You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युरोपातली विद्यापीठंही ज्यापासून प्रेरित आहेत, त्या नालंदा विद्यापीठाचा इतिहास जाणून घ्या
- Author, अभय के.
- Role, इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी
प्राचीन भारतातील ज्ञान, ज्ञान साधना, शिक्षणपद्धती याचा उल्लेख होताच डोळ्यासमोर ज्या काही मोजक्या गोष्टी येतात, त्या नालंदा विद्यापीठ किंवा विहाराचं नाव अग्रक्रमानं येतं.
नालंदा विद्यापीठातील शिक्षक, तिथे शिकवले जात असलेले विविध विषय आणि होत असलेलं संशोधन यामुळे नालंदा हे नाव फक्त भारतातच नव्हे तर त्याकाळी जगभरात प्रसिद्ध होतं.
नालंदा विद्यापीठाच्या अनन्यसाधारण आणि मूलभूत स्वरुपाच्या योगदानाबद्दल जाणून घेऊया.
नालंदाच्या इमारती आता भग्नावस्थेत आहेत. इतिहासातील या महान विहाराचं (मॉनेस्ट्री) काम 14 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच बंद पडलं होतं. मात्र नालंदाचा वारसा आजदेखील विविध क्षेत्रातील अभ्यास, संशोधनाचं काम पुढे नेतो आहे.
विज्ञान, वैद्यकीय, गणित, खगोलशास्त्र, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, व्याकरण, लिपि, पुस्तक संस्कृती, भाषांतर, साहित्य, कला आणि वास्तुकलेच्या विकासात या विहाराचं महत्त्वाचं योगदान आहे.
नालंदातील पहिल्या विहाराची स्थापना इसविसनापूर्वी तिसऱ्या शतकात करण्यात आली होती. भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांनी नालंदा विहार-विद्यापीठाची स्थापना केली होती.
मौर्य साम्राज्याच्या काळात नालंदा विहार बांधताना त्याचं नियोजन अत्यंत विचारपूर्वक करण्यात आलं होतं. विद्यार्थी तिथे शिक्षण घेतील आणि निवासदेखील करतील अशा शिक्षण संस्थेच्या रुपात हा विहार बांधण्यात आला होता.
मग पुढे तेच नालंदाचं नियमित स्वरुप झालं. हल्लीच्या भाषेत याला रेसिडेन्शियल व्यवस्था असं म्हटलं जातं.
असं मानलं जातं की युरोपातील अनेक महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या कॅम्पसची रचना नालंदाच्या रचनेनंच प्रेरित आहेत किंवा त्यावरच आधारित आहेत. यामध्ये ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठाच्या चौकोनी परिसराचा देखील समावेश आहे.
इसविसनापूर्वी तिसऱ्या शतकात एक विहार म्हणून स्थापना झाल्यानंतर एक महाविहार म्हणून नालंदाचा विकास अतिशय शिस्तबद्धपणे, सुनियोजितपणे झाला.
यामध्ये अनेक मठ, एक आधुनिक मुख्य इमारत, पायाभूत सुविधा, एक चार भिंती असलेला निवासाचं परिसर, अनेक चौकोनी विहार आणि सोबतच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवत केलेली व्यवस्था यांचा समावेश होता.
तिथे धर्मनिरपेक्ष विषयांसह अनेक विषय शिकवण्याची आणि त्यासाठी त्यावेळेच्या सर्वोत्तम शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती.
पुढील अनेक शतकांमध्ये या विद्यापीठाचा विकास आणि विस्तार त्याच्या विचार आणि तत्वज्ञानाद्वारे कसा झाला आणि तो पुढे मध्य आशिया, युरोप आणि उर्वरित जगभरात पसरला.
नालंदा महाविहारात नागार्जुन, वासुबंधु, संतरक्षिता आणि कमलसिला सारख्या महान विद्वानांनी पुनरावृत्ती तर्क (तर्क आणि त्यानंतर उप-तर्क) प्रणाली पुढे नेण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.
तर्काच्या आधारे मांडणी करण्याच्या या विचारपद्धतीतून पुढे मध्ययुगीन वैज्ञानिक पद्धत किंवा दृष्टीकोनाचा विकास झाला.
हा दृष्टीकोन, विचार करण्याची पद्धत मग मध्य आशिया, अरब जगत आणि युरोपासह जगाच्या विविध भागांमध्ये पोहोचली.
