नोकरी न करता व्हीडिओ आणि रील बनवून लोक असं घरबसल्या पैसे कमवतायत

    • Author, पायल भुयान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नोकरी आणि व्यवसाय ही कमाईची पारंपरिक साधनं आहेत. पण सध्याच्या ट्रेंडनुसार अनेक नाविन्यपूर्ण मार्ग समोर येत आहेत, ज्याद्वारे लोक पैसे कमवत आहेत.

सोशल मीडियाच्या या युगात, अनेक प्रकारचे इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्स आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात.

तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेले बहुतेक व्हीडिओ आणि रील या इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर्स यांनी तयार केले आहेत.

जगभरातील लोक असे व्हीडिओ बनवून चर्चेत राहतात. कंटेंट क्रिएटर्स हे इन्फ्लुएन्सर बनून आपला व्यवसाय चालवतात. पण या व्हीडिओ-रिल बनवण्याकडे लोक नोकरी-धंदा म्हणून बघत नाहीत.

आता हे समजून घेण्यासाठी काही इन्फ्लुएन्सर्सचे अनुभव जाणून घेऊयात.

कंटेंट क्रिएटर असलेल्या फराह शेख सांगतात, "माझ्या दिवसाची सुरुवात ही घरकामानं होते. माझ्या मुलीला शाळेत पाठवल्यानंतर मी स्वत:ला थोडा वेळ देते. त्यानंतर रात्री 11 वाजल्यापासून मी माझं प्रोफेशनल काम सुरु करते. प्रथम एक टीम मीटिंग आहे. ज्यात आम्ही विचारमंथन करतो की पुढे काय करता येईल. या बैठकीत फायनान्स विभागाची प्रत्येक टीम सहभागी झाली होती. कामाची सुरुवात करण्याआधी सकाळची वेळ ही आमच्यासाठी योजना बनवण्याची असते.

"मी बहुधा आठवड्यातून 35 ते 40 तास काम करते. तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा व्हीडिओ फक्त एक किंवा दोन मिनिटांचा आहे. पण तो बनवण्यासाठी अनेक लोकांची मेहनत आणि कित्येक तास आम्ही काम करतो. सुदैवानं आता माझ्यासाठी एक टीम काम करत आहे, पण सुरुवातीला मी सर्व काही एकटीच करत होते.”

पण इतर काम करणाऱ्या व्यक्तीप्रमामे आठवड्यातून 35-40 तास काम करूनही लोक हे कंटेंट क्रिएटर्सला रिअल जॉब किंवा नोकरी मानत नाहीत.

पण हे असं का?

फराह या गेल्या सहा वर्षांपासून या व्यवसायाशी संबंधित आहेत. पण आजही असे अनेक लोक आहेत जे या व्यवसायाकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहत नाहीत.

लोक विचारतात तुम्ही काय काम करता?

फराह यांनी कंटेंट क्रिएशनमध्ये येण्यापूर्वी कॉर्पोरेट जगतात काम केलं. त्यावेळी ते अनेक ब्रँडच्या डिजिटल मार्केटिंगवर काम करत होत्या.

तो क्षण त्यांना आठवतो जेव्हा त्यांनी कुटुंबाला कंटेंट निर्मिती क्षेत्रात काम करण्याच्या त्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं.

फराह सांगतात की, "त्या दिवसात मी गरोदर होते. मी माझ्या आई-वडिलांकडे कंटेंट निर्मितीच्या क्षेत्रात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना वाटलं ठीक आहे, मी आता हे करेन आणि मला कंटाळा आला तर मी वेगळं काहीतरी करेन"

त्या म्हणतात की, केवळ कुटुंबातील सदस्यच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांनीही याकडे छंद म्हणून पाहिलं. लोक सुद्धा विचारत होते, "बरं तुम्ही हे करता, पण प्रत्यक्षात काय करता?"

फराह सांगतात, “जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा लोकांना असं वाटलं नव्हतं की हे एखाद्याचं खरोखरच प्रोफेशन असू शकतं. लोकांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं की यातूनही पैसे मिळतात का? टिकटॉक होता तेव्हा लोकांना वाटलं, अरे यार! तुम्ही पण नाचून पैसे कमावता का?

पण आता लोकांची मानसिकता बदलत असून ते याकडे व्यवसाय म्हणून बघू लागले आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.

