रहस्यमयी फिरकीचं गूढ, शार्दूलचा दणका आणि बंगळुरुचं लोटांगण

सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती आणि पदार्पणवीर सुयश शर्मा या रहस्यमयी फिरकी टाकणाऱ्या त्रिकुटाच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर 81 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पण या विजयाचा शिल्पकार ठरला लॉर्ड शार्दूल ठाकूर. संघाची घसरगुंडी झालेली असताना शार्दूलने बंगळुरूच्या गोलंदाजांचा समाचार घेत बॅट चालवली. शार्दूलच्या अर्धशतकाच्या बळावर कोलकाताने 204 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बंगळुरूचा डाव 123 धावांतच आटोपला.

प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना अनुभवी शिलेदार विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 44 धावांची सलामी दिली. या दोघांना रोखण्यासाठी कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने पॉवरप्लेमध्येच चेंडू सुनील नरिनकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत नरिनने कोहलीला त्रिफळाचीत केलं. फुल लेंथ चेंडू अक्रॉस खेळण्याचा मोह कोहलीला नडला. चेंडूने ऑफस्टंपचा वेध घेतला. त्याने 21 धावा केल्या.

पुढचं षटक वरुण चक्रवर्तीला देण्याचं धाडस राणाने केलं. वरुणचा बॅक ऑफ द हँड चेंडू फाफने ड्राईव्ह केला पण बॅटची आतली कड घेऊन स्टंप्सवर आदळला. फाफने 23 धावा केल्या.

पुढच्या षटकात वरुणने धोकादायक ग्लेन मॅक्सवेलला तंबूचा रस्ता दाखवला. टप्पा पडून स्टंप्सवर आलेला चेंडू मॅक्सवेलला कळलाच नाही. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या मॅक्सवेलला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

हर्षल पटेलला बढती देण्याचा प्रयत्न फसला कारण वरुणने हर्षलला त्रिफळाचीत केलं, त्याला भोपळाही फोडता आला नाही.

नरिनसारख्या अनुभवी गोलंदाजांला रिव्हर्स स्वीप करण्याचा शाहबाझ अहमदचा प्रयत्न शार्दूल ठाकूरच्या हातात जाऊन विसावला. फिरकीपटूंनी जाळं विणलेलं असतानाच शार्दूलने ब्रेसवेलला बाद केलं.

फिरकीपटूंसमोर बंगळुरूचे फलंदाज हतबल होत आहेत हे स्पष्ट होताच राणाने 11व्या षटकात चेंडू पदार्पणवीर सुयश शर्माकडे सोपवला. लांब केस, केसांना बँड या रुपात वावरणाऱ्या सुयशने फिरकीवरच्या प्रभुत्वाने चाहत्यांना जिंकून घेतलं. दुसऱ्याच षटकात सुयशने अनुज रावतला तंबूचा रस्ता दाखवला.

त्याच षटकात अनुभवी फिनिशर दिनेश कार्तिकला सुयशने बाद केलं आणि बंगळुरूच्या विजयाच्या आशा मावळल्या. सुयशच्या गोलंदाजीवर स्वीपचा प्रयत्न फसला आणि वरुण चक्रवर्तीने झेल टिपला. सुयशने पुढच्या षटकात कर्ण शर्मालाही बाद केलं.

वरुण चक्रवर्तीने स्वत:च्याच गोलंदाजीत अफलातून झेल टिपत डेव्हिड विली-आकाश दीप ही शेवटची जोडी फोडली. बंगळुरूचा डाव 123 धावांतच गडगडला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 4 तर सुयश शर्माने 3 विकेट्स घेतल्या. नरिनने दोन विकेट्स पटकावल्या.

28 चेंडूत 69 धावा आणि एक विकेट पटकावणाऱ्या शार्दूलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

शार्दूलच्या बॅटचा तडाखा; कोलकाता दोनशेपल्याड

कठीण समय येता, कोण कामास येतो- या उक्तीला जागत सोशल मीडियावर लॉर्ड या बिरुदावलीने प्रसिद्ध शार्दूल ठाकूरने अफलातून अर्धशतकी खेळी करत सामन्याचं चित्रच पालटवलं. 89/5 अशा घसरण झालेल्या शार्दूलने हॅट्ट्रिक बॉलचा सामना केला. नशीब जोरावर असल्याने कर्ण शर्माच्या त्या चेंडूवर तो वाचला. या जीवदानातून झटपट सावरत शार्दूलने तडाखेबंद फटकेबाजी केली.

प्रमुख फलंदाज एकेक करुन माघारी परतलेले असताना शार्दूलने खांदे पाडले नाहीत. आकाश दीपच्या षटकात दोन चौकार आणि षटकार वसूल करत शार्दूलने इरादे स्पष्ट केले. अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या कर्ण शर्माच्या पुढच्या षटकात शार्दूलने चौकार लगावला. फिरकीपटू मायकेल ब्रेसवेलने शार्दूलच्या बॅटचा तडाखा झेलला. शार्दूलने ब्रेसवेलचे दोन चेंडू स्टेडियममध्ये भिरकावून दिले. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीचाही समाचार घेतला. हर्षल पटेलच्या षटकात शार्दूलने 20चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शार्दूलचं आयपीएलमधलं हे पहिलंवहिलं अर्धशतक आहे.

शार्दूलच्या टोलेबाजीमुळे दुसऱ्या बाजूने सहकार्याची भूमिका निभावणाऱ्या रिंकू सिंगनेही आक्रमक भूमिका घेतली. मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलच्या गोलंदाजीच्या त्यांनी ठिकऱ्या उडवल्या. 33 चेंडूत 46 धावांची खेळी करुन रिंकू बाद झाला. शेवटच्या षटकात जोरकस फटका लगावताना शार्दूलही बाद झाला. त्याने 29 चेंडूत 68 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

कोलकाताची 89/5 अशी अवस्था होण्यापूर्वी रहमनतुल्ला गुरबाजने 44 चेंडूत 57 धावांची दमदार खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 3 षटकारांची खैरात करत आपल्या आगमनाची नांदी दिली. गुरबाजला दुसऱ्या बाजूने साथ मिळू शकली नाही. डेव्हिड विलीने वेंकटेश अय्यर आणि मनदीप सिंग यांना झटपट तंबूत धाडलं. पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न कर्णधार नितीश राणाच्या अंगलट आला. ब्रेसवेलने त्याला बाद केलं. मोठ्या खेळीसाठी सज्ज गुरबाजला कर्ण शर्माने बाद केलं. पुढच्याच चेंडूवर उत्तुंग षटकारांसाठी प्रसिद्ध आंद्रे रसेलचा चेंडूचा अंदाज चुकला आणि विराट कोहलीकडे झेल देऊन तो माघारी परतला. गुरबाजच्या खेळीमुळे सुस्थितीत असणाऱ्या कोलकाताची 89/5 अशी घसरण झाली.

पण या स्थितीतून रिंकू सिंग आणि शार्दूल ठाकूर यांनी सहाव्या विकेटसाठी 47 चेंडूतच 103 धावांची शानदार भागीदारी रचली. एका क्षणी कोलकाताला दीडशे तरी करता येतील का अशी चिंता होती. पण या भागीदारीच्या बळावर त्यांनी दोनशेचा टप्पा ओलांडला. बंगळुरूतर्फे कर्ण शर्मा आणि डेव्हिड विली यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)