काकोरी कट: चादरीमुळे लागला पोलिसांना सुगावा, पण क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला हादरवलं

फोटो स्रोत, ,Indian Railway
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
1925 उजाडेपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली होती. अगदी एक एक पैसा जुळवता जुळवता त्यांच्या नाकी नऊ आले होते.
काही लोकांकडे कपडेही नव्हते. डोक्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. लोकांकडून बळजबरीने पैसा वसूल करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही पर्याय नव्हता.
मग, जर लुटायचंच असेल तर सरकारी खजिना का लुटू नये? याची जाणीव त्यांना झाली.
राम प्रसाद बिस्मिल त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात की, गार्डच्या डब्यात ठेवलेल्या एका लोखंडी पेटीत कर म्हणून गोळा केलेला पैसा असतो हे त्यांना समजलं होतं.
“एके दिवशी मी लखनौ स्टेशनवर गार्डच्या डब्यातून हमाल लोखंडी पेट्या उतरवत असल्याचं पाहिलं. त्याला कुलूप किंवा साखळी नव्हती, हे मी पाहिलं. त्याचवेळी याची लूट करायची ठरवली,” असं त्यांनी म्हटलं होतं.
पहिला प्रयत्न निष्फळ
या मोहिमेसाठी बिस्मिल यांनी नऊ क्रांतिकारकांची निवड केली होती. राजेंद्र लाहिरी, रोशन सिंह, सचिद्र बक्षी, अशफाक उल्ला खान, मुकुंदी लाल, मम्मननाथ गुप्ता, मुरारी शर्मा, बनवारीलाल आणि चंद्रशेखर आझाद अशी त्यांची नावं होतीं.
सरकारी खजिना लुटण्यासाठी बिस्मिल यांनी काकोरीची निवड केली. ते लखनौपासून आठ किलोमीटरवर असलेल्या शहाजहांपूर रेल्वे मार्गावरच एक छोटंसं स्टेशन होतं.

फोटो स्रोत, Sri Ganesh Prakashan
सगळे आधी टोही मोहिमेवर काकोरीला गेले. आठ ऑगस्ट 1925 ला त्यांनी एक रेल्वे लुटण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.
राम प्रसाद बिस्मिल लिहितात की, “आम्ही छेदीलाल धर्मशाळेच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये थांबलो होतो. आधीच निश्चित केलेल्या वेळेनुसार लखनौ रेल्वे स्टेशनवर पोहोचायला सुरुवात केली. आम्ही प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तेव्हा, एक रेल्वे जात असल्याचं पाहिलं. आम्ही विचारलं, कोणती रेल्वे आहे? तेव्हा कळलं की, ही 8 डाऊन एक्सप्रेस आहे. त्यात आम्ही जाणार होतो. आम्ही 10 मिनिटे उशिरा स्टेशनवर पोहोचलो होतो. आम्ही निराश होऊन धर्मशाळेत परत आलो.
ट्रेनची चेन ओढण्याची योजना
दुसऱ्या दिवशी दुपारी 9 ऑगस्टला सगळे काकोरीसाठी निघालो. त्यांच्याकडे चार माऊझर पिस्तुलं आणि रिव्हॉल्वहर होत्या. अशफाक यांनी बिस्मिल यांना समजावण्याचा प्रयत्न केला. “राम एकदा पुन्हा विचार कर. ही योग्य वेळ नाही. चल परत जाऊ’.
बिस्मिल यांनी त्यांना जोरात रागावलं, “आता कोणी काही बोलणार नाही.” जेव्हा अशफाक यांना कळलं की, त्यांच्या या नेत्यावर आता कोणत्याच गोष्टीचा परिणाम होणार नाही, तेव्हा त्यांनी एखाद्या शिस्तबद्ध शिपायासारखं ते म्हणतील ते ऐकलं.

