'लाखोंचे जीव घेणाऱ्या दुष्काळात माझे आजोबा बंगालचे गव्हर्नर होते, जे घडलं त्याची मला लाज वाटतेय'

- Author, कविता पुरी
- Role, प्रेझेन्टर, थ्री मिलियन पॉडकास्ट
"जे घडलं त्याची मला खूप लाज वाटते," सुझेनाह हर्बर्ट, बंगालच्या दुष्काळाबद्दल बीबीसीशी बोलत होत्या.
ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुझेनाह यांचे आजोबा बंगालचे गव्हर्नर होते. त्यांच्याच काळात 1943 मध्ये बंगालमध्ये तीव्र दुष्काळ पडला, उपासमारी झाली आणि यामध्ये किमान 30 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
सध्या सुझेनाह बंगालच्या दुष्काळात त्यांच्या आजोबांची भूमिका काय होती याबद्दल अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाच्या क्लिष्ट वारशाबद्दल जाणून घेत आहेत.
मी सुझेनाह यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा 1940 मधला एक फोटो त्यांच्या हातात होता. बंगालच्या गव्हर्नरच्या निवासस्थानी नाताळच्या दिवशी काढलेला तो फोटो होता. यामध्ये सर्वजण छान पोशाखात असून काहीजण रांगेत उभे आहेत तर काही बसलेले असून ते कॅमेऱ्याकडे बघताना दिसतात.
समोर भारतातील ब्रिटिश राजवटीतील सर्वांत महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले व्हॉईसरॉस लिनलिथगो आणि सुझेनाह यांचे आजोबा बंगालचे गव्हर्नर सर जॉन हर्बर्ट हे दोन मान्यवर बसलेले दिसतात.
त्यांच्या पायाजवळ पांढरा शर्ट आणि शॉर्ट्स, गुडघ्यापर्यत चढवलेले मोजे आणि चकचकीत बूट घातलेला एक लहान मुलगा बसलेला दिसतोय. तो मुलगा म्हणजेच सुझेनाहचे वडील.

फोटो स्रोत, Susannah Herbert
त्यांनी सुझेनाह यांना भारतात बालपण घालवत असतानाच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. यात फादर ख्रिसमस हत्तीवर बसून आल्याची गोष्टसुद्धा होती.
सुझेनाह यांच्या आजोबांचा 1943 मध्ये मृत्यू झाला होता. मात्र त्यांच्याबद्दल फारच थोडं सांगितलं होतं.
बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळामागं अनेक कारणं होती आणि ती गुंतागुंतीची होती.
जॉन हर्बर्ट हे बंगालमधील ब्रिटिश वसाहतीचे सर्वांत महत्त्वाचे अधिकारी असल्यामुळे ब्रिटिश वसाहतीच्या व्यवस्थेचा ते एक महत्त्वाचा भाग होते. ते बंगालमधून दिल्लीतील त्यांच्या वरिष्ठांना माहिती द्यायचे आणि दिल्लीतून त्यांचे वरिष्ठ लंडनमधील त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली जायची.
इतिहासकार आणि 'हंग्री बेंगॉल' (भुकेला बंगाल) या पुस्तकाचे लेखक डॉ. जनम मुखर्जी सांगतात, "जॉन हर्बर्ट त्यावेळेस बंगाल प्रांताचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे गव्हर्नर होते. त्यामुळेच बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळाशी त्यांचा थेट संबंध होता."
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी राबवलेल्या धोरणांपैकी एक धोरण म्हणजे नकार द्यायचं धोरण. यात हजारो गावांमधून बोटी आणि तांदूळ जप्त करण्यात आला होता किंवा नष्ट करण्यात आला होता.
भात हे बंगालमधील मुख्य अन्न होतं.
जपानी आक्रमणाच्या भीतीनं त्यांनी हे पाऊस उचललं होतं जेणेकरून जपानला भारतावर आक्रमण करत असताना स्थानिक संसाधनं मिळणार नाहीत.
मात्र आधीच ढासळलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी हे वसाहतवादी धोरण विनाशकारी ठरलं. मच्छिमार समुद्रात जाऊ शकत नव्हते, शेतकरी शेतात जाऊ शकत नव्हते, कारागिरांना त्यांचा माल बाजारात आणता येत नव्हता. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तांदळाची वाहतूक करता येत नव्हती.

