याच्या पाईपांवरून, जिथून शक्य असेल तिथून घरात शिरण्याचा प्रयत्न करतात," असं त्या पुस्तकात म्हटलं आहे.
यासंदर्भात रामेश्वरन म्हणाले, "जिथे त्यांच्या गरजा पूर्ण होतील अशा सुरक्षित जागा साप शोधतात. जर एखाद्या जागी त्यांना सातत्यानं सुरक्षित वाटली, तर ते तिथेच राहतात. त्याचबरोबर, जर त्यांना असुरक्षित वाटलं किंवा धोका जाणवला, तर ते तिथून तात्काळ इतरत्र निघून जातात."
त्यामुळे रामेश्वरन सल्ला देतात, "सापांनी वर उल्लेख केलेल्या मार्गांनी घरात शिरू नये म्हणून त्यांना रोखण्यासाठी काही पावलं उचलता येतात."
"यात घराजवळ सांडपाणी, घनकचरा साचू न देणं, आजूबाजूला स्वच्छता ठेवणं, घराच्या आजूबाजूला झुडुपं न वाढू देणं, घराच्या अवतीभोवती अनावश्यक वस्तू, दगडं किंवा लाकडांचा ढीग न करणं तसंच घराभोवतीच्या भेगा आणि बिळं बुजवून टाकणं इत्यादी उपाययोजना केल्यास सापांचं घरात शिरणं टाळता येतं."
'सापांबद्दलची जागरुकता महत्त्वाची'
रामेश्वरन या गोष्टीवर भर देतात की सापांपासून मानवाला आणि मानवापासून सापाला धोका निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर "पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे."
ते यावरही भर देतात की, जरी पर्यावरणाला पूर्णपणे पूर्वस्थितीत आणणं किंवा त्यांची झालेली हानी पूर्णपणे भरून काढणं शक्य नसलं, "तरीदेखील किमान निवासस्थान किंवा वापरातील जागा सुरक्षित ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून साप तिथे अधिवास तयार करू शकणार नाहीत."
'स्नेक्स वाईडली फाऊंड इन तामिळनाडू' या पुस्तकात सल्ला देण्यात आला आहे की, वर सांगितलेल्या उपाययोजना करूनदेखील जर साप मानवी वस्त्यांमध्ये, घरांमध्ये शिरले तर त्यांच्यापासून दूर राहावं. मदतीसाठी सर्पतज्ज्ञ किंवा सर्पमित्रांना बोलवावं.
"असं न करता, सापांना इजा करणारी कोणतीही गोष्ट केल्यास, त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यास किंवा मारून टाकण्याचा प्रयत्न करणं यातून निव्वळ धोका निर्माण होऊ शकतो," असं रामेश्वरन सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)