फोटो स्रोत, India Post
शहाजहांपूरहून सर्वजण रेल्वेमध्ये चढतील आणि काकोरीजवळ आधीच निश्चित झालेल्या ठिकाणापर्यंत जातील. तिथे ट्रेनची चेन ओढतील आणि गार्डच्या केबिनमध्ये जाऊन पैशाने भरलेल्या पेटीवर ताबा मिळवतील, असं ठरलं होतं.
राम प्रसाद बिस्मिल आत्मचरित्रात लिहितात की, “आम्ही कोणालाही शारीरिक इजा करणार नाही, असं ठरवलं होतं. अवैध पद्धतीने मिळवलेले सरकारी धन घ्यायला आम्ही आलो आहोत, असं रेल्वेत जाहीर करणार होतो. ज्यांना शस्त्रं चालवता येतात ते गार्डच्या केबिन बाहेर उभे राहतील आणि थोड्या थोड्या वेळानं गोळ्या झाडतील, म्हणजे केबिनपर्यंत जायची कुणाची हिंमत होणार नाही, हेही निश्चित झालं होतं."

फोटो स्रोत, PIB
चंद्रशेखर आझाद यांनी प्रश्न विचारला, “जर काही कारणानं चेन ओढूनसुद्धा रेल्वे थांबली नाही तर काय करायचं?”
ही समस्या सोडवण्यासाठी बिस्मिल यांनी एक उपाय सांगितला, “आपण ट्रेनच्या पहिल्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढू. एकदा चेन ओढून ट्रेन थांबली नाही तर दुसऱ्या टीमने चेन ओढून ट्रेन थांबवायची.”
नऊ ऑगस्टला सर्व लोक शहाजहांपूर स्टेशनला पोहोचले. सर्व लोक स्टेशनवर वेगवेगळ्या दिशेने आले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही. सगळ्यांनी रोजच्यासारखे कपडे घातले होते आणि हत्यारं कपड्याच्या आत लपवली होती. चेनच्या अगदी जवळ असलेली जागा त्यांनी पकडली. ट्रेन थांबल्यावर उतरायला जास्त वेळ लागणार नाही, म्हणून ही जागा निवडली.
राम प्रसाद बिस्मिल आत्मचरित्रात लिहितात की, “ट्रेन सुरू झाली आणि पुढे जायला लागली. मी डोळे बंद करून गायत्रीमंत्राचा जप करू लागलो. मला काकोरी स्टेशन दिसलं आणि माझ्या श्वासाची गती वाढली. हृदय जोरजोरात धडधडू लागलं अचानक जोरदार आवाज झाला आणि जिथे आम्ही ठरवलं होतं तिथे आमची गाडी थांबली."
बिस्मिल लिहितात, “मी लगेच माझी पिस्तुल काढली आणि ओरडून म्हटलं, शांत रहा, घाबरण्याची काही गरज नाही. आमचा जो पैसा आहे, तो आम्ही सरकारकडून घ्यायला आलो आहोत. तुम्ही तुमच्या जागेवर बसले तर तुम्हाला कोणतंच नुकसान होणार नाही.”
दागिने हरवले म्हणत, चेन ओढली गेली
पण, ट्रेन थांबवण्याच्या आधी एक नाट्य घडलं. राजेंद्र लाहिरी आणि सचिंद्र बक्षी यांनी सेकंड क्लासची तिकिटं घेतली होती.
सचिंद्रनाथ बक्षी त्यांच्या पुस्तकात लिहितात की, “मी अशफाकला हळूच विचारलं की, माझ्या दागिन्यांचा डबा कुठे आहे?” तो लगेच म्हणाला, “अरे तो तर आपण काकोरीलाच विसरून आलो.”

फोटो स्रोत, Photo Division
अशफाक असं बोलल्यावर बक्शीने ट्रेनची चेन ओढली. राजेंद्र लाहिरी यांनीही दुसऱ्या बाजूने चेन ओढली. तिघं लगेच खाली उतरले आणि काकोरीच्या दिशेने चालू लागले. थोडं दूर गेल्यावर ट्रेनचा गार्ड त्यांना दिसला. त्याने विचारलं की, चेन कोणी ओढली? त्याने आम्हाला तिथेच थांबण्याचा इशारा दिला. त्यानं सांगितलं, दागिन्याचा डबा काकोरीतच राहिला आहे. आम्ही तो घ्यायला जातो आहे.
बक्षी पुढे लिहितात, “तेव्हापर्यंत आमचे साथीदार ट्रेन मधून उतरून तिथे गेले होते. आम्ही पिस्तुलाने हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही पाहिलं की, गार्डने ट्रेन चालवण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मी त्याच्या छातीवर पिस्तुल ठेवलं आणि त्याच्या हातून कंदील घेतला. तो हात जोडून म्हणाला, “मला जिवंत सोडा, मी त्याला धक्का देऊन जमिनीवर पाडलं.”

