ब्राझीलचा सर्वोत्तम फुटबॉलपटू, जो डॉक्टर-तत्वज्ञही होता; पण वर्ल्ड कप जिंकू शकला नाही…

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रदीप कुमार,
- Role, बीबीसी प्रतिनिधी.
यंदाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज (रविवार, 18 डिसेंबर) होत आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडे आहे, कारण लिओनेल मेस्सीचं फुटबॉल वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न फक्त एक पाऊल दूर आहे.
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे.
फुटबॉल खेळण्यासाठी असावं लागणारं नैसर्गिक कौशल्य, आकर्षक शैली या सगळ्या गोष्टी भरभरून असल्या तरी वर्ल्डकप विजयाचं त्याचं स्वप्न अद्याप अधुरंच आहे.
हे केवळ मेस्सीच्या बाबतीत होत आहे, असं नाही. याच वर्ल्डकप स्पर्धेत आपण पाहिलं की, मोरोक्कोविरुद्ध कशा प्रकारे स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचं स्वप्न धुळीस मिळालं होतं.
मेस्सीचाच समकालीन असलेला आणि त्याला 'काँटे की टक्कर' देणारा पोर्तुगालचा रोनाल्डोही वर्ल्डकप विजयाच्या बाबतीत कमनशिबीच ठरला आहे. त्याचाही कदाचित हा शेवटचा वर्ल्डकप होता. या स्पर्धेतून बाहेर पडण्याचं दुःख तो लपवू शकला नाही.

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLICATION
ख्रिस्तियानो रोनाल्डोसोबतच क्रोएशियाचा लुका मॉडरिच आणि ब्राझीलचा नेमार यांचासुद्धा वरील यादीत समाविष्ट करता येईल. या दोघांनासुद्धा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानलं जातं मात्र वर्ल्डकप विजयाचा करिश्मा त्यांना करता आला नाही.
कतार वर्ल्डकप स्पर्धेतील क्वार्टर फायनर फेरीत एक अफलातून गोल करूनसुद्धा ब्राझीलला क्रोएशियाकडून पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर नेमारने म्हटलं की, हा पराभव मी अनेक दिवस विसरू शकणार नाही. तसंच त्याने हेसुद्धा स्पष्ट केलं की हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप नाही.
फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची जादू अशीच आहे. ती दिग्गज खेळाडूंना वारंवार मैदानात आणत असते. पण आपलं सर्वकाही पणाला लावूनही अनेक दिग्गज खेळाडूंना विजयाची चव चाखता येत नाही, हे वास्तव आहे.
भूतकाळाचा विचार केल्यास अनेक दिग्गज खेळाडूंना हे दुःख पचवावं लागलेलं आहे. नॉर्दर्न आयर्लंडचा फुटबॉपटू जॉर्ज बेस्ट, नेदरलँड्सचा जोहान क्रॉयफ, हंगेरीचा फ्रेनेक पुस्कास, फ्रान्सचा मायकल प्लांटिनी तसंच रशियाचा गोलकिपर लेव्ह याशिन यांनाही या यादीत टाकता येईल.
आज अशाच एका दिग्गज खेळाडूबाबत आपण जाणून घेऊ.
‘डॉक्टर सॉक्रेटिस – फुटबॉलर, फिलॉसॉफर आणि लिजेंड.’

फोटो स्रोत, Getty Images
ही गोष्ट आहे 1982 च्या वर्ल्ड कपची. वर्ल्ड कप जिंकू न शकलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या खेळाडूचा उल्लेख होतोच. पण त्यासोबतच वर्ल्ड कप जिंकू न शकलेली सर्वोत्तम टीम म्हणून त्याच्या संघाचाही उल्लेख केला जातो.
1982 च्या वर्ल्डकप स्पर्धेत ब्राझील संघात सॉक्रेटिस नामक एक खेळाडू होता. तो किती अव्वल दर्जाचा खेळाडू होता, हे त्याचं जीवनपट उलगडून सांगणाऱ्या पुस्तकाचं नाव वाचल्यास समजून घेता येईल.
