MPSC परीक्षा प्रक्रिया रखडली; परीक्षार्थी ताटकळत, अनेकांचं भविष्य अधांतरी

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना तयारी आणि नियोजनासाठी वेळ मिळावा यासाठी वर्षभर आधी एमपीएससी जाहीर केलेलं संभाव्य वेळापत्रक कागदावरच राहिल्याचं चित्र दिसत आहे.

वर्ष संपत आलं तरी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून घेतल्या जाणं अपेक्षित असलेल्या 16 पैकी 11 परीक्षांची प्रक्रिया प्रलंबित असल्याचं चित्र सध्या दिसतं आहे. यापैकी काही परीक्षा आता पुढच्या वर्षी होणार आहेत तर काहींचा निकाल येणं बाकी आहे.

यावर्षीचं वेळापत्रक कोलमडल्याने आता 2025 मध्ये देखील परीक्षा उशिरानेच होतील अशी परिस्थिती आहे. युपीएससी प्रमाणे एमपीएससी वेळापत्रकाचं पालन का करत नाही असा सवाल आता परीक्षार्थी विचारत आहे.

काय घडलं?

एमपीएससीमार्फत घेतली जाणारी कोणती परीक्षा नेमकी कधी घेतली जाणार आहे यासाठी एमपीएससी कडून वेळापत्रक जाहीर करण्यात येतं.

2024 साठी जे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं त्यामध्ये एकूण 16 परीक्षांची यादी आणि त्या कधी होणार याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.

डिसेंबर महिना जवळ आला तरी यापैकी काही परीक्षा होऊ शकल्या नाहीत तर इतर काही परीक्षांचे निकाल जाहीर होणं बाकी आहे, तर काही परीक्षांचे अभ्यासक्रम देखील जाहीर करण्यात आले नाहीत. आता आयोगामार्फत 2025 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

सद्यस्थितीनुसार आयोगामार्फत 2024 मध्ये ज्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित होतं त्यापैकी एकूण 11 परीक्षांची प्रक्रिया अजूनही बाकी असल्याचं आत्ता दिसत आहे. वेळापत्रक पाळलं जात नसल्यामुळे परिक्षांच्या अभ्यासाचं नियोजन करण्यात गोंधळ होत असल्याचा दावा परीक्षार्थी करत आहेत.

कोणत्या परीक्षांची प्रक्रिया रखडली?

  • यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा: मागणीपत्र नाही
  • महाराष्ट्र वनसेवा परीक्षा: मागणीपत्र नाही
  • महाराष्ट्र गट-ब
  • (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : पूर्व परीक्षा प्रलंबित

रखडलेल्या परीक्षा

  • महाराष्ट्र नागरी सेवा
  • राजपत्रित परीक्षा 2024 : पूर्व परीक्षा 1 डिसेंबर
  • महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 : पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025
  • महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा
  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 : मुख्य परीक्षा 21 जून 2025
  • न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024 : जाहिरात प्रलंबित

2025 साठी काय वेळापत्रक?

आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार आता 2025 मध्ये 8 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जानेवारी पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 पर्यंत यातील काही परीक्षांचे निकाल लागणं अपेक्षित आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार-

1. महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-2024 ची यंयुक्त पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025 ला पार पडणार आहे. तर मुख्य परीक्षा 1 जून 2025 ला होणार आहे. त्याचा निकाल अंदाजे सप्टेंबर 2025 मध्ये लागेल.

2. महाराष्ट्र राज्य गट क सेवा संयुक्त परीक्षा 2024 याची पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. तर मुख्य परीक्षा अंदाज 29 जून 2025 ला आणि निकाल ऑक्टोबर 2025 रोजी लागणार आहे.

3. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2024 याची पूर्वपरीक्षा 16 मार्च 2025 ला पार पडेल. तर मुख्य परीक्षा 13 सप्टेंबर 2025 रोजी होऊन त्याचा निकाल जानेवारी 2026 ला लागणे अपेक्षीत आहे.

4. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2024 याची पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे तर मुख्य परीक्षा 26 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान पार पडेल. याचा निकाल ऑक्टोबर 2025 मध्ये लागणे अपेक्षित आहे.

तर यापैकी वनसेवा मुख्य परीक्षा 10 मे ते 15 मे 2025 दरम्यान, स्थापत्य अभियांत्रीकी परीक्षा 18 मे 2025 रोजी, कृषी सेवा 2024 18 मे रोजी पार पडणार आहे. याचा निकाल ऑक्टोबर 2025 मध्ये येणे अपेक्षित आहे.

5. महाराष्ट्र राज्य नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2025 याची पूर्व परीक्षा 28 स्टेंबर 2025 ला पार पडणार आहे तर निकाल राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025, राज्य यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025, विद्युत अभियांत्रिकी 2025, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025, कृषी सेवा मुख्य परीक्षा 2025, अन्न व औषध प्रशासकीय मुख्य परीक्षा, निरिक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मख्य परीक्षा, या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

6. तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2025 12 ऑक्टोबर 2025 मध्ये पार पडणार असून त्याचा निकाल जानेवारी 2026 मध्ये जाहीर होईल. तर मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

7. महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा 2025 याची पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2025 मध्ये तर निकाल फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर होणार आहे. मुख्य परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

8. महाराष्ट्र राज्य गट क सेवा संयुक्त परीक्षा 2025 ची पूर्व परीक्षा 30 नोव्हेंबर 2025 ला होणार असून निकाल मार्च 2026 ला जाहीर होणार आहे. तर मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार आहे.

थोडक्यात 2024 मधल्या परीक्षा या 2025 मध्ये पार पडणार आहेत, तर 2025 ची भरती प्रक्रिया उशीराने सुरु होईल.

परीक्षार्थींची भूमिका काय?

याविषयी बीबीसी मराठीने परीक्षार्थींशी संवाद साधला. याविषयी बोलताना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा महेश घरबुडे म्हणाला, एमपीएससी मार्फत घेण्यात येणआऱ्या 2025 च्या राजपत्रित व अराजपत्रित पूर्व परीक्षआ गट क, ब परीक्षांचं नियोजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं.

"2024 च्या परीक्षांना विलंब झाल्यामुळे 2025 च्या परीक्षा उशिराने होत आहेत. आता मुख्य परीक्षेच्या वेळी पूर्व परीक्षा होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पूर्ण नियोजन कोलमडले आहे. यापूर्वी परीक्षेच्या ज्या तारखा जाहीर झाल्या होत्या त्यात गोंधळ होते. काही विभागांचा समावेश नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ आली. त्यानंतर आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या. पण आता परीक्षांचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले आहे.

"आयोगाने आधीच नियोजन नीट केले असते तर ही वेळ आली नसती. विद्यार्थी हौस म्हणून आंदोलन करत नाहीत," महेश सांगतो.

गेली काही वर्ष तयारी करत असलेला आदित्य वगरे म्हणाला, “2021-22 मध्ये ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा होणे अपेक्षित होते. पण त्याची जाहिरातदेखील आत्तापर्यंत प्रसिद्ध करण्यात आली नाही. युपीएससी तर्फे ज्या पद्धतीने वेळापत्रकाचे पालन होते तसे एमपीएससी का करू शकत नाही हा प्रश्न आहे. यामुळे आम्हांला शारीरिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांचं वय वाढतंय ही मोठी समस्या आहे.”

तर गेली 4-5 वर्ष या प्रक्रियेत असलेला स्वप्निल भांडारे म्हणाला, “राज्य शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आयोगाच्या सदस्यांकडून जर नीट काम होत नसेल तर त्यात बदल करावा. यासाठी आता लोकांनी मॅण्डेट दिला आहे. त्यामुळे आता सरकारने वेळप्रसंगी सदस्य बदलून आमच्या परीक्षा नीट होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची शासनाला विनंती आहे.”

याबद्दल आम्ही आयोगाच्या सदस्यांशी संपर्क साधला मात्र अद्याप त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.