फोटो स्रोत, Herbert family
महागाई आधीच वाढली होती. कारण, दिल्लीतील ब्रिटिश सरकार आशियाई आघाडीवर युद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा छापत होते. कोलकात्यामध्ये (तेव्हाचं कलकत्ता) असणारे मित्र राष्ट्रांच्या हजारो सैनिकांमुळे आधीच तुटपुंज्या असलेल्या अन्नाधान्याच्या साठ्यावर ताण पडत होता.
बर्मामधून (आजचा म्यानमार) बंगालमध्ये तांदळाची आयात केली होती. मात्र बर्मा जपान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिथून होणारी तांदळाची आयात थांबली होती. नफेखोरीसाठी तांदळाची साठेबाजी होत होती. त्यात बंगालमध्ये भयंकर चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि यात बंगालमधील तांदळाचं बहुतांश पीक उद्ध्वस्त झालं.
युद्ध सुरू असतानाच युद्ध मंत्रिमंडळ आणि ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याकडे अन्नाची आयात करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. मात्र युद्धामुळे त्यांनी या गोष्टीला नकार दिला.
बंगालच्या उपासमारीत किड्या-मुग्यांसारखी लोक मृत्युमुखी पडली. या दुष्काळाच्या इतक्या वर्षांनंतर बंगालच्या तत्कालीन गव्हर्नरची नात असलेल्या सुझेनाह यांना या गोष्टीची लाज का वाटली याचं मला आश्चर्य वाटलं.
त्यांनी हे समजवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, "मी तरुण होते तेव्हा ब्रिटीश साम्राज्याशी संबंध असणं हे खूपच दिपवणारं वाटायचं."
त्या म्हणतात, त्या त्यांच्या आजोबांचे जुने कपडे घ्यायच्या. त्यामध्ये रेशमी स्कार्फ होते आणि त्यावर 'मेड इन ब्रिटिश इंडिया' असं लिहिलेलं होतं.

फोटो स्रोत, Herbert family
"आता मी जेव्हा जेव्हा कपाटात त्या कपड्यांना पाहते तेव्हा मला अस्वस्थ वाटतं आणि वाटतं की मला हे कपडे का घालायचे आहेत? कारण त्या कपड्यांवरील ब्रिटिश इंडिया या अक्षरांमुळे आज ते कपडे घालायला अयोग्य वाटतात," त्या सांगतात.
ब्रिटिश राजवटीतील भारतात गव्हर्नर असलेल्या त्यांच्या आजोबांबद्दल अधिक जाणून घेण्याचा सुझेनाह यांचा निर्धार आहे.
बंगालच्या दुष्काळावर जे काही वाचू शकतील त्या ते वाचतात. वेल्समधील त्यांच्या कुटुंबाच्या घरातील आजी-आजोबांच्या जुन्या दस्तावेजांना त्या धुंडाळतात आणि वाचतात. ही कागदपत्रे एका हवामान नियंत्रित खोलीत ठेवलेली आहेत. एक अभिलेखशास्त्रज्ञ (आर्किविस्ट) महिन्यातून एकदा तिथे भेट देतो.
सुझेनाह यांना त्यांच्या आजोबांबद्दल अधिक माहिती मिळू लागते. त्या म्हणतात, "त्यांनी सुरू केलेल्या आणि राबविलेल्या धोरणांमुळे बंगालच्या दुष्काळाची व्याप्ती आणि परिणामांमध्ये भर पडली यात शंका नाही.
"त्यांच्याकडे कौशल्ये होती, सन्मान होता. ब्रिटिश साम्राज्यातील एका दूरच्या प्रदेशात 6 कोटी लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पदावर त्यांची नियुक्ती व्हायला नको होती. त्यांची नियुक्ती अजिबात व्हायला नको होती."

कुटुंबाच्या जुन्या दस्तावेजांमध्ये त्यांना त्यांची आजी लेडी मेरीनं त्यांच्या आजोबांना 1939 मध्ये लिहिलेलं पत्र सापडलं. त्यांना गव्हर्नर पदाची ऑफर मिळाल्याचं कळाल्यावर त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्या पदाचे फायदे आणि तोटे याबद्दल लिहिलं होतं. त्यांनी त्या पदाची जबाबदारी स्वीकारावी असं आजीला अजिबात वाटत नव्हतं, मात्र तरीदेखील ते जे काही निर्णय घेणार होते तो स्वीकारणार असल्याचं आजीनं लिहिलं होतं.