‘डॉक्टर सॉक्रेटिस – फुटबॉलर, फिलॉसॉफर आणि लिजेंड.’
क्रीडाक्षेत्रात असा खेळाडू अभावानेच आढळतो, ज्यांच्याबद्दल सांगण्यासाठी तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज भासत असेल. डॉक्टर, फुटबॉलर आणि फिलॉसॉफर, तेही एकाच वेळी. पण सॉक्रेटिस यांचं ते वैशिष्ट्यच होतं.
फुटबॉल पत्रकार अँड्र्यू डोऊने यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेत कार्यरत असताना 17 वर्षे ब्राझीलमध्ये घालवल्यानंतर वरील पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकाला जोहान क्रॉयफ यांची प्रस्तावना आहे.
ते लिहितात, “सॉक्रेटिस फुटबॉलने हवं ते करण्यास सक्षम होते. ते जास्त वेगाने धावायचेही नाहीत. इतर खेळाडूंना जास्त चकवायचे नाहीत. हेडरही इतका चांगला मारायचे नाहीत. पण ते त्यांना हवं ते करू शकत होते. खरं तर ते सगळ्या गोष्टी थोडं फार जमणाऱ्या खेळाडूंपैकी एक होते.”
सॉक्रेटिस यांचे वडील अत्यंत अभ्यासू होते. त्यांच्यावर ग्रीक तत्वज्ञानाचा विशेष प्रभाव होता. त्या कारणामुळेच त्यांनी आपल्या मुलाचं नाव दिग्गज तत्वज्ञ सॉक्रेटिस यांच्या नावावरूनच ठेवलं.
फुटबॉलपटू सॉक्रेटिस यांच्या वडिलांनाही फुटबॉल आवडायचं. ते 6 वर्षांचे असताना वडिलांनी त्यांना क्लब सँटोजचा टीशर्ट दिला. सँटोज क्लबमधूनच पेले पुढे आले होते. सॉक्रेटिस यांना पेलेंचे अनेक सामने पाहाण्याची संधी मिळाली.
सॉक्रेटिस यांना लहानपणी फुटबॉलसोबतच बॉक्सिंग आणि ज्युदो हे खेळ आवाडायचे. लवकरच त्यांना बोटाफोगो क्लबकडून खेळण्याची संधी मिळाली. याच क्लबमधून दिग्गज खेळाडू गरिंचा यांनीही प्रतिनिधित्व केलं होतं.
वैद्यकीय पदवी
फुटबॉलमध्ये नावलौकिक मिळवण्यापूर्वी सॉक्रेटिस यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पदवीही प्राप्त केली होती. ते साओ पावलो युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीय शिक्षण विभागातून MBBS उत्तीर्ण झाले होते.
त्यांच्या बायोग्राफीमधून समजतं की शिक्षण आणि खेळ या दोहोंचा दबाव सॉक्रेटिस यांच्यासाठी किती आव्हानात्मक राहिला.
सॉक्रेटिस यांनी काही काळ शिक्षणही सोडून दिलं होतं. पण त्याविषयी घरी कुणालाच सांगितलं नाही.
घरातून ते कॉलेजला म्हणून निघायचे. पण सिनेमा, पबला जाऊन ते घरी परतायचे. सॉक्रेटिस परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांच्या घरी या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या.
त्यावेळी पाच मुलांचं कुटुंब चालवणाऱ्या त्यांच्या वडिलांनी सॉक्रेटिसना शिक्षणाचं महत्त्व योग्यरित्या समजावून सांगितलं.
यानंतर, वयाच्या 18 व्या वर्षी सॉक्रेटिस यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी 4 विद्यापीठांची प्रवेश परीक्षा दिली. त्या चारही विद्यापीठांमध्ये त्यांची निवड झाली. अखेरीस, साओ पावलो विद्यापीठ घरापासून जवळ असल्याने तिथे त्यांनी प्रवेश घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासोबतच सॉक्रेटिस यांच्यासमोर आणखी एक आव्हान होतं. 1970 च्या यशानंतर मागे पडलेल्या ब्राझील संघाला पुढे आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे होते.
