अनिल अवचट : हरहुन्नरी लेखक आणि 'व्यसनमुक्ती'साठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचा आज जन्मदिन आहे. 26 ऑगस्ट 1944 रोजी पुण्यातील ओतूर येथे त्यांचा जन्म झाला होता.

सामाजिक प्रश्नांसोबतच विविध विषयांवर त्यांनी लिखान केलं. 'रिपोर्ताज' हा दीर्घ लेखन प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी उभारलेलं कामही सर्वज्ञात आहे.

लेखनासोबतच चित्रकला आणि ओरिगामीचीही त्यांना आवड होती. ते उत्तम बासरीही वाजवत.

मित्र परिवार, वाचक आणि मुक्तांगणचे रुग्ण या सगळ्यांमध्येच अनिल अवचट 'बाबा' म्हणूनच लोकप्रिय होते.

27 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी या हरहुन्नरी माणसाने जगाचा निरोप घेतला.

अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती.

आज मुक्तांगण व्यसनमुक्तीसोबतच अनेक क्षेत्रांत कार्य करत आहे. अनिल अवचट यांची मुलगी डॉ. मुक्ता पुणतांबेकर आता मुक्तांगणचं काम पाहतात.

डॉक्टर, पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्य

अनिल अवचटांनी पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यात त्यांचं मन रमलं नाही म्हणून ते युक्रांदच्या चळवळीत सामील झाले.

त्यातही फार काळ टिकले नाही. मग ते पूर्णवेळ लेखन क्षेत्रात उतरले.

त्यांची पत्नी सुनंदा मानसोपचारतज्ज्ञ होती. त्यांच्या साथीने अवचटांनी पुण्यात मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र चालू केले.

हे केंद्र अजिबात चालू नये अशी प्रतिक्रिया त्याच्या उद्घाटनप्रसंगी पु.ल.देशपांडेंनी दिली होती.

पत्रकार म्हणून त्यांनी विविधांगी विषयावर लेखन केले. ते वेळोवेळी दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालं आहे.

या लेखांचं संकलन 'रिपोर्टिंगचे दिवस' 'माणसं' अशा अनेक पुस्तकांतून त्यांनी मांडलं.

स्वत:विषयी थोडेसे या आत्मचरित्रपर लेखनात त्यांनी स्वत:च्या आयुष्याबद्दल विस्ताराने लिहिलं आहे.

मेडिकलच्या दिवसातच आपण लोकांशी बोलून योग्य पद्धतीने ते उतरवू शकतो अशी उपरती झाल्याचं ते 'रिपोर्टिंगचे दिवस' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात.

तळागाळातल्या लोकांशी सहज संवाद हे अवचटांचे आणखी एक वैशिष्ट्य होते.

त्या अनुभवाविषयी अवचट सांगायचे, "समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांशी बोलायला गेलो, कागद काढला की त्यांची बोलतीच बंद व्हायची. त्या भीतीमागे अनेक सरकारी लोकांनी फसवलेले पूर्वीचे प्रसंग असतील, कोर्टकचेऱ्या असतील आणखीही काही प्रसंग असतील.

कागदाची भीती आपल्या मध्यमवर्गीयांना कळूच शकणार नाही. आपल्यापुढे कागद येतो, तो प्रेमपत्राच्या स्वरुपात, धार्मिक पोथीच्या स्वरुपात. इथे येतो तो भीतीच्या स्वरुपात. मग मी कागदच सोडून दिला."

2021मध्ये त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तर त्यांच्या 'सृष्टीत गोष्टीत' या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाला होता.

आनंदाची व्याख्या सांगताना अनिल अवचट यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलं होतं, "माझी आई पहाटे उठून सडा घालायची, घरासमोरचा रस्ता झाडायची आणि मग दररोज वेगवेगळी रांगोळी काढायची.

ते बघायला आणि कौतुक करायलाही कुणी नव्हतं. मग ती रांगोळी पुसली जायची. त्याची तिला काही खंत नव्हती.

