'MPSCची 7 वर्षं तयारी करुन अधिकारी झालो, पण अजून वॉचमनचं काम करावं लागतंय'

    • Author, प्राजक्ता धुळप आणि नितीन नगरकर
    • Role, बीबीसी मराठी

साताऱ्याच्या अजय ढाणे यांनी एमआयडीसीत रात्रपाळीची नोकरी करत महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची तयारी केली. सात वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं.

उप-शिक्षणाधिकारी म्हणून पदही जाहीर झालं. पण अजूनही नियुक्ती न झाल्याने त्यांना सुरक्षा रक्षकाचीच नोकरी करावी लागत आहे.

आयोगाने 2022 साली 623 पदांची भरती जाहीर केली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, गटविकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, प्रकल्प अधिकारी, तहसीलदार अशा 23 संवर्गातील पदं भरली जाणार होती.

त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली देखील, 2023 मध्ये मुख्य परीक्षाही पार पडली. त्यानंतर मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर झाली.

पण सहा महिने उलटून गेले तरी निवड यादीनुसार अंतिम यादी, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.

MPSCच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे अजय ढाणे यांच्यासारखे 600हून अधिक तरुण हवालदिल झाले आहेत.

अजय सांगतात, “आता तर कधी असंही वाटतं की या नियुक्त्या सरकार रद्द तर करणार नाही ना! रात्री दचकून जाग येते, वाटत राहातं की परीक्षेची प्रक्रिया पहिल्यापासून तर सुरू होणार नाही!”

इंजिनिअरिंगची नोकरी सोडली

अजय यांचं वय आज 29 वर्षं आहे. त्यांनी सांगलीच्या अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर 7 हजार रुपये पगार आणि नोकरीच्या कमी संधी यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्र सोडल्याचं, अजय सांगतात.

अजय यांच्या वडिलांनी 25 वर्षं वॉचमनची नोकरी केली. कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी, घराची आर्थिक जबाबदारी अजय यांच्यावर आहे. चार तुकड्यात विभागलेल्या एक एकर शेतीत त्यांचं कुटुंब घरापुरतं पीक घेतं. घरात असलेली जेमतेम परिस्थिती बदलण्यासाठी अजय यांचा MPSC कडे ओढा होता.

2017 साली MPSC परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.

“माझे वडील हाताने अपंग आहेत. वृद्धापकाळात त्यांनी नोकरी सोडली. घरखर्च चालवण्यासाठी मला अशा जॉबची गरज होती की जेणेकरुन माझे दोन्ही हेतू साध्य होतील. मला दिवसभर अभ्यास करता येईल आणि सुरक्षा रक्षकाचा जॉब संध्याकाळचा असल्यामुळे मला अडचणी येणार नाहीत.” MPSC पास होऊन कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देता येईल, या उद्देशाने अजय यांनी मेहनत घेतली.

MPSC संदर्भातील इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

“एमआयडीसीला मंगळवारी सुट्टी असल्याने, आठवड्यातून एकदाच मला दिवसभर सिक्युरिटी गार्डचं काम करावं लागायचं, एरव्ही सकाळी आठ ते रात्री आठ अशी रात्रपाळी करायचो. त्यामुळे उरलेला दिवस अभ्यासासाठी मोकळा असायचा. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सातारमधील एका स्टडी रुमला जायचो. संध्याकाळी साडेसहा वाजता घरी यायचो. पुन्हा आठच्या ड्युटीला कंपनीत हजर व्हायचो.”

पुण्यात उमेदवारांचं आंदोलन

कामावर रुजू करुन घेण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी करण्यासाठी अजय यांच्यासारख्या MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी 2 ऑक्टोबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.

आयोगातर्फे अंतिम निकाल आणि नियुक्तीसंदर्भात कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत, त्यामुळे उमेदवारांना आर्थिक तसंच सामाजिक विवंचनेला सामोरं जावं लागतंय, असं त्यांचं म्हणणं होतं.

“आम्ही आयोगाला आतापर्यंत अनेकदा विनवण्या केल्या आहेत. खासदार-आमदारांना पत्रं दिली आहेत. अखेर आम्ही आंदोलनाला रस्त्यावर बसलो”

येणाऱ्या काळात खरंतर आम्ही लोकांच्या आंदोलनाचे प्रश्न हाताळणार आहोत.

आम्ही प्रतीक्षेत असलेले सगळे उमेदवार अधिकारी उन्हात आंदोलनासाठी बसलो, हा आमचा नाईलाज होता. भावी अधिकारी असूनही आम्हाला मागण्या रस्त्यावर बसून मांडाव्या लागत आहेत.” अजय सांगतात.

‘ऐन उमेदीची वर्षं वाया’

“मला कधी-कधी वाटतं की आम्ही असा काय गुन्हा केला आहे?, इतक्या खस्ता खाऊन आम्ही पोस्ट मिळवल्या आहेत. पण आहे त्याच परिस्थितीत आम्ही आहोत”, अशी वेळ कोणावरच येऊ देऊ नका अशी विनवणी ते आयोगाकडे करतात.

आज रोज रात्री आठच्या ड्युटीला अजय हजर होतात. पूर्वीचा एकांत आणि आताचा एकांत वेगळा असल्याचं ते सांगतात. “अभ्यास सुरू होता तेव्हा ही रात्रीची वेळ, एकांत मला आधार असल्यासारखी वाटायची. त्यात उद्याची उमेद असायची. पण आता जी रात्री मी अनुभवतो आहे ती भयाण वाटते. हा एकांत मला टोचतो. रिकामेपण घेऊन येतो. मला माहित आहे की अशा वेळी नैराश्य येऊ शकतं. पण मी अजूनही आशावादी आहे.”

पदात रुजू होणं, प्रशिक्षण, अंतिम नियुक्ती यासाठी लागणारा कालावधी मोठा असल्याने या तरुणांपुढे अनेक प्रश्न अधांतरित आहेत.

सरकार म्हणतं की तरुण आणि नव्या उमेदीचे अधिकारी प्रशासनात हवेत, पण या दिरंगाईमुळे आमची ऐन उमेदीची वर्षंच वाया गेली, असं अजय सांगतात.

नियुक्त्या रखडल्याने वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचं ते सांगतात. “आधी इंजिनिअरिंगचं शिक्षण, मग MPSCची तयारी, नंतर नोकरीची वाट पाहणं, यामुळे माझ्यासारख्या तरुणांसमोरुन वर्षं निघून चालली आहेत. तारुण्य हिरावून गेलंय. पुढल्या वर्षी माझी तिशी उलटलेली असेल. पण मी अजून माझ्या लग्नाचा विचारही करू शकत नाही.”

घराचा आर्थिक भार पेलण्यासाठी सध्या अजय सरकारी कार्यालयात क्लेरिकल कामही करत आहेत. पण ते पुरेसं नसल्याचं ते सांगतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियुक्त्या आणि प्रक्रियेच्या विलंबाविषयी कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.