फोटो स्रोत, Raj Kamal
अशफाकनं पेटी उघडायला सुरुवात केली. त्यांनी गार्डला म्हटलं, “जर आम्हाला सहकार्य केलं तर, तुमचं काहीही नुकसान होणार नाही.
बिस्मिल लिहितात, “आमच्या साथीदारांनी थोडा वेळ हवेत गोळ्या चालवणं सुरू ठेवलं. पैशाने भरलेली ती पेटी फार जड होती. आम्ही ती घेऊन पळून जाऊ शकत नव्हतो. अशफाक एका हातोड्यानं तोडू लागला. बऱ्याच प्रयत्नानंतरही तो यशस्वी झाला नाही.”
सर्व लोक अशफाककडं श्वास रोखून पाहत होते. त्याचवेळी तिथं अशी एक घटना झाली ज्यामुळं त्या क्रांतिकारकांचं आयुष्य कायमचं बदललं.
ट्रेनमधील प्रवाशाला गोळी लागली
दोन डबे पुढे असलेल्या डब्याती एक प्रवासी अहमद अली त्यांच्या डब्यातून उतरले आणि गार्डच्या केबिनकडे जाऊ लागले. असं करण्याची कुणी हिंमत करू शकेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
खरंतर अहमद महिलांच्या डब्याकडं जात होते. तिथं त्यांची बायको बसली होती. ट्रेन थांबलीच होती तर पत्नीची विचारपूस करावी, असं त्यांना वाटलं. ट्रेन मध्ये काय होतंय याची त्यांना जराही कल्पना नव्हती.

फोटो स्रोत, Social Media/X
बिस्मिल लिहितात, “मला सगळं प्रकरण समजण्यात वेळ लागला नाही. पण, माझ्या साथीदारांना हे लवकर लक्षात आलं नाही. मन्मथनाथ अतिशय उत्साही होते. पण, त्यांना शस्त्रं चालवण्याचा अनुभव नव्हता. त्यांनी त्या व्यक्तीला येताना पाहिलं आणि त्याच्यावर निशाणा साधला. मी काही म्हणणार तितक्यात त्यांनी ट्रिगर दाबल. अहमद यांना गोळी लागली आणि ते जमिनीवर कोसळले.”
हे होत असताना अशफाक पेटी तोडण्यात व्यस्त होते, पण त्यांना यश मिळत नव्हतं. शेवटी बिस्मिल यांनी हातोडा घेतला आणि पेटीला लागलेल्या कुलुपावर जीवाच्या आकांताने प्रहार केला. कुलुप खाली पडलं. सगळा पैसा काढून चादरीत लपेटून ते घेऊन निघाले. पण, तेव्हाच एक मोठी अडचण निर्माण झाली.
दुरून एक ट्रेन येण्याचा आवाज आला. त्या रेल्वेच्या ड्रायव्हरच्या लक्षात येईल, अशी भीती त्यांना वाटली. लूट सुरू असलेल्या रेल्वेतील प्रवाशांचीही हालचाल सुरू झाली होती.
त्यावेळी कोणीही प्रवासी ट्रेनमधून उतरून पळून जाऊ शकत होता. पण, कोणीही तसं करायचं धाडस केलं नाही. बिस्मिल तेव्हा हातातली बंदूक हवेत फिरवत होते.
त्यांनी इतर सहकाऱ्यांना शस्त्रं लपवण्यास सांगितलं. अशफाक यांना हातोडी खाली टाकण्यास सांगितली. ती पंजाब मेल होती. न थांबता ती पुढे निघून गेली.

