You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'वाळवी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, दिग्दर्शक परेश मोकाशींनी म्हटलं...
2022 या वर्षासाठीच्या 70 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
'आट्टम' हा मल्याळम सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
'कांतारा' चित्रपटासाठी कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दोन अभिनेत्रींना विभागून देण्यात आला आहे.
तामिळ चित्रपट 'तिरुचित्रम्बलम'साठी नित्या मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धनुष मुख्य अभिनेता होता.
'कच्छ एक्सप्रेस' या गुजराती चित्रपटासाठी मानसी पारखेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटाला मिळाला आहे.
मनोज वाजपेयी आणि शर्मिला टागोर यांच्या 'गुलमोहर' चित्रपटाला 'बेस्ट हिंदी फिल्म ऑफ द ईयर' पुरस्कार मिळाला आहे.
'उंचाई' चित्रपटासाठी निर्देशक सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे.
कार्तिकेय – 2 चित्रपटाला 'बेस्ट तेलुगू फिल्म'चा पुरस्कार मिळाला आहे.
'पोन्नियन सेलवन-1' या चित्रपटाला 'बेस्ट तमिळ फिल्म'चा पुरस्कार मिळाला असून 'केजीएफ चॅप्टर 2' ला 'बेस्ट कन्नड फिल्म ऑफ'चा पुरस्कार मिळाला आहे.
ब्रह्मास्त्र- पार्ट 1 या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार प्रीतम यांना उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पोन्नियन सेलवन- पार्ट 1 या तमिळ चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी ए. आर. रहमान यांना उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे.
अरिजित सिंहला ब्रम्हास्त्र-पार्ट 1 या चित्रपटातील 'केसरिया' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
मराठीमध्ये कोणाला पुरस्कार?
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटाला मिळाला आहे. वाळवी चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय पुस्कारही जाहीर झाला आहे.
वाळवी चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल बोलताना झी स्टुडिओजचे सीबीओ उमेश कृष्ण (कुमार) बन्सल यांनी म्हटलं, "झी स्टुडिओज नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी चौकटीबाहेरचे घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील असते. परेश मोकाशी अत्यंत अभ्यासू आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत, जे प्रेक्षकांच्या आवडी उत्तमरित्या जाणतात. ‘वाळवी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ही सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे. ‘वाळवी’मध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी हा एक सन्मान आहे."
दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी म्हटलं, '' खूप आनंद आहे, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तो आमच्या संपूर्ण टीमचा आहे. मी प्रेक्षकांचाही तितकाच ऋणी आहे.''
'मर्मर्स ऑफ जंगल' या मराठी डॉक्युमेंट्रीला बेस्ट डॉक्युमेंट्रीचा पुरस्कार मिळाला आहे. साहिल वैद्य हे या डॉक्युमेंट्रीचे निर्माते आहेत.
त्याचबरोबर बेस्ट आर्ट्स/ कल्चर फिल्मचा पुरसक्कार मराठी आणि कन्नड अशा दोन भाषांतील पुरस्कारांना एकत्रितपणे मिळाला आहे. कन्नड चित्रपट रंगा विभोगा आणि मराठी चित्रपट वारसा या चित्रपटांना हा पुरस्कार मिळाला.
त्याचबरोबर अनकही एक मोहेन-जो-दारो चित्रपटाला बेस्ट बायोग्राफिकल/हिस्टोरिकल फिल्मचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक राणे आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.