1979 साली ब्राझील संघात दाखल झाल्यानंतर 1982 ची विश्वचषक स्पर्धा त्यांच्या डोळ्यासमोर होती.
तोपर्यंत सॉक्रेटिस यांचे लांबलचक केस, दाढी, उंची आणि एकूणच शरीरयष्टीने मिळून त्यांना एक कूल फुटबॉलर म्हणून ओळख मिळवून दिली होती.
पण सॉक्रेटिस यांना आजही ब्राझीलमध्ये केवळ फुटबॉलपटूपेक्षाही फुटबॉल आणि समाजकारण-राजकारण यांची समज असणारा खेळाडू म्हणून ओळखलं जातं.
त्यांनी फुटबॉलबाबत म्हटलं होतं, “फुटबॉल तुम्हाला सत्य दर्शवून देतं. इतर कोणताही पेशा असं करू शकत नाही. फुटबॉल इतका लोकशाही आहे. मी नेहमी अशा खेळाडूंमध्ये असतो, ज्यांची सामाजिक स्थिती आणि शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे तुम्हाला समाजाचं वास्तव जवळून पाहण्याची संधी या माध्यमातून मिळते.”
संघातील कृष्णवर्णीय आणि गरीब खेळाडूंना पाहून त्यांच्या लोकशाहीवादी मनामध्ये अनेक विचार यायचे. या खेळाडूंना क्लबच्या बंधनातून मुक्त करावं. किंवा अधिक पैसे मिळण्यासाठी एखादं आंदोलन करावं, असंही त्यांना वाटायचं.
क्लबसोबत खेळाडूंचा होणारा करार हा क्लबचा फायदा समोर ठेवूनच करण्यात येतो. या दरम्यान वाटाघाटी करण्यासाठी खेळाडूंसमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, असं त्याचं स्पष्ट मत होतं.
त्यामुळेच त्यांना एक विचारी फुटबॉलपटू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची प्रगल्भता इतकी होती की, एखादा गोल केल्यानंतरही ते संघातील खेळाडूंसोबत जल्लोष करत नसत.
ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात पोहोचण्यापूर्वी सॉक्रेटिस हे ब्राझीलच्या क्लब कोरांथियंसचे स्टार खेळाडू बनले होते. हा क्लब खरं तर ब्राझीलच्या मजूर वर्गाचा क्लब होता. इथंही त्यांनी केवळ खेळाडूच नव्हे तर कामगारांच्या हितासाठीची लढाईही लढली.
याला 'कोरांथियंस' डेमोक्रसी म्हणून प्रसिद्धी मिळाली. क्लबमधील पैशांचा भ्रष्टाचार यामुळे बऱ्याच अंशी कमी झाला. या लढीने सॉक्रेटिस यांना हिरो बनवलं.
खेळाच्या मैदानात सॉक्रेटिस यांना तुलनेने संथ खेळाडू मानलं जायचं. मात्र तांत्रिक बाजूने ते खेळ आधीच समजून घ्यायचे. त्यामुळेच त्यांनी लगावलेले किक उपयुक्त असायचे. त्यांचे पास बिनचूक असत. तसंच गोल तर अगदीच निशाण्यावर.
इटलीकडून पराभूत
1982 साली सॉक्रेटिस यांनी ब्राझील संघाचं नेतृत्व करताना 1982 वर्ल्ड कप स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यांच्या यादीत आणून बसवलं होतं.
या स्पर्धेत संघांच्या कर्णधारपदासोबतच सेंटर मिडफिल्डरच्या भूमिकेतही ते होते. त्यांच्यासोबत जिको, क्रेजो, इडर आणि फलकाओ यांच्यासारखे इतर मिड फिल्डरही संघात होते.
