मासिक पाळी आलीय का हे तपासण्यासाठी महिला कामगारांचे कपडे उतरवले

सॅनिटरी पॅड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सॅनिटरी पॅड
    • Author, एस्ठर अकेलो ओगोला, मॅटिआ बुबालो
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, केनिया, लंडन

केनियाच्या चिझ तयार करणाऱ्या कारखान्यात मासिक पाळी आलेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना कपडे उतरवण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना घडली आहे.

केनियाच्या 'ब्राऊन फूड कंपनी' या कारखान्यात घडलेल्या या घटनेत पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

केनियाच्या ब्राउन्स फूड कंपनी या चिझ कारखान्यातील कचऱ्याच्या डब्यात वापरलेले सॅनिटरी पॅड आढळले होते. कोणत्या महिलेने हे पॅड फेकले हे बघण्यासाठी तेथील व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यांना बोलावले.

हे कृत्य कोणी केले हे जाणून घेण्यासाठी व्यवस्थापकाने बरेच प्रयत्न करूनसुद्धा माहिती न मिळाल्यामुळे व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यांना कपडे उतरवायला लावले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, व्यवस्थापकाने महिला कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी जमवले आणि जबरदस्तीने कपडे उतरवले आणि त्यांची तपासणी केली.

चौकशी होईपर्यंत व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आल्याचं ब्राउन कंपनीने म्हटलं आहे.

पोलिसांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, या घटनेत तीन जणांवर महिलांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केनियाच्या सिनेटर ग्लोरिया ओरवोबा यांनी फेसबुकवर व्हीडिओ पोस्ट करून या घटनेची माहिती दिली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांनी व्हीडिओमध्ये म्हटलंय की, सोमवारी रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांना फोन आला होता.

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, "कंपनीच्या व्यवस्थापकाला कचऱ्याच्या डब्यात वापरलेले सॅनिटरी पॅड दिसले. तो डबा सॅनिटरी पॅडसाठी नव्हता."

ग्लोरिया ऑरवोबा सांगतात, यावर त्या महिला व्यवस्थापकाने सर्व महिलांना बोलावून विचारलं की ते सॅनिटरी पॅड कोणी फेकले आहे. पण तिला योग्य उत्तर मिळालं नाही. ज्या महिलेने हे कृत्य केलं होतं तिला शिक्षा करायची होती.

ग्लोरिया ऑरवोबा पीरियड शेमिंगच्या विरोधात काम करतात.

ही दुःखद घटना आहे. मात्र हे कंपनीच्या धोरणाच्या विरोधात असल्याचं ब्राउन्स फूड कारखान्याने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

शिवाय, आम्ही कर्मचार्‍यांना संवेदनशील बनवण्यासाठी, एकमेकांमधील संवाद सुधारण्यासाठी आणि आमची विद्यमान धोरणे आणि कार्यपद्धती मजबूत करण्यासाठी महिला आरोग्य तज्ञांना बोलावलं आहे. पण तरीही आम्ही या घटनेच्या स्वतंत्र तपासाची व्यवस्था करत असल्याचं कारखान्याने आपल्या निवेदनात म्हटलंय.

पोलिसांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं की त्यांनी पीडितांचे जबाब नोंदवले असून, तीन आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांची कसून चौकशी केली आहे.

याआधीही या भागातील इतर कंपन्यांमध्ये अशाच घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक पोलिस प्रमुख फिलिप वानिया सांगतात, "अशा अपमानास्पद घटना बर्‍याच काळापासून सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. सर्व पीडितांना लवकरच न्याय मिळेल."

केनियामध्ये पीरियड शेमिंग ही एक मोठी समस्या असल्याचं यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

सिनेटर ग्लोरिया यांच्या मासिक पाळी दरम्यान त्यांची पॅंट रक्ताने माखली होती. त्यामुळे त्यांना संसद सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)