नव्या वर्षाचे संकल्प खरंच पूर्ण करायचे असतील, तर 'या' 2 शब्दांपासून दूर राहा

    • Author, यास्मिन रुफो
    • Role, बीबीसी न्यूज

सध्या नवीन वर्षाचे मेसेज सर्वत्र दिसू लागले आहेत.

सोशल मीडियावर जिम आणि डाएट प्लॅनच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत आणि ऑफिसमधील चर्चांमध्येही हेच बोलणं सुरू आहे की, जानेवारीत कोण काय सोडणार आहे, काय सुरू करणार आहे आणि शेवटी आयुष्य कसं सुधारणार आहे.

मात्र, बहुतांश नववर्ष संकल्प टिकत नाहीत. आपल्यापैकी अनेकजण जानेवारीच्या मध्यापर्यंत पोहोचताच ते संकल्प सोडून देतात.

तरीही, यावर्षी हे बदलू शकतं. नववर्षाचे संकल्प कसे ठरवावेत आणि ते कसे टिकवावेत, यासाठी आम्ही काही तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.

वास्तव समजून घ्या

2026 या वर्षात तुम्ही 'वजन कमी करणार', 'करिअर बदलणार' किंवा 'घर बदलणार' असं ठरवलं आहे का?

जनरल फिजिशियन राहिलेल्या आणि आता कॉन्फिडन्स कोच असलेल्या डॉ. क्लेअर सावधगिरीचा इशारा देत सांगतात, "सावध रहा. हे अमलात आणता येण्यासारखे प्लॅन नसून स्वतःवर टाकलेला दबाव आहे."

"आपण केलेले संकल्प बहुतेक वेळा अपूर्ण राहतात, कारण ते अस्पष्ट, अवास्तव आणि खूपच व्यापक असतात", असं स्पष्ट मत त्या व्यक्त करतात.

डॉ. क्लेअर सल्ला देतात की, तुमच्या आयुष्यात काय चांगलं चाललं आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला थकवत आहेत, आता काय गोष्टी तुमच्यासाठी योग्य राहिलेल्या नाहीत आणि कुठे तुम्ही फक्त सवयीने, विचार न करता गोष्टी करत आहात, हे तुम्ही लिहून काढा.

"केवळ कशापासून दूर रहायचं यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे जेव्हा कळतं, तेव्हाच बदल जास्त टिकतो", असं त्या सांगतात.

तुमची उद्दिष्टं नक्की लिहा, पण ते उद्दिष्ट एखाद्या ठरावीक टप्प्याऐवजी 'दिशा आणि अनुभव' यावर आधारित असावे.

उदाहरणार्थ, 'मला वजन कमी करायचं आहे' याऐवजी असं लिहिता येईल : "मला अधिक उत्साही वाटावं आणि शरीराला आराम वाटावा, असं मला वाटतं. तसेच ते कशामुळे शक्य होईल हे मला समजून घ्यायचं आहे."

तसंच 'करिअर बदलायचं आहे' याऐवजी असं लिहिता येईल : "मला कोणतं काम अर्थपूर्ण वाटतं आणि ऊर्जा देतं हे मला शोधायचं आहे. त्या दिशेने एक छोटं पाऊल टाकायचं आहे."

'या' दोन शब्दांचा वापर टाळा

मानसशास्त्रज्ञ किम्बर्ली विल्सन सांगतात की, उद्दिष्टं लिहिताना 'नेहमी' किंवा 'कधीच नाही' असे ठाम शब्द वापरू नका.

असे शब्द 'सगळं किंवा काहीच नाही' अशी मानसिकता तयार करतात. ही मानसिकता दीर्घकाळ टिकवणं खूप कठीण असतं.

जर तुम्ही स्वतःशीच वचन दिलं की, 'मी प्रत्येक बुधवारी धावायला जाणार' किंवा 'मी आता कधीच दारू पिणार नाही', तर तुम्ही अपयशी होण्याची भूमिका घेतली आहे.

बीबीसीच्या 'व्हॉट्स अप डॉक' या पॉडकास्टमध्ये विल्सन सांगतात, "डाएट आणि व्यायाम याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. लोकांना वाटतं की, एक दिवस चूक झाली, तर सगळा प्रयत्न वाया गेला."

"लोक अनेकदा 'टनल व्हिजन'चे बळी ठरतात. म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष असतं आणि मोठं चित्र दिसत नाही. अशा वेळी एखाद्या क्षणाकडे स्वतंत्रपणे न पाहता, अनेक क्षणांशी जोडून पाहणं गरजेचं असतं," असं त्या सांगतात.

डॉ. क्लेअर म्हणतात की, आपलं उद्दिष्टं लवचिक भाषेत लिहिलं पाहिजे. उदा. 'मला प्रयोग करून पाहायचा आहे', 'यासाठी मला अधिक वेळ द्यायची इच्छा आहे', 'माझ्यासाठी केव्हा काय उपयुक्त ठरतं हे मी शिकतोय'.