"आज इतक्या वर्षांनी तुम्ही जेव्हा पत्र वाचता, तेव्हा पत्राचा लेखक आणि वाचक यांना ज्या गोष्टी तेव्हा माहित नव्हत्या त्या तुम्हाला माहिती होतात. जर मला भूतकाळात जाता आलं असतं तर मी एवढंच म्हणाले असते, ते अजिबात करू नका. अजिबात जाऊ नका, भारतात अजिबात जाऊ नका. तिथं जाऊन तुम्ही चांगलं काम करणार नाही."
मागील काही महिने मी सुझेनाह हर्बर्ट यांच्या भूतकाळातील प्रवासाचा मागोवा घेते आहे. त्यांना त्यांच्या आजोबांबद्दल अनेक प्रश्न पडले आहेत.
इतिहासकार जनम मुखर्जी यांना भेटून त्यांनाच प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यास त्या उत्सुक आहेत. मुखर्जींशी त्यांची भेट जून महिन्यात झाली.
जनम मान्य करतात की त्यांची जॉन हर्बर्ट यांच्या नातीशी प्रत्यक्ष भेट होईल याचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता.
सुझेनाह यांना जाणून घ्यायचं आहे की त्यांचे आजोबा एक प्रांतीय खासदार आणि सरकारी व्हिप असताना त्यांची प्रांताच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती का करण्यात आली. तसं पाहता दिल्लीत काही काळ एक तरुण अधिकारी म्हणून घालवण्यापलीकडे त्यांना भारतातील राजकारणाचा कोणताही अनुभव नव्हता.
"या प्रकारच्या नियुक्त्या वसाहतवादाचा एक भाग आहे आणि वर्चस्वाच्या कल्पनेतूनच त्याचा उगम होतो," असं जनम सांगतात.
ते पुढे सांगतात, "काही खासदार ज्यांना वसाहतींचा कोणताही अनुभव नाही, ज्यांना तिथल्या भाषा येत नाहीत, ज्यांनी ब्रिटनच्या बाहेरील राजकीय व्यवस्थेत कधीही काम केलेलं नाही, ते अचानक असं जाऊ शकतात आणि कोलकातामधील गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारू शकतात. ज्या लोकांविषयी त्यांना अजिबात माहित नाही अशा लोकांविषयी ते निर्णय घेऊ शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
बंगालमधील त्यावेळच्या निवडून गेलेल्या भारतीय राजकारण्यांमध्ये हर्बर्ट काही लोकप्रिय नव्हते. इतकंच काय दिल्लीतील त्यांच्या वरिष्ठांना त्यांच्या क्षमतेबद्दल शंका होती. यात खुद्द व्हाइसरॉय लिनलिथगो यांचादेखील समावेश होता.
जनम सांगतात, "लिनलिथगो यांनी हर्बर्ट यांचा उल्लेख भारतातील सर्वांत दुबळा गव्हर्नर असं केलं आहे. खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हर्बर्ट यांना पदावरून दूर करायचं होतं. मात्र त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना चिंता होती."
यावर सुझेनाह उत्तर देतात की, "हे ऐकणं त्रासदायक आहे."
त्या दोघांचाही तिथं वैयक्तिक संबंध होता याची मला जाणीव आहे. जनम आणि सुझेनाह या दोघांचे वडील कोलकात्यात होते. ते दोघेही तेव्हा लहान मुलं होती मात्र पूर्णपणे वेगवेगळं आयुष्य जगत होती. आता त्यांचं निधन झालेलं आहे. सुझेनाहकडे किमान वडिलांचे फोटो आहेत.
जनमकडे मात्र वडिलांच्या बालपणीचे फोटो नाहीत. त्यामुळं मला जे कळलं ते त्यांच्या दु:स्वप्नांमधून आणि त्यांनी सांगितलेल्या काही कथांमधून. वसाहतींच्या युद्धक्षेत्रात त्यांनी बालपणी घेतलेल्या अनुभवांच्या कथा.
"माझ्या वडिलांच्या खूपच उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याबद्दल मी विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा वंशज म्हणून माझ्यावर त्याचा किती प्रभाव पडतो ही बाब मला जाणवते."
