स्पर्धा परीक्षांचं जाळं, सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढे आणि पुण्यातलं फ्लेक्सचं राजकारण

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, पुणे

स्थळ – पुणे, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधीचे हे संवाद.

MPSC ची तयारी करणारा अरविंद म्हणतो, “इथे भरती होत नाही, अजूनही इथे कौमार्य चाचणीसारख्या गोष्टी हद्दपार होत नाहीत, याकडे दुर्लक्ष करून तुम्ही कशासाठी फ्लेक्स लावताय?”

फार्मसीचं शिक्षण घेतलेला आदित्य वगरे म्हणतो, “सगळे पक्ष जाहीरनाम्यांमध्ये मराठीत इतकं चपखल लिहीतील की त्याला तोडच नाही. पण या सगळ्या भूलथापा असतात. पण त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. बॅनर लावणं कमी करा आणि गोष्टींची अंमलबजावणी करा.”

‘कामाचं बोला’ या बीबीसी मराठीच्या मालिकेसाठी मी पुण्यात पोहोचलो होतो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील तरुण मतदार कोणत्या गोष्टींवर लक्ष देतील? त्यांचं प्राधान्य, त्यांच्या अपेक्षा काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी मी चार जिल्ह्यांमध्ये प्रवास केला. तरुण वर्गासाठी कामाच्या गोष्टी कोणत्या आणि बिनकामाच्या कुठल्या हे जाणून घेतलं. त्याचा हा पहिला भाग.

पुणे शहरात आल्यापासून ठिकठिकाणी राजकारण्यांचे, रिअल इस्टेटचे आणि इतर अनेक फ्लेक्स दिसत होते.

फ्लेक्स म्हणजे एक शोकेस असते. ती तुम्हाला चकचकीत गोष्टी दाखवते. पण त्यामागे गेलात तर दिसतात आधारासाठी लावलेले बांबू, सळया आणि प्रसंगी पायथ्याशी बांधलेले दगड. निवडणूक जाहीरनामे म्हणजे जणू भविष्याचा फ्लेक्स असतात. पण तो प्रत्यक्षात उभा करण्यासाठी जे दगड, विटा आणि खांब लागतील त्याचं काय?

अरविंद, आदित्यसारखे अनेक तरुण या फ्लेक्समागच्या सपोर्ट सिस्टिमबद्दलचे प्रश्न विचारत होते. राज्य आणि देश मोठा व्हावा असं सगळ्यांनाच वाटत होतं, पण त्यातल्या तरुणांसाठी पुढे काय वाढून ठेवलंय याबद्दल त्यांना अनेक प्रश्न होते.

स्थलांतरितांचं केंद्र - पुणे

अनेक वर्षांपूर्वी मी माझं गाव सोडून पुण्यात शिक्षणासाठी आलो, ती प्रक्रिया आजही सुरू आहे, किंबहुना वाढलीय हे प्रकर्षाने जाणवलं. पुणे हे महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी केंद्र बनलंय. इथे येणाऱ्यांची आर्थिक स्थिती वेगवेगळ्या प्रकारची असते.

कुणाच्या घरचे इथला खर्च उचलू शकतात, कुणी पोटाला चिमटा काढून हा खर्च पेलतात. इथे येऊन एकदा अभ्यास सुरू केला की मग त्याच्या जोरावर जमतील तितक्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या हा अनेकांचा शिरस्ता.

पुण्याच्या पेठांमध्ये लहान लहान खोल्यांमध्ये पेइंग गेस्ट म्हणून हे विद्यार्थी राहतात. दिवसातले अनेक तास इथल्या जवळपासच्या अभ्यासिकांमध्ये घालवतात. इतर फ्लेक्सप्रमाणे या अभ्यासिकांचे फ्लेक्सही इथे बारमाहा झळकत असतात.

साध्या लाकडी टेबल – खुर्चीपासून ते आरामदायक खुर्ची, एसी आणि पुस्तकं ठेवायला जागा अशा अनेक प्रकारच्या सुविधा देणाऱ्या अभ्यासिका पुण्यात आहेत. तुमच्या गरजेप्रमाणे आणि पैसे भरण्याच्या ऐपतीप्रमाणे निवड करता येते. गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवणारेही इथे आहेत आणि त्या अभ्यासिकांचं भांडवल करणारेही.

पण हे स्पर्धा परीक्षांचं आकर्षण का? मास्टर्स किंवा दोन बॅचलर डिग्री असणारे तरुण वर्षानुवर्षं स्पर्धा परीक्षांचे खेटे का घालत असतात? सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला तो अरविंद वालेकर गणितात B. Sc आणि त्यानंतर B. Ed शिकलेला आहे. पण शिक्षकाची नोकरी शोधताना अनेकदा पैशाची मागणी होत असल्याचे आरोप तो करतो.

IT हब पुणे ते सुशिक्षित बेरोजगारांचं शहर

एक काळ होता जेव्हा खासगी नोकऱ्यांसाठी पुणे ही पंढरी होती. इथल्या IT क्षेत्राने देशभरातून टॅलेंट खेचून आणलं होतं. इंजिनिअरिंग आणि IT च्या शिक्षणासाठी तरुण पुण्यात येत होते. इथेच त्यांना नोकऱ्याही मिळत होत्या. भरपूर पगार आणि त्याबरोबर येणारी जीवनशैली यामुळे पुण्याचं जॉब मार्केट आणि रिअल इस्टेट मार्केट दोन्ही बदलत गेलं.