"तिच्यापासून मी एक शिकलो की, एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद. बाकी आनंद काही आपल्या हातात नाही. कुणीतरी कौतुक केलं पाहिजे, असं काहीही नाही. माझ्यासाठी प्रोसेसमधला आनंद हे महत्त्वाचं आणि तो मला माझ्या आईने शिकवला."

'मुक्तांगण' आणि व्यसनमुक्ती

अवचटांच्या लेखनाची, पुस्तकांची अशी मोठी यादी आहे. अर्ध्या शतकाचा असा हा मोठा भरलेला काळ आहे. पण अवचटांच्या सामाजिक जाणीवा या केवळ लेखनापुरत्या जागृत राहिल्या नाहीत.

त्या कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या जाणीवा होत्या. त्यातून प्रत्यक्ष संस्थात्मक कार्यही झालं. जेव्हा नव्वदच्या दशकात अवचट लिखाणाच्या निमित्तानं व्यसनांच्या विषयाकडे वळले, तेव्हाच ते या कार्याकडे ओढले गेले.

'गर्द' नावाचं त्यांचं पुस्तक आणि या विषयावर केलेल्या वर्तमानपत्रीय लिखाणानं विविध व्यसनं, ड्रग्सचा आपल्या समाजातला वाढत चाललेला पसारा हे समोर आलंच होतं.

लिखाणानंतर अवचटांनी प्रत्यक्ष व्यसनमुक्तीच्या कामातही स्वत:ला झोकून दिलं. त्यांच्या पत्नी सुनंदा याही मानसोपचार विषयामध्ये काम करत होत्याच. अन्य मित्र होते. त्यातूनच 'मुक्तांगण'ची निर्मिर्ती झाली.

पुण्यातल्या 'मुक्तांगण'नं आजपर्यंत हजारोंना दारुच्या आणि अन्य नशा-व्यसनांपासून मुक्त केलं आहे. एक व्यक्ती व्यसनापासून मुक्त होते, पण त्याचं खरं स्वातंत्र्य त्या व्यक्तीचे कुटुंबीय अनुभवतात. त्या स्वातंत्र्यामागे अनिल अवचट हे असे आहेत.

व्यसनमुक्तीसाठी कोणतीही ढिलाई न बाळगण्यांपैकी अवचट होते. त्यामुळे 'सोशल ड्रिंकिंग' वगैरे कल्पनाही त्यांना मान्य नव्हत्या. काही वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी एक व्यसनमुक्ती सप्ताह आयोजित केला होता आणि अनिल अवचट प्रमुख पाहुणे होते.

एका मोठ्या चित्रपट-नाट्य कलाकारालाही बोलावलं होतं. अवचटांपूर्वी झालेल्या भाषणात त्यांनी व्यसनं कशी चुकीचं हे सांगितलं, पण शेवटी कधीतरी 'सोशल ड्रिंकिंग' करायला हरकत नसावी असं म्हटलं. पण नंतर बोलतांना अवचटांनी त्यावरुन जाहीर कार्यक्रमातच ते कसं चूक आहे हे सुनावलं होतं.

अवचटांनी कविता लिहिल्या. मुलांसाठी 'सृष्टीत गोष्टी' म्हणून बालसाहित्य लिहिलं. जेव्हापासून ते लिहिते झाले तेव्हापासून एखादीही दिवाळी नसावी जेव्हा दिवाळी अंकांमध्ये अनिल अवचटांचा लेख नाही. त्यांचं पुण्याच्या पत्रकार नगरमधलं घर सर्वांसाठी कायम खुलं असायचं.

भरपूर वेळ देऊन ते बोलायचे. पत्रकारांसाठी तर ते एक विद्यापीठ होते. वयानं त्यांच्या मनातल्या कुतूहलावर कधीही परिणाम केला नाही.

कोरोनाकाळात सतत भटकणाऱ्या, माणसांच्या गोतावळ्यात रमणाऱ्या अवचटांवर घरीच थांबण्याची जणू सक्ती झाली. पण तरीही लिखाण शेवटपर्यंत थांबलं नाही.

अनिल अवचटांनी मराठी मनाला व्यसनांपासून मुक्त, प्रश्नांनी जागं आणि कुतूहलातून आलेल्या छंदांनी समृद्ध केलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.