गणित आणि खशोलशास्त्राचं केंद्र
भारतीय गणिताचे पितामह मानले जाणारे आर्यभट्ट सहाव्या शतकात नालंदा महाविहारातील सर्वात प्रमुख गणितज्ञ होते. त्यांनी 'आर्यभटीय' हे गणितातील मूलभूत स्वरूपाचं पुस्तक लिहिलं.
आर्यभट्ट हे पहिले गणितज्ञ होते, ज्यांनी शून्याला एक अंक म्हणून मान्यता दिली. या क्रांतीकारी संकल्पनेमुळे गणन किंवा कॅल्क्युलेशन करणं सोपं झालं. तसंच त्यातूनच पुढे बीजगणित (अल्जेब्रा) आणि कॅल्क्युलस विकसित झाले.
नंतर आर्यभट्ट यांचं कार्य ब्रह्मगुप्त यांनी पुढे नेलं. त्यांनी 'ब्रह्मस्फुटसिद्धांत' लिहिला. त्याचा आठव्या शतकात अरबी भाषेत अनुवाद झाला. तो 'सिंदहिंद'च्या रुपात प्रसिद्ध झाला. त्यातूनच भारतीय संख्या, अल्जेब्रा, कॅल्क्युलस, अल्गोरिदम आणि भारतीय खगोलशास्त्राशी युरोपची ओळख झाली.
गणित आणि खगोलशास्त्राच्या क्षेत्रात नालंदाचा प्रभाव सर्वत्र पडत होता. विशेषकरून चीनमध्ये तो महत्त्वाचा होता.
गौतम सिद्धार्थ इसविसन 665 ते 698 मध्ये ब्युरो ऑफ अॅस्ट्रोनॉमी ऑफ चायनाचे प्रमुख होते. त्यांनी त्यावेळेस भारतीयांच्या श्रेष्ठत्वाचं नेतृत्व केलं.
'सरकारमध्ये वापरले जाणारे अधिकृत कॅलेंडर बनवण्याची आणि महाराणी वु जेतियन यांच्यासाठी ज्योतिष आणि अलौकिक चिन्हांचे खगोलशास्त्रीय अर्थ लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. गौतम यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी सातत्यानं हे पद भूषवलं. गौतम त्यात पहिले होते.'
नालंदामध्ये विकसित झालेलं तांत्रिक बुद्धिझम, सातव्या आणि आठव्या शतकात चीनमध्ये एक मोठी ताकद बनलं होतं. चीनमधील वरच्या पातळीवरील बुद्धिजीवींमध्ये अनेकजण याचे अनुवायी होते.
बहुतांश तांत्रिक विद्वानांना गणितात खोलवर रस असल्यामुळे, तांत्रिक गणितज्ज्ञांचा चीनमधील गणितज्ज्ञांवर खोलवर प्रभाव पडला होता. हा रस असण्यामागचं कारण कदाचित सुरुवातीच्या टप्प्यात संख्येचं तांत्रिक आकर्षण होतं.
चीनमधील तांत्रिक बौद्ध भिक्कू आय-सिंग किंवा यी शिंग (इसविसन 672 ते 717) हे त्या काळचे महान चीनी खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ होते. नालंदा विहारात गणित आणि खगोलशास्त्रावर भारतीयांनी केलेल्या कामावर त्यांनी विशेष कौशल्य मिळवलं होतं.
आशियातील कला, संस्कृतींवरील प्रभाव
माध्यमिक आणि योगाचार या दोन मोठ्या महायान बौद्ध तत्वाज्ञानाच्या विकास आणि उत्क्रांतीमध्ये नालंदाचं योगदान मोठं होतं.
महाविहार अनेक शतकं योगाचाराशी जोडलेलं राहिल्यामुळे एक विशेष शाखा जन्मास आली. त्याला वज्रयान किंवा तंत्रयान म्हणून ओळखलं जातं. ही शाखा योगाचार तत्वज्ञानाच्या सिद्धातांवर आधारित आहे.
नालंदामध्ये अतिशय सुरक्षित ठेवण्यात आलेल्या माध्यमिक आणि योगाचार यांना एकत्र करून त्यातून नवीन तत्वज्ञान विकसित झालं. त्याला योगाचार-माध्यमिक म्हणून ओळखलं जातं.