पुन्हा मागे जाण्याची तयारी ठेवा

काही आठवडे सगळं छान चालतं, पण एखाद्या दिवशी धावायला जायचं राहून जातं, एकदा बाहेरचं खाल्लं जातं किंवा उशिरापर्यंत जागरण होतं आणि अचानक असं वाटतं की, लय तुटली, आपण हरलो.

विल्सन सांगतात की, काही संकल्प अपयशी ठरतात कारण "लोक आपल्या सर्वोत्तम वर्तनावर आधारित योजना करतात."

पण उशिरापर्यंत झोप न येणं, ऑफिसमधला कठीण दिवस अशा शक्यतांसाठी ते तयार नसतात आणि त्यासाठी कोणतंही नियोजन केलेले नसते.

जिथू सुरुवात केली तिथे मागे जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे, हे मान्य करणं गरजेचं आहे. मागे गेलात म्हणजे तुम्ही पूर्णपणे अपयशी ठरलात असा अर्थ होत नाही. परफेक्ट असणं नव्हे, तर सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे, असं विल्सन यांचं म्हणणं आहे.

डॉ. क्लेअर म्हणतात, "आपलं उद्दिष्ट परफेक्ट होणं नाही, तर एका चुकीमुळे संपूर्ण संकल्प सोडून द्यायचा नाही, हे असायला हवं."

जर तुमच्याकडून चूक झालीच, तर सर्वात उपयोगी प्रतिक्रिया स्वतःवर टीका करणं नाही, तर त्याविषयी कुतूहल बाळगणं आहे. तसेच पुन्हा सुरुवात करण्यासाठी पुढच्या आठवड्याची किंवा महिन्याची वाट न पाहता, प्रत्येक दिवसाला नवी सुरुवात समजायला हवे.

नवीन गोष्टींना जुन्या सवयींशी जोडा

करिअर कोच एम्मा जेफ्रीज सांगतात की, नववर्षाचे संकल्प यशस्वी करण्याचा एक मार्ग म्हणजे 'हॅबिट स्टॅकिंग' म्हणजेच नवीन सवय एखाद्या जुन्या, रोजच्या सवयीशी जोडणे.

त्या म्हणतात, "उदाहरणार्थ - दात घासल्यानंतर मी 10 पुश-अप्स करेन, वाइन ओतल्यानंतर 10 मिनिटं लिहीन, मुलांना झोपवल्यानंतर स्ट्रेचिंग करेन."

"याचा अर्थ तुम्ही तुमच्या समोरील ताटात आणखी नव्या गोष्टी टाकत नाहीत, तर आधीच असलेल्या साच्यात नवीन गोष्ट गुंफत आहात."

फक्त मोटिवेशनवर अवलंबून न राहता, आपल्या आजूबाजूचं वातावरण योग्य पद्धतीने तयार करणंही मोठा फरक निर्माण करू शकतं, असं जेफ्रीज सांगतात.

"उदा. तुम्हाला जास्त वाचन करायचं असेल, तर पुस्तक उशीवर ठेवा. म्हणजे झोपण्याआधी ते बाजूला काढावंच लागेल," असंही नमूद करतात.

सकारात्मक गोष्टींशी जोडून घ्या

जर तुमचा नववर्षाचा संकल्प अधिक बचत करण्याचा किंवा बजेट सुधारण्याचा असेल, तर तो एखाद्या सकारात्मक उद्दिष्टाशी जोडला तरच तो टिकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

ऑक्टोपस मनीत पर्सनल फायनान्स विभागाचे प्रमुख टॉम फ्रान्सिस म्हणतात, "सुट्टी असो किंवा आपत्कालीन निधी, एखादं स्पष्ट आणि उत्साहवर्धक ध्येय असेल, तर बचत ओझं वाटत नाही, तर अर्थपूर्ण वाटतं."

ते हेही सांगतात की, खूप जास्त बदल एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते सहसा टिकत नाहीत.

"फक्त 2-3 स्पष्ट प्राधान्यक्रम निवडा. उदाहरणार्थ, ड्रीम हॉलिडेसाठी 1.5 लाख रुपये बचत करणं अवघड वाटू शकतं, पण दर महिन्याला 12 हजार रुपये बाजूला काढणं शक्य वाटतं."

अशात जर अचानक एखादा खर्च आला, तर थोडा वेग कमी करणंही ठीक आहे.

"अशावेळी तुम्ही मासिक बचत 12 हजारवरून 2 हजार 500 रुपयांपर्यंत कमी केलीत, तरी चालेल. कारण तुम्ही पुढे जात आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सवय कायम राहणं," असंही ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)