पुण्यात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज सोसायटी आणि टाऊनशिप उभ्या राहिल्या. पण आज हे IT क्षेत्र कुठे आहे?

दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी पुण्याच्या रोजगार क्षेत्राचा पट उलगडून सांगितला. ते म्हणाले, “1990 ते 2015 मध्ये IT आणि ऑटोमोबाईल या दोन क्षेत्रांनी पुण्यात आणि आसपासच्या भागात जम बसवला. पण त्यानंतर आणि विशेषतः कोव्हिडनंतरच्या काळात हा वेग मंदावत गेलाय. आपण गुंतवणुकीचे आकडे सांगतो किंवा बेरोजगारांचे कमी झालेले आकडे सांगतो. गल्लीबोळात सुशिक्षित बेरोजगार दिसतायत त्यांचं काय?"

"मग ती मुलं स्पर्धा परीक्षांसारख्या ठिकाणी दिसतात किंवा लहानमोठ्या दुकानात काम करताना दिसतात, हा असंघटित क्षेत्रातला रोजगार त्यांच्या हातात आहे. आणि ते धोकादायक पातळीवर दिसतं.”

हातात पदवी आहे, पण नोकरी नाही या स्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं फडणीस सांगतात. फडणीस म्हणतात, “कौशल्य आणि शिक्षण याच्यात जी दरी निर्माण झालीय ती घातक ठरतेय. मी शिक्षण घेतो, मग परत कोर्सेस करावे लागणार आहेत. या काळात माझं वय किती वाढतंय याकडे लक्ष नाहीय. मार्केटमध्ये जे जॉब्स आहेत त्यांच्यासाठी काय कौशल्य लागणार आहेत याची माहिती तरुणांकडे नाहीय. गुंतवणुकीचे कितीही मोठे आकडे सरकारने सांगितले तरी जोपर्यंत तरुणांच्या हातात रोजगार नाही, त्या आकड्यांना काही अर्थ नाही.”

शिक्षण आणि कौशल्य असलं तरी त्याला साजेसे रोजगार नसल्याचा अनुभव अनेकांना येतो. पुणे विद्यापीठात M. Sc. करणाऱ्या स्मरणिका शिंदेने नेमकं यावरच बोट ठेवलं. ती म्हणते, “माझे काही मित्र delivery boy म्हणून काम करतात. आपण एवढं शिकून 15 हजार कमवणार आणि ते 30 हजार कमवत असतील तर फरकच पडतो ना.”

महायुती सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वीच्या काही आठवड्यांत भराभर योजना घोषित केल्या. या योजनांबद्दलही हे तरुण भरभरून बोलतात. इंटर्नशिप योजना, अप्रेंटिस योजना किंवा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांबद्दल आकर्षण निश्चित आहे, पण त्याच्या अंमलबजावणीतले अनेकांचे अनुभव कटू आहेत.

पुणे असुरक्षित शहर बनत चाललंय का?

नोकरी–व्यवसायात येऊ पाहणाऱ्या तरुणींचे प्रश्न दुहेरी आहेत. एकीकडे रोजगाराच्या संधी, दुसरीकडे सुरक्षेचा प्रश्न.

पुण्यात शिकणाऱ्या काही तरुणींनी हे बोलून दाखवलं. ‘पूर्वी रात्री दहानंतर बाहेर पडायला काही वाटायचं नाही. पण आता बोपदेवच्या घटनेनंतर साहजिकच भीती आहे,’ हा सूर अनेक मुलींनी लावला.

पुण्यात शिकायला आलेली शृती पाटील सांगते, “कामाच्या ठिकाणी तर सुरक्षित वाटायलाच हवं, पण कामाच्या किंवा इतर निमित्ताने बाहेर पडत असू तर बाहेरही ती सुरक्षितता जाणवायला हवी, ते वातावरण निर्माण व्हायला पाहिजे.”

वैष्णवी गुजर सांगते, “आमच्या ग्राऊंड रिअलिटी ते जाणूनच घेत नाहीत. मुलींचे काय प्रश्न आहेत हे आम्हाला विचारतच नाहीत. उगाच आधी केलेली कामं मोठी करून सांगतात. कामं केलेली असतील तर कळतातच. त्याची जाहिरात करणं मला बिनकामाचं वाटतं.”

स्मार्ट सिटी, कॉस्मोपॉलिटन शहर, कंटेंट क्रिएटर्सचं हब अशी पुण्याची अनेक वैशिष्ट्यं सांगत त्याचा एक मनोहर फ्लेक्स उभा करता येईल. पण इथल्या आणि बाहेरून इथे आलेल्या अनेक तरुणांनी त्या फ्लेक्सच्या मागे डोकावायला भाग पाडलं.

आश्वासनांची खैरात होईल, पण निवडणुकीनंतर ती प्रत्यक्षात उतरतील का? की आत्ताचे फ्लेक्स जाऊन नवीन आश्वासनांचे फक्त फ्लेक्सच उभे राहतील?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)