नालंदामध्ये विकसित झालेल्या तत्वज्ञानांचा दक्षिण, मध्य आशिया, पूर्व आशिया आणि आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियात प्रसार करण्यासाठी आणि त्या देशांतील लोकांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरुपाला आकार देण्यात नालंदा महाविहारानं महत्त्वाची भूमिका बजावली.
पाचव्य शतकापर्यंत नालंदा महाविहार हे कलेचं प्रमुख केंद्र झालं होतं.
नालंदात तयार करण्यात आलेल्या कलाकृतींमध्ये मथुरा आणि सारनाथ या दोन्ही कलाकृतींच्या स्थानिक वैशिष्ट्यांचा मेळ घालण्यात आला होता. त्यातून पुढे आठव्या शतकात पाल काळात नालंदा कला (नालंदा स्कूल ऑफ आर्ट) म्हणून नवीन वेगळी शाखा विकसित झाली.
या शाखेचा पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांमधील कलेवर खोल प्रभाव होता.
वज्रयान तत्वज्ञानाचा एक भाग म्हणून तांत्रिक बौद्ध सिद्धांताच्या बरोबर त्रिमितीय मंडल तयार करण्याची कल्पना नालंदा महाविहारात विकसित झाली.
या तंत्राचा वापर बिहारमधील केसरिया बौद्ध स्तूप आणि बोरोबुदुर या जावामधील जगातील सर्वात मोठ्या बौद्ध स्मारकाच्या निर्मितीमध्ये करण्यात आला.
नालंदातील आचार्यांनी संस्कृतमध्ये लिखाण करून संस्कृत भाषादेखील समृद्ध केली.
या लिखाणात तत्वज्ञानाचे ग्रंथ, शुद्ध आणि पाणिनी संस्कृतमध्ये बौद्ध तर्क आणि नीतीमूल्यांवरील ग्रंथ यांचा समावेश आहेत. तसंच मिश्र संस्कृतमध्ये स्तोत्र, महात्म्य, तंत्र आणि साधना यांचा समावेश आहे.
नालंदा महाविहारात सूत्रांची नक्कल करण्यासाठी आणि त्यांचं विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची महान परंपरा होती. या परंपरेनं कित्येक शतकांमध्ये अनेक देशांच्या भाषा, साहित्य आणि संस्कृतीला समृद्ध केलं.
तिबेटची संस्कृती आणि भाषा या परंपरेचं जिवंत उदाहरण आहे.
तिबेटचे विद्वान थोन्मी सम्भोटा यांनी नालंदा महाविहारात शिक्षण घेतलं होतं. त्यांनी देवनागरी आणि काश्मीरी लिपींच्या आधारे तिबेटी भाषेसाठी लिपी तयार केली होती.
नालंदा महाविहारातील चौऱ्याऐंशी सिद्धांनी, 8 व्या शतकापासून ते 13 व्या शतकापर्यंत जैन संतासोबत अपभ्रंश काव्याचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी दोहा, चौपाई आणि पदधारी सारख्या नवीन काव्य प्रकारांचा विकास होण्यात योगदान दिलं.
या बातम्याही वाचा:
- नागा साधू कोण असतात? त्यांची 'टांगतोड' प्रक्रिया काय असते?
- शिवाजी महाराजांकडून कोंढाणा जिंकून घेण्याचे प्रयत्न औरंगजेबाने किती वेळा केले होते?
- प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?
- चोल साम्राज्याच्या वैभवाची गोष्ट : अमाप संपत्ती, गगनचुंबी मंदिर आणि जावा-सुमात्रापर्यंत पोहोच
मौखिक ते लेखन परंपरेचा पाया
पांडुलिपी लेखन, रेखाचित्र, संरक्षण आणि नक्कल लेखनाची कला विकसित करण्यात नालंदाची मध्यवर्ती भूमिका होती.
याप्रकारे नालंदा महाविहारातील पांडुलिपी लेखन, नक्कल लेखन आणि संरक्षणाच्या संस्कृतीनं जगभरात मौखिक परंपरेकडून लेखन परंपरेला वेगानं चालना दिली.
'द डायमंड सूत्रा' हे जगात प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक आहे. ते 'प्रज्ञापारमिता सूत्रा'चा एक भाग आहे. याबद्दल मानलं जातं की नागार्जुन यांनी ते नालंदात लिहिलं होतं. धम्म चक्र, ज्यात पवित्र ग्रंथांना यांत्रिकपणे फिरवलं जातं. त्याचाही शोध नालंदामध्येच लागला होता.
