भारतीय गुलामांचा व्यापार करुन पैसे कमावले, ते दान देऊन जगप्रसिद्ध येल विद्यापीठ बांधले

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
प्रसिद्ध येल विद्यापीठानं गेल्या महिन्यात जाहीरपणे माफीनामा प्रसिद्ध केला. त्यांच्या प्रमुख नेत्याचा आणि दात्याचा गुलामगिरीशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांनी ही औपचारिक माफी मागितली.
तेव्हापासून भारतामध्ये एका नावावर प्रचंड चर्चा होत आहे. ते नाव म्हणजे एलिहू येल. त्यांच्याच नावावरून आयव्ही लीग युनिव्हर्सिटीचं नाव ठेण्यात आलं होतं.
येल यांनी 17 व्या शतकामध्ये दक्षिण भारतातील मद्रास (आताचे चेन्नई) या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर म्हणून कामगिरी बजावली होती. ते त्याकाळातील सर्वांत शक्तिशाली गव्हर्नर म्हणून नावारूपाला आले होते.
जवळपास £1,162 ($1,486) एवढ्या रकमेच्या भेटी दिल्यामुळं त्यांचं नाव विद्यापीठाला देण्याचा सन्मान त्यांना मिळाला होता.
"आजच्या काळातील महागाईशी तुलना करता ही रक्कम £2,06,000 एवढी होते," असं बर्मिंघम युनिव्हर्सिटीतील आधुनिक इतिहासाचे प्राध्यापक आणि इतिहासकार जोसेफ यानिएली यांनी म्हटलं. त्यांनी हिंद महासागरातील गुलामांच्या व्यापाराशी येल यांच्या संबंधांचा अभ्यास केला आहे.
आजच्या काळाचा विचार करता ही फार मोठी रक्कम नाही. पण तरीही त्यावेळी या रकमेतून महाविद्यालयाची एक पूर्ण नवी इमारत तयार करण्यात मदत झाली होती.
एलिहू येल यांचं वर्णन शक्यतो वस्तूंची पारख असलेले संग्राहक तसंच चर्च आणि धर्मदाय संस्थांना सढळ देणगी देणारे दाते असंच केलं जातं.
पण आता त्यांच्याकडं भारताला लुटणारे आणि त्याहूनही वाईट म्हणजे गुलामांचा व्यापार करणारे वसाहतवादी व्यक्तीमत्त्वं म्हणून पाहिलं जात आहे.
त्यांच्या या भूतकाळाच्या संदर्भात तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर विद्यापीठानं ही जाहीर माफी मागितली आहे. येल विद्यापीठातील इतिहासकार डेविड ब्लाइट यांच्या नेतृत्वातील टीमनं यासंदर्भात सविस्तर अभ्यास केला.
"गुलामगिरी संदर्भातील विद्यापीठाचा इतिहास, येलमधील इमारतींच्या बांधकामांमध्ये गुलामांची भूमिका किंवा गुलामांच्या श्रमामुळं नेते समृद्ध झाले आणि त्यांनी येलला भेटवस्तू दिल्या," याबाबत त्यांनी अभ्यास केल्याचं सांगण्यात आलं.
या माफीबरोबर प्राध्यापक ब्राइट यांचं 448 पानांचं 'येल अँड स्लेव्हरी : अ हिस्ट्री - बाय प्रोफेसर ब्लाइट' हे पुस्तकही होतं. त्यात येल यांनी गुलामगिरीच्या माध्यमातून किती नफा कमावला होता, याचीही माहिती देण्यात आलेली होती.
"हिंद महासागरातील गुलामांचा व्यापार हा त्याची व्याप्ती आणि शक्यतांचा विचार करता बऱ्याच अंशी अटलांटिक महासागरातील गुलामांच्या व्यापारासारखाच होता. 19 व्या शतकापर्यंत त्याचा फार विस्तार झालेला नव्हता.
पण भारतीय उपखंडात किनारी प्रदेशाबरोबरच इतर भागांत आणि बेटांवर मानव व्यापार हा फार जुन्या काळापासून होता. तसंच येल हे ईस्ट इंडिया कंपनीसाठी गुलाम बनवण्यात आलेल्या लोकांचे व्यव्हार, निर्णय आणि इतर बाबींवर निगराणी ठेवायचे" असं त्यांनी लिहिलं आहे.
