छाया कदम : फँड्रीची 'नानी' ते लापता लेडिजची 'मंजूमाई', कान फेस्टिव्हलमध्ये छाप पाडणाऱ्या मराठी अभिनेत्रीचा प्रवास

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी

"..देखने जाए तो औरतो को मर्दो की कोई खास जरुरत नही है, पर ये बात औरतो को पता चल गई तो मर्द बेचारे का बाजा ना बज जाए..."

हा आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लापता लेडिज' चित्रपटातला 'माई'चं पात्र साकारणाऱ्या छाया कदम यांचा डायलॉग.

या संवादातून त्या महिलांच्या आत्मविश्वासाच्या मुद्द्यावर बोट ठेवत असल्या तरी प्रत्यक्ष जीवनात त्यांनी यावर मात करत अत्यंत यशस्वी कारकीर्दीचा पाया रचला आहे.

उत्तम अभिनेत्री असलेल्या छाया कदम यांच्या 'लापता लेडिज' चित्रपटातील भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांत प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यांनी साकारलेल्या 'माई'ला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पण त्याबरोबरच कान चित्रपट महोत्सवातील त्यांचं पदार्पण आणि त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट'या चित्रपटाला ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आणखी चर्चा सुरू झाली आहे.

दिव्या त्रिपाठी यांच्या दिग्दर्शनातील या चित्रपटाच्या सादरीकरणानंतर उपस्थितांना जवळपास आठ मिनिटं टाळ्यांचा गडगडाट केल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी छाया कदम स्क्रीनवर झळकल्या तेव्हा त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. त्यांनी आजवर केलेल्या कामाला पोचपावती मिळाल्याचं समाधान त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर झळकलं.

एका नाटकापासून सुरू झालेला छाया कदम यांचा अभिनयाचा प्रवास पुढं 'फँड्री'मधील 'नानी'पासून ते आता 'लापता लेडिज'मधल्या 'माई'पर्यंत येऊन पोहोचला आहे. त्या निमित्तानं त्यांच्या प्रवासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुंबईत बालपण

छाया कदम यांचं मूळ गाव कोकणातलं असून त्यांचं संपू्र्ण बालपण हे मुंबईतच गेलं आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. मुंबईच्या कलिना या भागामध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील गिरणी कामगार होते.

लहानपणी एखाद्या टॉमबॉयप्रमाणे असल्यामुळे अत्यंत मजा-मस्ती करत बालपण गेल्याचं छाया कदम यांनी राजश्री मराठीच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

शाळेमधील स्पर्धांमध्ये त्या आवर्जून सहभागी होती. त्यानिमित्तानं कधीतरी डान्स करणं, गाणं, नाटक करणं असा सगळ्यामध्ये छाया सहभाग घेत असायच्या. पण त्यांना कबड्डी खेण्याची विशेष आवड होती.

शाळेमध्ये त्यांनी कबड्डी खेळायला सुरुवात केली आणि त्यात प्रावीण्य मिळवत चांगलं यश प्राप्त केलं. त्यांचा खेळ एवढा चांगला होत गेला की, त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे.

एकवेळ अशी होती की, कबड्डी खेळल्यानं कायम गुडघ्याला जखमा झालेल्या असायच्या असं छाया सांगतात.

पण हे सगळं सुरू असताना त्याकाळी मात्र त्यांचा अभिनयापर्यंत दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. अभिनेत्री होण्याबाबतचा तसा विचारही कधी त्यांनी केला नव्हता, असं त्या म्हणतात.

वडील-भाऊ जाण्याच्या वेदना

छाया कदम यांनी सुरुवातीपासूनच अभिनयाच्या दिशेने प्रयत्न केल होते असं नाही. पण त्यांच्या जीवनात अचानकपणे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर ते घडून आलं.

छाया कदम यांनी 2001 साली एकाच वर्षात वडील आणि भावाच्या रुपानं जीवनातील आधार गमावला. त्यामुळं त्यांना प्रचंड धक्का बसला होता.

वडिलांपाठोपाठ भावाचंही निधन झाल्यामुळं त्यांना जीवनात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. त्यामुळं जीवनात काय करावं असा संभ्रम एकप्रकारे निर्माण झाला होता, असं त्या सांगतात.