नालंदा महाविहारातील वैद्यकीय शास्त्राच्या ज्ञानाचा प्रभाव पूर्व आशिया, विशेषकरून चीनच्या वैद्यकीय परंपरेवर अतिशय खोलवर पडला. यात नालंदा महाविहारात वापरलं जाणाऱ्या अत्याधुनिक नेत्र विज्ञानाचाही समावेश आहे. ते विज्ञान पुढे तांग साम्राज्याच्या काळात चीनमध्ये पोहोचलं.
सुरुवातीच्या शतकात नागार्जुन यांनी लिहिलेल्या 'रसरत्नाकर' हा ग्रंथ भारतीय रसायनशास्त्रावरील पहिला ग्रंथ मानला जातो.
वैद्यकीय, नेत्र विज्ञान, रसायन शास्त्र आणि आरोग्याशी निगडीत इतर विज्ञानाच्या शाखांमध्ये नालंदा महाविहाराची उत्कृष्टता आणि सर्वोत्तम परंपरांचा अवलंब तिबेट, नेपाळ, चीन, कोरिया, जपान, मंगोलिया आणि जगातील अनेक भागांमध्ये करण्यात आला.
हठ योगाचा सुरुवातीचा उल्लेख वज्रयान शाखेच्या बौद्ध तांत्रिक ग्रंथांमध्ये सापडतो. नालंदा महाविहारात तो आठव्या शतकानंतर विकसित करण्यात आला होता.
शतकानुशतकं हठ योगाच्या विकासानंच योग लोकापर्यंत पोहोचवला, त्याचं लोकशाहीकरण केलं. तसंच धार्मिक आणि कर्मकांठामधून योग मुक्त केला. संपूर्ण जगभरात त्यामुळेच योग स्वीकारला गेला आणि त्याची लोकप्रियता वाढली.
येशू ख्रिस्ताचं जीवन आणि तत्वज्ञान आणि जातक कथांमध्ये बुद्धानं बोधिसत्वाच्या रुपात जन्म घेण्याच्या आणि इतरांसाठी त्यांच्या आयुष्याचं बलिदान करण्यामध्ये बरंच साम्य आहे.
नालंदा महाविहारातील नागार्जुन यांच्या विकसित शिक्षक परंपरेनं बोधिसत्व हे स्वत: ऐतिहासिक बुद्धाच्या समकक्ष होते हा दृष्टीकोन लोकप्रिय केला.
अनेक इतिहासकारांना वाटतं की ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव होता, या गोष्टीची वास्तविक शक्यता आहे.
अर्थात जरी 14 व्या शतकाच्या सुरुवातीलाच नालंदा महाविहाराचं निष्क्रीय झालं होतं. तरी त्याची ख्याती कायम राहिली. त्याच नावानं पुढे शिक्षण संस्था आणि मठांची स्थापना झाली. त्यांना नालंदा महाविहाराकडून प्रेरणा मिळत राहिली. नालंदाची आख्यायिका जिवंत आहे आणि अलीकडच्या काळात त्याला गती मिळाली आहे.
जगभरात नालंदाला समर्पित असलेल्या संस्था
1951 मध्ये बिहारमध्ये नव नालंदा महाविहाराची स्थापना करण्यात आली. 1984 मध्ये तिथे महान चीनी प्रवासी ह्वेन सांग यांना समर्पित असलेला एक मेमोरियल हॉल बनवण्यात आला.
1981 मध्ये सिक्कीममध्ये कर्म श्री नालंदा संस्था आणि 1987 मध्ये बिहारमधील नालंदा इथे नालंदा ओपन युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. 2010 मध्ये राजगीरमध्ये नालंदा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
नालंदाची ख्याती, प्रतिष्ठा इतकी मोठी आहे की त्यामुळेच त्याच नावानं जगभरात अनेक संस्थांची स्थापना झाली.
श्रीलंकेतील नालंदा गेडिगे आठव्या शतकातील आहे. त्यावेळेस नालंदा महाविहार कार्यरत होतं.
1435 मध्ये ल्हासाच्या वायव्येला फेन-यूल खोऱ्यात, बौद्ध भिक्कू आणि विद्वान रोंगटन शेजा कुनरिग (1347-1449) यांनी फेनपो नालेंद्र नावाच्या एका तिबेटी नालंदा मठाची स्थापना केली होती.