प्राध्यापक यानिएली यांच्या मते, अटलांटिक महासागरातील व्यापारात 400 वर्षांच्या काळात सुमारे 1.2 कोटी गुलामांची विक्री करण्यात आली.
पण हिंद महासागराचं भौगोलिक क्षेत्र अधिक मोठं होतं. तसंच ते दक्षिण पूर्व आशिया आणि आखाती देश आणि आफ्रिकेला जोडणारे होते. त्यामुळं या भागातील गुलाम व्यावापर अधिक मोठ्या प्रमाणावर होता, असं त्यांचं मत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण या भूतकाळाची चौकशी होणंही गरजेचं आहे. न्यू हेवन कनेक्टिकटमध्ये 1701 मध्ये स्थापना झालेलं येल विद्यापीठ अमेरिकेतील तिसरी सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे.
या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रसिद्ध हस्तींबरोबरच अमेरिकेच्या काही माजी राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे.
एलिहू येल यांनी कॉलेजिएट स्कूल ऑफ कनेक्टिकटला 1713 पासून शेकडो पुस्तकं आणि भेटी पाठवल्याच्या नोंदी आहेत.
त्यात धर्मशास्त्र, साहित्य, वैद्यकशास्त्र, इतिहास आणि वास्तुकलेशी संबंधित पुस्तकांचा समावेश होता. तसंच किंग जॉर्ज पहिले यांचे चित्र, उत्तम कापड आणि इतर मौल्यवान वस्तुंचा भेटीत समावेश होता.
त्याची विक्री करून मिळवलेल्या पैशाचा वापर करून एक नवी तीन मजली इमारत तयार करण्यात आली होती. त्या इमारतीला त्यांच्या सन्मानार्थ येल कॉलेज असं नाव देण्यात आलं होतं.
इतिहासकार आणि येल यांच्या कुटुंबातील सदस्य रॉडनी हॉरस येल यांनी 19 व्या शतकामध्ये एलिहू येल यांचं चरित्र लिहिलं आहे. "त्यांनी दिलेल्या देणगीमुळं अनिश्चिततेचं वादळ असलेल्या येल कॉलेजला मोठी मदत झाली," असं त्यांनी लिहिलं आहे.
पण त्यामुळं थेट वंशज नसतानाही येल यांना अमरत्व मिळालं. आयव्ही लीग विद्यापीठानं त्यांच्या नावाला कायमची ओळख दिली.
विद्यापीठानं माफीमध्ये म्हटलं आहे की, "आम्ही विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी, समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि सर्वांचं स्वागत, समावेशकता आणि आदर राहावा यादिशेनं आम्ही काम करू.
"तसंच जवळपास 30% लोकसंख्या कृष्णवर्णीय असलेल्या ठिकाणी सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी प्रयत्न करू,". मात्र हे सर्व सांगत असतानाच त्यांनी विद्यापीठाचं नाव बदलण्याच्या संदर्भात मात्र काही म्हटलेलं नाही. त्यांनी यापूर्वीही अशा मागण्या फेटाळलेल्या आहेत.
कारकून ते गव्हर्नर
एलिहू येल यांचा जन्म एप्रिल 1649 मध्ये बॉस्टनमध्ये झाला होता. तीन वर्षांचे असताना ते कुटुंबाबरोबर इंग्लंडला स्थलांतरीत झाले. 1672 मध्ये एक तरुण म्हणून ते फोर्ट सेंट जॉर्ज या मद्रासमधील श्वेतवर्णीयांच्या वसाहतीमध्ये पोहोचले.
ईस्ट इंडिया कंपनीसाठी ते कारकून म्हणून काम करण्यासाठी आले होते.
रॉडनी हॉरस येल यांच्या मते, कंपनीकडून दिलं जाणारं वेतन हे कमीच नव्हे तर हास्यास्पद होतं. गव्हर्नरला वार्षिक £100 तर प्रशिक्षणार्थींना £5 एवढंच वेतन मिळायचं.
त्यामुळं कर्मचारी व्यापार किंवा इतर मार्गातून पैसा कमावण्यासाठी सर्वकाही करू लागले होते, असं रॉडनी यांच्यासह इतर इतिहासकार सांगतात.