फोटो स्रोत, Social Media/X
या पूर्ण मोहिमेला अर्ध्या तासाचाही वेळ लागला नाही.
बिस्मिल लिहितात, “मला लक्षात आलं की, एका निरपराध व्यक्तीचा जीव गेल्याचं सर्वांनाच दु:ख झालं होतं. पण तो चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होता आणि तीच त्याची चूक होती. एका निर्दोष व्यक्तीवर गोळी झाडल्याचं मन्मथनाथला खूप दुःख दु:ख झालं होतं. तो रडत होता. त्यामुळं त्याचे डोळे सुजून लाल झाले होते.”
बिस्मिल यांनी मन्मथला मिठी मारली.
लूटीचा देशव्यापी परिणाम
या लुटीचा संपूर्ण देशावर परिणाम झाला. उत्तर प्रदेशात एका ट्रेनवर हल्ला झाल्याची बातमी आली, तेव्हा लोक या हल्ल्याचं कारण विचारू लागले.
या मोहिमेत फार कमी लोक सहभागी झाले होते आणि त्यांचा उद्देश फक्त सरकारी खजाना लुटणं हा होता, हे समजल्यानं लोकांवर या धाडसाचा चांगला प्रभाव पडला, असं बिस्मिल लिहितात. आम्ही सरकारी पैशाशिवाय काहीही लुटलं नाही, हेही लोकांना आवडलं होतं, असं ते सांगतात.
“भारताच्या बहुतांश वृत्तपत्रांनी आम्ही देशाचे हिरो असल्याचं म्हटलं. पुढचे अनेक आठवडे तरुण आमच्याबरोबर जोडले जाण्यासाठी प्रयत्न करत होते. लोकांनी या घटनेला एखाद्या लुटीच्या सामान्य घटनेसारखं समजलं नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची भूमिका मांडणारी अत्यंत मोठी घटना, म्हणून याकडं पाहिलं गेलं.”
सकाळपर्यंत दरोड्याची बातमी वर्तमानपत्रात
तिथून निघण्यापूर्वी लोकांनी काही सुटलं तर नाही, याचा अंदाज घेतला. इतकी मेहनत करूनही त्या लोखंडाच्या पेटीतून फक्त पाच हजार रुपये मिळाले.
गोमती नदीच्या किनाऱ्यावर काही मैल चालत ते लखनौ शहरात दाखल झाले.
मन्मथनाथ गुप्ता यांनी ‘दे लिव्ह्ड डेंजरसली’ मध्ये लिहिलं, “आम्ही चौकाकडून लखनौमध्ये आलो. हा लखनौचा रेड लाईट एरिया होता.तिथं कायम वर्दळ असायची. चौकात आल्यावर आझाद यांनी सर्व पैसे आणि शस्त्रं बिस्मिल यांना सोपवले. पार्कमध्ये बेंचवर जाऊन झोपू असा सल्ला आझाद यांनी दिला. अखेर आम्ही एकाझाडाखाली विश्रांती घेतली. पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने आमचे डोळे उघडले.”
पार्कच्या बाहेर येतात पेपर विक्रेत्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. “काकोरीत दरोडा, काकोरीत दरोडा’’, हे ऐकताच त्यांनी एकमेकांना इशारा केला. काही तासातच ही बातमी पसरली होती.


चादरीमुळे मिळाला पहिला पुरावा
घटनास्थळी आपण कोणताही पुरावा सोडलेला नाही, असं सगळ्यांना वाटलं. पण या सगळ्या गडबडीत एक चादर ते तिथेच सोडून आले आहेत, याचा त्यांना अंदाज आला नाही. त्या चादरीवर शहाजहांपूर येथील एका धोब्याची खूण होती.
त्यामुळे लुटीत सामील असलेल्या लोकांचा शहाजहांपूरशी काहीतरी संबंध आहे याचा पोलिसांना अंदाज आला. पोलीस त्या धोब्याला शोधण्यात यशस्वी झाले.
त्यावरून ही चादर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या एका सदस्याची आहे हे त्यांच्या लक्षात आलं.

