'झोपेत माझा मुलगा वेगळ्याच जगात जातो; तो ओरडायला लागतो, डोळे फिरवतो, घाबरतो'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फर्नांडो पॉल
- Role, बीबीसी वर्ल्ड न्यूज
"पहिल्यांदा असं घडलं, तेव्हा मला वाटलं की माझ्या मुलाला भास होताहेत. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला शांत केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, तो वेगळ्याच जगात आहे. माझ्यापासून लांब गेलाय.”
ऑलिव्हिया गार्सिया त्यांचा चार वर्षांचा मुलगा युआनबद्दल आलेला अनुभव सांगत होत्या.
खरंतर युआनबरोबर जे घडलं, तो भास किंवा भ्रम नव्हता. तो झोपेचा एक विकार आहे. त्याला पॅरासोम्निया म्हणतात.
यामुळे माणसाला कधी राग येतो, तर कधी लाजिरवाणं वाटतं. कधी तो ओरडतो, तर कधी खूप घाम फुटतो. कधीकधी मुलं झोपेतही हिंसक वागतात.
“रात्रीच्या वेळी माझा मुलगा एक वेगळाच माणूस बनतो. तो अतिशय असंबद्ध, न समजणाऱ्या गोष्टी सांगतो,” असं ऑलिव्हिया सांगत होत्या.
"ओरडतो आणि रडतो. मी त्याला घट्ट मिठी मारते आणि त्याला जवळ घेते."
“कधीकधी तो दुसराच कोणीतरी वाटतो. डोळे फिरवतो, पापण्यांची उघडझाप करत राहतो. त्यावेळी तो स्वतःच खूप घाबरलेला असतो.”
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन (AASM) च्या मते, रात्रीच्या वेळी झोपेत वाटणाऱ्या भीतीची कारणं ही पूर्णपणे समजलेली नाहीयेत. मुलामंध्ये या समस्येचं प्रमाण एक ते साडेसहा टक्क्यांपर्यंत आहे.
AASM च्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, 5 वर्षाखालील 25 टक्के मुलं या समस्येने ग्रासलेली आहेत. इतर संशोधनांमध्ये हा आकडा 40 टक्के इतका असल्याचं म्हटलं आहे.
या समस्येने ग्रस्त मुलांचे प्रमाण सर्व देशांमध्ये सारखे नाही. शिवाय हा आजार मुख्यतः मुलाच्या वयावरही अवलंबून असतो.
ही समस्या साधारणतः एक ते साडेपाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसून येते. सहा महिने ते 12 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ही भीती दिसून येते.
प्रौढांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या फक्त एक टक्के लोकांना ही समस्या भेडसावते.
मुलांना ही समस्या का भेडसावते?

फोटो स्रोत, Fernando Paul
गाढ झोपेच्या साधारणतः तिसऱ्या टप्प्यात रात्रीची भीती विकसित होते. ही अवस्था 5 ते 15 मिनिटांपर्यत ती टिकते. काही प्रकरणांमध्ये ही भीती दीर्घकाळही टिकते.
या समस्येचे कोणतेही विशिष्ट कारण माहीत नाही. पण अत्यंत थकवा, झोप न लागणे, खूप ताप यांमुळे हा त्रास होऊ शकतो. ही समस्या अनुवंशिकही असते.
जर मुलाच्या आई-वडिलांना किंवा त्यांच्या घरात कोणाला हा त्रास असेल, तर मुलामध्येही तो येण्याची शक्यता जास्त असते, असं मेयो क्लिनिकने म्हटलं आहे.
तात्याना मुनोज या एक बाल न्यूरॉलॉजिस्ट आहेत. या प्रकारच्या समस्येमुळे मुलं कशी प्रतिक्रिया देतात हे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"मूल झोपेतून अचानक जागं होतं. बेडवर बसतं किंवा बेडवरून खाली पडतं," त्या सांगतात.
"त्यावेळी मुलाच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत असतात. त्याला धाप लागलेली असते. खूप घाम येतो. चेहरा लालबुंद झालेला असतो. डोळेही मोठे होतात. त्याची अवस्था चिंताजनक वाटायला लागते.”

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात, रात्रीच्या भीतीने ग्रासलेल्या मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी काय घडले ते आठवत नाही. इतकं काही झाल्यानंतरही मुलं शांत होतात आणि झोपी जातात.
युआनच्या बाबतीतही असंच घडतं. त्याने आदल्या रात्री काय केले हे सांगितलं तर त्याला आठवणारही नाही, असं त्याची आई सांगते.
ख्राइस्ट कॅथलिक युनिव्हर्सिटी हेल्थ नेटवर्कमध्ये झोपेसंबंधीचे तज्ज्ञ म्हणून काम करत असलेल्या डॉ. पाब्लो ब्रॉकमन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "सोप्या भाषेत सांगायचे तर हे मेंदूतील शॉर्ट सर्किटसारखे आहे. बहुतेक वेळा रात्रीच्या भीतीचे कोणतेही विशिष्ट कारण नसते."
"हे मुलांमध्ये अपस्मार किंवा अन्य आजारामुळे होत नाही. 90 टक्के प्रकरणांमध्ये ते उत्स्फूर्तपणे उद्भवते आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे शमतेही."
हे रात्रीचं दुःस्वप्न नसतं