जवळपास 25 वर्षांमध्ये येल यांनी एकानंतर एक पदं मिळवली आणि अखेर त्यांना 1687 मध्ये गव्हर्नर-प्रेसिडेंट पदी नियुक्त करण्यात आलं.
1692 पर्यंत म्हणजे पाच वर्षे ते त्या पदावर होते. त्यांना खासगी बाबींसाठी कंपनीच्या निधीचा वापर करणं आणि अधिकारांचा गैरवापर तसंच कामाकडं दुर्लक्ष या कारणांसाठी 1692 मध्ये पदावरून हटवण्यात आलं होतं.
1699 मध्ये 51 वर्षांचे असताना ते इंग्लडला परतले. त्यावेळी ते प्रचंड धनाढ्य व्यक्ती बनले होते. त्यांनी क्वीन्स स्क्वेअरवर ग्रेट ऑर्मंड स्ट्रीटवर एक आलिशान घर बांधलं.
त्याठिकाणी त्यांनी संग्रह केलेल्या अनेक मौल्यवान कलाकृती आणि पुरातन वस्तू ठेवल्या होत्या.
जुलै 1721 मध्ये जेव्हा त्यांचं निधन झालं त्यावेळी एका ब्रिटिश वृत्तपत्रानं त्यांचं वर्णन, "दानशूरपणासाठी ओळखले जाणारे सज्जन व्यक्ती" असं केलं होतं. पण इतिहासकारांच्या मते, मद्रासमध्ये त्यांच्या काळात त्यांना लालची आणि क्रूर म्हणूनही ओळखलं जात होतं."

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यानंतर पदभार सांभाळलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक आरोपही केले होते. गव्हर्नर असताना भ्रष्टाचार केल्याचे आणि त्यांच्या काउन्सिलमधील सदस्यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आले.
एकदा तर त्यांनी तबेल्यात घोड्यांची देखरेख करणाऱ्याला, परवानगीशिवाय घोड्यावर बसल्याच्या कारणासाठी फासावर लटकवण्याचे आदेश दिले होते, असा आरोपही त्यांच्यावर झाल्याचं रॉडनी हॉरस येल यांनी लिहिलं आहे.
या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांविषयी काही प्रमाणात साशंकता असली तर त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाविषयी दुमत नसल्याचं इतिहासकार सांगतात.
"मद्रासमध्ये सत्तेत असताना त्यांच्या भोवताली अहंकार, क्रौर्य, वासना आणि लालचीपणा असं वातावरण होतं. हे त्यासाठी कारणीभूत असल्याचा सर्वांत प्रभावी युक्तिवाद त्यांच्याकडं होता," असंही त्यांनी लिहिलं आहे.
पण रॉडनी हॉरस येल यांनी त्यांच्या पूर्वजांच्या गुलामगिरीच्या व्यापारातील भूमिकेकडं मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं. इतरही अनेक चरित्र लेखक आणि अलिकडच्या काळातील इतिहासकारांनी तसंच केलं आहे.
प्राध्यापक यानिएली यांनी वसाहतींच्या काळातील पुरावे शोधून पाहिले आहेत. त्यावरून "तिथं सर्वकाही श्वेत आणि कृष्णवर्णीय मुद्याशी संबंधित होतं. तसंच एलिहू येल सक्रिय आणि यशस्वी गुलाम व्यापारी होते, हे नाकारता येणार नाही," असं ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
येल यांनी यातून किती पैसा कमावला याचा अंदाज मात्र प्राध्यापक यानिएली यांनी लावला नाही. कारण तो पैसा येत-जात होता.
तसंच ते हीरे, कपडे याचाही व्यापार करायचे त्यामुळं प्रत्येक व्यापारातून नेमकी किती कमाई केली याचा हिशेब लावणं शक्य नसल्याचं ते सांगतात. पण त्यांच्या नशिबात याचा मोठा वाटा होता, असं मात्र ते म्हणतात.
"माझ्या मते पैसे कमावण्याची त्यांची प्रचंड क्षमता होती. हिंद महासागरात गुलामांच्या व्यापाराची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर होती. 1680 च्या दशकात प्रचंड दुष्काळामुळं दक्षिण भारतात हाहाकार माजला. त्यामुळं मजुरांना काम मिळत नसल्यानं येल आणि कंपनीतील इतर अधिकाऱ्यांनी या परिस्थितीचा फायदा उचलला.