त्या मठात 700 भिक्कू राहायचे. त्याचबरोबर हजारो भिक्कू तिथे यायचे. तिबेटच्या विविध भागात या मठाच्या शाखा आहेत.
युरोपपासून अमेरिकेपर्यंत...
जगभरात नालंदाच्या प्रेरणेनं स्थापना झालेल्या संस्था
- सिक्कीममधील कर्म श्री नालंदा संस्थान (1981)
- फ्रान्समधील लावूरमधील नालंदा मठ (1981)
- ब्राझीलमधील नालंदा बुद्धिस्ट सेंटर (1989)
- ब्राझीलमधील नालंदाराम रिट्रीट (1999)
- कॅनडातील नालंदा कॉलेज ऑफ बुद्धिस्ट स्टडीज (2000)
- थायलंडमधील इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉलेज (2000)
- मलेशियातील नालंदा इन्स्टिट्यूट (2007)
- अमेरिकेतील नालंदा इन्स्टिट्यूट फॉर कंटेम्पलेटिव्ह सायन्स (2007)
युरोपात, फ्रान्समधील टोलूजपासून चाळीस किलोमीटर अंतरावर लावूरमध्ये 1981 मध्ये लामा जोपा रिनपोचे आणि लामा थुबटेन येशे यांनी नालंदा मठाची स्थापना केली.
नालंदा महाविहारातून प्रेरणा घेत 1989 मध्ये ब्राझीलमध्ये नालंदा बुद्धिस्ट सेंटरची स्थापना करण्यात आली. तिथे मूळ मठाच्या परंपरांचं पालन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
1999 मध्ये ब्राझीलमध्ये नालंदाराम रिट्रीट सेंटरची स्थापना करण्यात आली होती. ते दक्षिण अमेरिकेतील जंगलात ध्यान करवणारं पहिलं थेरवाद (बौद्धांच्या दोन मोठ्या परंपरांपैकी एक) केंद्र ठरलं.
कॅनडातील टोरंटोमध्ये नालंदा कॉलेज ऑफ बुद्धिस्ट स्टडीजची स्थापना 2000 मध्ये सुवांडा एचजे सुगुणाश्री यांनी केली होती.
दक्षिण थायलंडमधील हात्याई या सर्वात मोठ्या शहरात 2000 मध्ये इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉलेज (आयबीसी) ची स्थापना झाली होती. विविध बौद्ध परंपरांना एकत्र आणण्यासाठी आणि एकमेकांना अधिक चांगल्या रीतीनं समजून घेण्यासाठी या संस्थेला नालंदा महाविहाराप्रमाणेच बनवण्यात आलं आहे.
मलेशियातील कौलांलपूरच्या दक्षिणेकडील बाहेरच्या परिसरात 2007 मध्ये नालंदा इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली होती. देशात बौद्ध अभ्यासाला चालना देण्यासाठी नालंदा महाविहाराच्या मॉडेलनुसार ही संस्था उभारण्यात आली होती.
2007 मध्ये अमेरिकेत जो लोइजो या मानसोपचारतज्ज्ञाकडून 'नालंदा इन्स्टिट्यूट फॉर कंटेम्पलेटिव्ह सायन्स'ची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या प्रेरणेतून स्थापन करण्यात आली होती.
1996 मध्ये कोलंबिया विद्यापीठ आणि वेइल कॉर्नेल मेडिकल कॉलेजमध्ये विचार विज्ञान (कंटेम्पलेटिव्ह सायन्स) मध्ये संशोधन करत असताना त्यांनी याबद्दल विचार केला होता.
आशिया, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये नालंदाच्या वाढत्या पाऊलखुणांच्या या उदाहरणांमधून हे स्पष्ट आहे की आगामी काळात नालंदाची प्रसिद्धी आणखी वाढत जाईल.
द्वेष, राग, नैराश्य, मोह यांना दूर करून आणि अंतर्बाह्य शांतता मिळवण्यासाठी ज्ञान, बुद्धी आणि करुणा यांचा प्रसार करण्याच्या नालंदाच्या प्राचीन पंरपरेची मदत होऊ शकते.
(अभय के. 'नालंदा: हाऊ इट चेंज्ड द वर्ल्ड' या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)