पुण्यातील पुरंदर विमानतळाविरोधातील आंदोलनात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; नेमकं काय घडलं?

पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख
    • Author, प्रविण सिंधू आणि प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

पुण्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा सरकारकडून ड्रोन सर्व्हे होत आहे. मात्र, बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्व्हेला तीव्र विरोध केला आहे. शनिवारी (3 मे) पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्व्हे होत असताना आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला.

"गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस जखमी झाले आणि पोलिसांच्या वाहनांचंही नुकसान झालं," असं पोलिसांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, गावकऱ्यांनी आधी पोलिसांनी लाठीचार्ज करत मारहाण केल्याचा आरोप केला.

या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलं, गावातील आंदोलक शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? पोलीस प्रशासनानं नेमकं काय म्हटलं आहे? पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काय भूमिका घेतली आहे जाणून घेऊयात.

नागरिकांवर बळाचा वापर करणं अतिशय दुःखद - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरिकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु तेथे बळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे."

"या घटनेत येथील नागरिक जखमी झाले ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. शासनाला आवाहन आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा", असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

यावेळी त्यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये मुख्यमंत्री कार्यालय, अजित पवार, पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस यांनाही टॅग केलं आहे.

पुण्याला एका विमानतळाची नितांत गरज - अजित पवार

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे घडलेल्या या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "ड्रोन मोजणी करण्यासाठी गेल्यावर मोठ्या प्रमाणावर महिला-पुरुष आक्रमक पद्धतीने पुढे आले. त्यात दुर्दैवाने एका महिलेला अटॅक आला. त्यांचं दुःखद निधन झालं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

"मी प्रशासनाला सांगितलं आहे की, फार आक्रमकपणे जाऊ नका. आजचं कामकाज थांबवा. पुणे जिल्ह्याला एका विमानतळाची नितांत गरज आहे. सामोपचारानं पुण्याच्या जवळ जिथं विमानतळ करता येईल तिथं करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे," असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झटापट नेमकी कशी झाली?

या प्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शनिवारी (3 मे) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झटापट नेमकी कशी झाली? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "2 मेपासून पुणे विमानतळासाठीचं ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं. यावेळी सर्वेक्षण करणाऱ्यांच्या साहित्याची तोडफोड करणे आणि सरकारी कामात अडथळा आणण्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हाही दाखल होता."

या प्रकरणी शनिवारी (3 मे) पत्रकार परिषद घेत माहिती देताना पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख
फोटो कॅप्शन, या प्रकरणी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शनिवारी (3 मे) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

"3 मे रोजीही महसूल प्रशासन, सर्वेक्षण करणारे आणि पोलीस सर्वेक्षणासाठी तेथे पोहचले होते. परंतू तेथील शेजारच्या गावात एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळं तेथील लोक थोडेसे भावनिक झाले. त्यातच त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 5 पोलीस आणि 20 अंमलदार जखमी आहेत. आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेत आहोत."

"पोलिसांच्या दोन गाड्यांवर दगडफेकही झाली आहे. या अनुषंगाने आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आणखीही काही आरोपींना आम्ही अटक करणार आहोत. तसेच काही गुन्ह्यांचीही नोंद करणार आहोत", असंही पंकज देशमुख यांनी नमूद केलं.

पुरंदरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन

कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुशा गोपाल गायकवाड यांनी पोलिसांनी दिलेली माहिती वस्तुस्थिती नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच, पोलिसांनी आधी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचं म्हटलं.

सरपंच मंजुशा गायकवाड म्हणाल्या, "सातही गावातील गावकऱ्यांचा या विमानतळाला विरोध आहे. आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत. त्यामुळे हा सर्व्हे करु नये अशी आमची भूमिका आहे. मात्र, असं असूनही प्रशासनाने शुक्रवारी (2 मे) आमच्या गावात विमानतळासाठी सर्व्हेचा प्रयत्न केला. त्याला आम्ही ठामपणे विरोध केला. त्यावर प्रशासनाने आम्ही सर्व्हे करत नाही परत जातो सांगितलं. मात्र, त्यांच्या गाड्या परत गेल्यावर त्यांनी आकाशात ड्रोन उडवत सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकरी भयभीत झाले."

कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुशा गोपाल गायकवाड
फोटो कॅप्शन, कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुशा गोपाल गायकवाड यांनी पोलिसांनी दिलेली माहिती वस्तुस्थिती नसल्याचं मत व्यक्त केलं.

"दुसऱ्या दिवशी शनिवारी (3 मे) सकाळी 9 वाजता प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढवून पुन्हा सर्व्हेचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्वेक्षण करणाऱ्या लोकांना पोलीस गाड्यांमध्ये बसवलेलं होतं. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी गावकरी आपल्या पशुधनासह रस्त्यावर उतरले. आम्हाला हे आंदोलन शांततेत करायचं होतं. मात्र पोलिसांनी आम्हाला दोन्ही बाजूने अडवलं होतं. त्यामुळे गावकरी शेतातून सर्वेच्या ठिकाणी येत पोलिसांच्या गाड्यांसमोरच जाऊन बसले."

"यावेळी गावकऱ्यांनी हा सर्व्हे रद्द करा, हे विमानतळ रद्द करा, अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाने हे आमचं काम आहे आणि ते करणारच अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे प्रचंड उन्ह असतानाही शेतकरी पोलिसांच्या गाड्यांसमोर बसले. त्यावेळी त्यांच्या गाड्या काढण्यासाठी पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला. काही महिला बाजुला पडल्या, एका महिलेला चक्कर आली आणि गावकरी घाबरले. म्हणून पुरुष गावकऱ्यांनी महिलांचं संरक्षण केलं."

पुरंदरमधील शेतकरी आंदोलन

"पोलिसांनी तिथं काय घडतंय बघायला आलेल्या लोकांनाही अटक केली. पोलीस जसे त्यांचे व्हिडीओ दाखवतात तसेच आमच्याकडेही आम्ही काढलेले व्हिडीओ आहेत. सुरुवात शेतकऱ्यांनी केलेली नाही. ही सुरुवात पोलिसांकडून झालेली आहे."

"पोलीस त्यांच्या गाड्या पुढे न्यायला लागल्यावर गावकऱ्यांनी ते सर्व्हे करण्याच्या ठिकाणी जाऊ नये म्हणून बैलगाड्या रस्त्यात उभ्या केल्या. स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. बैलगाडी चालकाला प्रचंड मारहाण केली. त्याचा कान फुटला आणि सात टाके पडले. अनेक गावकरी जखमी झाले आहेत. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पोलिसांनी थेट मारहाण करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही कोणती पद्धत आहे?" असा प्रश्न सरपंच मंजुशा गायकवाड यांनी विचारला.

"गावकरी शांतपणे बसलेले होते, तरी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हे सगळं करण्याची गरज नव्हती", असंही त्यांनी नमूद केलं.

पोलिसांचा लाठीचार्ज झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला का?

पोलिसांचा लाठीचार्ज झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला का? या प्रश्नावर पोलीस अधीक्षक देशमुख म्हणाले, "एक पोलीस अधिकारी मृत महिलेच्या घरी जाऊन तपासून आला आहे. आमच्या माहितीनुसार, त्या 87 वर्षांच्या महिला आहेत. त्यांची तब्येत गेल्या 2 आठवड्यांपासून खराब होती. त्या कुंभारवळण गावच्या रहिवासी असून त्या त्यांच्या घरीच होत्या आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला आहे."

"आंदोलन दोन दिवसांपासूनच सुरू झालं आहे. या दोन दिवसात तरी त्या महिलेचा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असल्याची आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याविषयी मी भाष्य करू शकणार नाही. मात्र, माझ्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसात त्यांचा आंदोलनात सहभाग नव्हता", अशी माहिती त्यांनी दिली.