पण छाया यांनी त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधूनच पुढे त्यांना मनोरंजन क्षेत्राच्या दिशेला जाणारा मार्ग गवसला.

एका जाहिरातीने सर्व बदलले

घरात निर्माण झालेल्या दुःखाच्या वातावरणातून मन वळवायचं, असं छाया यांनी ठरवलं होतं. पण ते कसं हेच त्यांना कळत नव्हतं. बाहेर पडायचं तर नेमकं काय करावं? असा प्रश्न त्यांना पडलेला होता.

असाच विचार मनात सुरू असताना त्यांना पेपरमध्ये एक जाहिरात दिसली. ती जाहिरात होती ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्या अभिनयाच्या वर्कशॉपची.

ही जाहिरात पाहिल्यानंतर छाया कदम यांनी त्यांचं वर्कशॉप करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संपर्क केला आणि त्या वर्कशॉपसाठी नोंदणी केली.

अभिनयाबाबतच्या या 15 दिवसांच्या वर्कशॉपमुळं त्यांचा मूळ हेतू सिद्ध झाला होता. कारण त्यांचं मन त्यामध्ये रमलं होतं. दुःखावर फुंकर घालण्याचं काम त्यानं केलं होतं. या वर्कशॉपमध्ये त्या बरंच काही शिकल्या.

वर्कशॉप केल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात काहीतरी करायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर प्रयत्न सुरू केले.

'झुलवा'तून अभिनयाची पहिली संधी

पण वर्कशॉप केलं असलं तरी या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी किंवा काम मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं असतं हे त्यांना माहिती नव्हतं. फोटो कुठं काढायचे? ते कुणाकडे द्यायचे? काम कसं मिळवायचं असे एक ना अनेक प्रश्न छाया कदम यांच्यासमोर होते.

या सगळ्यात त्यांची जवळपास सहा वर्ष निघून गेली. म्हणजे छाया कदम यांना अभिनयाचं मोठं किंवा चांगलं असं पहिलं काम मिळालं ते 2006 मध्ये. वामन केंद्रे यांनीच त्यांच्या 'झुलवा' नाटकात छाया यांना चांगली भूमिका दिली होती.

छाया कदम यांनी 15 दिवसांचं वर्कशॉप वगळता दुसरं कुठंही अभिनयाचं तसं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. पण झुलवा नाटकाच्या सरावाच्या निमित्ताने तीन चार महिने त्यांनी केलली तालिम त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली.

नाटकाच्या या तालमीदरम्यान भूमिकेसाठी काय करायचं असतं, यासह अनेक बारकावे त्यांना वामन केंद्रेंकडून शिकायला मिळाले. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला, असं छाया सांगतात.

चित्रपटसृष्टीतील स्ट्रगल

'झुलवा' नाटकातून संधी मिळाली असली तरीही त्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी त्यांना भरपूर स्ट्रगल करावा लागला. चित्रपटात एक सीन करण्यापासून त्यांनी सुरुवात केली. अनेक चित्रपटांत त्यांनी ज्युनियर आर्टिस्टचीही कामं केली, असं त्यांनी सांगितलं.

कामानंच आपल्याला काम मिळतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळं अगदी मिळेल ते छोटंसं कामही त्या करायच्या.

दिसण्यात वेगळेपणा नव्हता त्यामुळं अनेकदा ऑडिशनला गेलं तर असिस्टंट म्हणून काम मिळायची, पण त्याचाही फायदा झाल्याचं त्या म्हणतात. असिस्टंट म्हणून काम करताना ज्या भूमिकेची इच्छा असेल ती भूमिका करणारी अभिनेत्रीच आली नाही, तिच्या जागी भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यामुळं कामातून काम मिळण्याचा त्यांचा विश्वास ठाम झाला, असं त्या म्हणाल्या.

असंच दूरदर्शनवरील 'फाट्याचं पाणी' नावाची मालिका करताना त्यांची अरुण नलावडेंशी ओळख झाली होती. त्या ओळखीतूनच त्यांना अरुण नलावडेंनी 'बाई माणूस' नावाच्या सिनेमात पहिली संधी दिली. पण त्यांचा तो चित्रपट प्रदर्शितच होऊ शकला नाही.