फोटो स्रोत, Srishti Publishers
इतकंच नाही तर क्रांतिकारकांच्या काही साथीदारांनी त्यांचा छळही केला. राम प्रसाद बिस्मिल सांगतात की, “दुर्दैवाने आमच्यात एक घरभेदी होता. मी संघटनेत डोळे बंद करून विश्वास करत असणाऱ्याचा तो अतिशय जवळचा मित्र होता. पण तो, व्यक्ती काकोरी कटातील सदस्यांच्या अटकेबरोबरच पूर्ण संघटना उध्वस्त करण्यासाठी जबाबदार होता, हे त्यांना नंतर लक्षात आलं.”
बिस्मिल यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या व्यक्तीचं नाव घेतलं नाही. पण त्यांचं पुस्तक ‘काकोरी द ट्रेन रॉबरी दॅट शूक द ब्रिटिश राज’ मध्ये ते लिहितात की, “बनवारीलाल भार्गव एचआरएचे सदस्य होते. काकोरी कटात त्यांची भूमिका शस्त्रं पुरवण्याची होती. त्यानंतर फाशीच्या शिक्षेपासून बचाव करण्यासाठी आणि सरकारकडून मिळालेल्या आर्थिक साहाय्यला बळी पडून ते माफीचे साक्षीदार झाले.”
आझाद यांना सोडून सगळ्यांना अटक
सरकारने काकोरी कटात सामील असलेल्या लोकांच्या अटकेसाठी 5000 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. त्यासंबंधी रेल्वे स्टेशन आणि पोलीस ठाण्यांवर जाहिराती लावल्या होत्या.
घटनेनंतर तीन महिन्यांच्या आत एक-एक करत या कटात भाग घेणाऱ्या सर्व लोकांचं अटकसत्र सुरू झालं होतं.
अशफाक, रोशन सिंह, राजेंद्र लाहिरी, बनारसी लाल आणि अन्य व्यक्तींना अटक करण्यात आली. फक्त चंद्रशेखर आझाद यांना पोलीस अटक करू शकले नाही.
सर्वांत शेवटी राम प्रसाद बिस्मिल यांना अटक करण्यात आली. कानपूरमधून प्रकाशित होणारं वर्तमानपत्र प्रताप या वर्तमानपत्रात हेडलाइन होती, ‘भारतातील नवरत्नांना अटक’.

फोटो स्रोत, @bjp4india
गणेश शंकर विद्यार्थी या वर्तमानपत्राचे संपादक होते. सर्व आरोपींवर दरोड्याचा आणि हत्येचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एप्रिल 1927 मध्ये या खटल्याचा निकाल लागला. अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी. रोशन सिंह आणि राम प्रसाद बिस्मिल यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. संपूर्ण भारतात त्यांच्याविरुद्ध निदर्शनं करण्यात आली.
मदन मोहन मालवीय, मोतीलाल नेहरू, लाला लजपत राय, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिनाह यांनी या क्रांतिकारकांना पाठिंबा दिला.
केंद्रीय असेंबलीनं व्हॉईसरॉयला मृत्यूदंडाच्या शिक्षेचं रुपांतर जन्मपठेपेत व्हावं, अशी विनंती केली. पण त्यांनी ही मागणी धुडकावून लावली.
बिस्मिल आणि अशफाक यांना फाशी

फोटो स्रोत, Ananya Prakashan
19 डिसेंबर 1927 ला रामप्रसाद बिस्मिल, रोशन लाल आणि राजेंद्र लाहिरी यांना गोरखपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. फाशी देण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी त्यांचं आत्मचरित्र पूर्ण केलं.
त्याच दिवशी अशफाक यांना फैजाबादच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.
मन्मथनाथ गुप्त 18 वर्षांचे नव्हते, त्यामुळे त्यांना फक्त 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
1937 मध्ये त्याची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा सरकारच्या विरोधात लिहायला सुरुवात केली.
1939 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि 1946 मध्ये स्वातंत्र्याच्या एक वर्षाआधी त्याची सुटका करण्यात आली.
काही काळ त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येही घालवला. 26 ऑक्टोबर 2000 ला त्यांनी अंतिम श्वास घेतला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