फराह यांच्याकडे सध्या अनेक ब्रँड आहेत ज्यांच्या जाहिराती त्या करतात. त्यांच्या मते लोकांची विचारसरणी आता हळूहळू बदलत आहे.

त्या सांगतात की,"आधी त्यांना वाटायचं की हा फक्त एक मिनिटाचा व्हीडिओ आहे, यात काय मोठी गोष्ट आहे. पण आता लोकांना समजू लागले आहे की यात किती मेहनत घेतली जाते,"

बऱ्याच काळापासून बहुतेक लोकांचा असाही विश्वास होता की हे काम करणाऱ्यांमध्ये बहुसंख्य तरुण स्त्रिया आहेत.

काही लोक याकडे मानाचे काम म्हणून पाहत नव्हते. पण आता या व्यवसायाशी निगडित लोकांच्या कार्यशैलीबरोबरच लोकांची मतंही बदलत आहेत.

इन्फ्लुएन्सर मार्केटला चालना मिळण्याची आशा

इन्फ्लुएन्सर्स डॉट इन (influencers.in) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पुढील पाच वर्षांत हा इन्फ्लुएन्सर मार्केट 25 टक्के दरानं वाढू शकतो.

2025 पर्यंत या मार्केटमध्ये 2200 कोटी अपेक्षित आहे.

अहवालात असंही म्हटलं आहे की 62.2 टक्के ब्रँड हे इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात.

या ब्रँडना माहिती आहे की नवीन ग्राहक खेचण्यासाठी इन्फ्लुएन्सर हे महत्त्वाचं माध्यम आहेत.

मोठ्या कंपन्यांसाठी हे मार्केट त्यांच्या डिजिटल मार्केटिंग धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

छोट्या कंपन्याही इन्फ्लुएन्सरर्सचं महत्त्व जाणतात. पण तरीही ते मार्केटिंगच्या या क्षेत्रात एवढी गुंतवणूक करत नाहीत.

फराह पुढे सांगतात की, " फक्त लोकांचा दृष्टीकोनच बदलला नाही, तर ब्रँडही अधिक व्यावसायिक बनले आहेत. या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये ब्रँड्सनीही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. एकतर, जुन्या मार्केटिंग पद्धतींपेक्षा इन्फ्लुएन्सरमार्केटिंग खूपच स्वस्त आहे आणि ब्रँड चांगलं काम करत आहेत."

हा करिअरचा पर्याय आहे का?

डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आणि लाइफ कोच देबराती रिया चक्रवर्ती यांचा असा विश्वास आहे की या व्यवसायाबाबत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

"सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या आगमनानं कंटेंट क्रिएटरला कंटेंट तयार करण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकांना देखील या इन्फ्लुएन्सर बाबत आत्मीयता वाटते आणि एक त्यांचं एक नातं तयार होतं,"असं त्या म्हणतात.

यासह त्यांचा असा विश्वास आहे की, "इन्फ्ल्युएन्सर संस्थामध्ये देखील आता सुधारणा होत आहे. पूर्वी ते फक्त ब्रॅंड्स आणि क्रिएटरशी जोडले होते. पण आता ते पूर्णसेवा देत आहेत. ते ब्रँड आणि इन्फ्ल्युएन्सर यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा बनले आहेत."

'द मोबाइल इंडिया'चे संपादक, संस्थापक आणि डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ संदीप बडकी यांच्या मते, इन्फ्लुएन्सरर्स सध्या याकडे करिअर म्हणून न पाहता या क्षेत्राकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहत आहेत.

ते सांगतात की, "या दोन पद्धतींमधला फरक असा आहे की जर व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं तर ती व्यक्ती चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आणि ते कसं करायचं इत्यादी गोष्टींकडे पाहते.

त्याला वाटतं की मी असं काहीतरी केलं पाहिजे, जे मी केल्यामुळे माझी प्रतिमा खराब होऊ नये. माझं नाव कलंकित होऊ नये. करिअरमध्ये मात्र अशी भावना हरवत चालली आहे"

इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचे फायदे

ब्रँड विविध मार्गांनी या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उदाहरणार्थ, सौंदर्य आणि फॅशन ब्रँड हे फॅशन ब्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सरला भागीदार करुन घेत आहेत.

ट्रॅव्हल ब्रँड त्यांच्या विक्रीला चालना देण्यासाठी ट्रॅव्हल ब्लॉगर्ससोबत घेऊन काम करतात, तर फूड ब्रँड हे फूड ब्लॉगर्सचा वापर करताना दिसतात.