कोणत्याही संघाची बचाव फळी भेदून काढण्याची क्षमता सॉक्रेटिस यांच्यात होती. स्पर्धेपूर्वी त्यांना एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं, डच संघाने टोटल फुटबॉलची रणनिती शोधली आहे. पेलेंची टीम मार्शल आर्ट्सच्या गिंगा शैलीत खेळत आली आहे. अशा स्थितीत तुमचा संघ कशा प्रकारे खेळणार आहे?
त्याला सॉक्रेटिसनी उत्तर दिलं, “ऑर्गनाईझ्ड केओस.’
मात्र, रशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ब्राझीलचा संघ सुरुवातीपासून मागे पडला. 7
5 मिनिटांपर्यंत 1-0 असे पिछाडीवर असताना गोलपोस्टपासून 40 गज अंतरावर चेंडू सॉक्रेटिस यांना मिळाला.

फोटो स्रोत, SIMON & SCHUSTER PUBLICATION
डोळ्याची पापणी लवतात न लवतात तोपर्यंत त्यांनी दोन डिफेंदर्सना भेदून एक दणदणीत किक मारली. गोलपोस्टच्या डाव्या बाजूला जाऊन चेंडू विसावला. या गोलनंतर इटरने केलेल्या दुसऱ्या एका गोलने ब्राझीलला विजय मिळवता आला.
आपल्या गोलबद्दल बोलताना सॉक्रेटिस यांनी म्हटलं, “नॉट अ गोल, एंडलेस ऑरगॅझम .”
मात्र, हाच संघ इटलीविरोधात खेळताना मोक्याचा क्षणी मागे पडला. या सामन्यातही सॉक्रेटिसने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली होती.
मात्र, 2-2 च्या बरोबरीनंतर पाओलो रोसीच्या अखेरच्या हॅटट्रिक गोलमुळे ब्राझीलला 3-2 ने पराभूत व्हावं लागलं. परिणामी, सॉक्रेटिस यांचा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.
5 जुलै 1982 साली झालेल्या या सामन्यात ब्राझील पराभूत झाल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
मात्र, सॉक्रेटिसने या सामन्यानंतर संघातील खेळाडूंना म्हटलं, “मित्रांनो, आपण हा सामना गमावला. पण आपल्याकडे जे आहे, ते आपल्याला गमावायचं नाही. आपल्या संघातील खेळाडूंमध्ये अविश्वसनीय अशी एकजूट आणि बंधुत्वभाव आहे. हा आयुष्यभर राहील. याच गोष्टीला जास्त महत्त्व आहे.”
पण, ही गोष्ट बोलत असताना सॉक्रेटिस यांचा हुंदका दाटून आला होता, हेही तितकंच खरं.
याच संघाची क्षमता आणि वर्ल्डकप जिंकू न शकण्याचं शल्य यांच्याविषयी पेले यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, “सॉक्रेटिस उत्तम मिड फिल्डर होते. त्यांची टीमसुद्धा कमाल होती. पण हीच संघाची ताकद आणि कमजोरीही होती. टीमकडे स्ट्रायकिंग फॉरवर्ड्स नव्हते.”
सॉक्रेटिस यांच्या बायोग्राफीमध्ये लिहिलंय की या पराभवानंतर संघाचे खेळाडू मद्यपानासाठी जवळच्या पबमध्ये गेले. ते सकाळी 5 पर्यंत पित होते.
दुसऱ्या दिवशी सॉक्रेटिसनी म्हटलं, “हा पराभव समजून घेणं अवघड आहे. कारण आपण कोणतीच चूक केली नव्हती. आपल्याला पराभवालाही तयार राहिलं पाहिजे, विशेषतः फुटबॉलसारख्या खेळात. हे तुमच्यासाठी मृत्युप्रमाणेच असतं. तुम्ही गेलात तरी दुःख कमी होत नाही.”
या पराभवानंतर विचारी सॉक्रेटिसवर असा प्रभाव पडला की, ते यामधून बाहेर पडू शकले नाहीत. खेळाच्या मैदानावर ते पुन्हा दिसले. पण त्यांची लय पूर्वीप्रमाणे नव्हती.