फोटो स्रोत, Getty Images
ही समस्या दुःस्वप्न किंवा झोपेत चालण्यापेक्षा वेगळी आहे.
डॉ. पाब्लो ब्रॉकमन यांनी म्हटलं की, दिवसा मुलाला आलेले भीतीदायक अनुभव किंवा त्याला बसलेला धक्का यांचा या रात्रीच्या भीतीशी संबंध नाही. याचा बराचसा संबंध मूडशी आहे.”
ते पुढे सांगतात की "आपल्याला गाढ झोपेत नाही, तर झोपेच्या आरईएम अवस्थेत भयानक स्वप्नं पडतात."
झोपेत चालण्याच्या आजाराबाबत बोलताना डॉ. ब्रॉकमन सांगतात की, झोपेत चालण्याचा विकार असलेले लोक घाबरलेले नसतात. ते झोपेत निर्वेधपणे चालतात.
“झोपेत चालणारे लोक बसतात, बोलतात. पण रात्रीच्या भीतीने ग्रासलेले लोक हे करत नाहीत. ते जास्त काळजीचं आहे. ही अवस्था धोकादायकही बनते, कारण त्यांचं स्वतःवरचं नियंत्रण गेलेलं असतं.
तज्ज्ञ सांगतात की, ज्या मुलांना रात्री भीती वाटते, त्यांना मोठं झाल्यावर झोपेत चालण्याची सवय लागण्याची शक्यता असते.
या समस्येवर काय करू शकतो?
रात्रीच्या भीतीमुळे ग्रस्त असलेल्या मुलांच्या आसपास राहण्याखेरीज इतरही काही गोष्टी सांभाळणं गरजेचं असतं.
ऑलिव्हिया सांगते, "मी माझ्या मुलाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. ‘मम्मी नेहमी तुझ्यासोबत असेल, सगळं नीट होईल’ ही खात्री मी त्याला देते. झोपेत त्याला मी अनोळखी आहे असं वाटतं, तेव्हा तो रडायला लागतो.”
तात्याना मुनोज यांच्या म्हणण्यानुसार अशा परिस्थिती त्या मुलाला उठवणे आणि त्याला मिठी मारणे कठीण आहे. पण त्यामुळे त्याची भीती कमी होऊ शकते. तो त्या वेदनेतून बाहेर येऊ शकतो.
डॉ. पाब्लो ब्रॉकमन यांच्या मते, काही उपायांनी या भीतीचं दमन करता येऊ शकतं.
झोपेसंबंधीच्या तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपेच्या पहिल्या टप्प्यात त्यांना त्रास न देणे आणि झोपण्यापूर्वी टीव्ही न पाहण्याची सवय लावून या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
शिवाय या गोष्टीकडे भास म्हणून न पाहता डॉक्टरांचाही वेळेत सल्ला घ्यावा.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा युआनची रात्रीची भीती वाढली, तेव्हा ऑलिव्हिया यांनी त्याला डॉक्टरकडे नेले.
ऑलिव्हिया यांनी म्हटलं, "जेव्हा गोष्टी हाताबाहेर गेल्या असं वाटलं की, आम्ही त्याला डॉक्टरांकडे नेण्याचा निर्णय घेतला.”
"युआन नियंत्रण गमावत होता. तो विचित्रपणे वागत होता. त्याच्याकडे खूप ऊर्जा होती."
युआन यांनी इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ECG) केलं. मेंदूतील विद्युत क्रिया मोजण्यासाठी ईसीजी केला जातो. यामुळे मुलाच्या झोपेची पद्धतच नाही, तर इतर संबंधित आजारांबद्दलही माहिती मिळते.
ईसीजीच्या निकालांवरून लक्षात आलं की, युआनची झोपेची पद्धत इतर मुलांप्रमाणेच सामान्य होती. त्याला इतर कोणतीही समस्या नव्हती.
कोरोनानंतर वाढली अपुऱ्या झोपेची समस्या?
"कोरोनाचा युआनवर खरोखर परिणाम झाला आहे. त्यावेळी तो खूपच लहान होता. त्याला दिवसभर ऑनलाइन क्लासेसमध्ये व्यस्त रहावं लागायचं. त्याला घरीच राहावं लागलं. ही खूप कठीण परिस्थिती होती," ऑलिव्हिया सांगतात.
अनेक अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोरोनामुळे जगभरातील लोकांच्या झोपेशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
काही तज्ज्ञ याला ‘कोरोना सोम्निया’ किंवा ‘कोव्हिड-सोम्निया’ म्हणतात.
ऑगस्ट 2020 मध्ये ब्रिटनमधील साउथॅम्प्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार, कोरोनानंतर अपुरी झोप घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. मुलंही याला अपवाद नाहीत.
डॉ. पाब्लो ब्रॉकमन म्हणाले की, कोरोनामुळे झोपेच्या विकारांमध्ये मोठा बदल झाला आहे.
हे मुलांमध्ये खूप सामान्य असल्याचंही सांगितलं जातंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