ब्रँडसाठी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा एक फायदा म्हणजे विशिष्ट ग्राहकांना आपल्याकडे आणणं. ब्रँड त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी ग्राहकांसाठी कंटेंट तयार करणारे इन्फ्ल्युएन्सर निवडत आहेत.

डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आणि लाइफ कोच देबराती रिया चक्रवर्ती यांचा असा विश्वास आहे की या व्यवसायाबाबत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

"सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या आगमनानं कंटेंट क्रिएटरला कंटेंट तयार करण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकांना देखील या इन्फ्लुएन्सर बाबत आत्मीयता वाटते आणि एक त्यांचं एक नातं तयार होतं,"असं त्या म्हणतात.सांगतात, "कंटेट क्रिएटर्सकडे जाहिरातीसाठी मार्केटमध्ये भरपूर वाव आहे. ब्रँड देखील टीव्ही किंवा वर्तमानपत्रांवर जाहिरात करण्याऐवजी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगवर त्यांचा विश्वास दर्शवित आहेत.

जेव्हा एखादी कंपनी जाहिरात करण्यासाठी इन्फ्लुएन्सर संस्थेशी संपर्क साधते तेव्हा ती कंपनी विचारते की या इन्फ्लुएन्सरचे किती फॉलोअर्स आहेत.”

त्या सांगतात की,"हे फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत की नाही? त्याने कोणत्या ब्रँडसोबत काम केलं आहे? 5 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांपासून ते 80 वर्षांपर्यंतचे लोक या क्षेत्रात काम करत आहेत.

संदीप बडकी म्हणतात, "दर दहा वर्षांनी मार्केटिंग जगतात एक नवीन ट्रेंड येतो. पूर्वी टीव्ही किंवा वृत्तपत्रातील जाहिरातींशिवाय कोणत्याही जाहिराती नव्हत्या. नंतर रेडिओ जाहिराती दिसू लागल्या आणि आता अशी वेळ आली आहे जेव्हा कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सकडे वळत आहेत."

"प्रत्येक ब्रँडची स्वतःची श्रेणी असते. असे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांचे पाच किंवा सहा हजार फॉलोअर्स आहेत आणि काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ब्रँड आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यातील भागिदारी ही त्यांचे निश्चित प्रेक्षक किती आहेत यावर अवलंबून असते, केवळ फॉलोअर्स नाहीत. "

पण संदीप असंही सांगतात की, "जुन्या पिढीचं खरेदी तंत्र हे अजूनही ' वर्ल्ड ऑफ माऊथ' आणि 'वॅल्यू ऑफ मनी' आहे आणि त्यामागील विश्लेषण ही पिढी स्वतःच करते. तर तरुण ग्राहकांना वाटतं की या व्यक्तीचे खूप मोठे फॉलोअर्स आहेत. म्हणजे त्यानं स्वतः खुप साऱ्या गोष्टी पाहिल्या असतील आणि त्यानंतरच तो आपल्याला या बाबत माहिती देतोय."

कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत?

या क्षेत्रात काय सुधारणा करता येतील यावर देबाराती रिया चक्रवर्ती सांगतात की, सध्या लोकांचा एक मोठा वर्ग असा आहे जो इन्फ्लुएंसरचं काम हे प्रोफेशन म्हणून बघत नाहीत.

हे माध्यम अतिशय नैमित्तिक आहे त्यामुळे लोकांचा अनेकदा गैरसमज होतो.

या क्षेत्रात अनेक गोष्टीत सुधारणा आवश्यक आहे, जसं की इथं एकसमान वेतन किंवा वेतन प्रणाली नाही. संस्था हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

फराह यांनी इंडस्ट्रीत काही अनिश्चितता असल्याचं मान्य केलं आहे. "काही दिवस असेही असतात जेव्हा तुम्ही खूप काम करता पण तुम्हाला तेवढा मोबदला मिळत नाही. पण हे बर्‍याच क्षेत्रात घडतं."

पण गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे इन्फ्लुएन्सर उद्योगाची भरभराट झाली आहे ते पाहता,फराह म्हणतात की "भविष्यात मी निश्चितपणे माझं काम करण्यास प्राधान्य देईन आणि माझ्या बाबतीत मी जे काही करेन ते नक्कीच ऑनलाइन असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)