आंदोलना दरम्यान हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या आजी
फोटो कॅप्शन, पोलिसांचा लाठीचार्ज झाल्यानं महिलेचा मृत्यू झाला का? या प्रश्नावर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी माहिती दिली.

दुसरीकडे कुंभारवळणच्या सरपंच मंजुशा गायकवाड यांनी मृत्यू झालेली महिला विमानतळासाठी आपली शेती जाणार याने धास्तावलेली होती, अशी माहिती दिली.

पारगाव येथील वामन मेमाणे आंदोलनात सक्रिय होते.
फोटो कॅप्शन, पारगाव येथील वामन मेमाणे आंदोलनात सक्रिय होते.

सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी आणखी एका व्यक्तीच्या मृत्यूची माहिती दिली. ते म्हणाले, "पारगाव येथील वामन मेमाणे आंदोलनात सक्रिय होते. मागील महिन्यात 16 एप्रिलला रात्री आकाशात लाईट फिरताना दिसत असल्याने त्यांनी ड्रोन सर्व्हेची रात्रभर धास्ती घेतली. ते अनेकांजवळ ही भीतीही व्यक्त करत होते. या धास्तीने १७ ला पहाटे हार्टअटॅकने मृत्यू झाला."

पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची वेळ का आली?

पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याची वेळ का आली? या प्रश्नावर देशमुख म्हणाले, "व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिलेच्या मृत्यूची माहिती आल्यानंतर पोलीस तेथून मागे जात होते. आम्ही सर्व गाड्या परत घेऊन जात होतो. तेव्हा गाड्यांना घेराव घालणे, गाड्यांसमोर झोपणे असे सर्व प्रकार सुरू होते. या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी दगडफेक केली."

"आम्ही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या नसत्या आणि सौम्य लाठीचार्ज केला नसता, तर अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले असते. या घटनेचं आमच्याकडे व्हिडीओ फुटेज आहे. त्यावरून आम्ही खातरजमा करून यात सहभाग असणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करू", अशी माहिती त्यांनी दिली.

पुरंदर आंदोलन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी पोलिसांनी आधी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं. ते म्हणाले, "ही घटना घडली त्याच्या एक दिवस आधीही प्रशासन सर्वे करायला आलं होतं. तेव्हा गावकऱ्यांनी गाड्या अडवल्या. मग त्यांनी आम्ही सर्व्हे करणार नाही असं सांगितलं आणि परत गेले. मात्र, गाड्या परत गेल्यावर सर्वे करण्यासाठी गावात ड्रोन फिरायला लागले."

"गाड्या घेऊन जातो म्हटले आणि ड्रोन फिरायला लागले हे पाहून प्रशासनाने आपल्याला फसवलं असं गावकऱ्यांना वाटलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व्हेसाठी आल्यानंतर गावकऱ्यांनी या गाड्या अडवल्या. या गाड्या पुढे सर्व्हे करण्यासाठीच्या गावांकडे जात होत्या, असा समज झाल्यानं गावकऱ्यांनी त्यांना अडवलं", असं श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी सांगितलं.

"आम्हाला विमानतळच नको आहे. आमची इच्छा नसताना तुम्ही ड्रोन फिरवून सर्व्हे का करतात? आम्ही ही जमीन सोडून कुठं जायचं? हे आमचं गाव आहे तर आम्ही हे सोडून का जायचं? असे प्रश्न गावकरी उपस्थित करत होते. यासाठी अनेकदा उपोषणंही केली आहेत. मात्र, असं असूनही सरकारनं हा सर्व्हे रेटण्याचा प्रयत्न केला", असंही त्यांनी नमूद केलं.