"ते शेकडो गुलामांची खरेदी करायचे आणि त्यांना सेंट हेलेना येथील इंग्लिश वसाहतीमध्ये गुलाम म्हणून पाठवायचे," असं ते म्हणाले.
"येल एका बैठकीत सहभागी झाले होते. त्या बैठकीत प्रत्येक जहाजातून युरोपात किमान 10 गुलाम पाठवण्यास सांगण्यात आलं होतं.
"1687 मध्ये अवघ्या एका महिन्यात फोर्ट सेंट जॉर्जमधून जवळपास 665 गुलाम पाठवण्यात आले होते. मद्रासचे गव्हर्नर प्रेसिडेंट असल्यानं येल यांनी प्रत्येक जहाजासोबत 10 गुलाम पाठवण्याचा नियम लागू केला होता," असंही ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक यानिएली हे येल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी एलिहू येल यांचा गुलामगिरीशी असलेल्या संबंधित साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली होती.
त्यावेळी त्यांना एक फोटो सापडला त्यात गव्हर्नर गळ्यात पट्टा असलेल्या एका गुलामाबरोबर उभे होते.
हे प्रसिद्ध पेंटिंग येल यांचा गुलामगिरीशी संबंध जोडण्याचा मोठा पुरावा असल्याचं ते सांगतात.
1719 आणि 1721 च्या दरम्यानच्या काळातील हया पेंटिंगमध्ये येल यांच्याबरोबर तीन इतर श्वेत लोक आहेत. नोकर म्हणून ओळखला जाणारा पेज त्यांची सेवा करताना त्यात दिसत आहे. पण या प्रकरणात पेज हा शब्द गुलामासाठी वापरला आहे.
"त्यावेळी इंग्लंडमध्ये सगळीकडं गुलामगिरी पद्धत होती. त्यामुळं तो त्यांचा गुलाम होता की त्यांच्या कुटुंबाचा हे अद्याप स्पष्ट नाही.
पण त्या पेंटिंगमध्ये सर्वांची सेवा करत असलेला तो मुलगा असणं यावरून दैनंदिन जीवनात गुलामगिरीचा समावेश होता, हे त्यावरून स्पष्ट होतं."
प्राध्यापक यानिएली यांच्या मते आधीच्या काळात ऐतिहासिक साहित्य सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळं आधीच्या चरित्र लेखकांनी येल यांच्या गुलामगिरीशी सबंधाचा उल्लेख केलेला नसावा.

फोटो स्रोत, Getty Images
पण आता ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्व बैठकांचा तपशील डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे. तरीही अलिकडच्या काही इतिहासकारांनी याकडं दुर्लक्ष केलं याची दोन कारणं असू शकतात.
एक तर त्यांना कदाचित हे पाहायचंच नसेल किंवा त्यांना प्री ब्लॅक लाईव्हज मॅटर काळात ते महत्त्वाचं वाटलं नसेल, असंही ते म्हणाले.
येल गुलामीचं निर्मूलन करण्याच्या मताचे होते आणि त्यांनी गव्हर्नर असताना मद्रासमधून गुलामगिरी बंद करण्याचा आदेश दिला होता, हा दावाही प्राध्यापक यानिएली यांनी फेटाळला आहे.
"त्यांनी गुलामगिरी निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला असं म्हणणं म्हणजे, प्रत्यक्षात त्यांची प्रतिमा अधिक चमकावण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही जर जुने दस्तऐवज पाहिले तर भारतातील मुघल शासकानं ईस्ट इंडिया कंपनीला गुलामगिरी बंद करण्यास सांगितलं होतं.
पण येल यांनी लवकरच पुन्हा ती सुरू केली. त्यांनी एका वर्षानेच गुलामांना मडगास्कारहून इंडोनेशियाला पाठवण्याचे आदेश दिले.
"गुलामगिरी आणि साम्राज्यवादाला 15 व्या शतकात विरोध सुरू झाला होता. त्यात निर्मूलनवाद्यांचा समावेश होता. पण येल हे त्यांच्यापैकी एक नक्कीच नव्हते."