मग ते असं काहीतरी सांगतात जे मला अपेक्षित नव्हतं.
"माझ्या आजोबांनी ब्रिटिशांच्या पोलीस दलासाठी सुद्धा काम केलं होतं. माझे आजोबा देखील ब्रिटिश व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारे सहभागी झालेले होते. त्यामुळे हे सर्व जाणून घेण्याच्या आमच्या प्रेरणांमध्ये काही रंजक साम्यस्थळं आहेत."
बंगालच्या त्या दुष्काळात किमान तीस लाख लोकं मृत्यूमुखी पडली होती. जगात त्याचं कुठंही स्मारक नाही किंवा त्यांच्याबद्दल सांगणारा साधा फलक देखील नाही.
सुझेनाहच्या आजोबांचं किमान स्मारक तरी आहे.
"ज्या चर्चमध्ये प्रार्थना करायला जायचो तिथं त्यांचा सन्मान करणारा एक फलक आहे," असं सुझेनाह सांगतात. त्यांच्या आजोबांचे अवशेष कोलकात्यात किंवा इतरत्र कुठे आहे, याबद्दल त्यांना निश्चित माहित नाही.
आपल्या आजोबांचं अपयश मान्य करत असतानासुद्धा सुझेनाह त्यांचं वर्णन करताना 'सन्मान' हा शब्द वापरतात.
"आपल्याला आधी सांगण्यात आला होता त्यापेक्षा इतिहास हा कितीतरी अधिक गुंतागुंतीचा आहे हे स्वीकारणं मला तसं सोपं गेलं. मात्र अजूनही कोणत्याही प्रकारे जॉन हर्बर्ट यांची अनादरानं कल्पना करणं माझ्यासाठी अवघड बाब आहे."
जनम यांचा दृष्टीकोन मात्र वेगळा आहे. ते म्हणतात, "हेतूंबद्दलच्या या प्रश्नांमध्ये मला अनेक प्रकारे रस नव्हता. इतिहासात काय घडलं याबद्दल मला अधिक रस आहे. कारण मला वाटतं जे घडलं त्या घटना हेतूच्या आड नेहमीच दडवल्या जातात."

ऐंशी वर्षानंतरदेखील हे सर्व गुंतागुंतीचं आणि अस्पष्ट आहे. मला आश्चर्य वाटतं की कित्येक महिन्यांच्या संशोधनानंतर सुझेनाह यांना अजूनही लाजिरवाणं वाटतं का?
त्या मला सांगतात की, त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. मला लाजिरवाणं हा शब्द निव्वळ माझ्या भावनांभोवती केंद्रीत झालेला आहे. हे फक्त माझ्याबद्दल आणि मला काय वाटतं याविषयी नाही.
"आम्ही इथपर्यत कसं पोहोचलो हे समजून घेणं आणि व्यक्त करणं ही एक व्यापक गोष्ट आहे. आम्ही म्हणजे ब्रिटन हा देश," असंही त्या सांगतात.
जनम सहमत होतात की, एका बिटिश अधिकाऱ्याचा वंशज म्हणून पुढील पिढ्यांसाठी ती लाजिरवाणी बाब आहे, असं मला वाटत नाही. मला वाटतं की ब्रिटनसाठी ते लाजिरवाणं आहे.
ते म्हणतात, "बंगालमध्ये लोक उपासमारीनं मेले. मला वाटतं वैयक्तिक पातळीवर आणि त्याचबरोबर सामूहिक पातळीवर ही ऐतिहासिक चिंतनाची बाब आहे."
सुझेनाह त्यांच्या वारशाचं चिंतन करत आहेत. त्यांचे निष्कर्ष त्यांना त्यांच्या कुटुंबाला सांगायचे आहेत. त्यांचं कुटुंब या निष्कर्षाचा स्वीकार कशा पद्धतीनं करेल हे त्यांना माहित नाही.
वेल्समधील त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या ढिगभर दस्तावेजांवर काम करण्यासाठी त्यांची मुलं कदाचित त्यांना मदत करतील अशी आशा सुझेनाह यांना आहे.
या युद्धाशी संबंधित आणि वसाहतवादाच्या अवघड इतिहासाचं काय करायचं यावर ब्रिटन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असताना सुझेनाह यांची मुलंदेखील एका क्लिष्ट वैयक्तिक वारशाचा भाग आहेत.