"पोलिसांनी केवळ उभ्या असणाऱ्या आमच्या सहा लोकांना अटक केली. यानंतर गावकरी सासवड पोलीस स्टेशनला गेली आणि त्यांना सोडल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाहीत, असं म्हटलं. पोलिसांनी मुलांना सोडतो, आधी आंदोलक महिलांना घरी पाठवा, असं सांगितलं. यानंतर सर्व महिला घरी परतल्या. मात्र, पोलिसांनी त्या मुलांना सोडलं नाही आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी घेतली", असं सरपंच गायकवाड यांनी सांगितलं.

आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर सोडण्यासाठी बैलगाड्या आणल्या?

पोलीस अधीक्षक देशमुख यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "तेथे पोलिसांच्या अंगावर सोडण्यासाठी बैलगाडा शर्यतीतील दोन गाड्या आणल्या होत्या. त्यात दुर्दैवाने 3 ग्रामस्थ महिला जखमी झाल्या आहेत. त्याबद्दलचे व्हिडीओही आमच्याकडे उपलब्ध आहेत. तेही आम्ही माध्यमांना शेअर करू."

पोलिसांना मारण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणल्या होत्या हा पोलिसांचा दावा आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी फेटाळला आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी सर्व्हे होऊ नये म्हणून रस्ता अडवण्यासाठी जनावरं आणि बैलगाड्या आणल्या होत्या. त्या पोलिसांना मारण्यासाठी आणलेल्या नव्हत्या. ज्या ज्या रस्त्याने सर्व्हेच्या गाड्या जात होत्या अशा दोन तीन ठिकाणी गावकऱ्यांनी बैलगाड्या लावल्या होत्या."

"एकजण रस्ता अडवण्यासाठी बैलगाडी रस्त्यावर घेऊन येत होता. तेव्हा पोलिस मध्ये उभे असल्याने बैल गांगरून रस्ता सोडून बाजूला पळाले. त्यावेळी ती बैलगाडी बाजूला बसलेल्या महिलांच्या अंगावर गेली. त्या बैलगाड्या ठरवून पोलिसांना मारण्यासाठी नव्हत्या".

"पोलीस त्यांच्याकडे व्हिडीओ आहेत म्हणत आहेत. त्यांनी त्यांच्याकडे असलेले व्हिडीओ दाखवावेत. पोलिसांनी शेतात घुसून गावकऱ्यांना मारहाण केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गावकऱ्यांनी शेतातील मातीचे ढेकुळ उचलून फेकले. अर्थात हे लोकांनी टाळायला हवे होते. मात्र याची सुरुवात पोलिसांनी लाठीचार्ज करून केली", असं मत श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी व्यक्त केलं.

सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर
फोटो कॅप्शन, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लक्ष्मी शंकर

"आंदोलकांचे पोलिसांशी काहीही भांडण नव्हतं, तर स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी ते जबरदस्तीने विमानतळ लादणाऱ्या प्रशासनाशी होतं", असंही त्यांनी नमूद केलं.

आंदोलक शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय?

या विमानतळाला आणि सर्व्हेला गावातील शेतकऱ्यांचा का विरोध आहे याविषयी बोलताना कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुशा गायकवाड म्हणाल्या, "प्रशासनाने गावकऱ्यांना नोटीस दिल्या. मात्र, गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी विमानतळासाठी द्यायच्या नाहीत. आम्हाला विमानतळ नकोच आहे, आमचा त्याला विरोध आहे."

"पुरंदर तालुक्यातील सिताफळ, पेरू, वाटाणा, अंजीर ही फळपिकं खूप प्रसिद्ध आहेत. खुद्द पंतप्रधानांनी या भागातील फळशेतीचा उल्लेख केला आहे. त्याच फळशेतीच्या जमिनी प्रशासन विमानतळासाठी वापरू पाहात आहे. परंपरेप्रमाणे या शेतजमिनी पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होतात. विमानतळ झाल्यावर पुढच्या पिढीच्या भविष्याचं काय? म्हणूनच येथील सातही गावांचा या विमानतळाला विरोध आहे", अशी भूमिका सरपंच गायकवाड यांनी व्यक्त केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)