असा मिळाला 'फँड्री'

अशाप्रकारे छाया कदम चित्रपटांमध्ये लहान मोठी कामं करत होत्या. 'मी सिंधूताई सपकाळ', 'आयना का बायना' अशा चित्रपटांत त्यांनी कामं केली. अगदी 'सिंघम रिटर्न'मध्येही त्यांनी एक सीन केला. पण म्हणावी तशी ओळख मिळवून देणारं किंवा समाधानकारक काम तोपर्यंत त्यांना मिळालं नव्हतं.

हे सर्व सुरू असताना त्यांची नागराज मंजुळेंशी भेट झाली. गडकरीच्या बाहेर कट्ट्यावर उभं राहून नागराज मंजुळेंनी त्यांना 'फँड्री' या चित्रपटाचं नरेशन दिलं होतं. या चित्रपटानं त्यांच्या जीवनात पूर्णपणे बदल घडवला.

'फँड्री' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोक 'नानी' म्हणून ओळखू लागले, असं छाया कदम म्हणाल्या. त्यानंतर नागराज मंजुळेच्या सगळ्याच चित्रपटात छाया कदम झळकल्या.

नागराजबाबतही छाया कदम भरभरून बोलतात, "नागराज दिग्दर्शकाएवढाच मोठा माणूसही आहे. त्यामुळे तो माणूस म्हणूनही आपल्याला खूपकाही शिकवतो. त्याच्या चित्रपटांनी मला खूप काही शिकवलं आणि दिलं आहे."

त्यांच्या मते, फँड्री चित्रपटावं मला ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर 'सैराट'नं मास आणि क्लास असं सगळं काही मिळवून दिलं.

'न्यूड'बाबतचा किस्सा

रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला 'न्यूड'चित्रपट हा छाया कदम यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. त्यातील भूमिका अतिशय आव्हानात्मक होती, असं त्या सांगतात.

छाया कदम यांनी कुठेतरी न्यूड चित्रपटाचं पोस्टर पाहिलं होतं. पोस्टर पाहिलं तेव्हाच त्यांना ही भूमिका खूप भावली होती, अशी भूमिका करायची हे त्यांच्या मनात आलं. पण पोस्टरमुळं हा चित्रपट प्रदर्शित झाला असावा असा त्यांचा समज झाला.

पण काही दिवसांनी स्वतः रवी जाधव यांनी छाया कदम यांना फोन केला. त्यांनी छाया कदम यांना या चित्रपटातील भूमिकेबाबत विचारलं. तेव्हा छाया यांनी हा चित्रपट शूट झाला असं वाटल्याचं त्यांना सांगितलं. अशाप्रकारे त्यांना मनापासून इच्छा असलेली ही भूमिका मिळाली होती.

हिंदीमध्ये दिग्गजांबरोबर काम

'सिंघम रिटर्न'मध्ये एक सीन करण्यापासून छाया कदम यांचा हिंदी सिनेसृष्टीतील प्रवास सुरू झाला होता. पण त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांबरोबर काम केलं आहे.

'झुंड' चित्रपटामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केलं. तर अंधाधुंद, अंतिम अशा चित्रपटांतही त्यांनी बड्या स्टार्सबरोबर काम केलं.

'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी संजय लीला भन्साळी आणि आलिया भट यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं आहे. 'अंधाधुंद' चित्रपट पाहिल्यानंतर तब्बूनं त्यांना खास फोन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.

त्यांच्या अभिनयातील वेगळेपणाच्या जोरावरच सध्या चर्चा होत असलेल्या किरण राव यांच्या दिग्दर्शनातील 'लापता लेडिज'मध्ये मंजूमाईंची भूमिका त्यांना मिळाली होती.

कान महोत्सवात पुरस्कार मिळालेल्या 'ऑल वी इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपटाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की,चित्रपटाचं स्क्रिप्ट ऐकलं तेव्हाच त्यांनी दिग्दर्शिका पायल यांना ही भूमिका माझ्याशिवाय कोणी करू शकत नाही असं, सांगितलं होतं. छाया कदम यांनी फिल्म कम्पॅनियनबरोबर बोलताना हे सांगितलं आहे.

हे वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचं असल्याचं छाया म्हणाल्या. आगामी काही दिवसांत त्यांचे विक्रम मेस्सीबरोबरचा 'ब्लॅकआऊट', संजय मिश्रांबरोबर 'अल्केमिस्ट', 'पेडीग्री', 'बारडोली' असे काही चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.