दुसरीकडे या पराभवाचा परिणाम ब्राझीलमध्येही दिसून आला. श्रीमंतांना वाटलं की आता कोरोंथियंस डेमोक्रसी आंदोलन आता बंद होईल. पण ब्राझीलच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सॉक्रेटिस यांनी आपल्या संघाला विजयी करून अनेक वर्षे हे आंदोलन जिवंत ठेवलं.
लोकशाही मूल्यांवर विश्वास
असं नाही की सॉक्रेटिसची क्रीडा कारकीर्द या पराभवानंतर संपून केली. त्यांनी 1986 ची मेक्सिकोमध्ये झालेली वर्ल्डकप स्पर्धाही खेळली. मात्र त्यावेळी दुखापतींमुळे त्यांना कर्णधार म्हणून निवडण्यात आलेलं नव्हतं.
स्पेनविरुद्ध पहिल्या सामन्यात पेनल्टीवर त्यांनी एक गोल केला होता. पण क्वार्टर फायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटमध्ये त्यांनी गोल हुकला. फ्रान्सविरुद्धचा हा सामना ब्राझीलने गमावला. हाच सामना सॉक्रेटिस यांचा अखेरचा सामना ठरला.
पुढे सॉक्रेटिस आपल्या दिलखुलास जीवनशैलीमुळे, सिगारेट आणि दारू पिण्याच्या सवयी असूनसुद्धा फुटबॉल जगतात चर्चेत राहिले.
त्यांच्या लोकशाही विचारांनीच त्यांना तत्वज्ञ आणि दिग्गजाचा दर्जा प्राप्त करून दिला.
नेहमी गरीबांची मदत करण्यासाठी पुढे येणारा खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जायचं. ब्राझीलचे असूनसुद्धा पेले, गरिंचा यांच्यासारखे खेळाडू त्यांचे आदर्श नव्हते.
ते सांगतात, “फिडेल कॅस्ट्रो, चे गव्हेरा यांच्याशिवाय बीटर ग्रुपचे अँटी वॉर प्रोटेस्टर जॉन लेनन यांचा आपल्यावर प्रभाव आहे.”
फिडेल कॅस्ट्रो यांच्या प्रभावामुळेच सॉक्रेटिस यांनी आपल्या एका मुलाचं नाव फिडेल ठेवलं होतं.
हे नाव ठेवत असताना सॉक्रेटिस यांच्या आईने विचारलं की, इतक्या आगळ्यावेगळ्या व्यक्तीचं नाव तू का निवडलंस?
त्याला उत्तर देताना ते म्हणाले, मग तू माझ्यासोबत काय केलं होतंस?
ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिसची आठवण यावेळी त्यांनी आईला करून दिली.
याव्यतिरिक्त सॉक्रेटिस यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत चढ-उतारांनी भरलेलं राहिलं.
त्यांना 4 लग्नांमधून 5 मुले झाली. यादरम्यान ते राजकारण आणि अर्थविषयक घडामोडींवर वृत्तपत्रांमध्ये लिहित होते. तसंच जगभरातील फुटबॉलप्रेमींचं त्यांना मिळणारं प्रेमही कायम होतं.
अखेर, अत्याधिक मद्य सेवनामुळे 4 डिसेंबर 2011 रोजी वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
रंजक बाब म्हणजे, सॉक्रेटिस ब्राझीलला वर्ल्ड कप जिंकून देऊ शकले नाहीत, तरी त्यांचे लहान भाऊ राय यांच्या नेतृत्वात ब्राझीलने 1994 चा वर्ल्डकप जिंकला होता.
म्हणजेच, 1970 नंतर 24 वर्षांनी ब्राझीलला वर्ल्डकप विजय मिळाला. जे स्वप्न सॉक्रेटिस यांनी पाहिलं होतं, ते त्यांच्याच लहान भावाने पूर्ण केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








